पारंपारिक बेसन लाडू - besan ladoo

Submitted by मेधा on 2 November, 2010 - 11:21
besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा

क्रमवार पाककृती: 

ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती

शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :

हमखास बेसन लाडू :

प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.

बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.

हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)

मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्‍या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.

लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.

कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्‍यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्‌ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्‍या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्‍यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)

काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.

तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
लाडवाक्का :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडी इज म्हणिंग द राइट. अर्ध्या तासात होणारा प्रकार नाही. निदान दीडतास हवाच.
प्रमाण - अर्थातच लाडवांच्या आकारावर अवलंबून. माझे एका किलोत साधारण पंचेचाळीस ते पन्नास बसतात.
(इथे किलो म्हणजेही पावशेराजवळ जाणार्‍या पातेल्याने मोजते मी. वजनी किलोत याच्या आतबाहेर होऊ शकेल हे प्रमाण.)

बरं बरं मी करून बघते अन मग लिहिते वेळ नक्की किती लागला ते. मी दोन वाट्या बेसनाचे करायचा विचार करतेय सध्या .

कृती लिहिण्याची स्टाईल छान आहे शोनू.

पण हे पारंपरीक नवरे कसे असतात व ते कसे ओळखायचे त्याची पण कृती येवु दे. Happy प्रत्येकीचे वेगळे वर्जन असेल ना.. Happy

स्वाती लय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य भारी कृती आहे Happy

माझी लाडू करायची पद्धत अशीच कारण मम्मी अशीच करते.

खरच ,अर्धा किलो बेसन भाजायला एक तासाच्या वर लागतो, आणि त्यापुढे लाडू वळण्याचा कार्यक्रम्.जाम वेळखाउ काम आहे.

कृती लिहिण्याची स्टाईल एकदम खुसखुशीत!
माझी कृतीही जवळपास अशीच, पण काल रात्री लाडु करताना बेसन मळून घ्यायला खूप कंटाळा आला होता म्हणुन मिश्रण Food Processor मधुन काढले, लाडू वळणे एकदम सोपे गेले!

मी पण असेच करते लाडू. आत्ताच केलेत, २५ लाडवांना भाजण्यापासून वळण्यापर्यंत अंदाजे २ तास लागले असतिल.
लिहायची स्टाइल मस्तच. Happy

मेधा,कृती मस्त लिहिली आहेस.
स्वाती, मग बेसन फुलते कसे?कच्चं वगैरे लागत नाही का खाताना?

लाडवाक्का, कृती छान आहे.. पण लिहायला थोडा उशीर केलात हो..
असो, ह्या कृतीने पण लवकरच करण्यात येतील लाडू.. (न करून जाते कुठे.. पोराला प्रचंड आवडतात क्ले लाडू Happy )

बेसन गरम असतानाच साखर घालते >>> ऑ ? Uhoh लाडवांचे पा भा नवरे नाही होत का ?

दूध न घालता मी केले आहेत एकदा (विसरले घालायला :अओ:), कच्चे बिच्चे काही लागत नाहीत बर्का Happy

माझी आई पण दुध न घालता करते. सिंडी म्हणते तसं कच्चे नाही लागत. बेसन नीट बाजलं गेलं तर नाही लागायचे कच्चे.
बाकि स्वाती कृती छान आहे.

उलट एकदम पुर्वी दूध न घालताच करत मी तरी बघितलेय. आईच्या गोव्याच्या मावश्या वगैरे दूध वगैरे नाही घालत पण घरीच चण्याची डाळ दळून जात्यावर वगैरे काढत, ते लाडू काय लागत घरच्याच शुद्ध तूपात.

डाळ सुद्धा घरीच काढत हरभर्‍याची. हरभरा भिजवतात मग वाळवून त्यामुळे डाळ हलकी असायची.
मस्त मंद्गनीवर भाजलेले बेसन काहि वाईट लागत नाही. माझी आजी/आई दूध वगैरे घालून करायला लागली . बाहेरचे/मुंबईचे बेसन चिकट असे आजीचे म्हणणे होते. पण गावी कोण नाही घालत बहुधा. पारंपारीक मध्ये नाही घालत वाटते. असो.

>>बेसन गरम असतानाच साखर घालते >> Uhoh लाडवांचे पा भा नवरे नाही होत का?
सिंडरेला, अगदी छान होतात लाडू. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो लाडू. बेसन गरम असताना साखर घालुन गॅस बंद करते आणि ढवळते. हाताला सोसवेल इतपत गार झाले की मुलाला आणि घरी असल्यास नवर्‍यालाच लाडू वळायला बसवते. Happy

मस्त! मेधा, छान लिहीलीय रेसिपी. मी पण असेच करते बेसनाचे लाडू, मुगाचे पण ह्याच पध्दतीनी करते.

मी आत्ताचं केले बेसन लाडू. थोड्या वेळाने फोटो टाकते. मी लाडू बेसन वापरले होते. धन्यवाद स्वाती आणि मेधा.

DSCN1906.JPG

तीन सपाट कप लाडू बेसन, एक कप तूप, दीड कप ( अर्धा कप शीग लावून ) साखर. केशर अन वेलची. ४ टेबलस्पून दूध . तीस लाडू झाले बरोबर.

माझी आई एकाच हाताने वळते लाडू नेहमी. मी यावेळेस पहिल्यांदा तसे करून पाहिले. ते जरा लहान झालेत आकाराने. पण शेवटी गाडी मूळपदावर आलीच आधी एका हाताने मुठियाच्या आकारात वळून मग दोन्ही हातात फिरवून फिरवून गोल करत वळते मी नेहमी - ते जरासे मोठे आलेत.

अगं फोटोत गडबडआहे. एका चिनीमातीच्या प्लेटमधे ठेवलेले जरा उजळ आलेत फोटोत. पण तो फोटो वाकडा तिकडा आलाय . ४० मिनिटे भाजायला, मग दुध घालून ५-७ मिनिटे. मग जेवण. मग साखर घालून १० मिनिटे, मग मुलांना झोपवून ( थॉमस, मॅजिक ट्री हाउस वाचून ) नंतर वळायला १५-२० मिनिटे.

मीही कालच केलेत.
आधी केले त्यात तूप थोडे जास्त झाले आणि ते बसले.;)
काल जरा कमी तूप घातले ते बरेच कमी झाले असावे.
हात भरून आले, रंग बदलला,छान वास सुटला असे सगळे झाले.
दूध घातल्याबरोबर बेसन शिजून गुठळ्या!
मग मॅशरने मॅश केले.
नंतर धीर सुटला. जवळच राहणार्‍या एका काकूंना फोन केल्याबरोबर देवासारख्या धावत आल्या.
तोपर्यंत डोळ्यात पाणी आलं होतं. काकूंनी मिश्रण बघून "सग्गळं छान करून देते तुला!" म्हणाल्या. मग सगळं मिश्रण तूप घालून, पिठीसाखर, वेलचीपूड, नट्स घालून मळून घेतलं. सुरेख लाडू करूनच गेल्या.
खूपच भारी वाटलं. आता लाडवांची भिती नाही.:)

Pages