मेंदुभिन्नता म्हणजे काय? कशाला समजून घ्यायचे? आपल्याला त्याचे काय?

Submitted by तुष्कीनागपुरी on 19 April, 2025 - 04:05

मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.
किती काळ लोटला याचा अंदाज लावण्यासाठी मनुष्य प्राण्याजवळ अचूक इंद्रीय नाही. बराच वेळ झाला, दोन रात्री गेल्या असे अंदाज फक्त लावता येतात पण तासांमधे किंवा मिनिटांमधे सांगायचे असेल तर आपल्या जवळ नैसर्गिक यंत्रणा नाही.
.
ही एक कमतरता आहे का? याला वैद्यकीय भाषेत बोलायचे झाले तर टाईम मेज्यरिंग डेफिशिएंसी म्हणजेच काल गणना दोष असे म्हणावे लागेल. पण तसे याला कमतरता म्हणून नामांकन व्हायची वेळच आली नाही, कारण मनुष्य प्राण्याने कालगणनेची साधने आणि यंत्रे शोधून काढली. अगदी सनडायल, वाळू भरलेल्या आणि मधून निमुळत्या असलेल्या काचेच्या पात्राने केलेले सॅंडक्लाक पासून आताच्या डिजिटल घड्याळापर्यंत अनेक साधने आपल्याजवळ आहेत. त्याचा वापर करून आपण कालगणना करतो आणि नियोजन करताना त्याचा उपयोग करतो.
.
कोणत्याच मनुष्याला यंत्राविना वेळ मोजता येत नाही हे सार्वभौम सत्य असल्याने वेळ मोजता न येणे ही काही मनुष्य प्राण्याची कमतरता नाही हे मान्य करता येते. त्याच कारणाने त्याला तसे काही दोष म्हणून नामाभिधान झालेले दिसत नाही.
.
मला यातून असे दाखवायचे आहे की आपल्याकडे नैसर्गिक क्षमता नाही आणि तशी क्षमता जगण्यासाठी आवश्यक आहे हे कळले की मनुष्य प्राणी तशी साधने यंत्रे यांचे शोध लावतो आणि आपले जगणे अश्याप्रकारे समृद्ध करतो हे यातून दिसते.
.
तारे जमीन पर या चित्रपटात ईशान या लहान मुलामधे एक सामान्य डोळ्यांना न दिसणारी कमतरता दाखवली आहे, तिला डिस्लेक्सिया म्हणतात. याचे ज्ञान नसणाऱ्या पालकांना तो मन लावून अभ्यास करत नाहीये असेच वाटत राहते. अधिकतर मुले ज्या साधनांचा वापर करून शिकतात ती साधने ईशान साठी कमी पडत असतात कारण ईशान च्या मेंदूची संरचना वेगळी असते, ते समजून घेतले आणि वेगळी साधने त्याला मिळाली तर अधिकतर मुले शिक्षणातले जे टप्पे साध्य करू शकतात ते ईशान देखील करू शकतो हे त्या चित्रपटातले निकुंभ सर पालकांना दाखवून देतात.
.
असा ईशान सारखा डिस्केक्सिया जर सगळ्यांनाच असता तर आपण त्याला दोष म्हटले नसते तर वेळ मोजण्यासाठी जसे आपण घड्याळ शोधले तसेच डिस्केक्सिया साठी देखील साधने आणि यंत्र शोधून काढली असती. ईशान च्या बाबतीत दुर्दैव असे की त्याच्या सारखी मेंदूभिन्नता टक्केवारीमधे कमी लोकांना भेडसावते त्यामुळे अधिकतर लोकांचे व्यवहार बघून जे नियम आणि आराखडे तयार झालेले असतीत त्यांचा त्याला उपयोग होत नाही.
.
मेंदूभिन्नता ही संकल्पना मला मागच्या दोन वर्षातच कळली आणि त्याची ओळख आणि जाणीव आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवी असे वाटते. मेंदूभिन्नता हा शब्द मी मुद्दाम वापरतो आहे कारण मी जे बोलतोय ती भिन्नता हे मूलभूत वेगळेपण आहे, ते शरीराचे दोष नव्हेत. जे दोष मानले जातात त्यांचे निवारण करता येते. भिन्नता जशी आहे तशीच राहणार असते. ते एक वेगळे आयुष्य आहे हे समजून घेणे आवश्यक असते.
.
ज्याप्रमाणे डाव्या हाताने लिहिणे आणि काम करणारी मंडळी आजकाल मान्य केली जातात आणि ती एक भिन्नता आहे हे मान्य केले जाते त्याच प्रमाणे मेंदूभिन्नता पण मान्य व्हायला हवी आहे. मेंदूभिन्नता सामान्य डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे तिचे अस्तित्व समजणे आणि त्यावर विचार होणे सहज होत नाही त्यामुळे त्याकडे खास लक्ष देऊन निरिक्षणातून समजून घ्यावे लागते.
.
मेंदूभिन्नता असते हे कळल्यावर शोध केल्यावर मला अश्या अनेक जागा सापडल्या जिथे स्वतःची भिन्नता लोक लिहून कळवताहेत आणि त्यांच्या आयुष्यातचे संघर्ष आणि अडथळे सांगताहेत. त्यावरून या घटनेची सत्यता समजायला मदत होते.
.
अ‍ॅफॅन्टेशिया साठी नव्यानेच (२०१५ पासून) सुरू झालेल्या संकेतस्थळावर असलेली एक प्रतिक्रिया उदाहरण म्हणून पाहुया: https://aphantasia.com/discussion/94765/my-take/ या प्रतिक्रियेत म्हटलेय:
.
[उद्धरण सुरू]
हो, मी न्यूरोडायव्हर्जंट आहे, चार पट. मला डिस्लेक्सिया आहे, माझ्याकडे SDAM आहे, अ‍ॅफॅन्टेशिया आहे आणि कदाचित ADHD देखील आहे. मी बिघडलेले नाही, मी वेगळी आहे; मी स्वतःकडे प्रगत रूपात पाहते. हेच माझं आयुष्य आहे. मी वर्तमान क्षणात जगते (तास, दिवस, अंदाजे ३ महिनेपर्यंत). माझ्यासाठी भूतकाळ नाही (वैयक्तिक, लोक, घटना), तो खूप लवकर फिकट होतो आणि भविष्यासाठी एक रिकामी, काळी जागा आहे, माझं मन कोरं आहे, एक विशाल शून्यता. तुम्हाला समजणं अशक्य आहे की मी या जगात कसं जगते, कसं अनुभवते. जसं मला समजू शकत नाही की तुम्ही कसं करता.
.
माझ्याकडे अस्पष्ट सूक्ष्म स्मरणे असतात (दृष्य नव्हे, कदाचित एखादा विचार जो नॅनोसेकंदात मोजता येईल) जुन्या घटनांचे तेही अस्पष्ट, फक्त काही तथ्यांचे अंश असतात. मी स्वतःला किंवा दुसऱ्या कुणालाही मनात पाहू शकत नाही, फक्त ते आज जसे आहेत, त्या क्षणातच मला कळतात. मला माझं बालपण, किशोरवय, तरुण वय किंवा तीन महिने आधीची मी कोण होते हे माहीत नाही. माझं कुटुंब, ते देखील तसेच आहेत, ते फक्त आज जसे आहेत तसेच अस्तित्वात आहेत, भूतकाळातील काहीही आठवत नाही.
.
माझ्या लक्षात आलंय की माझ्याकडे असलेले थोडेफार आठवणीचे तुकडे हे खरं तर मी पाहिलेल्या जुन्या फोटोंमधून आलेले आहेत किंवा एका क्षणाची धूसर झलक, ज्यामध्ये कोणताही संदर्भ नाही, कोणतीही जाणिवी रचना नाही, काही अर्थ नाही. जर वेळोवेळी मला वेळ, जागा किंवा लोक यांची आठवण करून दिली गेली नाही, तर ते नाहीसे होतात, ते अस्तित्वातच नसल्यासारखे वाटतात… जणू ते कधीच नव्हते.
.
फक्त तीन महिन्यांत लोक आणि वैयक्तिक घटना पूर्णपणे नाहीशा होऊ शकतात. हाच SDAM आहे. कधीकधी एखादं नाव किंवा घटना आठवते, पण ती एक शरीरविरहित, क्षणिक, संदर्भाशिवाय, रंगाशिवाय, पोताशिवाय, आठवणीशिवाय अशी विचारलाट असते – जी लगेच विरते.
[उद्धरण समाप्त]
.
या वरच्या अनुभवावरून कळते की जगात अश्या काही व्यक्ती असतात ज्यांना अ‍ॅफॅन्टेशिया आहे. अ‍ॅफॅन्टेशिया ही साधारण २०१५ नंतर लक्षात आलेली मेंदूभिन्नता आहे. जगभरातले अनेक व्यक्ती आता हा शोध समोर आल्यानंतर स्वतःला ओळखू शकताहेत.
.
आपण जर बहुतांश लोकांसारखे असू तर आपल्याला ही भिन्नता समजत नाही आणि त्याचा अनुभव पण घेता येत नाही जसे या वरच्या अनुभवात लिहिले आहे. मग तरीही आपण अशी भिन्नता असते हे जाणून घ्यायची काही गरज आहे का? आपल्याला जे नाही त्याची माहिती आणि वर्णन कशाला वाचायले हा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
.
जगात भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाचे लोक जसे राहतात तसेच भिन्न मेंदू संरचने चे देखील लोक राहतात हे समजून घेतले तर आपल्याला जेव्हा समाजात एकोप्याने राहायचे असते, तेव्हा आणि जेव्हा आपला संपर्क अश्या मेंदूभिन्न व्यक्तींबरोबर येतो तेव्हा संवाद साधायला आणि गटात काम करतांना तयार होत असलेली समीकरणे ठरवायला आवश्यक असतो असे मला वाटते.
.
जेव्हा मी अ‍ॅफॅन्टेशिया बद्दल अधिक माहिती मिळवली त्यातून कळले की अ‍ॅफॅन्टेशिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती त्यांच्या मनात दृष्य प्रतिमा किंवा इतर इंद्रियांच्या संवेदना निर्माण करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, काही लोक दृष्य प्रतिमा तयार करू शकत नाहीत, तर काही लोकांना आवाज, वास, चव, हालचाल किंवा स्पर्श यांची कल्पना करता येत नाही.
.
अ‍ॅफॅन्टेशियाचे अनेक प्रकार समोर आले ते म्हणजे
.
1. दृष्य अ‍ॅफॅन्टेशिया: मनात दृष्य प्रतिमा तयार करण्यास असमर्थता.
2. श्राव्य अ‍ॅफॅन्टेशिया: आवाज, संगीत किंवा बोलण्याची कल्पना करण्यास असमर्थता.
3. घ्राण अ‍ॅफॅन्टेशिया: वासांची कल्पना करण्यास असमर्थता.
4. रसना अ‍ॅफॅन्टेशिया: चवीची कल्पना करण्यास असमर्थता.
5. गती अ‍ॅफॅन्टेशिया: हालचालींची कल्पना करण्यास असमर्थता.
6. स्पर्श अ‍ॅफॅन्टेशिया: स्पर्शाच्या संवेदनांची कल्पना करण्यास असमर्थता.
.
ज्या गोष्टी आपण गृहित धरत असतो त्यादेखील करता न येणारे काही लोक जगात असतात आणि त्यांची ती भिन्नता सामान्य डोळ्यांना दिसत नसल्याने त्यांना देखील बरेच वर्षे कळलेली नसते अशी या भिन्नतेची शोकांतिका आहे.
.
हे सगळे माहिती म्हणून नवे असले तरी आपल्याला अशी माहिती वाचायची आणि समजून घ्यायची आवश्यकता आहे का? मला वाटते अनेक वेगवेगळ्या दायित्वांमधून जगतांना आपल्याला एक ना एक मेंदूभिन्न व्यक्तीशी सामना होईल याची शक्यता सहज आहे. काही दायित्वे पाहुया:
.
पालक म्हणून
आपण जर पालक असू तर आपल्या मुलांच्या संगोपनात आपल्याला हे तपासता येऊ शकते की आपल्या मुलांच्या शिकतांनाच्या आणि समाजात वागतानाच्या समस्या मेंदूभिन्नतेमुळे तर नाहीत. वर उल्लेख केलेल्या मन लावून अभ्यास न करण्यामुळे आपली मुले मागे पडताहेत की एखळाद्या मेंदूभिन्नतेमुळे यावर लक्ष ठेवता येते.
.
शिक्षक म्हणून
जर आपण मुलांच्या शिक्षणाच्या प्रवासात कुठेतरी आपल्या व्यवसायामुळे समलग्न असू तर आपल्याला या मेंदूभिन्नतेच्या माहितीचा मुलांच्या समस्यांना सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. एखादा विद्यार्थी का मागे पडतोय याच्या कारणांमधे मेंदूभिन्नता जर कारण असेल तर साधने बदलून पाहण्याचा उपाय आपल्याला करता येऊ शकतो.
.
मित्र, सहयोगी, नवरा किंवा बायको म्हणून
जेव्हा आपल्या मित्रमंडळात अशी एखादी व्यक्ती असेल आणि आपल्या लक्षात आले तर आपण त्या व्यक्तीची सहायता प्रणाली ठरू शकतो. मेंदूभिन्नता या विषयावर चर्चा करण्यापासून, आपली कुठे कुठे सहायता होऊ शकते यावर आपण विचार करू शकरतो.
.
लोकाभिमुख कामे करताना
जर आपण लोकाभिमुख कामे करण्याच्या व्यवसायात असू, जसे प्रशिक्षक, गाईड, कोच, सल्लागार, समुपदेशक किंवा सामाजिक कार्यकर्ता जिथे आपल्याला लोकांशी संवाद साधावा लागतो आणि आपल्याला अनेक लोकांचे निरिक्षण करता येते. आपण जर अनेक लोकांच्यासाठी धोरणे आणि कार्यपद्धती तयार करण्याच्या किंवा करवून घेण्याच्या कामात असू तरीही मेंदूभिन्नता समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे असे मला वाटते.
.
डिस्लेक्सिया, स्वमग्नता, अ‍ॅफॅन्टेशिया, ए.डी.एच.डी यासारखे मेंदूभिन्नता असणाऱ्या व्यक्ती कमतर नसून वेगळ्या असतात आणि त्यांना बहुतांश लोकांसाठी तयार केलेले नियम, पद्धती, आराखडे, युक्त्या, कामी येत नाहीत हे समजून घेतले तर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने तयारी करायला आणि प्रयत्न करायला मुभा देऊ शकतो आणि बहुतांश लोकांप्रमाणेच जगण्याचा स्तर अनुभवण्याची संधी देखील देऊ शकतो.
.
(समाजाचा जागरुक घटक)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, १८ एप्रिल २०२५

Group content visibility: 
Use group defaults

डिस्लेक्सिया, स्वमग्नता, अ‍ॅफॅन्टेशिया, ए.डी.एच.डी यासारखे मेंदूभिन्नता असणाऱ्या व्यक्ती कमतर नसून वेगळ्या असतात आणि त्यांना बहुतांश लोकांसाठी तयार केलेले नियम, पद्धती, आराखडे, युक्त्या, कामी येत नाहीत हे समजून घेतले तर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने तयारी करायला आणि प्रयत्न करायला मुभा देऊ शकतो आणि बहुतांश लोकांप्रमाणेच जगण्याचा स्तर अनुभवण्याची संधी देखील देऊ शकतो>>>>

हल्लीच्या जगात मेंदुभिन्नता असलेली लोकसंख्या वाढतेय. अशा वेळी बाकीच्या लोकसंख्येने त्यांना समजुन घेणे गरजेचे आहे.

परवाच काश्मिरात फिरताना एक अनुभव आला. टुरिस्ट स्पॉटवरची आमची मौजमजा आटपुन परत गाडीकडे जाताना लांबुनच दिसले की पुलाखाली जिथे रस्ता होता तिथे आता तलाव झाला होता. दुपारनंतर बर्फ वितळुन पाणथळ जागा तयार होणे हे तिथे नित्याचेच. एका बाजुने एक झाड आडवे पाडले होते व त्यावरुन हळुहळु, पुलाच्या भिंतीचा आधार घेत लोक जात होते. अर्थात सगळे भारतीयच असल्याने आरडाओरडा, धक्काबुक्की, पुढच्याला मागे ढकलुन आपण पुढे घुसणे वगैरेचा मनसोक्त आनंद घेणेही लोकांचे सुरु होते. आम्हीही त्या गर्दीत घुसुन पुढे जायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात मागुन मोठ्या मुलाचा रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. मी वळुन पाहिले. एक विशीबाविशीचा मुलगा रडत ओरडत होता, खुप घाबरलेला होता आणि सोबतच्या दोन प्रौढांना अजिबात आवरत नव्हता. त्यातील एक त्याचे वडिल असावेत. ते त्याला समजावत पण होते आणि रागवत पण होते. रागवत अशासाठी की आजुबाजुचे लोक ह्या प्रकाराकडे विचित्र नजरेने व रागाने पाहात होते. त्या मुलाला पाहताच तो स्पेशल आहे हे माझ्या व लेकीच्या लक्षात आले. आम्ही आजुबाजुच्या लोकांना हे सांगायचा प्रयत्न केला की त्याला काही कळत नाहीय, तो आवाजाला घाबरतोय, तुम्हाला कळतेय तुम्ही शांत राहा. तो आपोआप शांत होईल. मी शेवटी त्या कुटुंबाला माझ्यापुढे जायला दिले आणि ते व्यवस्थित आडव्या झाडावरुन पुढे गेले.

तो इतरांपेक्षा वेगळा आहे, त्याच्याशी इतरांसारखे धक्काबुक्की, ढकलाढकली करणे उपयोगी नाही, त्याला कळणारे वागणे वेगळे आहे हे तिथल्या उपस्थित लोकांना समजत असते तर त्या मुलाला असा ट्रॉमॅटिक अनुभव आला नसता.

त्याला पाहुन मनात पहिला विचार हाच आला की याला पालक इतक्या दुर, गर्दीत का घेऊन आले? पण लगेच असेही वाटले की मेंदुभिन्नता आहे म्हणुन त्याने घरात कोंडुन राहावे का? त्याला इतरांसारखी बर्फावरील मजा अनुभवायचा हक्क नाही का? बरे झाले पालक त्याला तिथे घेऊन आले.

लेख मस्त.लेखातून बरीच नवनवीन माहिती मिळतेय आणि त्या गोष्टीवर काय करू शकतो याची उत्तरंही.
साधना यांचा प्रतिसादही आवडला. विशेषतः शेवटचा पॅरा. स्पेशल चाइल्ड असलेल्या मुलांना सगळा आनंद मिळायला हवा मग तो फिरण्याचा का असेना आणि लोकांनी त्या ठिकाणी तितका अवेयरनेस आणि समजूतदारपणा दाखवायला हवा.

आवडलं. बरंच रिलेट पण झालं. मला आधी पब्लिक प्लेसेसमधे आकांडतांडव करणारी, प्रचंड हट्ट करणारी, लोळून रडणारी मुलं बघितली की चीड यायची. यांच्या पालकांना कसं कळत नाही किंवा या मुलांना कसं कळत नाही, पालक शिस्त कधी लावणार वगैरे सगळं वाटायचं. आता माझंच लेकरू स्पेक्ट्रम मधलं निघालं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. मुद्दाम नाही करत कुणी. ना ती मुलं ना त्यांचे पालक. परिस्थिती सांभाळून घ्यायला बरेच पेशन्स लागतात. आता हळूहळू आमच्यात ते आलेत.
आपल्याकडे खूप घाई असते लोकांना लेबल लावायची. जे मूल नॉर्मल नाही ते लगेच ॲबनॉर्मल किंवा मतिमंद किंवा वेडं. यापलीकडे आपल्याला काही माहिती नाहीये तर तो आपला वेडेपणा म्हणायला हवा खरंतर.
माझ्या मुलीच्या बाबतीत खूप भीती वाटलेली आधी. लोक काय म्हणतील हा अती सामान्य विचार डोक्यावर नाचत होता. पण मग हळूहळू कळलं की बाकी कुणाचा काही संबंधच नाहीये. आपलं लेकरू आपणच जपायचं आहे. Acceptance is the key. आणि खरं सांगायचं तर ऑटीझम तिच्या आणि आमच्या पथ्यावरच पडलंय. Concentration and focus is her core. खेळात, कलेत किंवा अभ्यासात म्हणा त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे थोडंफार कळायला लागलंय आम्हाला आणि खरंच खूप छान रिझल्ट्स मिळतायत. ही मुलं वेगळी आहेत, कोणापेक्षा कमी नाहीत. ती त्यांचं त्यांचं आयुष्य छान घडवणार आहेत फक्त आपल्याकडून थोडासा सपोर्ट किंवा निदान acceptance हवा आहे.

+786
Awareness वाढेल तेव्हा acceptance च्याही पलीकडे जाऊन लोकांना समजेल की हे gifted आहेत.

नवीन प्रतिसाद लिहा