सेवानिवृत्तीची क्षणचित्रे

Submitted by पॅडी on 9 May, 2024 - 01:41

*सेवानिवृत्तीची क्षणचित्रे*

१/ समारोप

सुरकुतल्या शुभेच्छांचा गंधवर्षाव
कोमेजल्या अभिनंदनाचे हार तुरे
इतिहासजमा कालखंडावर
पहिले अन् शेवटचे गौरवपर भाषण,
सर केलेल्या अत्युच्च शिखरावरून
पेशवाई कटागत; सामूहिकरित्या-
अनाम अंधारदरीत ढकलून दिल्यासारखा
तो आत्मक्लेशी सुवर्णक्षण !

२/ दिनचर्या

पाच पावले रपेट, चार योगासनं
तीन सूर्यनमस्कार
आंघोळ - कपभर चहा...बशीभर कांदेपोहे
निवृत्तिवेतन खात्यास खरडलेले स्मरण पत्र,
जेवण... वामकुक्षी...
फुलझाडांना पाण्याची झारी
भाजीच्या पिशवीची देवळात हजेरी
नातवांचा गलबलाट
प्रतीक्षातूर कंकणांचा किलकिलाट
गजऱ्याचा घमघमाट यत्रतत्र सर्वत्र,
धूळभरल्या आरामखुर्चीत
निरर्थक फडफडणारे
शिळे वृत्तपत्र!

३/ पंचाहत्तरी

अडगळीच्या खोलीत कोंबलेल्या
वयोवृद्ध देहावर साचलेली
कोळिष्टकं जळमटं काढून फेकण्याचा
टोलेजंग दिव्यभव्य सोपस्कार,
पैठण्या, गजरे, तलम वस्त्रालंकार
जीवश्चकंठश्च मित्रमंडळींच्या
वोडकाबीयरबुफेत
ओठंगून गेलेला
एका ज्येष्ठ नागरिकाचा
निष्प्रभ पुष्पहार

४/ वानप्रस्थ
जीर्णशीर्ण आयुष्याचा
कॄष्णधवल अल्बम चाळता न्याहाळताना
घनगर्द कुरळ केसांपासून सुरू होऊन
क्रमाक्रमाने टक्कल पडत गेलेल्या
विगताठवणींच्या परिक्रमेने
पाननपान गहिवरून येते,
तडकू पाहणाऱ्या
ऋणानुबंधांच्या
जाडभिंगी चष्म्याच्या काचा
तडजोडीच्या रूमालाने
घासून पुसून देखील
हळूहळू
‘जवळ’चे ही ‘दूर’ दिसू लागते...
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!
संध्याछाया भिवविती हृदया.