भारत का दिल देखो (पाककृती): उन्हाळी रानभाजी भोकर/ गुंदा

Submitted by मनिम्याऊ on 6 May, 2024 - 06:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भोकराची कच्ची फळे :१५० - २०० ग्रॅम
लहान आकाराची कैरी - १ (एकदम करकरीत , लोणचे घालायला घेतो तशी घ्यावी)
कांदा - १ (मध्यम आकाराचा)
लसूण - ७-८ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - २-३
मोहरी, जिरे, हिंग, धणेपूड, जिरेपूड, हळद, मीठ (सगळे चवीनुसार)
गरम मसाला -१ लहान चमचा
फोडणीसाठी तेल
बारीक शेव - मूठभर

क्रमवार पाककृती: 

भोकर हे आशियात सर्वत्र आढळणारे झाड आहे. विशिष्ट आकाराच्या बोरांएवढ्या फळांमुळे हे लगेच ओळखता येते. उन्हाळा सुरु झाला कि या झाडाला लहान गोट्यांच्या आकाराच्या गोल फळांचे घोस च्या घोस लगडलेले दिसतात.
bhokar fr.png
भोकराच्या फळाच्या आता एक बी असून हे फळ आतून अतिशय बुळबुळीत चिकट असते.

शास्त्रीय नाव - कॉर्डिया डायचोटोमा. मराठीत भोकर व शेलवट, हिंदीत गुंदा, गुजरातीत लासोडा, राजस्थानात रायगुंडो असे नाव आहे. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून त्यामुळे संस्कृत मध्ये याला बहुवर म्हंटले आहे. .

आपल्याला भोकराचे लोणचेच सहसा माहित असते. पण महाराष्ट्रातील झाडीपट्टी भागात तसेच त्याला लागून असलेल्या बालाघाटमध्ये या फळांची भाजी आणि फुलांचा झुणका देखील करतात. आरोग्यास अतिशय गुणकारक असल्याने उन्हाळा सुरु झाला कि आहारात भोकराचा समावेश केल्या जातोच. विशेषतः ऋतूबदलाने सर्दी-खोकला झाला असल्यास भोकर कच्चेच खातात.

असो. भोकराच्या भाजीची कृती पुढील प्रमाणे.

भोकरे स्वच्छ धुवून देठे काढून घ्या.
2_1.jpg
एका मोठ्या पातेल्यात भोकरे बुडतील इतके पाणी घेऊन त्यात किंचित हळद व मीठ घालून उकळायला ठेवा. खूप जास्त शिजू न देता भोकरे जरा नरम झाली कि गॅस बंद करून पाणी काढून टाका .
3_0.jpg

जरा थंड झाली कि एक एक फळ बोटाने हलकेच दाबून आतील बी व चिकट गर काढून टाका.
1.png

बिया काढल्यानंतर २-३ वेळेला पाण्याने धुतले कि सगळा चिकटा निघून जातो.

एकीकडे कैरी किसून घ्या. किसलेल्या गरात जिरे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकून बारीक वाटून घ्या.
कांदा उभा चिरून घ्या.

कढईत फोडणीसाठी तेल तापवून घ्या. तेल कडकडीत तापले कि हिंग मोहरी तड्तडवून घ्या. त्यात चिरलेला कांदा घाला.
कांदा चांगला सोनेरी झाला कि त्यात कैरीचं वाटण घाला. त्यात हळद, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाका. खमंग झाले कि भोकरे घाला. नीट मिसळून घ्या. ४-५ मिनिटांनंतर वरून मूठभर बारीक शेव पेरा. नीट परतून झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्या.
भोकराची भाजी तयार आहे.
ready.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

सेम याच https://www.maayboli.com/node/78762 पद्धतीने भोकराच्या कोवळ्या फुलांचा आणि पानांचा झुणका केला जातो.

माहितीचा स्रोत: 
बालाघाट येथील रहिवासी गीताकाकू.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users