निरोपाच्या कविता

Submitted by पॅडी on 3 May, 2024 - 23:48

* निरोपाच्या कविता *

एक.

मान वेळावण्याआधी
प्राण कंठाशी येतात
न खाल्लेली सुपारी लागते
उंबर्‍यात पाऊल अडते,
ताटातुटीच्या बिकट समयी
नको नको म्हणताना
तेच ते आदिम आर्त नाट्य
आधुनिक युगातही घडते

दोन.

प्रकृतीस जपा
जेवणाचे हाल, रात्रीची जाग्रणे नको
पोहोचताच फोन करा
तुझ्या लक्षवेधी सूचनांची
लांबलचक यादी,
माझे बर्फाच्या तुकड्यागत
स्वत:त विरघळत जाणे
तुझ्या हरणकाळज्या पात्रात
धोक्याच्या पातळीपर्यंत
येऊन ठेपलेली महानदी

तीन.

डोळ्याला फडफडता पदर लावून
हसण्याचा दुबळा प्रयत्न करत
तू रडवेलं होणं टाळतेस,
मग सबंध प्रवासभर
माझ्या ओल्या अक्षरांच्या
पावलात घोटाळतेस

चार.

एरवी
तोलूनमापून बोलणारी तू
जेव्हा
निरर्थक...असंबद्ध बोलू लागतेस,
माझ्या देहभर
शिटीचे पडसाद घुमतात
तुझ्या सैरभैर डोळ्यांत
गार्डची हिरवी झेंडी हलू लागते...
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. निरोप म्हटल्यावर लगेच मृत्यू डोक्यात येतो. आयुष्याच्या एखाद्या संध्याकाळी आसमंत उजळून टाकणाऱ्या संधिप्रकाशात कवी ही ओवी म्हणतो -

वाळल्या ओठां दे | निरोपाचे फूल |
भुलीतली भूल | शेवटली || (बा भ बोरकर)

हपा छान आहे...
बोरकरांची पूर्ण कविता डकवा ना ?

केशवकूल - Happy
रूपाली विशे - पाटील , सहज, भरत, SharmilaR, द सा - आपणा सर्वांचे खूप खूप आभार प्रतिसादासाठी..!
हरचंद पालव - द सांच्या सूचनेला पूर्ण अनुमोदन..! Happy बा भ ह्यांचा तो संपुर्ण अभंग वाचायला आवडेल...! आता डकवाच!
सामो- खूप खूप आभार आपले..