कृपया ह्याची नोंद घ्यावी

Submitted by पॅडी on 29 March, 2024 - 01:00

अखेर आपण आत्महत्या करायची, असा माझा ठाम निश्चय झाला!

खरे पाहता ; माझ्या निधनाने देशाची अपरिमित हानी व्हायला, मी कुणी समाजसुधारक, समाजसेवक नाही. माझ्या मरणाने अवघा देश पोरका व्हायला मी कुणी मुत्सद्दी राजकारणी नाहीये. देशात न भरता येण्याजोगी पोकळी निर्माण व्हायला; ज्येष्ठ तत्वज्ञ, शास्त्रज्ञ नाहीये. औद्योगिक क्षेत्राचा आधारस्तंभ निखळून पडायला, उच्चभ्रू समाजातील उद्योगपती नाहीये. इतकेच काय पण, एखादी बहुमूल्य कला उघड्यावर पडायला; मी कवी, लेखक, चित्रकार, गायक अथवा अभिनेतादेखील नाहीये.

माझ्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी कुठे दोन मिनिटे मौन पाळले जाण्याची तसुभरही शक्यता नाही. शासकिय कर्मचार्‍यांना किंवा सरकारी निमसरकारी शाळांना जाहीर सुटी मंजूर होण्याचा संभाव्य धोकादेखील नाही. आणि म्हणूनच; देशाच्या राज्यकारभारात वा राष्ट्रीय जनजीवनात तीळमात्रही व्यत्यय येणार नाही ह्याची खात्री करून झाल्यानंतरच माझा आत्महत्येचा ठाम निश्चय झाला आहे.

आत्महत्येमागची उद्देशमीमांसा करू गेलो तर खूप काही सांगता येईल. जसे: गरिबी, बेरोजगारी, अपयश, दिवाळखोरी, प्रेमभंग, मानसिक धक्का, असाध्य व्याधी इ. माझ्या बाबतीत वरील कुठलेच कारण लागू पडत नाही ही खेदाची बाब.

गरिबी – नॉट एप्लीकेबल... लहानपणापासून आजी म्हणतेय- बाळ्या; आपल्या घरात गरिबीचा अन् तुझा जन्म एकाच दिवशीचा. तिची कसली आलीय लाज? ‘ ठेविलें अनंते तैसेची राहावे..’ असे संत-महात्म्यांनी म्हटले ते काय उगीच?

अपयश- नेव्हर! यशासाठी कधी झटलोच नाही तर अपयशाचा प्रश्नच कुठे येतोय? .

दिवाळखोरी- रिडिक्युलस!! उभ्या आयुष्यात एक दिवाळीचा बोनस वगळला तर ह्या किरट्या हातांनी कधी पाच आकडी रकमेला शिवलेलं नाही, हे स्टँप पेपरवर लिहून द्यायची तयारी आहे आपली.

प्रेमभंग..? – छे छे, काहीतरीच ! पूजनीय पिताश्रीनी पसंत केलेल्या कन्येच्या गळ्यात वरमाला टाकून आम्ही मोकळे. पूर्वपुण्याईने सासर ही छान मिळालेय.

मानसिक धक्का – नो प्रॉब्लेम! ऑफिसाला जाताना लोकलमध्ये रोज एवढे धक्के खातो की, एव्हाना कसलाही धक्का सहजगत्या पचवण्याची माझी मानसिक तयारी झालेली आहे.

मग एवढे सारे सुरळीत चालू असताना मी आत्महत्या का करतोय, याचे तुम्हाला कोडे पडले असेल. परंतु मी कोडं सोडविण्याच्या भानगडीत मुळी पडणारच नाहीये. मी करणाराय फक्त आत्महत्या!

मृत्यूनंतर जिच्यात जीव गुंतून राहावा अशी एक विधवा पत्नी, लग्नात आंदण मिळालेली चार सहा भांडीकुंडी, बारोमास कुरकुरणारा पलंग, चाळणी झालेले दोन बनियन ( पैकी एक अंगात), मूळ रंग कळण्यापलीकडे गेलेले दोन फूल पॅंट अन् शिवतेवेळी शिंप्याने कडक इस्त्री मारलेले तीन शर्ट्स, एवढाच परिवार मी मागे सोडून जाणार आहे. पण एका निद्रिस्त देशाचा जागरूक नागरिक ह्या नात्याने; इहलोकाची वाट धरण्यापूर्वी कायदेशीर मृत्युपत्र करून, साऱ्या स्थावर-जंगम मालमत्तेची वाटणी करून ठेवणे मी माझे परम कर्तव्य समजतो.

मी लगेच कामाला लागलो.

सगळ्यांची नजर चुकवून, ऑफिसामधून ढापलेल्या A फोर कागदावर, बँकेत कुण्या अनोळखी इसमाकडून फॉर्म भरायला म्हणून घेतलेला अन् परत न केलेला बीनटोपणाचा फडतूस पेन काढून मी लगेचच मृत्युपत्र लिहायला सुरुवात केली:

मी सदाशिव दामोदर ऊर्फ स. दा. उधारे लिहून ठेवतो की , मरणोपरांत माझ्या मालमत्तेची समांतर विभागणी वाटणी खालील प्रकारे करण्यात यावी :
१. पेंशन, ग्रॅच्यूइटी, प्रोविडेंट फंड इ स्वरुपात मिळणारी रक्कम माझ्या पत्नीस देण्यात यावी.
२. राहत्या घराच्या सहा महिन्याच्या घरभाड्याची थकबाकी माझ्या ज्येष्ठ बंधुनी चुकवावी.
३. किराणा भुसारा आणि न्यू बदनाम पान शॉपीची उधारी कनिष्ठ बंधुनी चुकती करावी.
४. ऑफिसच्या टी स्टॉल ची उधारी देऊ नये. कारण तो इब्लिस माणूस; वर्षानुवर्ष रेल्वे स्टेशनावरील चहापेक्षा निकृष्ट दर्जाचे गढूळ, गरम पाणी, तुटक्या कानाच्या कपातून पाजत आलाय. सबब, या परतफेडीस माझा स्पष्ट नकार आहे.
५. चाळी मधल्या हातउसन्याची जबाबदारी माझी पत्नी आपल्या हाती घेईल.
स्वाक्षरी
स. दा. उधारे

मृत्युपत्र तयार होताच मी मनोमन सुखावलो.

आता फक्त आत्महत्या करायला एखादी सोपी पायवाट शोधणे गरजेचे होते.

मुळातच कला शाखेचा पदवीधर असल्याने, विष ‘प्रयोग’ ह्या संकल्पनेवर माझा मुळीच विश्वास नाही. किंबहुना, विषांवरून माझा विश्वास कधीच उठलाय. उदाहरणच द्यायचे झाले तर, ऑल आऊट ने मच्छर मरत नाहीत. रॅट कील केक ने कमी होण्याऐवजी घरोघरी उंदरांची संख्या वाढत चाललीय हा माझा आजवरचा अनुभव. म्हटल्यावर कशाला उगाच विषाची परीक्षा पाहायची?

एखाद्या भरधाव वाहनासमोर उडी मारावी म्हटले तर हल्ली शंभर टक्के मरणाची खात्री देता येत नाही. शिवाय त्या ADAS की कुठल्या तंत्रज्ञानाने सगळा लोचा करून ठेवलाय तो वेगळाच. उगाच आयुष्यभर लुळे-पांगळे होऊन पडण्यात काय अर्थ आहे?

जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत अख्खं आयुष्य काढलेल्या आमच्या चाळीतील घराच्या छताला जळमटाप्रमाणे लटकलेल्या पंख्यास गळफांस लावून घ्यावा म्हटले तर पंख्याबरोबर अख्खं छत खाली यायची भीती!

सरतेशेवटी, आपण रेल्वे रुळावर देह ठेवायचा, हे मी मनाशी ठरवून टाकलं. पण पुन्हा प्रश्न: मीटर गेज की ब्रॉड गेज? गुड्स की पैसेंजर, दुरांतो की वंदे भारत, उत्तर रेल्वे की दक्षिण रेल्वे ?

हा तिढा सोडवायला ; परवा एका भिकाऱ्याच्या थाळीत टाकलेलं अन् क्षणाचाही विलंब न लावता त्याने मोठ्या त्वेषात तेच माझ्या अंगावर परत भिरकावलेलं, अन् मी निमूट खिशात घातलेलं दोन रुपयाचं गुळगुळीत नाणं मदतीला धावलं. हेड्स अँड टेल्स करून - ब्रॉड गेज, पॅसेंजर, दक्षिण रेल्वे, वंदे भारत असं सुटसुटीत समीकरण तयार झालं.

चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४६, ९ एप्रिल, मंगळवार, गुढीपाडवा हा शुभ दिवस मी आत्महत्येसाठी निवडला. अगदी लहानपणापासून रात्रीची मला फार भीती वाटते. उगाच अंधाराचा फायदा घेऊन कुण्या भुरट्या चोराने पै-पैशाच्या अमिषाने प्राणांतिक हल्ला चढवून वा भोसकून ठार मारलं तर काय घेता? त्यापेक्षा दिवस परवडला.

सकाळी उठलो. दाढी करावी की नाही या संभ्रमात मोलाची पाच मिनिटं घालवली. बायकोच्या हाताचा बिन दुधाचा चहा प्यायलो. शेजारच्या बंडूनानांचा पेपर, जन्मसिद्ध अधिकाराने वाचून काढला. पाणी आलं नव्हतं म्हणून ड्राई क्लीन वॉश घेतला. देव्हार्‍यापासून ‘योग्य ते अंतर’ राखत देवादिकांना मनोभावे नमस्कार केला.

बायकोला अखेरचे कुशीत घेण्याची तीव्र इच्छा झाली. परंतु सकाळी सकाळी अंगलट यायचा प्रयत्न केल्यास ती रागाने लटलट कापू लागेल ह्या भीतीपोटी मनातली सुप्त इच्छा तशीच दडपून टाकली. त्राण नसलेल्या पायांत पादत्राणे चढवली. व्यथित अंत:करणाने समारोपाचं बोललो:
‘ निघतो मी- ’

बायको ‘ जा ’ म्हणाली अन् पाणी आलं म्हणताना बादल्या घेऊन, मला बाजूला ढकलत सार्वजनिक नळाकडे पळाली.

मी रस्त्यावर आलो. त्या भव्य चाळीला मनातल्या मनात अखेरचा दंडवत घातला अन् चालू लागलो. थेट रेल्वे रुळांच्या दिशेने.

सकाळ सरली...
सूर्य मध्यान्ही आला...
दुपार टळून गेली...

रुळांवर पडल्या पडल्या मी चौफेर नजर फिरवली. कुणी समविचारी मित्र भेटला तर तेवढीच स्वर्ग लोकापर्यंत सोबत!

गाडी येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. कुणी साथीदारही भेटला नव्हता. लोळून लोळून कंटाळलो होतो. उठून उभा राहिलो. अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागलो.

संध्याकाळ झालेली.

काळ आला होता. वेळ आली होती. तेवढी गाडीच येत नव्हती. या जगात जगण्याप्रमाणेच मरणेही तितके सोपे नाही, ह्याची मनोमन खात्री पटली.

तेवढ्यात शिटीचा खणखणीत आवाज आला. मी कान टवकारले. पाठोपाठ अस्सल ठेवणीतील सणसणीत शिवी:

“ अबे इधर क्या लफ्डा कर रहा हैं, स्साले..?”

मपो !!

माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला.

आपण नेमकं काय करताहोत हे या बहादराला कसं सांगायचं? आत्महत्या कायद्याने गुन्हा.

माझी बोबडी वळली. मोडक्या तोडक्या हिंदी-मराठीत मी गयावया करू लागलो. हाता पाया पडू लागलो. सोडून देण्यासाठी क्षमा याचना करू लागलो. परंतु; सर्वसामान्यांचे ऐकून घेईल तो पोलीस कसला! तो दटावत होता:

“ रेल्वे रूळ पे संशयास्पद अवस्थेत फिरता हैं..बोल क्या मामला हैं..?” हेच पालुपद आळवत होता.

माझ्या झाडा-झडतीमधून कवडीचीही कमाई न झाल्याने त्याचं टाळकं आणखीनच भडकलं . गचांडे देत देत त्याने मला पोलीस चौकीवर नेलं. माझ्या पाठीवर हातपाय मोकळे करून घेतले. रात्रभर डांबून ठेवलं. सकाळी तंबी देऊन सोडून दिलं.

मित्रहो; तेव्हापासून माझी आत्महत्या तूर्तास तहकूब झालेली आहे. कारण आत्महत्येचा शंभर टक्के सुरक्षित अन् यशस्वी मार्ग अजून तरी मला सापडलेला नाही. आपणापैकी कुणाला सापडला असल्यास, अन् त्या प्रयोगात आपण शंभर टक्के यशस्वी झाला असल्यास, त्वरित कळवून मला उपकृत करावे, ही नम्र विनंती.

मार्ग सुचविणारास प्रवासखर्च अन् योग्य ते बक्षीस देण्याची, मी मृत्युपत्रात आगाऊ नोंद करून ठेवत आहे, ह्याची कृपया नोंद घ्यावी...
***

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही अगदी कुठल्याही विषयावर म्हणजे गंभीर पण विनोदी आणि विनोदी पण गंभीर लिहू शकता. सिद्धहस्त लेखक आहात.
चित्रदर्शी....
पिपली लाईव्ह आठवला...

पियू जी - काहीही नव्हे...काहीच्या काही..! Happy प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...!

दसा - साष्टांग दंडवत... आपल्या " चित्रदर्शी " शब्दाच्या प्रेमात पडलोय...! ही झिंग आयुष्यभर राहावी...!! पुनश्च आभार आपले...

माबो वाचक- अभिप्रायासाठी आभार आपले..!

AMIT जी- प्रतिसादासाठी खूप खूप आभार...!

सामो - थँक्स टन्स!!

अनु जी- पोटात खड्डा पडला तुमच्या कमेंट ने..! सीरियसली... Happy

छान.
त्राण नसलेल्या पायांत पादत्राणे, विषाची परीक्षा>> Biggrin

>>>>>>>>पोटात खड्डा पडला तुमच्या कमेंट ने..! सीरियसली...
माझ्याही.
कारण पराचा कावळा करतात सोमिवरती. पण इतकी विनोदी कथा आहे की कोणी रीडींग बिटवीन लाइन्स करणार नाही.
डोन्ट वरी!!

मस्त जमलीये.
शीर्षक आणि विनोदी असं combinatiom वाचून गोंधळ झाला होता. तो लेख वाचून दूर झाला.
Happy

उपाशी बोका - अभिप्रायासाठी आणि सूक्ष्म निरीक्षणांसाठी आभार आपले..!

सामो - आता कुठे जीवात जीव आलाय माझ्या...!! Happy

अतरंगी - खूप खूप आभार...! तसा हा लेखन प्रपंच अतरंगीच म्हणायचा....!! Happy

किल्ली - मनःपूर्वक आभार, धन्यवाद..!

मस्त लिहिलंय..!
एवढा गंभीर विषय पण तुम्ही विनोदी पद्धतीने छान हाताळलायं.