लेखन स्पर्धा २ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश- आशिका

Submitted by आशिका on 26 September, 2023 - 12:50

संयोजकांनी 'फिटे अंधाराचे जाळे'या स्पर्धेनिमित्त जो धागा काढला आहे, तो वाचत असतांनाच त्यात लिहिल्याप्रमाणे 'गतस्मृती' जाग्या झाल्या. हा प्रसंग लिहावा की तो अशी क्रमवारी मनातल्या मनात ठरवली गेली. पण मग पुन्हा विचार करतांना जाणवलं असं की हे प्रसंग काही फार 'इंपॅक्ट' करणारे नाहीतच. त्या वेळी का आपण इतके घाबरलो होतो? अगदी 'अंधाराचे जाळे' पसरलेय असं वाटण्याइतपत 'पोटेंशियल' नाही ब्वा या प्रसंगात. त्यामुळे हा नको, तो नको करता करता सगळेच बाद होऊ लागले की.... इतके की जाऊ दे आपल्या आयुष्यात फारसं काही 'हॅपनिंग' घडलंच नव्ह्तं त्यामुळे या स्पर्धेत नकोच भाग घ्यायला, या निष्कर्षापर्यंत पोचले मी. त्याच नेमक्या वेळी जाणवलं ते हे की त्या त्या प्रसंगांतून सहीसलामत बाहेर पडल्यावर आज मला त्रयस्थपणे विचार करतांना 'यात काय एव्हढं' असं वाटतंय.... पण तेव्हाचं काय? ......तेव्हा याच प्रसंग, परिस्थिती, संकटांनी जेरीस आणलं होतं, यातून सुटेपर्यंत सगळे दरवाजे बंद झालेत आपल्यासाठी हेच ठळकणे अधोरेखित होत होतं . एकूण काय तर हे 'अंधाराचे जाळे' त्यात अडकून पडणे वगैरे व्यक्ती, स्थळ-काळ, परिस्थितीसापेक्ष आहे. जे मला पूर्वी खूप अडचणींचं वाटतं होतं, ते आता तितसकंसं वाटत नाहीये ... मग त्या प्रसंगाची पुसटशीही कल्पना नसणार्‍या व्यक्तीला तर ते अजिबातच मनाला भिडणार नाही.

व्यक्ती तितक्या प्रवॄत्ती, प्रत्येकाची सामाजिक, वैचारिक पार्श्वभूमी वेगळी !! त्या अनुषंगाने विचार केला असतां मात्र मला अगदी प्रत्येकाचं नित्याचं जगणंही चॅलेंजिंग वाटू लागलं. 'नवा दिवस - नवं आव्हान असंच' !

अगदी लहानपणीचं आठवणारं 'पहिलं संकट' म्हणजे आईला सोडून, घरचं सुरक्षित विश्व सोडून पहिल्यांदा शाळेत जाणे.... शाळेच्या त्या अविश्वसनीय दुनियेतून, तिथल्या माणसांपासून पुन्हा आपल्या आश्वस्त विश्वात येण्यासाठी, सुटका करुन घेण्यासाठी केलेली रडारड….., काही लगेच शाळेत रुळले असतील, काही नाही, पण ही घालमेल , तगमग थोड्याफार प्रमाणात सर्वांनीच अनुभवली असते. काही दिवसांनी त्या नव्या दुनियेची सवय होते, मित्र मैत्रिणी, खेळणी, गाणी यांचे आकर्षण म्हणा किंवा कितीही विरोध केला तरी इथे यावं लागत आहेच म्हणून 'पत्करलेली शरणागती' म्हणा, ते विश्व 'अ‍ॅक्सेप्ट' करावं लागतंच. एकदा का ते अ‍ॅक्सेप्ट केलं, सवय झाली की "आकाश मोकळं' झाल्याचा फील येतो.

थोड्याफार फरकाने प्रत्येक नव्याची सुरुवात अशीच असते, नाही का? आधी अज्ञातात प्रवेश, नव्या वस्तू/परिस्थितीशी अनभिज्ञ असणे, मग ठेचकाळणे, चाचपडणे असं करता करता, नवं जे आहे ते आत्मसात करणे, त्याची सवय करुन घेणे अर्थात त्यात 'मास्टरी' येणे म्हणजेच अंधाराचे जाळे फिटून मोकळे आकाश होणे. एकदा का त्या कलेत /विद्येत मास्टरी आली की ते आपल्याला आवडू लागतं, करायला उत्साह येतो. पण काही दिवसांपुरतंच. एकदा ते सवयीचं झालं, अंगवळणी पडलं की ते एकसुरी होतं, नीरस, रटाळ वाटत रहातं. या धाग्याच्या संबंधी संयोजकांनी हेच लिहिलंय की साधे, सरळ, सुरळीत, अडचणी नसलेले जीवन म्हणजे मिठाशिवाय बनवलेले चवहीन जेवण असते. असे जीवन जगण्यात मजा नसते. आयुष्यात येणारे एक एक अडथळे पार करत, येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांच्यावर मात करणे हाच सुखी आणि समाधानी जीवनातील एक भाग असतो.

दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर आपला 'कंफर्ट झोन' सोडून सतत नव-नवी आव्हानं स्वीकारत, नवनवी क्षितीजं पादाक्रांत करण्यासाठी तत्पर असणे हे सुद्धा फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश याची एक बाजू नव्हे का? फरक इतकाच की हे अंधाराचं जाळं स्वत: स्वतःभोवती विणून घेतलेलं असू शकतं......समोर खुणावणारे मोकळे, नीरभ्र आकाश कवेत घेण्यासाठी.

काही वर्षांपूर्वीपर्यंत एक साधी सुरक्षित सरकारी नोकरी मिळवणे हीच जीवनाची 'इतिकर्तव्यता' असं मानलं जाई. एकदा त्या सरकारी कचेरीत चिकटलेली व्यक्ती, नाकासमोर चालत त्याच ठिकाणी पस्तीस एक वर्षे नोकरी करुन सेवानिवृत्त होत असे.पण काळ बदलू लागला. सुरक्षित सरकारी नोकरीपेक्षा जिथे स्वतःची स्किल्स, पगार दोन्ही बाबत 'ग्रोथ पोटेंशियल' आहे, त्या संधी स्वीकारल्या जाऊ लागल्या. मग त्यासाठी आपली जन्मभूमी सोडून इतर ठिकाणी स्थलांतरीत होऊन तिथली भाषा, संस्कॄती, अन्नपाणी आत्मसात करणे हेही या ओघात केले जाऊ लागले आणि आता हे नित्याचंच झालंय. दर दोन ते तीन वर्षांनी जॉब चेंज, कमीत कमी जॉब प्रोफाईलमध्ये बदल, नव नवे स्किल्स आत्मसात करत रहाणे, स्वतःला अपग्रेड करत रहाणे हीच गरज बनून गेली आहे. स्वतःची प्रगती साधायची असेल तर अज्ञाताला कवेत घेणे अर्थात अंधाराच्या जाळ्यात स्वतःहून शिरुन ते फाडून मोकळ्या आकाशात अर्थात रुंदावलेल्या कक्षांत स्वतःला सामावून घेणे हीच जगरहाटी झाली आहे आणि ही स्वागतार्ह अशी बाब आहे.

जेरियाट्रीक मेडीसिन या शाखेत वृद्धांत दिसून येणारे डिमेन्शिया, अल्झायमर असे विस्मृतीसंबंधित आजार टाळायचे असल्यास आपला मेंदू हा सतत कार्यरत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.मेंदू तल्ल्ख, कार्यरत ठेवण्यासाठी त्यालाही व्यायामाची गरज असते. मेंदूचे व्यायाम म्हणजे अशा गोष्टी करणे ज्याची आपल्याला सवय नाही. उदा. पाठमोरे चालणे, डोळे मिटून आंघोळ करणे, अंधारात चालणे, पाण्याच्या आवाजाचा अंदाज घेऊन नळाखाली बाटली भरणे (न बघता) इ. या सर्व गोष्टी करणे म्हणजे पुन्हा तेच आलं ना..... अडथळींचा सामना करुन त्यावर मात करणे. ... आणि हो वर उल्लेख केलेली जी क्रिया आपण मेंदूचा व्यायाम म्हणून करत आहोत, त्यात एकदा का 'मास्टरी' आली की ते सोडून दुसरं नवं हाती घ्यायचं बरं का.....

तर हा मी माझ्या परीने 'फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश' या संज्ञेचा केलेला उहापोह. आपल्यातील प्रत्येकाला ही अशी नवनवी क्षितीजे खुणावत राहोत आणि ती पादाक्रांत करुन सर्वांना मोकळे आकाश लाभो ही त्या 'बुद्धीदात्याकडे' मनोभावे प्रार्थना !!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहेस आशिका

@सामो तुझा लेख उत्तम आहे. त्यात झाकोळलेल्या आकाशाचे वर्णन आहे पण त्यावर मात करत बाहेर पडण्याचेही आहे. तुझाही लेख वेगळ्या प्रकारे आशावादच दर्शवतो. आणि सोपे नसते असेही लिहिणे

छान लिहिले आहे आशिका.
कम्फर्ट झोन ईझ मोस्ट डेंजरस झोन असे म्ह्टले जाते. साचलात तरी डबके व्हाल, प्रवाही झाला तर ठेचकळायची भिती राहणारच. चॉईस आपापली.. पण आयुष्य कधी थांबत नाही.

मुळात हे सर्व उघडपणे मांडणे हेच मोठे धाडस आहे जे इकडे भल्या भल्याना जमलेले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी घटना घडलेली असतेच , फक्त ती जाहिरपणे मान्य करणे ह्यासाठी मनाचा खंबीरपणा लागतो आणि तो आहे ह्याचाच अर्थ आता आकाश नुसते मोकळे झालेलेच नाहीये तर निरभ्र आणि प्रकाशमान आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल घडवण्यास सदगुरु तत्व बहुमोल भूमिका आपल्या आयुष्यात घडवत असते आणि त्याची प्रचिती म्हणजे सामो ऋ आणि आता हां तुमचा लेख.

३ही लेखात प्रखर संग्राम आणि लढाऊ व्यक्तिमत्वा सोबतच जिंकण्याची उमेद दिसून आलीय ती इतराना सुद्धा कायम प्रेरणादायकच ठरणारी आहे त्यामुळे कोणीच इकडे डावे उजवे नसून सर्वच लेख छान आहेत.

>>>>अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल घडवण्यास सदगुरु तत्व बहुमोल भूमिका आपल्या आयुष्यात घडवत असते
हे वाक्य मनाला इतकं स्पर्शून गेले आहे अज्ञानी. हा असा विचार कधीच सुचला नव्हता. आपले अनंत धन्यवाद.

धन्यवाद सर्वांना.

सामो -=अज्ञानींनी लिहिल्याप्रमाणे सो मी वर आपल्या आयुष्यातील घटना उलगडून दाखवणं यालादेखील हिंमत लागते. तुम्ही, ऋन्मेष, हा आ यांनी ती दाखवली.त्यामुळे या सदरातील आधीचे हे 3 लेख दीपस्तंभ झालेत, याच मार्गावर अजूनही ठेचकाळत राहणाऱ्याना मार्ग दाखवणारे .
खरं तर या सदरात स्पर्धा नकोच असं वाटतं. मी माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाचं आयुष्य 'एकमेवाद्वितीयच' आणि म्हणून महत्वाचंच!!

अभिनंदन आशिका !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

लेखन स्पर्धा २- फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश - तृतीय क्रमांक - आशिका.jpg