वाटुली

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 July, 2023 - 06:14

गवतामधून ठुमकत मुरडत
शिरते वाट माळरानात
धुरकट धुरकट भवताल असा
भरकटली वाट चकवा जसा

डोळे चोळत वाट थांबली
गर्जना कसली कानी पडली
धुक्यात दूरवर एक निर्झर
कड्यावरून मारतो सूर

लपवितो निर्झर खोल घळीत
चांदीचे सुंदर आभूषण
ठेचाळला जरी खडकावर
करी खळाळत मार्गक्रमण

डहुळले अंतरंग डोहाचे
उमटले तरंग सुखदुःखाचे
करूनी पार त्या वलयांना
वाहते जळ ते पुढे सदाचे

काठावरचे फूल गोजिरे
जळी पाहते रुप साजीरे
गंध भारला तो खळखळाट
भुलूनी तया थबकली वाट

झ-या संगे नाचत गेली
वनवेडी वाटुली गोडुली

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसा
काय प्रेमाने लिहिलंय.
झ-या संगे नाचत गेली
वनवेडी वाटुली गोडुली
जाऊ द्या तिला. तिला तिची वाट मिळाली आहे. नांदा सौख्यभरे! अस म्हणा आणि निरोप द्या.

केशवकूल
वावे
मनीमोहोर

खूप धन्यवाद...

>>>>खूप सुंदर कविता...
शब्दसंग्रह छान आहे तुमचा..!>>>>

रूपालीताई तुमचा प्रतिसादही खूप सुंदर आहे... धन्यवाद

हल्ली तुम्ही लिखाण थांबवलय का?

हल्ली तुम्ही लिखाण थांबवलय का?>> धन्यवाद दत्तात्रेयजी, आठवणीने विचारलंत..
बराच खंड पडलायं लेखनात... आज लिहिते उद्या लिहीते असं करता उद्या अजून उजाडतच नाहीये.. सध्या वाचनालयातली पुस्तक आणून वाचायचा सपाटा लावलाय.. वाचनावर थोडा भर देतेयं. तुमच्या प्रश्नाने लेखनाचा हुरूप वाढलायं मात्र..!

>>>पुस्तक आणून वाचायचा सपाटा लावलाय.. वाचनावर थोडा भर देतेयं. तुमच्या प्रश्नाने लेखनाचा हुरूप वाढलायं >>>>

वाचनही तेवढंच गरजेचं आहे...मी रियाज समजतो वाचन, श्रवण, निरिक्षण, चिंतन आदी ला.
एखादं लिखाण जेवढा वेळ घेतं तेवढी चांगली कलाकृती घडवतं . शुभेच्छा....