"दमयंति गो दमयंति, खय असा गो. ता कृष्णकमळीक फ़ूला नाय ती." सुगंधामामी ओसरीवरुन ओरडली. "फ़ूलं नहित ग मामी, पण वेलावर ना फ़ळे आहेत छोटी " दमयंति तिथूनच ओरडली. अप्पामामा पण तिथेच होता. तो लगबगीने आला. खरेच कि, वेलीवर छोटी छोटी फ़ळे होती. त्याने पूर्वी कधीच बघितली नव्हती. मामी पण आली. तिची पूजा खोळबंली होती ना. तिनेपण कधी बघितली नव्हती फ़ळे ती. पण मामीला वेळ नव्हता. ती चाफ़्याची फ़ुले वेचू लागली. दमयंति पण वेचू लागली. उन्हाळ्यात मामाकडे आली कि सगळी फ़ुले बघून ती हरखून जात असे. कृष्णकमळीची निळी सुगंधी फ़ूले तिच्या खास आवडीची. त्यातला तो कृष्ण, पाच पांडव आणि शंभर कौरव याचे तिला फ़ार अप्रूप वाटे. शाळेत दाखवायला म्हणून तिने एकदा सुकवलेली फ़ुले पण नेली होती. पण तोपर्यंत पांडवांचा पाडाव झालेला होता. तिच्या जोशीबाईनी पण त्या फ़ूलांचा वेल मागितला होता. मामा तर म्हणत होता, कि या वेलाची फ़ांदीच लावतात. एवढ्या लांबच्या प्रवासात फ़ांदी कुठली तग धरायला ? पण आता फ़ळे होती म्हणजे बियापण येतील. मग नक्की आपल्याला वेल रुजवता येईल, शाळेत. आणि त्या माधुरीलापण ढेंगा दाखवता येईल. दमयंति मामाला एस्टीत बसेपर्यंत त्या बियांचीच आठवण करुन देत होती.
***
आज सगळे हैबतरावांच्या माजघरात जमले होते. हैबतरावाना अख्खा गाव तात्या गवळी म्हणून ऒळखत होता. त्यांची उभी हयात, गायी म्हशीना संभाळण्यात गेली होती. नाही म्हंटलं तरी चार कमी पन्नास वर्षे तरी गावात रतीब घालत होते ते. गावातले पैलवान त्यानीच पोसले होते. घरावर दोन माड्या चढवल्या. निव्वळ चार्यासाटी म्हणून त्यानी पाच एकर जमिन खरीदली होती. घराजवळ आणि शिवारात दोन बोअर मारले होते. पाण्याला काही कमी नव्हती. अजय आणि विजयला पण त्यानी तयार केले होते. थोरला अजय तर गुरांचा डॉक्टर झाला होता. धाकटा विजय तसा हुनरीचा. हैबतरावानी पंचक्रोशीत नाव कमावले होते, पण विजयची स्वप्नं मोठी होती. त्याने गावात पंचवीस तरी गायी म्हशी घ्यायला लावल्या होत्या. ज्याना गरज होती त्याना बॆंकेकडून कर्ज मिळवून दिले होते. गावातल्या गावात एवढे दूध खपणे शक्यच नव्हते. विजयने मग खवा करायच्या भट्ट्या लावल्या. गावातल्या महिलाना रोजगार मिळाला. मोठ्या मागण्या येऊ लागल्या, तसे अनेक तरुण या धंद्यात उतरू लागले. पण गेल्या दहा पंधरा दिवसापासून जरा वेगळाच प्रश्ण निर्माण झाला होता. गावातल्या गायी म्हशी अचानक पान्हा चोरू लागल्या होत्या.ज्या घरात वीस लिटर दूध जमा होत होतं तिथे दोन लिटर मिळायची मारामार होती. घरातल्या मूलाबाळानाच काय आल्यागेल्या पैपावण्याच्या चहाला पण दूध मिळत नव्हते.
आधी अजयला वाटले कि काहीतरी रोगाची साथ आली असेल. पण तशी गुरांची तब्येत उत्तम होती. चारा पण व्यवस्थित खात होत्या. जिथे वासरे पाडसे होती, तिथे त्यांच्यासाठी व्यवस्थित पान्हा होता. पण एरवी मात्र धार काढायला गेलं कि पान्हा चोरत होत्या. अजयला तर जरा जास्तच काळजी होती, कारण एरवी तपासणीसाठी सहकार्य करणाया गायीम्हशी शिंग रोखू लागल्या होत्या. खरं तर गावभरच्या गाय़ीम्ह्शी त्यानेच संभाळल्या होत्या.
हार्मोन वगैरे द्यायच्या विरोधात तो होता. कुणी चोरून देत असेल, असे त्याला वाटतही नव्हते. हैबतरावांच्या समोर सगळे बावचाळून बसले होते. घराची, पोराबाळांच्या शि़क्षणाची स्वप्न विरून जातील कि काय, असेच सगळ्याना वाटत होते.
***
"तू जा पैले, तेरे अब्बूके परिंदे ढूंढके ला" फ़ातिमाबी जावेद्ला सांगत होती. " अब्बी दो चार दिनोमे आयेंगे तो उनको दिखने होना. आत्तेच पूछे तो ".
" बोल दे, जावेद खा गया कबाब बनाके" जावेद परेशान होत म्हणाला. " एक तो अब्बू कि खीट्खीट और उप्परसे इन परिंदोकी गुटर्गू. एंजिनीयरींग का फ़ायनल इयर है ना मेरा. पढने आया हु. अब्बूनेही तो बुलवाया था. बोले कि इत्तासा रूम तेरा, और उसमे चार लोगां. घरहीच आज्जा तो पढाई के वास्ते "
फ़ातिमाबी ला हसू आवरेना. " अरे इत्तेसे परिंदे, क्या बिगाडते तेरा. और उन्हे नही गुटर्गू करे तो क्या तू करे. कही तेरी माशूका कि तो याद नही आ रहेली. "
" तूबी ना. अब्बू को क्या पडी इन परिंदोकी ? फ़ालतू की मगजमारी. उन्हे दाना पानी दो, ये दो , वो दो. इस्से तो मुर्गिया पालते. बैदे देगी और ना दे तो काटके खा जाये. " जावेदने बोलून गेला.
" ऐसे नही सोचते बेटे. अल्लामियाने क्या कम दिया है हमे ? दो चार दाने परिंदेने खाभी डाले तो क्या. अल्लामिया खुद तो नही ना सबको दानापानी दे सके. हमसे कराते है. देख औलाद नही दी तो तूझे भेज दिया. " फ़ातिमाबीचे डोळे भरुन आले, " अब्बी लायेगा तू उने, के मैहीच निकल पडू ? " तिने शेवटचे सांगितले.
जावेदने चारच दिवसांपूर्वी कबुतराना हाकलून दिले होते. त्यांच्यासाठी ठेवलेला बॉक्सहि काढून ठेवला होता.वाचत बसले कि त्यांची मस्ती सुरु. त्या दिवशीतर पुस्तकावरच शीट पडली. मग त्याने वैतागून त्याना हाकलूनच लावले. तो त्याना शोधायला बाहेर पडला. या परिंद्याची जातच हरामी. कायम घराच्या वळचणीला. बाकिच्या परिंद्यासारखे झाडावर बसणारच नाहीत कधी.
तेवढ्यात त्याला त्याच्या डोक्याजवळ फ़डफ़ड झाल्यासारखे वाटले. हो तीच जोडी ती. पण ती तर उडून चक्क समोरच्या झाडावर जाउन बसली होती. लाल लाल डोळ्यानी त्याच्याकडे रोखून पहात होती. त्याना परत कसे आणायचे, याचा विचार करत तो उभा राहिला.
***
पिशवीत बटाटे भरुन चित्रा स्टॆंडवर आली खरी, पण तिचे मन काही ठिकाणावर नव्हते. सगळ्या काकाकाकूंचा विरोध पत्करुन तिला पप्पानी पूढे शिकू दिले होते. नुसती शेतकी पदवीधर होऊन ना तिचे समाधान झाले होते ना त्यांचे. तिने पंजाबराव कृषि विद्यापिठात संशोधन करुन, बटाट्याची संकरीत जात तयार करायला घेतली होती. त्या काळात तिच्यावर लग्नासाठी खुप दबाव आणला जात होता. पण तिचे पप्पा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
तिचे संशोधन पूर्ण झाल्यावर सगळीकडे त्याच वाणाची शिफ़ारस विद्यापिठ करणार होते. पप्पानीच आपली सुपीक अशी चार एकर जमिन तिला प्रयोगासाठी दिली होती. त्याना टिश्यू कल्चर वगैरे नवीन होते, पण त्यासाठी लागणारे सर्व काहि तिला त्यानी उपलब्ध करुन दिले होते. रोपे तरारून आली प्रयोगशाळेत. लावणी झाल्यावर देखील खुप जोमाने वाढ झाली. गावकरी सगळे बघून जात असत.
पण एकाएकी काहीतरी बिघडले आणि पिकाला भरमसाठ फ़ुलोरा आला. हे तसे जरा विचित्रच होते. फ़ुलानंतर तर छोटी छोटी फ़ळे धरु लागली होती. चित्राने पटकन निर्णय घेऊन कापणी करुन टाकली. बटाटे तयार झाले असतील अशी शक्यता जरा कमीच होती, पण तरीही तिने नांगरट करवून जमिन उकरली होती.
अपे़क्षेपेक्शा बटाटे खुपच छोट्या आकाराचे होते. तसे ते निरोगी होते पण साल जाड होती आणि आत हिरवेपणा जास्त होता. या सर्व काळात तिचे पप्पा तिला धीर देत होते. मोठ्या काकूने खवचटपणे नैवेद्याला बटाटे मागितले होते, पण या बटाट्यात सायनाईड्चे प्रमाण जास्त असावे अशी चित्राला शंका होती. तिचे निरसन करुन घ्यायला आणि प्रा. गायकवाडाना भेटण्यासाठी ती विद्यापिठात निघाली होती. पप्पानी गाडीने जा म्हणून सांगितले होते, तरी ती हट्टाने बसनेच निघाली होती.
योगायोगाने त्याच बसमधे तिला प्रसाद भेटला. तो पण विद्यापिठात निघाला होता. संशोधन काळात ते दोघे अनेकवेळा भेटले होते. तशी खास मैत्री नव्हती ओळख होती इतकेच. तो गव्हावर संशोधन करतोय ते तिला माहित होते. पण त्याच्याशी बोलल्यावर मात्र तिच्या लक्षात आले कि त्याचाही अनुभव असाच विचित्र होता. अगदी वजनदार गव्हाच्या दाण्याची अपे़क्षा असताना, तयार झालेले दाणे अगदी हलके होते. पाखडताना तर ते चक्क हवेवर उडत होते. विद्यापिठाच्या वजनाच्या मानकात तर ते अजिबात बसत नव्हते. प्रा. गायकवाड काय म्हणताहेत याचीच त्याना खुप उत्सुकता होती.
****
"मम्मी सी व्हॉट ब्राऊनी हॅज डन. देअर इज ब्लड एव्हरीवेअर" बेडरुममधून अमांडा किंचाळली तसा क्लॅरीसच्या काळजाचा ठोकाच चुकला. हातातले काम टाकून ती धावत गेली. अमांडा बेडवर अवघडून बसली होती. सकाळीच बदललेल्या गुलाबी बेडशीटवर लाल काळे डाग पडले होते. ब्राऊनी तिचा लाडका कुत्रा कुठे दिसत नव्हता. अमांडानेच खुणेने सांगितले कि तो बेडखाली आहे. क्लॅरिसने आधी अमांडाला उचलून घेतले. बेडरुमच्या बाहेर येऊन तिने दरवाजा घट्ट बंद केला. तशीच ती शेजारच्या रोझारिओ आंटिकडे गेली. तिला बोलायला शब्दच सूचेना. आंटिने तिला आधी बसवले. पाणी प्यायला लावले. थोडा दम घेतल्यावर क्क्लॅरिसने सर्व सविस्तर सांगितले. खरे तर तिच्या काहि लक्षातच आले नव्हते. मग तिला आठवले कि बेडरुमधे फ़्लोअरवर पण ब्लड्स्टेन्स होत्या. अमांडाला तिथेच बसवून त्या दोघी घरी आल्या. दरवाज्यातून क्क्लॅरिसने ब्राऊनीला हाक मारुन बघितली, पण मग बेडरूमचे दार आपण बंद केल्याचे तिच्या लक्शात आले. ते उघडायचा तिला धीर होत नव्हता. मग त्या दोघी व्हिक्टरला घेऊन आल्या. त्याने हॉकी स्टिक हातात घेतली. क्लॅरिसने हळूच दरवाजा उघडला.
तिने प्रेमाने ब्राऊनीला एकदोनदा हाक मारली प्रतिसाद आला नाही. फ़्लोअरवर बरेच रक्त पडले होते. ब्राऊनीलाच काही दुखापत झाली असेल असे समजून क्लॅरिस बेडखाली बघू लागली. तर तिला बघून ब्राऊनी गुरगुरु लागला. मग व्हिक्टरने हॉकी स्टिकने त्याला ओढायचा प्रयत्न केला तर तो एकदम अंगावरच आला.आणि सरळ धावतच सुटला. जिना उतरून तो बिल्डिंगमागच्या ओढ्यात शिरला, आणि पलीकडे जाऊन दिसेनासा झाला. व्हिक्टरने बेडखाली स्टीक घालून काहितरी ओढून काढले. एक छोटे कुत्र्याचे पिल्लू होते ते. ब्राऊनीने त्याचा जीव घेतला होता.
ते बघून क्लॅरिसला एकदम मळमळू लागले. ब्राऊनी त्यांचा सगळ्यांचाच लाडका होता.अमांडाच्या फ़र्स्ट बर्थडेला तिला गिफ़्ट म्हणून मिळाला होता तो. अगदी छोटासा होता तो. ती पण त्याच्याशी मजेत खेळत असे. त्याच्या अंगावर झोपत असे.तो जरासा मोठा झाला तर त्याच्या पाठीवर पण बसत असे. त्याने तिच्यावर कधीच नाराजी दाखवली नव्हती. आंटी तिला नेहमीच कॊशस करत असत. पण तिचा ब्राऊनीवर खूप विश्वास होता.
त्याची खूप काळजी घेत असे ती. खास त्याच्यासाठी बेड, टॉईज होत्या. त्याच्यासाठी खास डॉग फ़ूड पण आणत असे ती. खुपच हेल्दी होता तो.
त्याने घरात कधी घाणही केल्याचे तिला आठवत नव्हते.
मग तिला आठवले, गेले दोन दिवस तो काही खात नव्हता. असा अधून मधून तो उपाशी रहात असे. म्हणून तिने लक्ष नव्हते दिले. पण त्याला बाहेर जाऊन शिकार करायची काय गरज होती. ते सुद्धा कुत्र्याचेच पिल्लू ? अगदी छोटेसे होते ते.
हॅज हि गॉन मॅड ? ओह माय गॉड म्हणत तिने अमांडाला जवळ घेतले. आता तो परत आला तरी ती त्याला घरात घेणार नव्हती.
***
रेगेकाकींचा श्री शांतादूर्गेचा नवस फ़ेडायचा कितीतरी वर्षे राहून गेला होता. नातीसाठी बोलल्या होत्या म्हणून तिला घेऊन जाणे भाग होते, नाहीतर त्या काय, कधीच जाऊन आल्या असत्या. यावेळी मात्र त्यानी हट्टच धरला. दोघी तर दोघी, पण जाऊन येउ, असे म्हणत त्या वर्षाच्या मागे लागल्या. शेवटी त्या निघाल्याच. देवस्थानात रहायची सोय होतीच त्यांची. गाभार्यात बसून त्या डोळेभरुन देवीकडे पहात बसल्या. अगदी शेजारती होईपर्यंत त्या तिथेच बसून होत्या.
वर्षाला मात्र धीर नव्हता. तिने बाहेर जाऊन जाम, करमळे जे मिळेल ते खाऊन घेतले. आपण इतकी वर्षे का इथे आलो नाही असेच तिला वाटले. एवढा रम्य परिसर. कुठलीही गर्दी नाही कि भिकारी नाहीत. आजूबाजूचा परिसर किती रम्य.
तिने देवळासमोरच्या बागेतली फ़ुले बघायला सुरवात केली. आणि ताटली एवढे जास्वंदीचे फ़ूल बघून ती वेडीच झाली. लालभडक रंगावर पिवळी नक्शी. तिने मुंबईत असे फ़ूल कधी बघितलेच नव्हते. आज्जी बाहेर आल्यावर, तिने त्या झाडाची फ़ांदी मागून घ्यायचा हट्ट केला. रेगेकाकीना अगदी संकोच वाटला. तर वर्षानेच थेट ट्रस्टींच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली. तशी काहि हरकत नव्हती त्यांची.
वर्षाने ती फ़ांदी खास कुंडी आणून तिच्यात लावली. खास कल्चर आणून मुळावर फ़वारले. त्या फ़ांदीने लगेच जीव धरला. खरे तर गरज नव्हती, पण फ़ुले मोठे होण्याचा पण स्प्रे तिने मारला. फ़ांदीला आणतानाच एक कळी होती. यथावकाश तिचे ताटलीएवढे फ़ूल झाले. रेगेकाकीना पहिले फ़ूल म्हणून देवाला वहायचे होते, पण वर्षाने ठाम नकार दिला. जास्वंदीचे फ़ूल एका दिवसातच कोमेजते, असे सांगून पाहिले, पण ती ऐकेना. दुसर्या दिवशी ती धावत कुंडीजवळ गेली तर फ़ूल जसेच्या तसेच होते. रेगेकाकीना जरा नवलच वाटले. शाळेत परागीभवन शिकवताना त्याना फ़ुले लागत, पण ती दुपारच्या आत कोमेजून जात. मग त्या मुलाना खास प्रयोगासाठी म्हणून सकाळी बोलावत असत. दुसर्या दिवशी सकाळी ते फ़ूल गळून पडले.
एरवी या फ़ूलाचा देठही झाडावर रहात नाही, पण या फ़ूलाचा देठच नव्हे तर पुष्पकोषही झाडावर राहिला होता. आता नातीच्या उत्साहानेच त्या झाडाचे निरिक्षण करु लागल्या. साधारण कापसाच्या बोंडासारखे फ़ळ धरु लागले होते त्याला. पण एके दिवशी ते अचानक पिवळे होऊन गळून गेले. वर्षा खुप हिरमुसली.
रेगेकाकीनाही उत्सुकता होतीच.
त्याना आठवले त्यांचे एक सहकारी शिक्शक रिटायर झाल्यावर एक संस्था चालवत होते. फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज, असे काहितरी नाव होते. एका प्रदर्शनात ते भेटले होते त्यावेळी आवर्जून पत्ता दिला होता. डायरीतून त्यानी तो शोधून काढला. फ़ारसे लांब नव्हते त्यांचे घर. दुसयाच दिवशी त्या भेटायला गेल्या, वागळेसराना.
सर एकटेच होते. कसलातरी रिपोर्ट तयार करत होते. रेगेकाकी ओशाळल्या. आधी फ़ोन करुन यायला हवे होते, असे वाटले त्याना. वागळेसर मात्र त्याची गरज नव्हती असे म्हणाले.
" म्हातारपणी वेळ चांगला जातो हो, संस्थेच्या कामात. खरे तर तूम्हीही यायला हवे. तूम्ही जीवशास्त्र शिकवत होता ना. आम्हाला चांगली मदत होईल. " ते म्हणाले.
रेगेकाकी म्हणाल्या, " यायला आवडेल हो मला. जमवेनच, पण आज एका खास कामासाठी आले होते". असे म्हणत त्यानी रुमालात गुंडाळलेले जास्वंदीचे फ़ळ सराना दाखवले.
सर ते निरखून पाहू लागले, व म्हणाले, " जास्वंदीचे दिसतेय.म्हणजे याचाही विश्वास उडाला तर मानवजातीवरचा "
"म्हणजे काय म्हणताय तूम्ही ?" रेगेकाकीना नीट उलगडा झाला नव्हता.
" तूम्ही बातम्या बघता कि नाही ? गायी म्हशी दूध देत नाहीत. कबूतरं घराच्या वळचणीला रहात नाहीत. कुत्रे शिकार करु लागले आहेत.सीडलेस द्राक्शात बिया तयार होऊ लागल्यात. चिकूचा गोडवा कमी होतोय. बर्याच बातम्या येत असतात. " वागळेसरानी विचारले.
" हो येत असते कानावर काहितरी. पण त्याचे काय एवढे ? " काकीनी विचारले.
" दिसतय तेवढे साधे नाही हे. आजवर हे प्राणी, पक्षी, मानवाच्या आधाराने सुखाने जगत होते. मानवाला आणि त्याना एकमेकाच्या सहवासाची इतकी सवय झाली होती, कि हे प्राणी स्वतंत्रपणे जगूच शकत नाहीत. " सर म्हणाले.
" आणि या फ़ुलांचे काय ? " काकीनी विचारले.
" त्यांचेही तसेच. आता या जास्वंदीचेच घ्या. तूम्ही शाळेत मुलाना फ़ुलांचे सर्व भाग शिकवण्यासाठी हे फ़ूल वापरता. फ़लधारणेसाठी आवश्यक ते सर्व या फ़ूलात आहे. पण तरीही या झाडावर फ़ळे दिसत नाहीत. याचे कारण काय असेल बरं " सरानी विचारले. काकींच्या चेहयावरचे भाव बघत, ते पुढे म्हणाले, " अहो या झाडाला कधी त्याची गरजच वाटली नाही. तूम्ही याच्या फ़ांद्या रोवता. काळजी घेता. भरपूर प्रजा वाढतेय त्यांची. मग काळजी कसली ? कुत्र्यांचे बघा. हा मूळचा जंगलातला प्राणी. शिकार करुन पोट भरणारा. आजच्या कुत्र्याना सगळे आयते मिळतेय. मुद्दाम कुणी दिले नाही तरी उकिरडे आहेतच. काय गरज पडलीय त्याना शिकार करायची ? कबूतराना घरांच्या वळचणीला सुरक्षित वाटतेय. ते कशाला झाडावर घरटी बांधतील ? "
" मी कधी असा विचार केला नाही " काकी म्हणाल्या.
" आता विचार करायची वेळ आलीय. पर्यायच नाही. आता बटाटा घ्या. तयार बटाट्याचे तूकडे करुन त्याची लागवड करतात. निसर्गत: हे शक्य आहे का ? गहू हे तर गवत. सगळ्या गवतांच्या बिया वायासवे उडतात. पण पिकवलेला गहु असा वाया जाणे तूम्हाला परवडणार नाही. मग तूम्ही तो जड करुन ठेवलात. आता तूम्हि पेरल्याशिवाय गहू उगवणारच नाही. फ़ळांमधे बिया असणे अगदी नैसर्गिक, पण तूमच्या घश्यात अडकतात, म्हणून तूम्हाला त्या नकोत. निसर्गात फ़ळातील साखरेचे प्रमाण मर्यादित असते. तूम्ही ते वाढवून ठेवता. " सरांचा आवाज नकळत चढला होता.
" म्हणजे हा सगळ्याचा सूड घेताहेत का ते ? " काकीनी शंका काढली.
" तूमच्या जीवशास्रात शिकवतात ना, कि वंशसातत्य ही एक आदीम प्रेरणा असते जीवांची म्हणून, त्यालाच अनूसरुन वागताहेत ते. " सरांचा स्वर जरा तिरकस लागला.
" पण आपण तर त्यांची जोपसनाच करतोय की " काकी म्हणाल्या.
"त्याचीच खात्री वाटेनाशी झालीय त्याना आता. मानवाची खात्री वाटत नाही त्याना आता. " सर म्हणाले. काकी जरा गोंधळल्याच.
" ज्याच्या भरोश्यावर रहायचे, त्या मानवाचाच वंश टिकेल असे त्याना वाटत नाही. आपले आपणच आता जगायला हवे, असे त्याना वाटतेय. आणि त्याना तूमचा धर्म, तूमचे राजकिय विचार, तूमचा पक्ष, याच्याही काहि देणेघेणे नाही. केवळ मानव म्हणून बघतात ते तूमच्याकडे." सर म्हणाले.
" पण एवढा विचार करु शकतात का ते " काकीना अजूनही सरांचे म्हणणे पटत नव्हते.
" केवळ मानवप्राणीच विचार करु शकतो हा भ्रम आहे आपला. मानवाच्या मेंदूच्या तूलनेत त्यांचा मेंदू लहान असेल. झाडांचा मेंदू कुठे असतो हेच आपल्याला माहित नाही. पण तो असतो. साधी मगर घ्या. एक निव्वळ सरपटणारा प्राणी. पण अंडि घातल्यापासून अगदी नेमक्या चाळिसाव्या दिवशी पाउस पडणार हे त्याना कसे कळते. का आपण असे म्हणायचे कि पावसाचा नेमका अंदाज घेउनच मगर अंडी घालते. पावसाचा एवढा नेमका अंदाज तर इतके उपग्रह सोडून, इतक्या वेधशाळा उभारुन मानवाला घेता येत नाही. निव्वळ पाने शिवून घरटे बांधणारा शिंपि पक्षी. पण त्याची पिल्ले मोठी होऊन उडेपर्यंत ते पान गळणार नाही हे त्याला कसे कळते. आजही आपल्याला हिमालय सहज पार करता येत नाही. पण त्याचे सर्वोच्च शिखर पार करत लाखो पक्षी स्थलांतर करतात. त्यापे़क्षा छोटेसे फ़ूलपाखरु घ्या. केवढा असेल त्याचा मेंदू, पण तेही हजारो किलोमीटर स्थलांतर करु शकते. खरं तर आपणच विचार करु शकत नाही. किंवा करत नाही असे म्हणू. " सर म्हणाले.
" कसला विचार सर ? " काकीनी विचारले.
" नदीच्या उगमापाशी राहणार्यानी, संपूर्ण नदी स्वाहा करुन टाकलीय त्याचा विचार. प्रवाहाच्या खालच्या दिशेने राहणायांचा विचारच केला नाही कधी आपण. सत्य हे, मी मुद्दामच सुदैव म्हणत नाही, तर सत्य हे कि आपण कालाच्या ओघात आधी जन्मलो. जी चिऊकाऊची गोष्ट ऐकत आपण पहिले घास जेवलो, ती चिऊ आज दाखवायलाही शिल्लक नाही. उद्या वाघ राहणार नाही. परवा मोर नष्ट होईल. आपण हा कालाचा प्रवाहच आटवून टाकला. प्रचंड अपराधी वाटतय मला. या नव्या पिढीचा घोर अपराध केलाय आपण" सर निराश स्वरात बोलले.
" पण तूमची संस्था यासाठीच काम करतेय ना ? " काकीनी धीर द्यायचा प्रयत्न केला.
" कोण आहे हो आमच्या संस्थेत ? माझ्यासारखीच आणखी दहाबारा पिकली पानं. निव्वळ भाषणं करतो आम्ही ऐकायलाच कुणी नसतं. अजून नाही फ़ारसा उशीर झालाय. थांबवता येईल हे सगळं. पण आम्ही थकलो आता. प्रत्यक्ष काही करायचे त्राण नाही आमच्यात. काय करणार आम्ही ? " सर फ़ारच निराश झाले होते.
काकी म्हणाल्या, " कधी आहे तूमची सभा म्हणालात ? मी भेटते प्रिंसिपल साहेबाना. शाळेत सभा घेता येईल का ते बघते. नाहीच जमलं तर, जमतील तितक्या मुलाना मीच घेऊन येते."
समाप्त
सही! मला
सही!
मला बाबा आवडली! आणि मुलांन जागृत करावे हे ही आवडले!
दिनेशदा कल्पना एकदम मस्त!
चांगली आहे
चांगली आहे कथाकल्पना! गेल्या वर्षी पाहिलेल्या श्यामलन च्या 'द हॅपनिन्ग' ची आठवण आली . कन्सेप्ट साधारण अशीच, पण जास्त व्हायोलन्ट.
छान कथा.
छान कथा. आवडली.
दिनेश, मला
दिनेश,
मला तुझी लिहिण्याची पद्धत आवडली. किती सहजतेने वेगवेगळी शब्दचित्रे उभी करतोस. व्वा!
शरद
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा;
कल शब, मौसमकी पहली बारिश थी! 'परवीन शाकर'
छान कथा.
छान कथा. आवडली .
मस्त,
मस्त, आवडली.
दिनेशदा,
दिनेशदा, आवडलीच. वेगवेगळ्या घटना लिहूनही शेवटी इतक्या सुरेख रितीने ते प्रसंग बांधले गेलेत....
जाईजुई म्हणतेय तसं मुलांना ह्या शिक्षणात ओढणं किती महत्वाचं ते ही आवडलच.
कथा आवडली.
कथा आवडली. कथाबीज वेगळेच आहे.
'ते' जे काय करतात त्यात ठरवून केलेला विचार असतो का ? 'संगणक विचार करतो' असे जितपत म्हणता येते तितपत 'ते'ही विचार करतात, असे आपले सध्याचे मत आहे. असो.
नदीच्या मुखाशी राहणार्यांनी पुढे राहणार्यांचा विचार न करणे... अगदी अगदी. बुद्धी, हास्य वगैरे जाऊ दे, हे असले अप्पलपोटेपण मानवजातीची खरी खासीयत आहे.
***
Entropy : It isn't what it used to be.
आवडली ! छान
आवडली ! छान कथा.
-----------------------------------------
सह्हीच !
दिनेश खुप
दिनेश खुप सुंदर आहे हो कथा. किती सहज, सोप्या शब्दात इतक्या महत्वाचा विषय हाताळलात तेही त्याचं महत्व कमी न होउ देता! पुन्हा सर्व धर्म समानतापण
त.टी.शेवटचं वाक्य मजेत आहे, ते तसंच घेतलं जावं. (मायबोलीवर माझं बरच वाचन आहे ह्याचा परिणाम/पुरावा ?)
वेगळी आणि
वेगळी आणि सुंदर कथा.
छान
छान कल्पना. आवडली.
पण आधीच्या प्रसंगात जितकं सुंदर डीटेलिंग केलंय, त्या मानाने शेवटचा विवेचनाचा आणि तोडग्याचा प्रसंग थोडा उरकल्यासारखा वाटला, अजून थोडा मोठा चालला असता.
-----------------------------------
Its all in your mind!
वेगळा
वेगळा पॅटर्न, वेगळा विषय. आवडली कथा
प्रतिक्रि
प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार.
पीएस्जी, एस आर के, हा आक्षेप मला मान्य आहे. पण तोडगा अजून कुठे निघालाय ? मी काही सूचवेन, एवढी माझी कुवतही नाही. पण निदान काहितरी समस्या आहे, याचा विचार करणे आता आवश्यक आहे, नाही का ?
इथले जे प्रसंग आहेत, त्यापैकी कुणालाच या समस्येचे स्वरुप कळलेले नाही. सुगंधामामीला पूजेसाठी फ़ूले हवीत तर दमयंतिला शाळेत मिरवण्यासाठी. फ़ातिमाबीला निव्वळ धार्मिक कारणांसाठी कबूतरे पाळायची आहेत.क्लॅरिसला फ़क्त अमांडाचे खेळणे म्हणून कुत्रा हवाय. गावकर्याना पैसा मिळवायचे साधन म्हणून दूध हवेय. चित्रा आणि प्रसाद थोडे हताश आहेत, पण त्यानाही पूर्ण आकलन झालेले नाही. त्यांच्या हेतूत वाइट काहीच नाही, पण समस्येचा व्यापक स्तरावर विचार नाही.
वागळे सरांकडे वर्षा गेलेली नाही. हे सर्व जण सुशिक्शित असून त्याना जाण नाही आणि वागळे सराना हेच सलतेय.
समजा समस्येचे आकलन झाले तरी, त्यावर धार्मिक वा राजकीय असे उपाय योजले जातील. जे बोलायला सोपे असतील, काही ठराविक व्यक्तींचा लाभही करुन देतील. ( कुणी महाराज जगबूडीपासून वाचण्यासाठी स्वत:च्या नावे बिल्ले विकतो, तसेच ) पण कुठल्याही समस्येचा यापेक्षा व्यापक विचार नाही करू शकत.
बीबीसी च्या एका सिरियलमधे बघितले कि, दलाई लामानी आवाहन केल्यावर अनेकजणानी फ़र वापरणॆ सोडून दिले. अनेक विचारवंताना याचा खूप आनंद झाला. धर्माच्या नावाने का होईना, काहितरी घडतेय ना, याचे त्याना समाधान वाटले, पण त्याचवेळी पाकिस्तानातील एका प्राधापकाने ( पाकिस्तानातील हिमालयात, एक अत्यंत दुर्मिळ अशी वाघाची प्रजाती आहे, आणि ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ) या देशात धर्माचा असा काहि उपयोग होऊ शकणार नाही असे सांगितले.
स्लार्टी. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अगदी किटकांच्या बौद्धिक क्षमतेला आपण नेहमीच कमी लेखले आहे. मधमाश्या करोडो वर्षे इंटरलॉकिंग डिझाईन वापरताहेत पोळ्यासाठी पण आपल्याकडे रस्त्यावर या इंटरलॉकिंग टाईल्स अलिकडेच आल्या.
साधी वाळवी, अगदी नैसर्गिक साधने वापरून, पूर्णपणे वातानुकूलीत वारुळ बांधते. ते सर्व प्रकारच्या हवामानात टिकू शकते, आपल्याला साधलय का ते ?
नेहमीच्या बघण्यातले आंब्याचे झाड. वर्षभर थोडीथोडी पाने गाळून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करते. आपल्याला जमलय का ते ? जर आंब्याच्या जीनमधेच हे व्यवस्थापन आहे असे मानले तर आपल्याकडे वर्षातून एकदाच फ़ळावणारा आंबा आफ़्रिकेत दोनदा का फ़ळतो ? म्हणजे प्रत्येक झाड, स्वत:च हे ठरवते का ?
कदचित त्यांची विचार करण्याची रित वेगळी असेल. त्याना प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा काळ जास्त असेल. सगणकाच्या आज्ञाप्रणालीनुसारच तो विचार करणार. आणि ती प्रणाली आपण निर्माण केलीय. मग "त्यांची" कुणी केली. ( देवाने ? ) ती अपडॆट कोण करतं ?
एका प्रकारचे किटक तब्बल १७ वर्षे कोषावस्थेत असतात. कारवी नेमक्या ७ वर्षानी फ़ुलते. अंडी उबवताना, अनेक पक्षी तपमान नियंत्रित करतात. कमी जास्त असेल तर उपाय योजतात. कसे मोजतात ते ?
या अश्या बुद्धीमान प्राण्याना, आणखी किती काळ मानव गुलाम बनवून ठेवू शकेल ?
दिनेश दा
दिनेश दा खुप विचार करायला लावणारी कथा, अगदी "अवशेष" सारखीच
दिनेश, अहो
दिनेश, अहो मी कसलाही आक्षेप घेतला नाहीये. उलट इतक्या महत्वाचा विषय साध्यासोप्या शब्दात हाताळलात ही खुप मोठी गोष्ट वाटतेय मला. व्यापकता कळावी म्हणुन प्रसंग हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, शहरी, खेड्यातल्या अश्या वेगवेगळ्या लोकांभोवती बांधलेत हे लक्षात आलचं आहे. तेव्हा प्लीज गैरसमज करुन घेउ नका.
मस्त
मस्त कल्पना आहे आणि ती गोवलीये पण छान. फक्त एक - 'नदी मुख' ह्याच्या ऐवजी 'नदीचा उगम' असे हवे होते. नदीचे मुख म्हणजे नदी सागराला मिळण्याचे ठीकाण.
दिनेश, तो
दिनेश, तो ठरवून विचार नसतो, हे जनुकीय ज्ञान आहे. ते मुळांत जनुकांत कोठून आले ? तर उत्क्रांतीतून. त्यांत त्यांच्या बुद्धीमत्तेचा काहीच संबंध नाही. ते विचार करतात आणि तसे बदल घडवून आणतात हे अवैज्ञानिक विधान होय. programming जे झाले ते या उत्क्रांतीतूनच. या उत्क्रांतीतूनच अंडी उबवणार्यांना अतिशय संवेदनशील तापमानसंवेदन लाभले आहे, पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय गुणधर्माचे अतिशय सूक्ष्म संवेदन करू शकतात, इ.
>>> जर आंब्याच्या जीनमधेच हे व्यवस्थापन आहे असे मानले तर आपल्याकडे वर्षातून एकदाच फ़ळावणारा आंबा आफ़्रिकेत दोनदा का फ़ळतो ? म्हणजे प्रत्येक झाड, स्वत:च हे ठरवते का ?<<<
याचे कारण तिथे ते जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून. तिथे एकदाच फळणारा आंबा काही कारणाने 'निसर्गतः' जगू शकला नाही. दोनदा फळणे हे आवश्यक ठरले. 'आता एकदा फळून काही जगत नाही, तर दोनदा फळून बघावे' हा विचार आंब्याचे झाड करत नाही. (असे केले तरच त्या झाडाने 'ठरवले' असे म्हणता येईल.) तर random genetic mutations मधून असे करणारी झाडे निर्माण झाली. तीच का तगली अन् एकदा फळणारी का नाही ? तर एकदा फळणार्या झाडांपेक्षा या दोनदा फळणार्या झाडांकडे काही survival advantage होता म्हणून. दुसरे म्हणजे ही दोनदा फळणारी जात जनुकीयदृष्ट्या वेगळीच असू शकते.
गॅलापगोस फिन्चेस हे एक अतिशय गाजलेले उदाहरण आहे. बेटावरील खाद्यपरिस्थिती बदलल्यावर त्यांच्या चोचीचा आकार बदलला, परत मूळ झाला. आता चोचीतले हे बदल ते पक्षी विचार करून करतात असे नव्हे, तर उत्क्रांतीच्या जबरदस्त रेट्याने ते केले. माध्यम होते जनुकीय बदल आणि विशिष्ट जनुके कार्यरत राहण्याचे कालखंड.
genetic mutations याइतकेच, किंबहुना काकणभर जास्त महत्त्वाचे genetic expression असावे असे आता शास्त्रज्ञांना वाटते. म्हणजे कुठले जनुक कधी व किती काळ कार्यरत राहते यावरून मोठाच बदल घडतो. एक दाट शक्यता अशी की सर्वच आंब्याच्या झाडांमध्ये दोनदा फलधारणेचे जनुक असतील, आफ्रिकेत उत्क्रांतीच्या रेट्यामुळे ते जनुक प्रभावी झाले.
म्हणजे कारवी बरोबर ७ वर्षांनी फुलणे हेसुद्धा ७ हा आकडा त्यांना कळतो म्हणून नाही, तर तेवढा काळ त्या झाडाला फुलायला लागतो. वाळवी वातानुकुलित वारूळ बांधते कारण तसे न बांधणार्या वाळवीच्या जमाती टिकूच शकल्या नाहीत. मधमाशांनी इ. १ली पासूनच interlocking डिझाईनवाली पोळी बांधली नाहीत, तर त्यांच्यातल्या ज्या जमाती असे बांधू लागल्या, त्यांची पोळी जास्त सुरक्षित व मजबूत ठरली, ती जमात टिकण्याला survival advantage मिळाला. ते ज्ञान त्यांच्या अस्तित्वाचा भाग झाले. मग मुळातच त्यांना 'अशी पोळी/वारुळे बांधावीत' हे तरी कसे सुचले ? तर हे ज्ञान जनुकीय आहे... random mutations मुळे सर्व प्रकारची पोळी बांधण्याचा प्रयत्न केला गेला असणार, परंतु गोल डिझाईनची पोळी बांधलीच जाणार नाहीत. असे असेल तर interlocking design हा बदल घडायला वर्षानुवर्षेच जावी लागतात असे नाही, उपरोल्लेखित फिन्चेसच्या चोचीतील बदल एकेका वर्षात झालेले आहेत.
बुद्धी, विचार करणे, ठरवणे यात कदाचित तुम्हाला instinct असा अर्थ अपेक्षित असावा.
***
Entropy : It isn't what it used to be.
दिनेश विषय
दिनेश विषय एकदम वेगळा.. मांडणी एकदम वेगळी.. आवडली खुप.
पण तरीही एक वाटलं ते वाटत ते, शेवटचा परीच्छेद अजुन वाढवायला हवा होता असं मला वाटतं. म्हणजे रेगेकाकींचा संवाद. त्यामुळे त्यांना नेमकं काय वाटतं, आणि त्याद्रुष्टीने त्यांचे मुलांना आणण्याचे प्रयत्न नेमके का आहेत हे जास्त स्पष्टतेने आलं असतं.
अर्थात हे माझं मत आहे.
पण कथा मनापासुन आवडली.. विषयासकट.
---------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पे क्युं है क्यु......
मलाही विषय
मलाही विषय आवडला.. वेगळा आहे.. मी असा विचार कधीच केला नाही.. विचार करायला लावलंत!
( हॅपनिंगही पाहावा आता.. )
स्लार्टी,
स्लार्टी, छान विवेचन.
मला आपलीच झाडे वेगवेगळ्या ठिकाणी बघायची खोड आहे. आपल्याकडचा जो साधा चाफा असतो ना त्यालाच केनयात भरपूर शेंगा येतात. आपल्याकडे येत नाहीत. याची एका आजीकडून ऐकलेली कथा म्हणजे, या शेंगा सर्पदंशावर जालीम उपाय असतात, आणि आपला शतृ जगू नये म्हणून रात्री सर्पराज येऊन त्या खूडून टाकतात.
हि कथा अगदी शास्त्रीय सत्य नाही. पण मला या सगळ्या प्रकारात, आपण अन्याय करतोय असे वाटत राहते. वेगवेगळ्या कुत्र्यांच्या जाती बघून असे वाटते कि कदाचित निसर्गात असे घडू शकणार नाही. आणि हे प्रयोग पुढे आपल्याच अंगाशी येतील असे वाटते.
बाकि आफ्रिकेतला आंबा, आपल्या आंब्यासारखाच लागतो. म्हणजे कच्चा असताना.( पिकल्यावर खाल्ला कि हटकून रत्नागिरीच्या मावशीची आठवण येते ) ते लोक कच्चा खात नाहीत. म्हणून माझी चंगळ असते.
पण तरीही जनूकीय बदलाचा, एखादा क्षण असेलच ना ? तोच तर मला पकाडयचा होता.
झाडांच्या विचारशक्तीबद्दल, मराठीत निळू दामले यांचे एक छान माणूस आणि झाड, असे पूस्तक आहे. इंग्लिशमधेही डेव्हिड अटेनबरोचे, द प्रायव्हेट लाईफ ऑफ प्लान्ट्स, असे एक छान पूस्तक आहे. जनुकिय ज्ञान आणि बुद्धी, फार वेगळे करता येतील का ?
एस आर के, मला राग वगैरे नाही आलाय. पण उलट मी जे जाणीवपूर्वक केलेय, ते लक्षात आले, म्हणून आनंदच झाला. जगबूडी आली तरी ख्रिश्चन लोग त्यातून वाचतील, असा प्रचार इथे सर्रास केला जातो. त्याला अनूसरुन.
माधव, चूक सुधारतो आता.
आता हॅपनिंग बघावा लागेल. पण मला नाही वाटत, कि हा विषय, इतक्या क्रुरपणे मांडावा. मला हि कथा सूचायला, बीबीसी ची लिव्हींग प्लॅनेट हि सिरीज कारणीभूत झालीय.
जनुकिय
जनुकिय ज्ञान आणि बुद्धी, फार वेगळे करता येतील का ? >>
survival साठी जे आवश्यक आहे ते जनुकीय ज्ञान. म्हणजे, भूक लागली की खाणे, शत्रू आला की पळून जाणे किंवा त्याच्यावर वार करणे, प्रजनन करणे, इत्यादि. जनुकीय ज्ञान सोडून जे काही ज्ञान आहे ते मिळविणे म्हणजे बुध्दीचा वापर करणे. उदा. मानवाने आपली बुध्दी वापरुन निसर्गातील बर्याच नियमांचा शोध लावला आहे. या निसर्गनियमांचा त्याच्या survival साठी काही उपयोग नाही (म्हणजे, ते असून नसून काही फरक पडत नाही). त्यामुळे जनुकीय ज्ञान आणि बुध्दी हे वेगळे आहेत असे मला वाटते.
वा स्लार्टी, खरंच छान विवेचन.
पण मग डार्विनचा हा उत्क्रांतीवाद मानवांनापण लागू होतो का? म्हणजे genetic mutations मुळे विचार करता येऊ शकणार्या मानवांच्या प्रजाती टिकल्या आणि इतर नष्ट झाल्या का? तसे असेल तर विचार करता येऊ शकणार्या मानवांच्याच प्रजाती का निर्माण झाल्या? इतर species मध्ये का निर्माण नाही झाल्या?
माफ करा दिनेश, मी इथे तुमची जागा वापरुन प्रश्न विचारतो आहे. पण विषय अतिशय इंटरेस्टिंग असल्याने राहवले नाही.
छान कथा,
छान कथा, दिनेशदा. आवडली. असे बदल निसर्गात बर्याच ठिकाणी आढळून येताहेत.
दिनेशदा,
दिनेशदा, मस्तच... जावेदची अम्मी आवडली मला.
मस्त
मस्त गोष्ट. खुप आवडली.
*****&&&*****
What others think about me is none of my business
सुरेख
सुरेख मुद्दा व यावर थोडी चर्चा आणखी वाढली तर कदाचित आमच्यासारख्या वाचकांचा फायदाच होईल. उत्क्रांती, जीन्स वगैरे च्या चर्चा जेव्हा आपण करतो तेव्हा शेवटी प्रश्न उरतोच की का ? ही उत्कांती अशीच का किंवा हे जीन्स असेच का ? खर तरं हा फार व्यापक मुद्दा आहे आणि एकदा चर्चेला घेतला तर त्याला अनेक फाटे फुटतील. उदाहरण द्यायचं झाल तर वीज दिसत नाही पण तिच्यामुळे चालणारा पंखा दिसतो. अशा न दिसणार्या अनेक गोष्टींनी जे आपलं जग व्यापलं आहे त्याचा किती जण विचार करतात हा त्याच्या पुढचा प्रश्न. न संपणारी मालिका ही.
दिनेश तुमचे आभार. हा विचार मांडल्याबद्दल.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
ज्याना
ज्याना ऑर्किड्सची आवड आहे त्यानी, बी ऑर्किड बघितली असतील किंवा त्याबद्दल वाचले असेलच.
एकतर तसे बघायला गेलं तर ऑर्किड हि दूसर्या झाडाच्या आधारानेच वाढते. फारच थोडी थेट जमिनीवर वाढतात.
तर या ऑर्किडचे फूल, एका खास माशीची नक्कल करते. हि नक्कल केवळ रंगरुपाची नाही, तर गंधाचीही. हे फूल खास मादीचा गंध निर्माण करुन, नराला आकर्षक करते. नर बराच वेळ झटापट करतो या फुलाशी, पण लवकरच झालेली फसवणूक त्याच्या लक्षात येते. अशी फसवणूक झालेला नर, मग दूसर्या फुलाकडे कसा जाईल ? तर त्यासाठी हे फूल, जरा वेगळा गंध तयार करते, ज्यामुळे नराला दुसरी मादी असल्यासारखे वाटते.
हि माशी तर किटक वर्गातली, उडू शकणारी. मग फूल त्याची नक्कल कशी करणार, तर अगदी लवचिक आणि लांबलचक देठ निर्माण करुन, माशीच्या उडण्याचाही आभास केला जातो. हे सगळे अचानक घडलेले नाही. पण एका टप्प्यावरुन दुसर्यावर जाताना, काहितरी "विचार" झालाच असेल ना.
हे वास तयार करणे, परागकण निर्माण करणे, निव्वळ साखरेचे पाणी पाजून, आपले परागीभवनाचे काम करुन घेणे, यामागे अनेक पिढ्यांची तपश्चर्या आहे, असे मला वाटते. आपल्याकडे साधारण पाणथळ जागी, एक गुलबट जांभळ्या रंगाचे फूल दिसते. ते तर खोटे परागकणहि निर्माण करते.
याबाबत मी जितके बघतो, वाचतो आणि अनुभवतो तेवढ्याने माझ्या मनातले कूतुहल वाढतच जातेय.
अगदी थेट नाही, पण एक संदर्भ लेख म्हणून साप्ताहिक सकाळच्या, ताज्या अंकात, डॉ खुराणांच्या संशोधनाबद्दल एक लेख आलाय, तो अवश्य वाचा. ( नेटवर आहे उपलब्ध )
मला आणखी एक कुतुहल वाटते. सुगरण पक्षी घ्या. त्या नराला ते अत्यंत अवघड असे विणकाम करुन घरते बांधायचे ज्ञान कुठून मिळते ? आपण म्हणू त्याच्या जनुकात ते आहे. मग मानवाकडे असे कुठले कौशल्य आहे ? आपल्याला पिढीजात असे काहि ज्ञान मिळते का ? माझ्या वडिलांची चित्रकारी, पोहण्याची कला, मला का नाही मिळाली ? आपल्याला ते खास प्रयत्न करुन शिकावे लागते. प्राणी कुठे शिकतात ? खुपदा शिकवणारी पिढी तर हयातच नसते ( सामन मासे, समुद्री कासवे, जन्म झालेल्या ठिकाणीच अंडी घालायला जातात, हे त्याना कोण सांगते. सामन माश्याला धबधबा पार करायला कोण शिकवते ? )
बाकि चर्चा झाली तर छानच आहे कि,
छान कथा
छान कथा दिनेश. अगदी वेगळा विषय आणी या विषयातला तुमचा अभ्यास आणी सखोल विचार छान कळुन येतात कथेत. विचार करायला लावणारी कथा आहे. मस्तच!
****************
सुमेधा पुनकर
*****************
दिनेश,तुमच
दिनेश,तुमच्या प्रश्नांची ढोबळ उत्तरे खालीलप्रमाणे देता येतील
१] बहुतेक सर्व जीव त्यांचे आयुष्य त्यांच्या जनुकांमधल्या आज्ञावलीप्रमाणे पार पाडतात,त्यात अंतःप्रेरणेचा भाग मोठया प्रमाणात असतो,विचारांचा किंवा शिकवण्याचा नव्हे.
२] जन्म झाल्यावर मनुष्य ज्या गोष्टि शिकतो,त्यांची माहिति जनुकात साठवली जात नाही त्यामुळे आपल्या पालकांनी शिकलेली कला जशीच्या तशी आपल्यात येत नाही,ती आपल्याला परत शिकावी लागते.अर्थात एखाद्या कलेची आवड वा पात्रता अनुवांशिक असु शकते उदा.सर्व मंगेशकरांना त्यांच्या वडीलांकडून स्वरयंत्राची रचना नक्कीच मिळाली आहे.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
आगाऊ, परत
आगाऊ, परत हि अंतःप्रेरणा कुठून येते हा प्रश्ण उरतोच. ज्या मधमाशीने पहिल्यांदा षटकोनी पोळ्याची रचना केली, वा करुन बघितली, तिला ते का करावेसे वाटले ?
मंगेशकरांपैकी सर्वानाच ती देणगी मिळालेली नाही. मीनाताई तेवढ्या गायल्या नाहीत. शिवाय त्या सर्वानी बरिच साधना केलीय, हे आपण जाणतोच.
निव्वळ मानव म्हणून आपल्या सगळ्याना कुठलीच हुनर वा कौशल्य मिळालेले नाही.
परवाच याहू वर क्लिप होती, कि एका झू मधल्या माकडाने, त्याला त्रास देणार्या पर्यटकांवर मारण्यासाठी दगड गोळा करुन ठेवले होते. म्हणजे तो प्लॅन करायला शिकला. त्याने विचार केला .त्याचे अनुकरण बाकिची माकडे करतील का ?
मागे नॅशनल जिओग्राफिक वर दाखवले होते, कि माकडांची एक टोळी, अगदी कट करुन दुसर्या टोळीवर हल्ला करते. इतकेच नव्हे तर त्यातल्या लहान माकडाना जीवे मारुन त्याचे मास खाते. हे त्यांचाकडून आपल्याकडे आले ( असे त्या कार्यक्रमात सांगितले होते ).
रानटी कुत्रे तर शिकारी शिकारीच्या आधी व्यवस्थित स्ट्रॅटेजी वगैरे ठरवून शिकार करतात. बरेच सवाल आहेत.
सुमेध, सखोल ज्ञान वगैरे नाही हं. हे भोवतालचे जग आणि माझे वाचन, हिच माझी प्रेरणा.
Pages