पियानोवरची सात गाणी...

Submitted by ट्युलिप on 28 October, 2007 - 15:58

पियानोवरची सात गाणी...साठाच्या दशकातले हिंदी सिनेमे मला असंख्य कारणांसाठी आवडतात. त्यांना स्टोरी असायची -ज्यात नायिका अंगावरच शिवल्यासारखे दिसणारे चुडीदार घालून 'छुट्टीयोंके दिनोंमे' काश्मिर नाहीतर शिमल्याला जायच्या, गालांवर स्वल्पविरामी बटा चिकटवायच्या आणि नायक बी.ए. मधे 'फर्स्ट क्लास फर्स्ट ' येऊन 'दर दर नौकरी' शोधत फिरायचे मग घरी येऊन 'गाजर का हलवा विथ मूली के पराठे' खायचे आणि नायिकेच्या काश्मिरला जाणार्‍या ट्रेनचा जीपमधून पाठलाग करत गाणी म्हणायचे. ती गाणी सुंदर असायची. बरेचसे नायक-नायिका अभिनय करायचे; नायक तोंडावर हाताचा पंजा ठेवून रडायचे, नायिका 'बाबूजी, आप भी ना..!' असं लाजत म्हणत बापाच्या गळ्यात पडायच्या आणि शिफॉन्सच्या साडया नेसून हातात गुलाबांच्या बास्केट्स नाचवत घर आवरत गाणी म्हणायच्या. ती गाणीसुद्धा सुंदर असायची. दिग्दर्शक दिग्गज होते- ते 'शिमला की वादियोंमे' नायकनायिकेच्या मागे खलनायकाला पाठवून कथेत चित्तथरारक जान आणायचे. एकंदरीत तशी बरीच कारणे हे सिनेमे मला आवडण्यामागे आहेतच. पण सर्वात प्रमुख कारण त्या सिनेमांची काही ठराविक वैशिष्ठ्ये होती. अगदी ठळक अशी.

एक म्हणजे नायिकांचे ड्रेसेस आणि दागिने- तेव्हा भानू अथैया एकहाती नायिकांना सजवायच्या आणि सारख्या एम्ब्रॉयडरीच्या पेस्टल शिफॉन साड्या, उंच केसांवर बांधायचे दुपट्टे आणि स्लीवलेस चुडीदार कमीज, गुलाबी लिपस्टिक्स, खड्यांचे चमचमते दागिने, उंच टाचेच्या सॅन्डल्स, पांढर्‍या पर्सेस एका सेटवरुन दुसर्‍या सेटवरच्या नायिकांसाठी पाठवून द्यायच्या.

दुसरं प्रमुख लक्षण म्हणजे घरं. 'आलीशान महाल' हा एकच शब्द त्यासाठी. ते पण कसं- तर बाहेर लांबलचक इंपाला असणारे पोर्च, मग आत लग्नाच्या कार्यालयांसारखा भलामोठ्ठा हॉल आणि हॉलच्या मधोमध असणारा तो दोन पंखी जिना. त्यावर लाल गालीचा आवश्यक. आणि सर्वात ठळक आणि महत्त्वाची घरातली वस्तू म्हणजे एका बाजूला असलेला तो ग्लीमिंग पियानो. कधी लाल तर कधी काळाभोर- राजेशाही थाटात विराजमान झालेला. कधी पूर्ण उघडा कधी एकाबाजूला पट्टीवर टेकवून अर्धा झाकल्यासारखा. त्यावर फक्त नायक आणि नायिका ही दोन प्रमुख पात्रेच बोटे फिरवू शकणार. त्यांचे आई-बाप चुकूनही पियानोला हात लावणार नाहीत. नायक गरीब घरातला असला तर तो नायिकेच्या घरी 'जनमदिनके अवसरपर' येऊन तिच्या घरच्या पियानोवर बोटे उमटवणार. आणि नायिका तर काय, येता-जाता कधीही फुल्ल मेकप आणि भा.अ. गेटप मधे पियानोला छेडत रहाणार. साठच्या दशकापर्यंतच्या सगळ्या नायिका 'बचपन'मधून 'जवानी'त प्रवेश करताना पियानो वाजवणार. प्रेमात पडताना पियानो वाजवणार. 'प्यार का इजहार' करताना पियानोला आधी सांगणार. नायकाबरोबरचे रुसवे-फुगवे.. वाजवला पियानोला. नायिकेचं लग्न दुसर्‍याशी ठरलं की तर नायकाला सुनहरा मौका पियानोवर दर्दभरी गीते म्हणण्याचा. नायकाचा डबल ब्रेस्टेड सूट काळ्या टायसकट, समोर नायिका त्या खलनायक कम होणार्‍या नवर्‍याबरोबर पडलेल्या चेहर्‍याने बसलेली किंवा फक्त नायकालाच चेहर्‍याची प्रोफाईल आणि डोळ्यांतले अश्रू दिसू शकतील अशा कोनात उभी. ह्या सिच्युएशनमधली रफी आणि मुकेशच्या आवाजातली 'टूटे दिलोंकी दास्तां' सांगणारी कमीतकमी एकशे पंधरा गाणी मला आत्ता आठवताहेत.

ह्याव्यतिरिक्त काही खास सिच्युएशन्ससुद्धा असायच्या. म्हणजे बेवफा नायिकेने लग्नानंतर आपल्या जुन्या प्रियकराला घरच्या पार्टीत समोर पाहून दचकल्यावरची गाणी, किंवा मित्राने विश्वासघात केला म्हणून व्यथित होऊन नायकाने म्हटलेली गाणी वगैरे..

प्रसंग कोणताही असो. मूड कसलाही असो. आनंदी, रोमॅन्टिक, विरहाचा, दु:खी, रागीट, उदास, सेलीब्रेशन, विश्वासघात.. संगीतकार कोणीही असो, नायकनायिका कोणतेही असोत, चित्रपटाचं नाव काहीही असो.. ह्या सर्व पियानोसोबतच्या गाण्यांचं वैशिष्ठ्य एकच होतं.. ते म्हणजे ही सर्वच्या सर्व गाणी 'एकसे एक बेहतरीन' होती. पियानोचे ते मंजुळ सूर छेडले गेलेले पार्श्वभूमीवर ऐकायला आले की पुढलं गाणं सुरेल असणारच, ह्याची खात्री होती. नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्र, रवी, ओपी, शंकर जयकिशन, कल्याणजी, आरडी.. अशा प्रत्येक संगीतकाराने अनेक गाणी पियानोवर रचली आहेत आणि त्यातली बहुतेक सगळी गाजली आहेत. कोणती गाणी 'पियानोची गाजलेली' म्हणून निवडायची, हा प्रचंड कठीण भाग. तेव्हा मी सात मूडची सात गाणी जी मला सात निरनिराळया कारणांसाठी आवडतात, ती इथे देण्याचं ठरवलं. ही गाणी चाल, शब्द, आवाज, अभिनय ह्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट वगैरे असतील, हे गरजेचं नाही. पण ती मला आवडलीत. तुम्हालाही आवडतील.

१) dil_ke_jharoke.jpg पहिल्या क्रमांकावर आहे अर्थातच शम्मी कपूरचं 'दिल के झरोके में..' चित्रपट : ब्रह्मचारी. हे गाणं कां आवडतं? पहिली गोष्ट; शम्मी त्याच्या त्या पांढर्‍याशुभ्र कोटामध्ये, काळ्या टायमधे ह्या गाण्यातले दुखावलेले भाव त्याच्या त्या निळ्या-गहिर्‍या डोळ्यांत आणताना कमालीचा देखणा दिसतो. आणि त्यामुळे तो वाजवत असतो तो पियानो आणि म्हणत असतो ते गाणंही सुंदर बनतं. गाण्यातला प्रसंग काही फार वेगळा नाही. उलट नेहमीचाच. म्हणजे त्याचं जिच्यावर प्रेम तिचं लग्न दुसर्‍याशी ठरलेलं असणं. साठाच्या दशकातल्या चित्रपटांमधलं आणखी एक वैशिष्ठ्य असणारा तो भलामोठा हॉटेलमधला किंवा क्लबमधला पार्टी हॉल आणि त्यातला बॅन्ड. फिरत्या स्टेजवर शम्मी पियानो वाजवत आणि मधोमध हृदयाच्या आकाराच्या स्टेजवर चाललेला वॉल्झ.. गाण्याच्या मूडशी मिळता जुळता. प्रत्यक्ष गाणं सुरु व्हायच्या आधी शंकर-जयकिशन शैलीतला एक मोठा ऑर्केस्ट्रेशनचा तुकडा. ज्यातले वाद्यांचे कल्लोळ अत्यंत हाय-पिचवर असूनही कानांना जराही दुखावत नाहीत. आणि मग ह्या कल्लोळामधूनच उमटत जाणारे ते पियानोचे स्वर आणि रफीच्या आवाजातले 'दिल के झरोके में तुझको बिठाकर..' शब्द. ते जास्त देखणे की त्या ओळीवर शम्मीने मानेला एक हलकासा झटका देत वर उचललेली निळी नजर जास्त देखणी, हे आख्खं गाणं संपेपर्यंत ठरवताच येत नाही. राजश्री म्हणजे फिल्मची हिरॉइन चमचमत्या केशरी साडीत, केशरी लिपस्टिक लावून, ग्लिसरीन जास्त झाल्याने तांबूस दिसणारे तिचे मुळचे पिंगट डोळे पुसत शम्मीच्या समोर टेबलवर बसलेली असते. तिच्या शेजारी तिच्यासमोर रुमाल धरुन आणि मधूनच हुंदके दाबत ती उठत असताना तिचा हात धरुन परत खाली बसवण्याचे काम करत धुराची वलयं सोडत बसलेला प्राण (तसा हासुद्धा साठाच्या दशकातल्या चित्रपटांमधला अपरिहार्य भाग. खलनायक प्राण असणे). राजश्रीचे ह्या गाण्याच्या वेळचे हुंदके कधी नव्हे ते खरेखुरे वाटतात, कारण अर्थातच कोणत्याही मुलीला इतक्या देखण्या शम्मीला सोडून प्राणशेजारी बसताना रडू फुटणं साहजिक आणि सर्वांना पटणारं. 'दिल के झरोके में' गाण्यातल्या 'मत हो मेरी जां उदास..' ओळीतला रफीचा व्याकूळ आवाज आणि 'फूलोंकी डोली में होगी तू रुखसत लेकिन महक मेरी साँसोंमे होगी..' ह्या ओळीत शम्मीच्या चेहर्‍याच्या प्रोफाईलवर दिसणारी उदास ग्वाही लाजवाब.

२) pyaar_deewana_hotaa_hai.jpg पियानोवरचं दुसरं आवडतं गाणं आहे राजेश खन्नाचं. चित्रपट : कटी पतंग. 'प्यार दीवाना होता है...' हे गाणं किशोरने कमाल म्हटलंय अणि राजेश त्याच्या त्या नेव्ही ब्लू रंगाच्या कोटामध्ये, लाल कॉलरच्या शर्ट आणि केसांच्या क्रूकटमध्ये कमालीचा हळवा आणि रोमॅन्टिक दिसला आहे. पियानो वाजवातानाची त्याची देहबोली शम्मीइतकीच शोभून दिसणारी. (काही जण म्हणजे मनोजकुमार किंवा राजेन्द्रकुमार सारखे साठाच्या दशकातले ठोकळे पियानोवर इतक्या निर्जीवपणे बोटं चालवत असत! अशांच्या हातात पियानोसारखं राजेशाही वाद्य शोभत नाही. त्यांना बाजाची पेटी योग्य!)
'प्यार दीवाना होता है..' गाण्याचा प्रसंग 'प्यार का इजहार, पहली बार' असा! आशा पारेख ह्या चित्रपटात दु:खी, उदास चेहर्‍याने वावरली आहे. पण ह्या गाण्यात तेवढी राजेश खन्नाशी 'आँखों आँखोंमे बातें' करताना गोड मूडमधे दिसली आहे. पांढर्‍या साडीवर लपेटलेला नाजूक, पांढरा स्वेटरपण तिला छान दिसतो. पियानोवर जळत्या मेणबत्त्या लावून वातावरणनिर्मितीदेखील खास.
'शमा कहे परवाने से परे चले जा,
मेरी तरहा जल जायेगा यहाँ नही आ..'
या ओळीत राजेश खन्ना-आशा आणि जळत्या मेणबत्त्यांचा एका फ्रेममधला क्लोजप सुरेख. गाण्याच्या एकंदर रोमॅन्टिक मूडमध्ये पियानोने 'चार चाँद' लावले आहेत.

३) dost_dost_naa.jpgपियानोच्या गाण्यांवरचा लेख ह्या गाण्याशिवाय पूर्ण वाटणारच नाही. गाणं आहे 'दोस्त दोस्त ना रहा..' चित्रपट : संगम. पियानोवर अर्थातच राज कपूर. जिवलग मित्राने आणि आपल्या प्रियतमेने आपला विश्वासघात केल्याची वेदना, आपलं प्रेम एक भ्रम असल्याची झालेली उदास जाणीव, कदाचित ते खरंही असू शकेल अशी वेडी आशा आणि आपल्याच वाट्याला आपल्याच जवळच्या माणसांनी फसवल्याचं दु:ख यावं, ह्याचा कडवटपणा चेहर्‍याच्या प्रत्येक रेषेमध्ये भरलेला. राधा आणि गोपालकडे पाठ फिरवून पियानोवर बसलेल्या राज कपूरची आपल्याला आधी बराच वेळ नुसती पाठ दिसत राहते आणि पियानोवर त्याची बोटं फिरत असतानाचे स्वर ऐकू येत रहातात तेव्हा राज कपूरची मनःस्थिती अचूक आपल्यापर्यंत पोचते. मग मात्र क्लोजप आहे, तो त्याच्या चेहर्‍यावरच्या वेदनेचाच फक्त. प्रसंगाला अप्रतिम साथ देतो तो ह्या गाण्यातला पियानो. पियानोवर बोटं चालवताना मध्येच चेहरा झाकून घेणारे त्याचे हात आणि त्याचवेळी त्याच्या उदास डोळ्यांचा क्लोजप पाहून राधा-गोपाल इतकंच आपलंही मन कळवळून जातं.

४) chalo_ek_baar_phir_se.jpg 'चलो एक बार फिर से...'- 'गुमराह' या चित्रपटामधल्या ह्या गाण्यात अशोक कुमार, सुनील दत्त, माला सिन्हा आणि पियानो अशी चार प्रमुख पात्रं आहेत, असं वाटावं इतका पियानो सिच्युएशनमध्ये फिट बसला आहे. लग्नाआधीचा प्रियकर समोर जुन्या आठवणींना छेडत, विरहाचं दु:ख आळवतोय आणि नवर्‍याच्या नजरेला टाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करत ती आपण आपल्या प्रियकराशी 'बेवफाई' केल्याची अपराधी भावना लपवत पियानोभोवती अस्वस्थपणे फेर्‍या मारतेय. त्याच्या स्वरातल्या सच्च्या उदासीला तरीही तिला नाहीच टाळता येत.
'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकीन..
उसे इक खूबसूरत मोड देकर भूलना अच्छा..'
म्हणताना सुनील दत्त चेहर्‍यावर इतका निरागस समजूतदारपणा दाखवतो की, 'का हा इतका सहन करतोय?' असा आपल्या मनात कळवळा दाटून यावा. गाण्यातल्या प्रत्येक ओळीत त्या तिघांचे कोन पियानोच्या पार्श्वभूमीवर छान टिपले आहेत. बाकी संगीतकार रवीचा पियानो नेहमीच लाडका. त्याची बहुतेक सगळीच गाणी पियानोच्याच सुरावटीवर छेडल्यासारखी असतात. कधी कधी तर गाण्याची सिच्युएशन बागेत नायक नायिका गाणं गातायत, अशी असते अणि रवीच्या गाण्यात स्वर मात्र पियानोचे!

khwaab_ho_tum_yaa.jpg
५) 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत..' 'तीन देवियाँ' ह्या चित्रपटातलं देव आनंदने म्हटलेलं पियानोवरचं हे गाणं त्याचा छेडछाडीचा खेळकर मूड मस्त टिपतं.
एका वेळी तीन नायिकांना छेडावं तर देवनेच. कधी पियानोला रेलून कल्पना, तर कधी समोर नाचताना सिम्मी आणि देव आनंद पियानोवर आरामात मौजमजेच्या मूडमध्ये गाणं गातोय. परफेक्ट पार्टी साँग सिच्युएशन. किशोरचा उडता आवाज पियानोच्या स्वरांशी मिसळून गेलेला. ह्या गाण्याशी मिळत्याजुळत्या मूडचं, पियानोवरचं अजून एक गाणं म्हणजे 'दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे' मधलं शाहरुखने पडद्यावर साकारलेलं 'रुक जा ओ दिल दीवानें..' त्या गाण्याच्या सुरुवातीला त्याची पियानोशी जी छेडछाड चाललेली असते ती म्हणजे कमाल!

६) tuu_kahe_agar.jpg जराशा आधीच्या वर्षांमधलं पण जे गाणं पियानोशी जोडलं गेलेलं म्हणून घेतलंच पाहिजे असं आहे ते.. जुन्या 'अंदाज'मधलं 'तू कहे अगर, जीवनभर..' मला ह्या गाण्याचं चित्रीकरण खूप आवडतं. दिलीपकुमारचा जीव नर्गिसवर जडला आहे. तिला ह्याची जाणीव आहे की नाही, ह्याची अजून त्याला कल्पना आलेली नाही. पण भर पार्टीत आपल्या हृदयीचं गुज तिला एकटीला कळावं, ही त्याच्या मनातली आस तो पियानोच्या स्वरांच्या साथीने पुरी करु पहातो. ती स्वच्छंद स्वभावाची. फुलपाखरासारखी. कधी पियानोवर रेलून त्याच्या डोळ्यांत पाहते, तर कधी बेफिकिरीने मान उडवत पार्टीच्या रंगीतसंगीत वातावरणामध्ये सामील व्हायला उठून जाते. दिलीपकुमार आर्ततेने आपलं हृदय गाण्यात ओतत सूर छेडतच रहातो...
'इन बोलों मे तू ही तू है.. मै समझू या तू जाने..
इनमें हैं कहानी मेरी, इन में हैं तेरे अफसाने...'
जवळपास सर्वच पियानोवरच्या पुढच्या गाण्यांमधली भावना दिलीपकुमारच्या ह्या गाण्यातून व्यक्त झालेली आहे. त्यामुळे हे गाणं सर्वांत जास्त प्रातिनिधिक वाटतं. तसा 'अंदाज' हा चित्रपटच पुढील सर्व हिंदी चित्रपटांमधल्या त्रिकोणी प्रेमाचा आदर्श घालून देणारा, आद्य असाच आहे म्हणा!

७) bachapan_ke_din.jpg पियानोवरच्या गाण्यांमधला सर्वांत अवखळ, उत्फुल्ल असा तरुण मूड व्यक्त करणारं गाणं म्हणून मला 'सुजाता'मधलं 'बचपन के दिन भी क्या दिन थे..' घ्यावंसं वाटलं.
बालपणातून तारुण्यात प्रवेश करताना हिंदी चित्रपटांच्या नायिकांनी असंख्य गाणी म्हटली आहेत. पण हे सगळ्यांत लोभस गाणं. ह्यात शशिकला पियानोवर इतकी गोड दिसते! तिचे ते रिबिनी बांधलेले केसांचे कानावरचे दोन बो, तिचा तो पंजाबी ड्रेस, ती उडवत असलेली ओढणी हे तर ह्या गाण्यातल्या आशाच्या आणि एस. डी. बर्मनच्या टवटवीतपणाला जुळणारं आहेच पण ह्यापेक्षाही जास्त प्रसन्न आहे, पार्श्वभूमीवरचा नूतनचा चेहरा. अहा.. अहाहा.. असे नुसतेच सूर छेडत नूतन गच्चीवर कपडे वाळत घालताना दाखवली आहे. तिचा काळा सावळा चेहरा इतका अप्रतिम लोभस दिसतो. पियानोवर गाणं गात असते शशिकला पण सूर उमटत असतात नूतनच्या चेहर्‍यावर.

केवळ सातच गाणी निवडायची असं ठरवलं आहे तरी काही गाणी राहून गेल्याचं वाईट नक्कीच वाटेल. उदा. साठाच्या दशकाचा भाव तंतोतंत दर्शवणार्‍या 'वक्त' मधलं 'कौन आया के निगाहोंमे चमक जाग उठी..' हे गाणं, किंवा 'लाल पत्थर' मधलं 'गीत गाता हूं मै..', किंवा रफीचं एक सुंदर गाणं 'आपके हसीन रुख पे आज नया नूर हैं..' अशी कितीतरी गाणी शिल्लक राहत आहेत.

हिंदी चित्रपटांचा मूड आता लोकांच्या मूडला साजेसाच बदललेला आहे. पियानोची संथ, शांत, हृदयाच्या तारांना छेडणारी मंजुळ, रोमॅन्टिक सुरावट आता गाण्यांमध्ये नसते, ह्यात नवल नाही. सिन्थेसायझरमधून तरीही पियानोचे स्वर उमटवत संगीतकार गाण्यात सुरेलपणा आणण्याचा असफल प्रयत्न करत रहातात. प्रयत्न असफल राहतो, ह्याचं कारण गाण्यात ते सूर घातले तरी जोपर्यंत प्रत्यक्ष पियानो पडद्यावर दिसत नाही, तोपर्यंत त्या सुरांत जिवंतपणा येणारच नाही, हे आपल्याला माहीत असतं.

बरेचदा पियानोवर बसलेल्या नायक-नायिकांची बोटं अगदी अविश्वसनीयरीत्या पियानोच्या पट्ट्यांवर उमटताहेत, हे आपल्याला कळत नसतं असं नाही. पण आपल्याला ते चालतं, कारण त्या त्या प्रसंगातल्या गाण्यांत मुख्य पात्र पियानोच आहे, हे आपल्याला पक्कं ठाऊक असतं.

संजय लीला भन्साळीच्या 'खामोशी'मध्ये घरातल्या आर्थिक अडचणीमुळे पियानो विकून टाकायची पाळी येते. मनिषा कोईरालाचं सगळं बालपण त्या पियानोसोबतच गेलेलं असल्याने तिला घरातून पियानो बाहेर नेताना बघणं सहन होत नाही. ते कुणीतरी थांबवावं, पियानोने परत घरात यावं असा मूक आक्रोश करत ती हेलनच्या गळ्यात पडते. हेलन तिला कुशीत घेते आणि समजावते. रडू नकोस. जे आपल्याला मनापासून आवडत असतं, ज्यावर आपण जिवापाड प्रेम केलेलं असतं, अशी प्रत्येक गोष्ट कधी ना कधी परत आपल्याकडे आपल्याला शोधत येतेच. हा पियानोही येईल तसाच परत एक दिवस. असो...

ज्यांनी ज्यांनी साठ-सत्तरच्या दशकातल्या चित्रपटांमधल्या त्या सगळ्याच सुंदर 'फिल्मी' पणावर मनापासून प्रेम केलंय, त्यांनी सगळ्यांनीच त्या सार्‍या गोष्टी; पियानोवरची गाणी, त्यांच्या त्या सुरेल सुरावटींसोबत, वातावरणासोबत चित्रपटांमध्ये परत येतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाहीये मग.

-ट्युलिप

विशेषांक लेखन: