ऐन पावसाळ्याचे दिवस. परवापासून पावसाची झड लागलेली. कुठेही बाहेर जायला नकोसं वाटत होतं. घरात बसूनही कंटाळा आलेला. हातात एकही केस नाही. परवा एकजण आली होती.
नवर्याच्या बदफैलीपणाचे पुरावे हवे होते, घटस्फोटासाठी. त्याचं त्याच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीबरोबर अजूनही अफेअर चालू होतं म्हणे!
"हे पहा, तुम्हाला इतकी खात्री आहे तर तुम्हीच जाऊन गोळा करा बघू पुरावे. तुमचा वेळही जाईल नि कामही होईल."
सहसा मी इतकं तिरकस उत्तर कुणाला देत नाही, पण कामामधल्या नीरसतेमुळे सध्या असं होत होतं खरं! ती बाई चिडून चालती झाली. मी हताशपणे पुन्हा समोरच्या पुस्तकात डोकं खुपसलं. हा अनिकेत पण कसलंही पुस्तक "छान पुस्तक आहे. वाच!" म्हणून आणून देतो. आता 'भारतातील दुर्मिळ रत्ने' असल्या नावाचं पुस्तक वाचून मी करू काय? मला दागदागिने वगैरे काही आवडत नाहीत. हातातल्या पुस्तकात मला काडीचा रस वाटेना. चिडून मी ते पुस्तक टीपॉयवर आपटलं.
फोनच्या आवाजाने शांततेचा भंग केला.
"सुनीता?" फोन उचलल्याचा मला पश्चात्ताप झाला. पण आता वेळ निघून गेली होती.
"बोला मिसेस रुईकर."
"उद्या माझ्याकडे पार्टी आहे संध्याकाळी. काही खास कारण नाही. सहज.. जरा ह्या पावसाने बोअर झालंय. आणि आशूला जर्मनीला जायचा चान्स मिळाला. कालच कळलं अचानक."
"अरे वा!"
"तेव्हा तू नक्की ये. वाट बघते."
माझ्या हो-नाही ची वाटही न बघता तिने फोन बंद केला. आता हिच्या पार्टीला जाणं आलं. अख्खा पावसाळा असाच कंटाळवाणा जाणार की काय?
पार्टीहून परतायला मला रात्रीचे दोन वाजले. तिथे बसून आणि अत्यंत इरिटेटिंग लोकांशी बोलून माझं डोकं दुखायला लागलं होतं. घरी आल्यावर एक गोळी घेऊन मी सरळ झोपी गेले.
सकाळी जाग आली ती कुणाच्यातरी जोरजोरात दरवाजा ठोठावण्यानंच! मी चटकन उठून दरवाज्याकडे धावले. दार उघडताक्षणी एक बाई तीरासारखी आत शिरली आणि तिने माझे पायच धरले.
"अहो बाई, हे काय करताय? उठा."
"सुनीता.... सुनीता वर्मा..... प्लीज. सुनयनाला वाचवा. ती निर्दोष आहे हो. प्लीज......."
"बाई, आधी तुम्ही शांत व्हा. बसा. मी तुम्हाला चहा करून आणते. तोवर इथे सोफ्यावर बसा."
मी चहा आणेपर्यंत ती बरीच सावरली होती. चहाचे घोट घेत ती बोलू लागली.
"सिनेतारका सुनयनाचं नाव ऐकलं असेलच तुम्ही. ती माझी मोठी बहीण."
सुनयना. वीस वर्षांपूर्वी लाखो लोक जिच्यासाठी वेडे झाले होते ती रुपवान सिनेतारका. ती एखाद्या सिनेमात पाहुणी कलाकार असली तरी तो सिनेमा आवर्जून बघणारे कित्येक लोक होते. तिची पोस्टर्स तडाखेबंद खपायची. तिचा एकही सिनेमा फ्लॉप जात नव्हता. कुठल्याही समारंभात ती दोन मिनिटं जरी येणार असेल तरी अख्खा समारंभ मिडीयाचं आकर्षण ठरायचा.
"मी तिची सगळ्यांत धाकटी बहीण, अंजना. सुनयनाच्या सिनेमातल्या कमाईवर आम्ही सर्व लहानाचे मोठे झालो. ती किती लोकप्रिय होती हे मी नव्याने काय सांगू? तिने आमच्या शिक्षणाला, लग्नाला लागेल तेवढा पैसा पुरवला. आम्हाला अजून एक भाऊ नि एक बहीण आहे. सगळ्यांचं आयुष्य सुनयनाने मार्गी लावलं. ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. आणि तेवढ्यात तिला तो भयंकर अपघात झाला. ड्रायव्हरचा कारवरचा ताबा सुटल्याने तिची कार दरीत कोसळली. सुनयना वाचली. पण...."
मला ते सगळं आठवत होतंच. ती वाचली, पण ज्यांमु़ळे तिचं नाव सुनयना पडलं होतं ते तिचे डोळे कायमचे अधू झाले. चेहरा प्लास्टिक सर्जरीने ठीकठाक झाला खरा, पण त्यातलं ते सौंदर्य पार हरवलं. सुनयना विस्मृतीच्या पडद्याआड गेली.
"माझ्या इतर भावंडांनी सुनयनाला एका पैशाची मदत केली नाही. दोघेही कृतघ्न निघाले. माझ्या नवर्याकडे थोडाफार पैसा असला तरी सुनयनाबद्दल त्याच्या मनात एकप्रकारची अढी आहे. त्याला एकदा पैसे हवे होते शेअर्समध्ये गुंतवायला, ते ती देऊ शकली नाही. तेव्हापासून त्यानं मला कधीही तिला मदत करू दिली नाही. सुनयनाची जवळपास सगळी संपत्ति त्या अपघाताच्या खुणा पुसण्यात गेली. तिला राहता बंगलादेखील विकावा लागला. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आदर्शनगरात तिने एक छोटं घर घेतलं होतं. त्यात ती मग रहायला गेली. एकटीच रहाते. दिवसभर एक मोलकरीण तिच्या घरी असते. तीच तिचं सारं काम करते. परवा मला सुनयनाचा फोन आला. तिला असं वाटत होतं की, तिच्या घरावर कुणीतरी पाळत ठेवून आहे. आदल्या रात्री तर घराभोवती कुणीतरी फेरी मारल्यासारखं तिला वाटलं. ती पार घाबरली होती. मी तिला धीर दिला आणि तिला म्हटलं की मी रात्री तिच्या सोबतीला येईन. माझा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला आहे. म्हणून मला जाता येणं शक्य होतं. पण तो संध्याकाळीच परत आला. मी कुठे नि कशासाठी जातेय हे कळल्यावर तो चांगलाच चिडला. आमचं चांगलंच भांडण झालं. मला सुनयनाची काळजी वाटत होती. मी त्याला न जुमानता तिथून बाहेर पडले.
आदर्शनगरमध्ये पोचेपर्यंत मला चांगलाच उशीर झाला. तो भाग आठाच्या सुमाराला अगदी निर्मनुष्य व्हायला लागतो. आणि आतला रस्ताही खराब आहे. काल पावसामुळे तो आणखीच खराब झाला होता. रिक्षावाला तिच्या घरापर्यंत मला सोडायला तयार नव्हता. मी रिक्षा मेन गेटपाशीच सोडली आणि तिच्या घराकडे जायला लागले.
तेवढ्यात मला पिस्तुलाचा आवाज नि किंकाळ्या ऐकू आल्या. त्यातला एक आवाज सुनयनाचा होता निश्चित. मी वेड्यासारखी तिच्या घराकडे धावू लागले. आणि तिच्या घरापाशी पोचल्यावर मला ते भयंकर दृश्य दिसलं. एक माणूस तिच्या अंगणात कोसळला होता. ती हातात पिस्तुल घेऊन उभी होती.
"सुनयना, हे काय? तू याला मारलंस?" ती थरथर कापत होती. "कोण आहे हा?" तिने उत्तर दिलं नाही. तो सगळा आवाज आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोचला असावा. लोक जमा झाले होते. कुणीतरी पोलिसांना फोन केला असावा. कारण पंधराएक मिनिटांतच पोलिसांची व्हॅन आलीच. त्यांनी तिला त्या अनोळखी माणसाच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली.
... प्लीज, तिला वाचवा. ती... ती खुनी नाहीये."
अंजनाला पुन्हा हुंदके यायला लागले.
"आपण आधी पोलिसचौकीत जाऊ. मला सुनयनाशी बोलावं लागेल याबाबत."
आम्ही पोलिसचौकीत पोचलो तेव्हा माझ्या ओळखीचेच अधिकारी तिथं ड्यूटीवर होते. त्यांनी मला सुनयनाला भेटण्याची परवानगी दिली.
मी आत गेले. तिथं भिंतीला डोकं टेकून, डोळे मिटून सुनयना बसली होती. आता तिच्या चेहर्याकडे पाहता वीस वर्षांपूर्वीचा देखणा चेहरा तो हाच, यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं.
"सुनयना....."
तिने डोळे उघडून माझ्याकडे बघितलं.
"आपण?"
"मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, सुनीता वर्मा. तुमची बहीण, अंजना- तिनं मला त्या खुनाबद्दल सांगितलं आहे. आपण त्या विषयावर सविस्तर बोलू शकतो का?"
तिने मान हलवली.
"गेले आठवडाभर मला सतत वाटत होतं की कुणीतरी माझ्या घरावर पाळत ठेवून आहे. पहिल्यांदा वाटलं, मला भास होत असतील. पण परवा मला पायांचा आवाज स्पष्ट ऐकू आला. आणि हॉलच्या खिडकीवर एक सावली दिसली. मी प्रचंड घाबरले. श्वास रोखून चाहूल घेत राहिले. पण त्या व्यक्तीचा विचार घरात शिरण्याचा नसावा. थोड्या वेळाने पुन्हा सर्व शांत झालं. माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. तुम्हाला अंजनाने सांगितलं असेलच. एवढ्या संकटात असूनदेखील माझी इतर दोन भावंडं मला मदत करणार नाहीत. त्यांनी नावच टाकलंय माझं. अंजनाला मदत करायची इच्छा असून उपयोग नाही. तिचा नवरा तिरस्कार करतो माझा. मी घर सोडून कुणाकडेही जाऊ शकत नव्हते. अंजनाला माझ्या सोबतीला बोलावणं हा एकच मार्ग माझ्याकडे होता.
मी रात्री तिची वाट बघत होते. तिला यायला उशीर होऊ लागला तसतशी माझ्या जिवाची घालमेल होऊ लागली. मी पूर्वी पैसा असताना एक पिस्तुल विकत घेतलं होतं, स्वसंरक्षणासाठी असावं म्हणून. माझ्याकडे त्याचा परवानाही आहे. गेल्या महिन्यातच मी ते पूर्ण भरून ठेवलं होतं.
काल मी ते जवळ ठेवून अंजनाची वाट बघत बसले. अचानक बाहेर फुलझाडांच्या कुंड्यांच्या पडण्याचा आवाज आला. मी प्रचंड घाबरले. पुढच्या दरवाजापाशी कुणीतरी होतं. मग ती व्यक्ती अचानक अंगणाकडे गेल्याचा आवाज आला. मागोमाग पुन्हा पावलं वाजली. दोन व्यक्ती.... मी देवाचा धावा सुरू केला. बाहेरून गुरगुरल्यासारखा काहीतरी आवाज आला. मी मन घट्ट केलं. पिस्तुल घेऊन मी बाहेर आले. समोर तो माणूस उभा होता. अचानक माझ्या डावीकडून कुणीतरी गोळी चालवली त्या समोर उभ्या असलेल्या माणसावर. मी किंचाळले आणि ट्रिगरवरचं बोट दाबलं गेलं. तो गोळी चालवणारा माणूस पळून गेला. समोरचा माणूस कोसळला होता. मी थिजून तिथेच उभी होते. तेवढ्यात अंजना आली, काही वेळाने इतर लोक, पोलीस.... पण मी खून केलेला नाही. मी खरं सांगतेय. मी खून केलेला नाही."
तिच्या डोळ्यांतून पाणी वहायला लागलं. मी तिच्या खांद्यावर थोपटून उठले. बाहेर येऊन त्या अधिकार्यांना भेटले.
"सुनयनाला अटक कुणी केली?"
"मीच की."
"तुमचा प्राथमिक तपास काय सांगतो?"
"आता काय सांगायचं सुनीता तुम्हाला? सिनेमा लाईनमधल्या बायकांचं कॅरॅक्टर तसं लूजच बघा. ही बाई धंदा करत होती. आणि त्यातल्याच कुठल्यातरी लफड्यापायी हा खून झालाय."
"काय?" स्वतःच्या आवाजावर ताबा ठेवणं मला कठीण गेलं. "याला काही पुरावा?"
"मी तिच्या आजूबाजूच्यांकडे चौकशी केली जरा तिच्याबद्दल. बाई कुणातच मिसळायची नाही. तिच्या बहिणीशिवाय, अंजनाशिवाय, तिच्याकडे कुणीच येताजाताना दिसलेलं नाही. आणि अचानक गेल्या महिन्यापासून रात्री उशीरा, तिच्याकडे कुणीतरी कारमधून येत असे आणि गुपचुप निघून जात असे. काही लोकांनी रात्री त्या कारला येताना आणि जाताना बघितलंय."
"तिने खून केल्याचं मला प्रथमदर्शनी तरी वाटत नाही साहेब."
"आम्ही प्रेताच्या शरीरातली बुलेट तपासलीय, मॅडम. ती बुलेट सुनयनाच्याच रिव्हॉल्व्हरची आहे. बाई धडधडीत खोटं सांगतेय खून तिनं केला नाही म्हणून! खेरीज तिच्याकडे लपूनछपून येणार्या त्या माणसाचं काय? आम्ही त्याचा शोध घेणारच आहोत. म्हणूनच सुनयनाच्या घराभोवती आम्ही पहारा बसवलाय."
कुठली हकीकत नक्की खरी होती?
....
"हा माणूस कोण आहे, याचा काही पत्ता लागला?" मी त्या प्रेताला नीट निरखून बघत म्हणाले. सोबतच्या पोलिस अधिकार्याने नकारार्थी मान हलवली.
"काही चीजवस्तू? याचा पत्ता लागू शकेल असं काही?"
"याच्याकडॆ फक्त एक रिव्हॉल्व्हर आणि खिशात एक कार्ड सापडलं. त्यावर फक्त सुनयनाच्या घराचा पत्ता लिहिलेला आढळला. बाकी कुठलीही चीजवस्तू या माणसाच्या अंगावर नव्हती."
पुढचा टप्पा. सुनयनाचं घर. एक हवालदार तिथे पहार्याला बसवलेला होता. मी जाताच त्याने उठून मला सलाम केला.
"सुनीता वर्मा... मी ओळखतो आपल्याला. या केसचा तपास तुम्हीही करताय का?"
"हो. मी जरा घर बघू का?"
"अवश्य... बघा ना. मी बाहेर आहे. काही लागलं तर सांगा."
त्याने दार उघडून दिलं. आतमध्ये काही विशेष वस्तू नव्हत्या. हॉलमध्ये एक छोटी सेटी होती. समोर एक लहानसा टीव्ही. बाकी प्लास्टिकच्या दोन चार खुर्च्या, मूळ पांढर्या असणार पण आता मळकट झालेल्या. एक बेडरुम होती. तिची आणि स्वयंपाकघराचीही तीच अवस्था होती. अगदी मोजकं सामान दोन्हीकडे ठेवलेलं होतं. बेडरूममधल्या एका गोष्टीने माझं ल़क्ष चटकन वेधून घेतलं. बाकी स्वस्त सामानाच्या पसार्यात एक Chanel No. 5 ची बाटली दिमाखात उभी होती. जवळपास पूर्ण भरलेली. म्हणजे नवीनच होती. सुनयनाची आर्थिक परिस्थिती पहाता ती तिच्या आवाक्याबाहेरची होती खास. सुनयना माझ्यापासून काहीतरी नक्की लपवत होती.
बाहेर अंगणामध्येदेखील मी सगळा परिसर तपासला. आदल्या रात्री प्रचंड पाऊस झाल्याने सगळीकडे पाणी साचलं होतं. त्यामुळे कुठेही पायाचे ठसे वगैरे मिळणं अशक्यच होतं. तरी मी उशीरापर्यंत तो परिसर धुंडाळत होते.
उशीरा घरी आले. राधाबाईंनी जेवण तयार ठेवलं होतं. थोडंसं खाऊन मी हॉलमध्ये येऊन बसले. दुसर्या दिवशी सुनयनाला पुन्हा भेटणं गरजेचं होतं. तोवर काहीही निष्कर्ष काढण्यात हशील नव्हता. मला झोपही येईना. अगदीच निरुपाय झाला म्हणून मी पुन्हा ’भारतातील दुर्मिळ रत्ने’ कडे आपला मोर्चा वळवला. गेले काही दिवस ते पुस्तक वाचून ’ते पुस्तक म्हणजे झोप येण्याचा अक्सीर इलाज आहे’ याची खात्री झाली होती. तसंच झालं. पाच दहा मिनिटांत मी झोपी गेले.
"सुनयना, तो परफ्यूम कुणी दिला आहे?" सुनयनाच्या चेहर्यावर प्रचंड आश्चर्य आणि काहीशी भीती पसरली.
"मी घेतलाय." बर्याच वेळाने ती म्हणाली. "पैसे साठवून. मला तो परफ्यूम आवडतो."
"म्हणजे तुम्ही मला सहकार्य करणार नाही तर?"
यावर सुनयना काहीही बोलली नाही. इतक्यात एक हवालदार धावत पळत आत आला.
"सुनीता मॅडम... आपला हवालदार आहे ना केशव... तो काल ह्या बाईंच्या घराबाहेर नाईट वॉचवर होता. तो जखमी झालाय मॅडम. काल रात्री कुणीतरी त्याच्या डोक्यात काहीतरी मारलं मागून. तो बेशुद्ध झाला मॅडम. नंतर शुद्धीवर आल्यावर त्याने मेन पोलिस ठाण्याला कॉन्टॅक्ट केला. घराची पूर्ण पाहणी केली तेव्हा काहीही गेल्याचं जाणवलं नाही. सामान होतं तसंच नीट लावलेलं होतं."
"काय सुनयना? काय वाटतं तुम्हाला? कुणी केलं असेल असं?"
ती फक्त भयचकित होऊन माझ्याकडे बघत राहिली.
मी सुनयनाच्या घरी पोचले तेव्हा कालचाच हवालदार सकाळच्या ड्यूटीला होता. मी पुन्हा तपास सुरू केला. त्या मळकट ड्रेसिंग टेबलावरची chanel ची बाटली आज गायब झाली होती.
"अंजना, मी विचारेन त्या प्रश्नांची कृपया खरी उत्तरं द्या. सुनयनाचा कुणी प्रियकर वगैरे होता?"
"नाही सुनीता... तसं तिचं नाव कुणाकुणाशी जोडलं गेलं होतं ती यशाच्या शिखरावर होती तेव्हा. पण त्यात फारसं तथ्य नव्हतं. तिला या सगळ्या गोष्टींसाठी वेळच नव्हता. आणि कुणी जर प्रियकर असलाच तरी त्याचं आत्ता काय? आत्ता सौंदर्य हरवून बसलेल्या आणि डोळे अधू झालेल्या माझ्या बहिणीला कोण माणूस ओळख दाखवणार आहे?"
"तिचं महिन्याचं उत्पन्न सांगू शकाल मला? अंदाजे सांगितलंत तरी चालेल."
"चार - साडेचार हजार."
"ठीक आहे." मी उठत म्हणाले.
"मॅडम, माझी बहीण निर्दोष आहे हो. मी गॅरंटी देते तिची. तिने खून केलेला नाही." अंजना काकुळतीला येऊन म्हणाली.
"ते मला माहीत आहे, अंजना. सुनयना खुनी नाही. तिने खून केलेला नाही, हे नक्की. पण ती खुनात सहभागी नव्हतीच, असं ठामपणे मला नाही सांगता येणार."
अंजना गोंधळल्यासारखी माझ्याकडे बघत राहिली.
सुनयना आणि मी आज पुन्हा एकदा समोरासमोर बसलो होतो.
"कुणाला वाचवू पाहता आहात तुम्ही, सुनयना?" ती काहीच बोलली नाही.
"कोण आहे तो?"
"मी खून केलेला नाही." बर्याच वेळाने ती अस्फुट स्वरात म्हणाली.
"ते मलाही माहीत आहे. तुमच्या रिव्हॉल्व्हरमधून झाडली गेलेली गोळी मला सापडलीय. पण तो कोण आहे?"
"मला फाशी झाली तरी चालेल."
मी हतबद्ध झाले. ही बाई कुणाला वाचवू बघतेय?
तिला भेटून बाहेर पडले. बाहेर ते पोलीस अधिकारी कामात गुंग होते. माझी चाहूल लागताक्षणी त्यांनी फाईलमधून डोकं वर काढलं.
"काय मॅडम, लागला का काही तपास? तुम्हाला सांगतो, आमचंच शेवटी खरं निघेल बघा."
"बाईंनी खून केला नाही हे नक्की, इनामदारसाहेब. बाकी तुमचा अंदाज खरा असूही शकतो." माझ्या बोलण्याने ते चकित झालेले दिसले.
पुन्हा एकदा सुनयनाचं घर. जवळपास तसंच्या तसंच होतं. मी बेडरूममध्ये गेले. तिथलं कपाट उघडून मी सामान तपासून पाहू लागले. इतर कुठल्याही कपाटाला असतो तसाच याही कपाटाला एक चोरकप्पा होता. तो सहजी दिसतही नव्हता. मी हेअरपिन काढून त्याच्या कुलपाशी खटपट सुरू केली. आणि पाच मिनिटांत कुलूप उघडलं. आतमध्ये सुनयनासाठी महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी होत्या. काही कागदपत्रं, काही दागिने... मी ते सगळं बाहेर काढून पाहिलं. रहस्यापासून बहुदा मी आता एखादी पायरी दूर होते.....
"इनामदारसाहेब, तुमचं बरोबर होतं. खून सुनयना बाईंनीच केलाय आणि आता तसं कबूल करत नाहीयेत. पण किती काळ कबूल करणार नाहीत? खुनाचं कारणही त्यांच्याकडनंच कळेल आपल्याला. पण केशववर झालेला हल्ला... तो सुनयनाबाईंच्या कुठल्यातरी साथीदारानेच केला असावा. आज पंधरा दिवस झाले. त्या घराभोवती दिवसरात्र पहारा असल्यामुळे ते लोक सावध झालेले दिसतात. माझं असं मत आहे की, सुनयनाच्या घराबाहेरचा पोलिस पहारा काढून घ्यावा."
मी माझी योजना त्यांना समजवायला सुरुवात केली.
....
रात्रीचा एक वाजला होता. सुनयनाच्या घराभोवती असलेल्या झाडीत मी केव्हाची बसले होते. तीन दिवसांपूर्वी पहारा उठवला गेला होता. तीन दिवसांपासूनच्या माझ्या या तपश्चर्येला अजूनतरी काही फळ आलं नव्हतं. वाट बघण्याशिवाय माझ्या हातात काहीही नव्हतं.
दीड वाजण्याच्या सुमारास अंगणाचं फाटक करकरलं. नखशिखांत काळे कपडे घातलेली एक व्यक्ती मुख्य दरवाज्याकडे हळूहळू यायला लागली. मी सावध होतेच. एकदम झेप घेऊन मी त्या व्यक्तीला पकडलं. तो माणूस निसटायची धडपड करत होता. मी पकड घट्ट केली आणि बॅटरीचा झोत त्या व्यक्तीच्या चेहर्यावर मारला. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. यासाठीच सुनयना तोंड उघडत नव्हती तर!
"मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही पळून जाणार नाही, हे मला माहीत आहे."
"माझ्याकडे किल्ली आहे घराची." त्या व्यक्तीने कुलूप उघडलं.
हॉलमधला क्षीण पिवळा बल्ब लागला. माझ्यासमोर भारतातला तो प्रसिद्ध दिग्दर्शक उभा होता.
"मी तो खून केलेला नाही. मी... मी इथे फक्त तिच्यासाठी येत होतो. माझं अजूनही प्रेम आहे तिच्यावर."
"तुम्हाला पाहताच मला कळलं की तो खून तुम्ही केलेला नाही. खुनी माणूस वेगळा आहे."
"थॅंक्स, सुनीता. मी इथे फक्त त्या परफ्यूमच्या बाटलीसाठी आणि त्या हारासाठी आलो होतो. सुनयनाकडे असल्या महागाच्या वस्तू पाहून कुणी संशय घेतला असता, तर तिला नाहक मन:स्ताप सहन करावा लागला असता. कारण त्या दोन्ही गोष्टी मी तिच्यासाठी विकत घेतल्या आहेत. तिने माझं नाव कधीच ओठाबाहेर येऊ दिलं नसतं. मात्र स्वत: असह्य मन:स्ताप सहन केला असता. म्हणून मी त्या दोन गोष्टींसाठी आलो होतो. त्यादिवशी मी आलो तेव्हा ड्यूटीवरचा हवालदार बेशुद्ध होऊन पडला होता. मी कानोसा घेतला. आतमध्ये कुणीच नव्हतं. मी बेडरूममध्ये जाऊन परफ्यूमची बाटली उचलली. कपाट उघडून त्यातून तो हार घेणार इतक्यात मला बाहेर त्या हवालदाराच्या कण्हण्याचा आवाज आला. तो शुद्धीवर येत होता. तिथे थांबणं धोक्याचं होतं. मी बाजूच्या दाराने हळूच पोबारा केला. नंतर मला इथला पहारा उठवला गेल्याचं कळलं. मी दोन तीन दिवस वाट बघितली. आणि त्या हारासाठी आज इथे यायचं ठरवलं. "
"सुनयनावर मी खूप प्रेम करतो. पण आता तिला उघडपणे भेटणं मला शक्य नाही. माझं कुटुंब, संसार, मुलं... माझी सिनेकारकीर्द. मीडिया या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला कमी करणार नाही. पण तिला माझ्याशिवाय कुणीच नाही, हे मी जाणतो. त्या अपघातानंतर सुनयनाने माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले. माझी भेटदेखील नाकारली. मी तिची सगळी जबाबदारी घ्यायला तयार होतो. पण ती कधीच तयार झाली नाही. "यू डिझर्व समथिंग बेटर इन युअर लाईफ." ती वारंवार मला सांगत राहिली. ती ग्रेट आहे. ती महान आहे खरंच." त्या दिग्दर्शकाच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
"ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हा मी नुकताच सेटल होत होतो. ती मला शक्य तितकी सारी मदत करायची. माझे दोनेक सिनेमे गाजले की आम्ही लग्न करणार होतो. ती सिनेकरीयर सोडून देणार होती.... पण.... वीस वर्षं! वीस वर्षं मी तिच्या प्रतिसादाची वाट पाहिली. गेल्याच महिन्यात माझ्या तपश्चर्येला फळ आलं. तिला एकटं एकटं वाटायला होतं. मनात सारखे आत्महत्येचे विचार करायची. मी तिला भेटणं सुरू केलं. लपूनछपून! मी तिला भेटताना शक्य तितकी सर्व खबरदारी घेत होतो. तुम्हाला तर माहीतच आहे, सिनेसृष्टीतल्या लोकांच्या जीवाला अंडरवर्ल्डकडून बराच धोका असतो. मी कुठेही जातो तेव्हा माझ्यासोबत सतत सुरक्षापथक असतं. सुनयनाला भेटायला येताना ते बरोबर घेऊन येणं शक्यच नाही."
"म्हणून गेल्या महिन्यात सुनयनाने तिचं रिव्हॉल्व्हर पूर्ण लोड करून घेतलं होतं."
"बरोबर... तोच खात्रीशीर मार्ग होता. ती किती खूश होती. ... पण तो खून. सुनयनाकडे काहीही किमती ऐवज नाही. तो हार तिचा एकमेव किमती दागिना पण तोही सेमीप्रेशस स्टोन्सचा आहे. मग तिच्यावर कुणी का पाळत ठेवावी, कळत नाही."
"ते कदाचित मला माहीत आहे."
"काय सांगता? तुम्हाला....."
"जस्ट अ मिनिट...." मी धाडकन दार उघडून बाहेर धावले. ’त्या’नेही तिथे यायला तोच दिवस निवडला होता. गेटपाशी तो मला दिसला. काळे कपडे घातलेला, चेहरा संपूर्ण झाकलेला.
"हॅंड्स अप. अदरवाईझ आय विल शूट. आयम सिरियस."
तो गर्रकन वळला.
"मी शूट करेन." मी पुन्हा ओरडले. "मला तुझं सीक्रेट कळलंय. आणि हे लक्षात घे, ती वस्तू आता तिथे नाही. तुला ती कधीच हस्तगत करता येणार नाही. उलट आता तुला तुझ्या साथीदाराच्या खुनाचा जाब द्यावा लागेल."
त्याने पळण्यासाठी पाऊल उचललं. मी गोळी झाडली. तो हेलपाटला. पण तसाच पळाला. मी त्याच्यामागे धावले पण तो फार चपळ होता. पाहता पाहता तो दिसेनासा झाला. मी घामाघूम होऊन घरात परत आले.
"सुनीता... आता?"
"तो परत येणार नाही. आणि हो... चिंता करू नका. सुनयना एखाद दोन दिवसांत तुरुंगातून बाहेर येईल. आणखी एक, हे माझं वचन आहे की, तुमचं रहस्यदेखील जगाला कळणार नाही."
"थॅंक्स. तुमचे उपकार मी जन्मात विसरणार नाही." तो रात्रीच्या अंधारात दिसेनासा झाला.
पोलिस मुख्यालयात एक बैठक भरली होती. बरेचसे वरिष्ठ अधिकारी त्याला उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मी बोलणं सुरू केलं.
"सुनयना पूर्णत: निर्दोष आहे. तिने सांगितलेली कहाणी खरी आहे. तुमच्यापुढे आता मी क्रमाने एकेक गोष्ट मांडणार आहे.
सुनयनाने खून केला नाही, ही गोष्ट माझ्या डोक्यात पक्की होत होती. कारण गोळी मारणारी व्यक्ती ही निष्णात शूटर होती. तुम्ही जर त्या प्रेताच्या जखमेचं निरी़क्षण केलंत तर लक्षात येईल की, गोळीने थेट हृदयाचा वेध घेतला आहे. सुनयनाचे डोळे अधू आहेत. तिला लांब अंतरावरून असा नेम साधणंही शक्य नाही. पण जर अनमानधपक्याने तिने झाडलेल्या गोळीने असा वेध घेतला असेल तर? जरी ही शक्यता अतिशय कमी असली तरी तपासून पाहायला हवी होती. मी सुनयनाचा इतिहास तपासला. तिला शत्रू असे कुणी नव्हतेच. खेरीज विस्मृतीत गेलेल्या एका नायिकेला कोणी का संपवू बघावं? गेल्या वीस वर्षांत तिच्याबाबतीत असं काही कधी घडल्याचं ऐकीवात नव्हतं. मग आता हे असं का व्हावं? तिच्या अंगणात खून झाला तो का आणि कुणाचा? त्या खुनाची साखळी जुळते ती ह्यामुळे."
मी सुनयनाचा हार सर्वांपुढे धरला.
"ये हार सेमीप्रेशस स्टोन्स का है, क्यूं मंगतरायजी? क्या कीमत होगी इसकी?"
"यही कुछ छे हजार के करीब." तो अनुभवी सोनार बोलला.
"तुमच्याकडे दीड वर्षापूर्वी पहिल्यांदाच सेमीप्रेशस स्टोन्सच्या जरा स्वस्त दागिन्यांचा विभाग सुरू झाला, नाही का?"
"हो. मी त्यात विशेष लक्ष घालत नाही. माझा मोठा मुलगा विशाल ते बघतो. चालू फॅशनप्रमाणे स्टोन्स आणून आम्ही घाऊक डिझाईन करून दागिने विकतो. सुनयनादेवी आमच्या जुन्या कस्टमर. आता त्यांची हिर्यांचे वगैरे दागिने घेण्याची ऐपत राहिली नाही दुर्दैवाने. म्हणून हा सेमीप्रेशस स्टोन्सचा हार त्यांनी घेतला दोन महिन्यांपूर्वी. त्याचेही पैसे त्या तब्बल एक महिन्यानंतर देऊ शकल्या."
"बरं, आता जरा हा हार नीट बघा बरं. कदाचित तुम्ही तो पहिल्यांदाच बघत असणार."
त्यांनी हार निरखून पाहायला सुरुवात केली. काही मिनिटांत ते उत्तेजित होऊन जागीच उभे राहिले.
"येस, मि. मंगतराय?"
"कौन सोच सकता है? क्वीन ऑफ द ज्युवेल्स... नूरजहान."
अनिकेतचं "भारतातील दुर्मिळ रत्ने" असं कामी आलं होतं शेवटी. त्या हारात बेमालूमपणे लपवलेलं ते रत्न... हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये दोन वर्षांपूर्वी झालेली ती अभूतपूर्व चोरी. नूरजहान हे एक युनिक आकाराचं आणि वजनात आतापर्यंत सर्वांत जास्त असलेलं दुर्मिळ माणिक आहे. म्युझियममधून त्याची चोरी झाली. "शर्विलक" अशा नावाखाली काम करणार्या दोघा चोरांचा यात हात होता. या दोघा चोरांना आजपर्यंत कुणीही पाहूदेखील शकलेलं नव्हतं. पकडणं तर लांबची गोष्ट.
"ते माणिक चोरल्यावर नक्की काय घडलं, हे कळायला मार्ग नाही. पण माझा अंदाज असा आहे की, त्या रत्नापायी त्या दोघांत फूट पडली. एकजण ते माणिक पळवून नेण्यात यशस्वी झाला. दुसरा त्याच्या मागावर होताच. त्याचा ससेमिरा टाळण्यासाठी पहिल्याने हे रत्न आणि इतर काही त्यासारखे दिसणारे खडे यांच्यातून हा हार तयार केला आणि एका सोनाराला तो साधा हार असल्याचं भासवून तो विकला. तो सोनारही फार निष्णात रत्नपारखी नव्हताच. ते पहिल्या शर्विलकाच्या पथ्यावर पडलं. नंतर तो देशाबाहेर पळून गेला. त्या सोनारामार्फत, जो मंगतराय यांना सेमीप्रेशस स्टोन्सचे दागिने पुरवत असे, तो हार मंगतराय यांच्या दुकानात विकण्यासाठी आला. अर्थात तिथेही तो कुठल्याही कसबी कारागिराच्या हाती गेला नाहीच. तुम्हाला माहीत आहेच की, दोन महिन्यांपूर्वी एका सिनेपुरस्कार सोहळ्यात सुनयनाला "जीवनगौरव पुरस्कार" मिळणार होता. त्यासाठी काही साजेशी वेशभूषा असावी, म्हणून तिने हा हार कमी किमतीतला असल्याने खरेदी केला. पहिला शर्विलक काही काळाने त्या माणकासाठी पुन्हा भारतात परतला. त्या सोनारापासून सुरुवात करून तो हार कुठे कुठे विकला गेला, हे तपासणं सहज शक्य होतं त्याला.
तो हार सुनयनाने खरेदी केल्याचा पत्ता त्याला लागला. त्याने सुनयनाच्या घराची माहिती काढायला सुरुवात केली. कुणालाही, कसलाही संशय येऊ न देता त्याला ते माणिक हस्तगत करायचं होतं. पण त्याचा साथीदार त्याच्या मागावर होताच. त्याने त्याला अखेर गाठलं. त्यांची बोलाचाली झाली असावी. त्यानंतर काय घडलं हे आपणा सर्वांना माहीत आहेच."
....
सुनयना तुरुंगातून त्यानंतर लगेचच सुटली. ’नूरजहान’ त्याच्या हक्काच्या ठिकाणी, सालारजंग म्युझियमध्ये समारंभपूर्वक रवाना झालं. ’दुसरा शर्विलक’ मात्र सहीसलामत निसटण्यात यशस्वी ठरला. त्याचा चेहरादेखील मला कळू शकला नाही. त्याचा कुठेही मागमूसही लागलेला नाही. तो सगळीकडून गायबच झाला आहे जणू.
....
परवा हैदराबादला गेले होते तेव्हा सालारजंग म्युझियमला भेट दिली. ’नूरजहान’ दिमाखात त्याच्या जागी विराजमान झालं होतं. देशोदेशींचे पर्यटक त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होते, भारावून जात होते. मला ’दुसर्या शर्विलकाची’ आठवण झाली.
’एक ना एक दिवस नूरजहानच्या लोभाने तू पुन्हा येशीलच. तेव्हा मात्र माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला तुझ्या प्रत्येक दुष्कृत्याचा जाब एक दिवस द्यावाच लागेल.’
.....
नूरजहान अजूनही तितक्याच दिमाखात सालारजंगमध्येच आहे. ’तो’ अजूनतरी आलेला नाही. पण मीही आशा सोडलेली नाही.
-श्रद्धा द्रविड