तू करुणेचा विशाल सागर आभाळा
तुझ्याच पोटी सर्व चराचर आभाळा
व्यापलेस तू विश्वातिल काने कोने
सांग कुठे दिसला का ईश्वर आभाळा
तू साकी हो, घे सुरई चैतन्याची
ये, देहाचा तू प्याला भर आभाळा
थकून जातो मावळून हा तव चरणी
रोज तरीही जळेच भास्कर आभाळा...
विलीन मी तुझियामध्ये होण्यापूर्वी
बरसुन यावी एक तुझी सर आभाळा
निर्मिल्यास का समोर या इतक्या वाटा?
का प्रश्नांचे अनंत डोंगर आभाळा... ?
तुला पाहता एकदाच मी शांतपणे
दु:खांचे होते छूमंतर आभाळा!
तुझा आसरा घेत राहती ग्रह तारे...
सांग मला तू कुठे तुझे घर आभाळा?
शाश्वततेच्या पोटी यावी शाश्वतता...
देह कसा हा माझा नश्वर आभाळा ?
लोपली कुठे करुणा अन पाऊस तुझा?
वाट पाहतो आहे हलधर आभाळा...
तापुन धरणी नभी लोटले बाष्प तरी...
कसा फिरकला नाही जलधर आभाळा?
आम्ही करावी तुझी प्रार्थना सत्वर अन
देत रहावे तूही भरभर आभाळा...
आपल्याच धुंदीमध्ये जगतोस सदा...
असा कसा आहेस कलंदर आभाळा ?
विराट दर्शन तुझे पाहता हे कळते
लुटूपुटूचे माझे संगर आभाळा...
भोग द्यायचे मला असावे थेट सदा
सुख-दुःखांना नकोच अस्तर आभाळा
दिसायचे जर रूप तुझे तर स्पष्ट दिसो
उगाच का ही संभ्रम-झालर आभाळा?
कशास माझा जीव ठेवला तू असल्या
असण्या-नसण्याच्या सीमेवर आभाळा
अजून आहे भोगत सगळे शाप तुझे
अशात आता नको नवा वर आभाळा!
तसा राहिला सदैव माझा ताठ कणा...
तुझ्या पुढे झुकलो, जुळले कर आभाळा
किती जपू मी, कधीतरी ही फुटायची
प्राणाने भरलेली घागर आभाळा...
कधीतरी करशील बेरजा जीवांच्या...
एक शून्य तू माझेही धर आभाळा...
फिरून थांबे कालचक्रही ह्याच क्षणी
जगतो आहे मीही क्षणभर आभाळा...
तुझ्याप्रमाणे व्यापक तरिही पोकळ मी
दोघांचे आयुष्य समांतर आभाळा
भास असूनी जगण्याची का ओढ अशी?
सांग अता का तुही निरुत्तर आभाळा!
रणांगणी दुमदुमणारा पांचजन्य तू
तूच बाण अन तूच धनुर्धर आभाळा...
पहाटवेळी अनंतरंगी छटा नभी
रोज तुझे न्यारे वेषांतर आभाळा!
रिती राहते पोटाची खळगी तेव्हा
चंद्रबिंबही दिसते भाकर आभाळा!
जन्महि नव्हता हाती, मृत्यूही नाही
जगण्याविण नाही गत्यंतर आभाळा
तुझ्याच पोटी नांदतोय मी किती युगे
अजून का हा भाव आप-पर आभाळा?
खुळी अपेक्षा कशास ही वैराग्याची?
देह - वासना हे तर वधुवर आभाळा!
हाकतोय मी गुरेच आणिक तू तारे
मीही धनगर, तूही धनगर आभाळा!
निर्मितोस तू कसे नव्याने ग्रहतारे?
राहतोस तू कसा गरोदर आभाळा?
पहाटवेळी गर्द जांभळे वस्त्र तुझे
अन पदरावर सोन्याची जर आभाळा!
एकामागुन एक तुफाने किती तुझी?
सावरण्या दे थोडा अवसर आभाळा...
अवर्षणावर बोलताच तू पूर दिले
करू नको असले विषयांतर आभाळा...
तुझे वागणे कसे असावे, असू नये,
तुला काय मी सांगू पामर आभाळा
माग तुझा घेणे ना जमले कधी मला
मी भलत्या इच्छांचा चाकर आभाळा
विश्व निर्मिती तुझी जराशी चुकली का?
फिरव पुन्हा आभाळी नांगर आभाळा
कितीक तार्यांच्या गंगा आल्या गेल्या
तूच एकटा उभा निरंतर आभाळा
किती युगे मी झेलत राहू वार तुझे?
कोसळत्या उल्कांना आवर आभाळा
चाकोर्या सोडून जाहलो धुमकेतू
मीच ठरवतो माझा वावर आभाळा
असह्य झाले जरी तुला जगणे इथले
तू कोठे करशील स्थलांतर आभाळा
सांग मला तू अस्तित्वाचे रूप कसे
जन्मापूर्वी, मृत्यू नंतर आभाळा
तुझ्या संप्रती येण्यासाठी प्रवास हा
वाट नवी अन प्रवास खडतर आभाळा...
रोज अंबरी दूध चांदणे आटवते
रोज पहाटे क्षितिजी केशर आभाळा!
अस्तित्वाच्या पल्याडही अस्तित्व तुझे
वेध तुझा मी घेऊ कुठवर आभाळा...
अनंत वर्षे सुरूच आहे खेळ तुझा
कसा न तू अद्याप वयस्कर आभाळा!
जीवन सारे तुझ्याच उदरी सामावे
तू विघ्नेश्वर, तू लंबोदर आभाळा...
अर्थहीन शब्दांनी रचले गीत तुझे
'प्रसाद' करतो तुलाच सादर आभाळा...
[आभाळा या दीर्घ गझल मधे शंभरहून अधिक शेर आहेत! मायबोलीच्या दिवाळी अंकातल्या 'इंद्रधनुष्य' या खास विभागासाठी प्रसाद यांनी त्यातले निवडक ७ x ७ = ४९ शेर पाठवले आहेत!]
-Prasad_Shir