कुणी इतकंही हळवं असू नये…
तुझ्या मनावर ओरखडे पडतात
प्राजक्ताची फुलं अंगावर उधळली की…!
वारा उडवून लावतो बाभळीगत काटेरी
मनभर पसरलेली स्वप्ने पाचोळ्यागत
भर पावसात काच तडकल्याचा
आवाजही ऐकू येत नाही
तुझी धाप मात्र घुमत असते नसानसांत…!
आकांत फुलारून आला की
डोळ्यांनी रडून घ्यावं दिलखुलास
चिवटपणे वेदना दाबून ठेवू नये
हळूवार सगळयावर सोडून द्यावं पाणी
तुला म्हणून सांगतो इतकंही हळवं होवू नये कुणी…!
गाफील क्षण येतातच अनेकदा
आपण मात्र गाफील असू नये
कुणावर एवढाही विश्वास टाकू नये
हळूवार उसवत जाणारी कळ
ढगांच्याही वर पसरलेली नीळ
आणि जमिनीवर घट्ट रोवलेले पाय
यांच्यात नक्की नातं काय?
असा प्रश्नही पडू देवू नये…
खरंच सांगतो इतकही हळवं असू नये…!
संध्याकाळी समई लावताना
नकळत हात जुळावेत
मनात प्रार्थनांचा कल्लोळ नसेलही
पण हातांवरचा ताबा सुटता कामा नये
किमान एवढा तरी संयम हवाच…!
काल म्हणे तू रडली होतीस
खिडकीचे गज मुठीत चुरगाळत
आणि पाणीही नव्हतं तुझ्या डोळ्यांत
म्हणून हे एक नक्की लक्षात ठेव -
पहाटे प्राजक्ताचा सडा पडण्याआधी वारा येतो
कालचा सडा अलगद घेऊन जातो
तो मात्र पहायचा नाही…
तुला तो पाहवला जायचा नाही…
हळवेपणालाही सीमा हव्याच…!
हळवेपणाचं अस्तित्व हळूवार जपताना
त्याचं हळवेपण कुणालाही कळू नये
वर्षानुवर्षे जपलेलं जाळीदार पिंपळपान
आपल्याच हातांनी जाळू नये…!!!
-सारंग