रेशमाच्या रेघांनी

Submitted by क्ष... on 24 October, 2007 - 02:01

Pillow Coverहान असताना आपण घरातली मोठी माणसे जे काही करतात त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आई-वडील पुस्तके वाचत असतील तर मुलाना सहजच पुस्तके वाचण्याचा नाद लागतो. माझे जे सगळे छंद आहेत त्याचा उगम बघितला तर आजी, आई, काकू वगैरे यांची खूप छाप आहे असे मला वाटते. माझी आजी सतत काहीतरी विणत असायची, तिच्या हातात एखादा स्वेटर विणताना सतत दिसे. तिने पेंटिंग केलेल्या साड्या पाहील्या होत्या. काकू आणि मम्मी सतत काहीतरी भरतकाम करताना दिसत. सुई-दोरे वगैरेचे आकर्षण तेव्हापासूनचे.

मी तिसरीमधे असताना आमच्या शेजारच्या काकू पण भरतकाम करताना दिसत. त्यांची मुलगी तेव्हा लहान होती म्हणून मी त्यांच्याकडे खेळायला जायचे. एकदा ती झोपलेली असताना हट्टाने मग त्यांच्याकडून टाके शिकले. मम्मीने एक रुमाल, सुई, दोरा असे साहित्य दिले. मम्मी त्यावेळी दुपारी शिवणाचे क्लास घेत असे. त्यामुळे तिने पण आढेवेढे घेतले नाहीत. मग माझी शिकवणी सुरु झाली. गहू टाका, साखळी, उलटी टीप, काश्मिरी टाका एवढेच प्रकार त्यांनी मला शिकवले. पण ते शिकताना माझे प्रश्न ऐकून काकू अगदी कावून जात असाव्यात. 'ह्याला गहू टाकाच का म्हणायचे?' 'हा टाका खर्‍या साखळीसारखा दिसायला पाहिजे, मग मला किती दिवस लागतील तसे यायला?' असे बरेच काही! काकूंच्या सुदैवाने आम्ही ते घर लवकरच सोडले. पण टाके शिकायचे वेड काही गेले नाही. पुढे कच्छी, पॅचवर्क कटवर्क वगैरे अवघड प्रकार शिकायला बारावीची सुट्टी यावी लागली पण ते वेड राहिले ते राहिलेच. आणि सतत वाढतही राहिले.

कॉलेजमधे गेल्यावर बाकीच्या मुलींपेक्षा आपले सगळेच वेगळे असावे असे एक वेड असते. त्यात ड्रेसेस पण आलेच. आकर्षक दिसणारे ड्रेसेस असावेत आणि ते असले म्हणजे जग जिंकल्याचे लक्षणच. त्यातूनच मला माझ्या प्रत्येक ड्रेसवर काहीतरी भरतकाम कर, कुठे पेंटिंग कर अशी सवय लागली. त्याकाळात विकत ड्रेस घ्यायचा तर अजून चार मुली तसलेच ड्रेस घालणार, असा प्रकार होता. ते अगदी त्रासदायक वाटत असे. मम्मी माझे सगळे ड्रेस घरी शिवायची- काय हवी ती फॅशन, कोणते हवे ते रंग आणि कोणता हवा त्या प्रकारचा कपडा. त्यामुळे वेगळेपणाचे वेड (हो वेडच ते!) अगदी छान जपले गेले.

kashida-gopur.jpg

दरम्यान एका काकूंकडे फार सुंदर साडी पाहिली. त्यावर त्यांनी क्रोशाची नाजुक लेस करुन लावली होती. मला क्रोशाकाम म्हणजे फक्त ताटावर झाकायचे रुमाल, तोरणे हेच प्रकार माहिती होते. आजुबाजूला तेच पाहिले होते. मम्मीच्या बर्‍याच मैत्रिणी ते करायच्या आणि त्यातला ओबडधोबडपणा पाहून तो प्रकार कधी शिकावाच वाटला नाही. ते काम मात्र काकूंच्या एका साडीने केले. लगेचच काकूंना विचारुन त्यांच्याकडे क्लास लाऊन तो प्रकार शिकूनही घेतला. तशातच एकेदिवशी आजीचे कपाट आवरताना तिची स्वेटरची पुस्तके, सुया, असले घबाड मिळाले. त्यातल्या एका स्वेटरची वीण खूप आवडली म्हणून मग मी आणि मम्मीने मिळून तो स्वेटर विणायलाही घेतला. हे करत असताना अभ्यास नव्हता असे काही नव्हते. अभ्यास, journals, practicals, submissions असले सायन्सच्या विद्यार्थ्यांचे सोपस्कार मलाही होतेच. गणिताशी जितक्या आवडीने झटापट करत असे तशीच झटापट माझी दोर्‍यांचे गुंते सोडवताना चाले. एकावेळी साधारण दोन-तीन प्रोजेक्ट हातात असत. एकीकडे कच्छीकाम करायला घेतलेली साडी, तर दुसरीकडे पप्पांसाठी करायला घेतलेला स्वेटर, मधेच कुठेतरी मिळालेले छापच छापून घे असा प्रकार असे! एक मात्र होते, कुठलेही प्रोजेक्ट कधी अर्धे टाकले नाही.

माझे ड्रेसेस वगैरे पाहून आजुबाजूच्या कॉलेजच्या मुली विचारायच्या, "आम्हाला हे सर्व शिकवणार का?" मला माझ्या कामात खूप सफाई लागते म्हणून मला शिकवण्यात खूप इंटरेस्ट नव्हता. दोरे अर्धे वगैरे मागे लोंबत आहेत, कापड, दोरे, घाण झाले आहेत असे काम पाहिले की मला तिडीक येते. त्या मुली खूपच मागे लागल्यावर मग त्याचेही क्लासेस घ्यायला सुरुवात केली, तेही माझ्या अटींवर. पूर्वी शेजारी रहाणार्‍या काकू आता परत आसपास रहायला आल्या होत्या आणि मम्मीकडे शिवणाच्या क्लासला यायच्या. मी भरतकाम शिकवते म्हणल्यावर माझ्याकडून टाके शिकावे असे त्यांना वाटले. मला विचारले तेव्हा वाटले काकू गंमत करताहेत. पण खरोखर त्या सर्व विसरुन गेल्या होत्या. माझ्या विद्यार्थ्यांमधे त्याही सामील झाल्या आणि पुन्हा सर्व नव्याने शिकल्या. ह्यालाच 'गुरुची विद्या गुरुला' असे काहीसे म्हणत असावेत!

shirt-details.jpg

पुढे अमेरीकेमधे आल्यावर सॅन होजे मधली 'मार्टीन लुथर किंग लायब्ररी'चा शोध लागला. तिथे इतर पुस्तकांबरोबर विणकाम, भरतकाम वगैरेची पुस्तके पहाणे हा एक उद्योग असे. 'मायकेल्स'मधे जाऊन विविध प्रकारच्या लोकरीचे नमुने पहाणे, निरनिराळ्या प्रकारचे beads आणून त्याचा काय उपयोग करता येईल हे पहाणे, असे उद्योग चालू झाले. पहिल्यांदा खरेदीला दुकानात गेले आणि तिथे एकाच प्रकारचे जवळपास पन्नास एक शर्ट पाहून माझ्या वेगळेपणाच्या वेडावर थंड पाणी पडले. तशातच कितीही साड्यांवर भरतकाम केले तरी त्या साड्या वर्षातून एकदा वगैरेच घालू शकतो हे लक्षात आल्यावर त्यात कशाला वेळ घालवा असा प्रॅक्टीकल विचार मनात आला. मला त्यावर पण उपाय सापडला. विकत आणलेल्या शर्टवर नाजुक भरतकाम कर, कुठे मोती लाव असे करुन मी माझ्यापरीने माझ्या कपड्यांचे वेगळेपण जपायला सुरुवात केली. Ikea मधून विकत आणालेल्या तयार कव्हरवर भरतकाम कर, टेबलरनर बनव वगैरे करायला सुरुवात केली.

Bead Work 2

आपल्याला येत असलेली कला माणूस कुठेही कशीही वापरु शकतो या गोष्टीवर माझा अतोनात विश्वास आहे. साधारण दोन वर्षापूर्वी कंपनीची Annual Party होती आणि मी एक ड्रेस आणू म्हणून कित्येक दुकाने फिरले. शेवटी मनासारखे काही मिळेना म्हटल्यावर एक काळ्या रंगाचा स्वेटर विकत आणून त्यावर मण्याने नाजुक फुले केली आणि तो काळ्या ट्राउझर वर घातला. जवळपास १० तरी लोकानी विचारले असेल "कुठे घेतला?" म्हणून. आणि हे करण्यासाठी मी फक्त १५ मिनिटे घालवली. असेच काही इतर शर्ट, सलवार कमीझ वर काम करुन मी माझी आवड अजूनही जपली आहे.

आज नोकरी, घर इत्यादी व्यवधाने वाढली आहेत. भारतात असताना एखादा ड्रेस भरतकाम करुन साधारण दोन-तीन दिवसात पूर्ण होत असे आता तेच पूर्ण करायला महिना-महिना लागतो. माझी छापांची पिशवी भारतातून मी अजून इकडे आणलेली नसल्याने जी काही डिझाईन्स आहेत त्यातलेच काहीतरी शोधून वापरते. कधी कधी एखादे प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी दोन-तीन महिनेही लागतात. पण करायची आवड अजूनही कमी झाली नाही. दरम्यानच्या काळात अजून कित्येक छंद निर्माण झाले. त्यातले काही तेवढ्यापुरते, तर काही ह्यापेक्षाही गारूड करणारे ठरले. एवढे असूनही सुया, दोरे, रेशीम वगैरे पाहिले की माझे हात अजूनही तितकेच शिवशिवतात. कुठेतरी, काहीतरी केल्याशिवाय स्वस्थता येत नाही. माझ्या ह्या आवडीतूनच मायबोलीवर दोन-तीन वर्षांपूर्वी 'इतर कलां'चा बुलेटीन बोर्ड चालू केला होता. नवीन कुणाला काही शिकायची आवड असेल तर मदत होईल अशा इराद्याने. पण आता त्याला मरगळ आलेली आहे.

Wall_Hanging.jpg

आपल्यापैकी सर्वाना काही ना काही कला अवगत असते. त्या कलेचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करावा इतपत त्या कलेविषयी माहिती नसते किंवा इच्छा नसते. बर्‍याचदा वेळेचा आभाव, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्यांशी झगडताना आपल्याला स्वत:च्या कलांचा विसर पडण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी स्वत:शी ठरवले की कुठल्याही कारणाने मी माझ्यातल्या कलेचा विसर पडू देणार नाही, महिन्यातून/सहा महिन्यांतून/वर्षातून अमुक एवढा वेळ अमुक एवढे पैसे माझ्या स्वत:च्या कलेसाठी, छंदासाठी वापरणार! असा विचार प्रत्येकाने करायला काही हरकत नाही. या दिवाळीच्या निमित्ताने झटका त्या कॅमेर्‍यावरची धूळ, काढा ते ब्रश आणि रंग माळ्यावरुन खाली. ती गेल्यावर्षी करायला घेतलेली दोन सुयांवरची शाल तिथून कोपर्‍यातून खुणावतेय बघा! काढणार ना?

-मिनोती

विशेषांक लेखन: