दोन शेवट

Submitted by HH on 23 October, 2007 - 15:46

दुपारचे दोन वाजतायत. 'जनहित'चे सर्वेसर्वा प्रकाशकुमार चौधरींना प्रसाद 'जनहित'च्या नवीन येऊ घातलेल्या आठ पानी पुरवणी-पत्रिकेसाठीचा 'ले आऊट' दाखवतोय. नव्या पिढीला आवडतील असे विषय आणि व्हिज्युअल्स. चौधरींना पाहताच आवडलेत. या माणसाच्या कल्पना पूर्णपणे नवीन आहेत हे त्यांनी ओळखले आहे, पण चेहर्‍यावर ते तसे दिसू देत नाहीयेत. ए.सी.च्या थंड हवेत वाफाळत्या कॉफीचा घोट घेत प्रसाद सारख्या नवीन माणसाला हे काम झेपेल का याचा ते विचार करत आहेत. तेवढ्यात प्रसादचा मोबाईल वाजू लागलाय. प्रसादच्या बायकोचा- रश्मीचा फोन आलाय. पण प्रेझेन्टेशन मध्ये व्यत्यय नको म्हणून त्याने मोबाईल लगेच बंद केलाय.

ठाण्यातील 'नीलय टॉवर्स' मधल्या आपल्या सातशे तीन नंबरच्या अपार्टमेन्टचा दरवाजा उघडून रश्मी तिच्या चार वर्षाच्या मुलाला, धृवला बस स्टॉपवरून घेऊन आली आहे. धृवचा चेहरा आनंदाने फुलला आहे. आज स्कूलमध्ये टीचरने सर्वांना 'बी' काढायला शिकवलाय. आणि धृवला 'बी' काढायला लगेच जमला म्हणून त्याच्या वही मध्ये 'व्हेरी गूड' लिहून दिलंय. आईला वही दाखवायला तो अधीर झालाय.

सातशे चार नंबर अपार्टमेन्ट मधील रूपल मेहता जरा जास्तच झालेल्या जेवणाने सुस्तावली आहे. हल्ली तिला गॅसेसचा त्रास वरचेवर होऊ लागलाय. एक ढेकर काढत ती हॉल मधील दिवाणावर आडवी झालीय. रिकाम्या वेळचा तिचा आवडीचा चाळा... ती मनातल्या मनात मोठ्या घरात राहायची स्वप्ने रंगवू लागलीय. प्रसाद गाडगीळचा शेजारचा फ्लॅट आपल्याला मिळाला तर मधील भिंत पाडून केव्हढा मोठा हॉल तयार होईल. रिद्धी आणि नयनेशला वेगवेगळी खोली मिळेल. नवीन घराच्या रंगरूपाची रूपल मेहता डोळ्यापुढे चित्रे आणू लागलीये.

शीला आणि सतीश गाडगीळ क्लबमध्ये बसले आहेत. दर शुक्रवार दुपार ही त्यांची पत्ते खेळायची ठरलेली वेळ आहे. कार्डरूममध्ये आपापल्या वेगळ्या ग्रुप्स मध्ये दोघेही वेगवेगळे खेळतायत.

सतीश सिगरेटचा एक मोठा झुरका घेतोय. तो हुकमाचं मॅरेज जमवायच्या मागे आहे पण आज शेजारी बसलेला चंदू अजिबात राणी सोडत नाहीये.

शीलाच्या हातात पत्ते असले तरी आज तिच्या डोक्यात विचार धाकटा मुलगा नीरज आणि सून नेत्राचे आहेत. दोघातील भांडणे विकोपाला गेली आहेत. आठ दिवसांपासून नेत्रा लंडनला एका प्रोजेक्टसाठी गेली आहे. पण तिने अजून एकदाही फोन केला नाहीये. बाजूला बसलेली स्वाती आज न आलेल्या प्रतिभाविषयी काही सांगतेय पण त्यातही शीलाचे लक्ष नाहीये.

नेत्रा लंडन मधील आपल्या ऑफीसात सकाळी-सकाळी कॉफीचे घोट घेतेय. गेले चार दिवस तिला इतके वर्कलोड आहे की, नीरजचा विचार देखील करायला तिला वेळ झाला नाहीये. आत्तापण तो विचार नकोसा वाटतोय, पण काहीतरी एक फायनल डिसीजन घ्यायला हवंय, हे डिसीजन तिने फायनल केलंय.

'जनहित'च्या ऑफीस मधून प्रसाद बाहेर आलाय. 'जनहित'च्या या "युवा" पुरवणीचे काम आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री वाटू लागलीये. फक्त 'जनहित'च्या अंतर्गत राजकारणाने वेगळा निर्णय घ्यायला नकोय. नकळत त्याच्या हातून मोबाईलची बटने दाबली जातायत- रश्मीला हे सगळे सांगण्यासाठी.

संध्याकाळचे पाच वाजले आहेत. कार्डरूममध्ये शेवटचे प्लस-मायनसचे हिशेब सुरू आहेत. हाताचे सांधे दुखू लागल्याचे शीलाला नुकतेच जाणवलेय. बोटे मोडत हातांकडे निरखून बघताना, गेल्या वर्षभरात हातावर फारच सुरकुत्या वाढल्यायत हे तिच्या लक्षात आलंय. पुरुषांच्या वर्तुळात पण तेव्हाच विषय मेडीकल टेस्ट्स, शुगर, बी.पी. इत्यादी गोष्टींवर घसरलाय. सतीशला सहा महिन्यांपूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलाय, पण तरी तो अजून सिगरेट पिणे बंद करीत नाही यावरून चंदू त्याला उपदेश देतोय. त्यावर आता मी अगदी ठणठणीत असून सिगरेट न प्यायल्यास खंगून मरून जाईन, हे सतीश त्याला पटवून सांगतोय. त्या बरोबरच मुले मोठी होऊन आपापल्या उद्योगात सेटल झाली आहेत, तेव्हा माझ्या जबाबदार्‍या संपल्यात जमा आहेत हेही तो चंदूला ठणकावून सांगतोय.

इकडे स्वातीने क्लबमधून बाहेर पडता पडता, शीलाला आज तिचे काय बिनसले म्हणून विचारले आहे. सांगू का नको या विचारातच शीलाने नेत्रा आणि नीरज बद्दल सांगायला सुरुवात केली आहे. कुठेतरी मन मोकळे करणे तिला गरजेचे वाटू लागलेय.

संध्याकाळी सातला रूपल मेहताचा नवरा घरी आलाय. नवर्‍याने येताना क्रॉफर्ड मार्केट मधून हापूस आंब्यांची पहिली पेटी आणलीये, त्यामुळे रात्री रस-पुरी करायचा बेत रूपल मेहताने आखलाय. रात्री झोपताना नवर्‍याजवळ मोठे घर घेण्याचा विषय काढायचा बेत पण तिने आता पक्का केलाय.

रश्मीने सहज म्हणून सासूला, शीलाला फोन लावलाय. दोघीजणी एकमेकींना दिवसभराचे आपापले अपडेट्स देतायत. उद्या ब्रेकफास्टला दोघांना आपल्याकडेच यायचे सांगून रश्मीने फोन ठेवलाय. आई मोकळी झालेली बघून छोटा धृव तिच्यापाशी येऊन बिलगलाय. त्याला आणखी जवळ घेत आज काय काय केले शाळेत, ते रश्मी त्याला विचारतेय. धावत जाऊन बॅगेतून वही काढत त्याने पानभर काढलेला 'बी' आईला दाखवलाय. 'अरे वा! व्हेरी गूड' म्हणत तिने त्याला शाबासकी दिली आहे. त्या नंतर A for Apple... B for Bat ची उजळणी सुरू झाली आहे. रश्मीला मध्येच तोडत B for BABA असे धृव तिला सांगतोय. धृवचे हे हुशारीचे बोलणे ऐकून रश्मीला मनापासून हसायला आलंय. त्याचा पापा घेत बाबा आता उद्याच परत येणार आहे, हे ती त्याला सांगू लागलीये. आपल्या सारखेच तो पण प्रसादला मिस करतोय हे तिला जाणवलंय.

नेत्रा लंडन मधील हॉटेलात पलंगावर बसून नुसतीच टी.व्ही. वरील चॅनेल्स बदलतेय. आठ-दहा मिनिटे तोच चाळा केल्यावर टी.व्ही. वर काय बघायचे हेही धड ठरवता येत नसल्याचा तिला राग येऊ लागलाय. वैतागून तिने टी.व्ही. बंद केलाय. मघाशी दूर करून ठेवलेला नीरजचा आणि स्वत:चा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालाय. नीरजपासून कायमचे वेगळे राहायचे विचार तिच्या डोक्यात गेल्या एखाद-दोन महिन्यांपासून येऊ लागलेत. त्याच्या अपेक्षा, तिचे करीअर या सर्वांचा ताळमेळ काही बसत नाहीये. एकमेकांना सहन करण्याची शक्ती आता संपुष्टात येऊ लागलीये. या विचारातच तिने अलार्म लावलाय. सकाळी सहाचे फ्लाईट पकडून तिला मुंबईला उद्या परतायचे आहे.

पुस्तक मिटत रश्मीने शेजारचा लाईट बंद केला आहे रात्रीचे दोन वाजायला आलेत. हातात पॉवर-रेन्जरचे खेळणे धरून थोड्या अंतरावर धृव झोपला आहे. त्याच्या अंगावरचे पांघरूण नीट करत रश्मी कूस बदलून झोपायचा प्रयत्न करतेय. तिला प्रसादची फार आठवण येतेय. आत्ता या क्षणी तिला तो हवासा वाटू लागलाय. त्याचा राकट स्पर्श... गच्च मिठीमध्ये घेणे, हे तिला हवेसे वाटतेय. गेले चार दिवस तो नसतानाच्या कितीतरी गोष्टी, तिला त्याला सांगायच्या आहेत. आणि मग निर्धास्त त्याच्या कुशीत झोपी जायचे आहे.

रविवारचा दिवस उजाडला आहे. कुणी सुस्तावून, कुणी उत्साहाने दिवसाची सुरुवात करत आहेत... घरी परतण्यासाठी प्रसाद डेक्कन क्वीन मध्ये बसलाय. कर्जतला गाडी थांबली आहे. प्रसादने वडापाव घेतलाय. त्याच्या समोर साठीच्या आसपासचे डोंबिवलीला राहणारे एक जोडपे बसले आहे. पैकी काकूंनी साबुदाणा वडा आला तर घ्यायची ऑर्डर नवर्‍याला सोडली आहे. वडापाव थंड आणि कोमट या मधला काहीतरी आहे. चव यथातथाच. प्रसादने तो संपवायचा म्हणून संपवला आहे. डोळे मिटून आता तो एक डुलकी काढतोय. काकूंना साबुदाणा वडा न मिळाल्याने त्या जरा खट्टू झाल्या आहेत. थोड्या वेळातच महानगर त्याच्या रंग-गंधासहीत जवळ आल्याचे जाणवू लागले आहे. अचानक दचकून प्रसादला जाग आलीये. झोपेत आपले तोंड उघडे राहून, आपण आजूबाजूच्यांच्या समोर घोरत तर नव्हतो? या विचाराने तो थोडा चपापल्यासारखा आजूबाजूला बघतोय. पण लोक आपापल्यातच आहेत.

डोंबिवली गेलंय ठाणे येऊ घातलंय. गाडीचा वेग जरा हळू झालाय. एरवी ठाण्याला न थांबणारी गाडी सिग्नल न मिळाल्याने ठाणे स्टेशनात येऊन थांबली आहे. प्रसादच्या हे लक्षात येताच त्याने झपाट्याने आपली हॅन्ड बॅग आणि लॅपटॉपची बॅग उचलून ठाण्याला उतरायचे पक्के केले आहे. डोंबिवलीला राहणार्‍या काकांच्या मनात उतरावे की नाही अशी चलबिचल आहे. पण प्रसादची मदत घेत पटापट तिघांनी आपापले समान उचलून दरवाजा गाठलाय. काकू आणि त्यांच्या मागोमाग काका दोघेही उतरलेत. त्यांच्या दोन सूटकेसेस प्रसादने त्यांच्या हाती देता देताच गाडी स्टेशन वरून हललीये.

एक क्षण चालत्या गाडीतून उतरावे का नाही याचा प्रसादने विचार केलाय पण पुढचे वाचणारे दोन तास आठवून त्याने झटक्यात उतरायचा निर्णय घेतलाय. चालत्या गाडीतूनच त्याने एक पाय टेकवलाय, दुसरा टेकवतोय. तोच एक झटका बसलाय. लॅपटॉप-बॅगेचा बेल्ट दरवाजाच्या कुठल्याशा भागात अडकलाय. प्रसादला कळायच्या आत तो ओढला गेलाय, गाडीखाली. रुळावर. रक्ताच्या थारोळ्यात. गाडी धाड धाड आवाज करत पुढे निघून गेलीये. डोंबिवलीच्या काकू-काकांना एक क्षण काय झाले कळलेच नाहीये.

चार-पाच हमाल, आठ-दहा आजूबाजूचे पुढे सरसावलेयत. दोघांनी खाली उतरून प्रसादचे धड प्लॅटफॉर्मवर ठेवलेय दुसर्‍याने शीर धडाच्या जवळ नेऊन ठेवलेय. काकू-काकांच्या भोवती - मेला तो त्यांचा मुलगा समजून - लोक गोळा झालेत. तेव्हढ्यात प्रसादच्या खिशातून कुणी त्याचा मोबाईल काढलाय. ऍड्रेस बूक मधील होम वरती फोन चाललाय.

*******************

रात्रीचे आठ वाजतायत. प्रसाद आणि रश्मी गाडगीळचे घर. पोस्ट्मॉर्टेम पासून ते फ्युनरल, सगळे काही संध्याकाळपर्यंत आटोपले आहे. येणारे जाणारे मित्र, नातेवाईक, बाहेरगावाहून आलेले, अशी ये-जा सुरूच आहे. सुन्न आणि शांत वातावरणात मधूनच ऐकू येणारा एखादा हुंदका आणि दाटून आलेला कढ तेव्हढा आहे.

सतीश बाल्कनीत जाऊन एक सिगरेट पेटवतोय. खिडकीतून त्याला धृव दिसतोय. भिरभिर्‍या डोळ्यांनी कावरा-बावरा होऊन तो रश्मीची ओढणी हातात गच्च धरून बसलाय. त्याला पाहताच सतीशला जाणीव झालीये. जबाबदारीची. पुढील काही वर्षे तरी आपल्याला धडधाकट राहावे लागणार आहे. कळत-नकळत त्याने सिगरेट विझवून दूर भिरकावलीये.

तेव्हाच छोट्या धृवसाठी वरणभात घेऊन शीला धृवच्या जवळ आलीये. 'B for BABA' तो थोडंसं हसून आज्जीला सांगतोय. पदर तोंडाला लावत शीला त्याला उचलून कडेवर घेतेय. सकाळपासून दुखणारी कंबर आणि सांधे तिला विसरायला झाले आहेत.

बाहेर बसलेल्या स्वातीला आपण नक्की काय काम केले म्हणजे मदत होईल, हे सुचत नाहीये. तिच्या समोर नीरज मोबाईलशी काही चाळा करत बसलाय. रश्मी सारखी चांगली बायको, इतका गोड पोरगा असलेल्या प्रसाद पेक्षा हा नीरज गेला असता तर... एवीतेवी नेत्राचे आणि याचे पटत नाहीचे. तिच्या मनात विचार येतोय.

रूपल मेहताला रश्मी साठी फार वाईट वाटते आहे. उद्या आपल्याबरोबर असे काही झाले तर? या विचाराने तिच्या अंगावर शहारा आलाय. पण दुसरीकडे, आता रश्मी पुन्हा सतीश आणि शीलाकडे राहायला जाईल आणि आपले मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, ही फायदेशीर गोष्ट तिला थोडा आनंद देतेय. यापुढील काही दिवस रश्मी आणि गाडगीळ कुटुंबाशी आपुलकी आणि जवळीक साधायचे तिने ठरवले आहे. याची सुरुवात म्हणून तिने गाडगीळ लोकांकडे न्यायला खिचडीचा कूकर लावलाय.

समोरच्या भिंतीकडे रश्मी भकास आणि शून्य नजरेने बघत बसली आहे. काळवेळाचे तिचे भान गेलेय. पुढचे सगळेच तिला धूसर दिसतेय. मधूनच एकदम प्रसादच्या चार-पाच आठवणी तिच्या मनात एकत्र येतायत, तर मधूनच तिला ब्लॅन्क व्हायला होतंय. प्रसाद आत्ता परत येईल असं वाटून तिची नजर मधूनच दरवाजाकडे जातेय. पुन्हा भानावर आली की, "आता पुढे काय?" चा विचार तिच्या मनात येतोय.

नीरजला राहून राहून एकच प्रश्न सतावतोय, दादाने का चालत्या गाडीतून उतरायची घाई केली. पोस्टमॉर्टेम नंतर मिळालेली प्रसादची बॉडी पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यापुढे येतेय. डोळ्यात परत पाणी साचू लागलंय. त्याला आत्ता नेत्रा सोबत हवी होती असे वाटू लागलेय. विमानात असेल हे माहीत असूनही, कधीचा तो तिला फोन लावायचा प्रयत्न करतोय. उत्तर अर्थातच 'नॉट रिचेबल' येतंय.

नेत्रा विमानात नुसतीच डोळे मिटून बसली आहे. विमान मुंबईत लॅन्ड होण्याची अनाऊन्समेन्ट होते आहे. आठ दिवसांनी ती परत मुंबईला येते आहे. या दरम्यान तिने एकदाही नीरजला फोन केला नाहीये. त्यानेही केला नाहीये. पूर्वी रात्री एकमेकांच्या कुशीत शिरून संपणारी भांडणे आता दिवसचे दिवस लोटले तरी संपत नाहीयेत. प्रेम झाले हे जसे समजले नाही तसेच ते संपले कधी तेही तिला समजत नाहीये. मघापासून नीरजच्या बरोबर न राहण्याची हजार कारणे तिच्या मनात गर्दी करू लागलीयेत. पण एकत्र का राहायचे याचे एकही कारण सापडत नाहीये. एक दीर्घ श्वास घेऊन नेत्राने निर्णय पक्का केलाय, यापुढे तिला नीरज बरोबर राहायचे नाहीये. आपला संसार संपला हे नीरजला सांगायला तिने त्याचा नंबर फिरवला आहे.

(वरील कथेतील लेखनशैली 'साप्ताहिक सकाळ' मधील एका कथेवरून घेतलेली आहे.)

-हवा हवाई

विशेषांक लेखन: