कामातुरांणाम् ना भयम् .....

Submitted by SureshShinde on 18 April, 2016 - 18:23

स्थळ: मेडिसिन डिपार्टमेंट, ससून हॉस्पिटल, पुणे. साल १९७६.

प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती.
"सुरेश, बाहर एक कोई डाॅक्टर बावसकर बैठे है. कोंकणके महाड प्राथमिक आरोग्य केंद्रमें वो मेडिकल आॅफिसर का काम कर रहे है. वहाॅपर स्काॅर्पियन बाईटके बहुत सारे केसेस उन्होने देखे है आैर उसीके बारेमे मेरे साथ चर्चा करनेके लिए वो आये है. आप उनके साथ बात करके फिर मेरे पास रे आना."
"अोके, सर!" संमतीदर्शक मान झुकऊन मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो. बावसकर लगबगीने उभा राहिले.
"डाॅक्टर बावसकर? मी डाॅक्टर शिंदे. सरांनी मला आपल्याशी बोलण्यासाठी सांगितले आहे."
बावसकरांशी हस्तांदोलन करतांना त्याच्या हातांचा कंप मला जाणवला.
"मी डाॅक्टर बावसकर! महाडजवळील बिरवाडी गावाच्या पीएचसीमध्ये मी मेडिकल आॅफिसर म्हणून गेले वर्षभर काम करतो आहे. येथील आदिवासी जनता अगदीच मागासलेली, अशिक्षित आणि गरीब! अक्षरश: खायला कोंडा आणि उशाला धोंडा अशी परिस्थिती! येथील सर्वात मोठी आणि जीवघेणी आरोग्य समस्या म्हणजे, 'विंचूडंख'! या भागामध्ये एक वेगळाच विंचू सापडतो, तांबडा विंचू! हा विंचू डसलेली व्यक्ती हमखास दगावते. येथे शहरासारखे रस्ते, वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे रुग्ण दवाखान्यात येईपर्यंत दगावलेला असतो."
मला ही माहिती नवीनच होती. काळ्या विंचवाच्या दंशाने सहसा रुग्ण दगावत नाही. दंश झालेल्या जागी वेदना होतात व एखादे वेदनाशामक इंजेक्शन दिल्याने बरे वाटते.
बावसकर पुढे बोलतच होते,"या विंचूडंखाच्या मुळे होणारा त्रास मी या सर्व केसपेपर्समध्ये लिहून ठेवला आहे. बहुतेक डंख रात्री होतात आणि लहान मुलांना जास्त त्रास होतो. ह्दयक्रिया अतिशय वेगाने चालते, प्रचंड घाम येतो, तोंडाला फेंस येतो आणि मग शुद्ध हरपते. योग्य उपचार न मिळाल्यास थोड्याच वेळात रुग्ण दगावतो."
त्यांनी कागदांवर नोंदविलेली रुग्णांची टिपणे मी नजरेखालून घालत असतांना उत्साहित होउन ते बोलत होते," मी आणखीन एक नवीन निरीक्षण केले आहे. या विंचू चावलेल्या व्यक्तींमध्ये जे पुरुष होते त्यांच्या लिंगास आपोआप ताठरता आलेली दिसत होती. "
बावसकर यांची निरीक्षणशक्ती अफाटच होती. त्यांच्यातील हे गुण डॉ. सैनानींनी ओळखले आणि त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी खास व्यवस्था केली. बावस्करांनी पुढे 'विंचूडंख' या विषयामध्ये संशोधन केले आणि महाड भागातील विंचवाच्या डंखामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण तीस टक्क्यांवरून अक्षरशः शून्य टक्क्यांवर आणले. विंचवाच्या विषामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम 'अल्फा ब्लॉकर' या औषधामुळे पूर्ण निवारता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले व याबद्दल त्यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.
....पण या विषामध्ये लिंग उद्दीपित करण्याचा गुणधर्म आहे हि गोष्ट मात्र दुर्लक्षितच राहिली.

सन १९७८

मी नुकतीच वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यावेळी पुण्याच्या आसपास वैद्यकीय सेवा फारशा उपलब्ध नव्हत्या. पुण्यातील एमडी डॉक्टर दर आठवड्यातून एकदा पुण्याच्या आसपासच्या गावांमध्ये जावून तेथील डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये पेशंट तपासून सल्ला देत असत. माझे आजोळ कोपरगाव येथे असल्याने तेथील अनेक डॉक्टर माझ्या परिचयाचे होते. दर गुरुवारी तेथील एक प्रथितयश डॉक्टर जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये मी पेशंट तपासण्यासाठी जात असे. अनेक प्रकारचे नवनवीन आजारग्रासित पेशंट तेथे पाहण्यास मिळत असत. असाच एक गुरुवार...
मी सकाळी आठ वाजता जाधव हॉस्पिटलमध्ये पोहोंचलो. दरवाज्यातच डॉक्टर जाधवांनी माझे स्वागत केले.
"नमस्कार, डॉक्टरसाहेब ! मी आज आपली मोठ्या उत्सुकतेने वात पहात होतो. एक थोडी विचित्र केस तुम्हाला दाखवायची होती." मला हॉस्पिटलच्या एका स्पेशल रूममध्ये घेवून जात असताना डॉक्टर मला पुढे सांगू लागले. "हा पेशंट पाहते चार वाजताच माझ्याकडे आला आहे." आम्ही तोपर्यंत पेशंटच्या कॉटजवळ पोहोंचलो. सुमारे पंचेचाळीस वर्षांचा एक रुग्ण शरीराचे कोंडाळे करून आणि अंगावर चादर ओढून झोपला होता. त्याच्या शरीरावरील चादर आपल्या हाताने दूर करीत डॉक्टर जाधव पुढे बोलू लागले. "रात्री दहा वाजल्यापासून याच्या लिंगाला ताठरता आली आहे व ती अजूनही कमी झालेली नाही. घरी अनेक गावठी उपाय करून उपयोग होईना तेंव्हा पुढील उपचारांसाठी माझ्याकडे घेवून आले आहेत. मी माझ्या पद्धतीने काही इंजेक्शने दिली व सलाईन सुरु केले आहे पण त्याचा काहीच उपयोग होतांना दिसत नाही. त्याला लिंगामध्ये खूपच वेदना होत आहेत. नातेवाईक देखील खूपच चिंतेमध्ये आहेत. अशी विचित्र केस मी तरी प्रथमच पाहत आहे." आता विचार करण्याची पाळी माझी होती.

पुरुषाचे लिंग हा एक अतिशय चमत्कृतीकारक अवयव आहे. त्याचे अंडाशय व शिस्न असे दोन मुख्य भाग असतात. पुरुषाचे वीर्य हे अंदाशायात तयार होते. त्यातील शुक्रजंतूंची उत्पत्ती होण्यासाठी एक ठराविक तापमान असणे आवश्यक असते व ते शक्य व्हावे म्हणून अंडाशयामध्ये खास स्नायू असतात. थंडीमध्ये अंडाशय आकुंचन पावते व शरीराजवळ येते. तसेच शरीरामध्ये उष्णता वाढल्यास किंवा ताप आल्यास अंडाशय व त्यातील वृषण शरीरापासून दूर जातात. शिस्नाचे काम म्हणजे तयार झालेले वीर्य स्त्री-संबधाच्या वेळी योनीमार्गामध्ये संक्रमित करणे हे असते. त्या क्रियेसाठी शिस्नास थोडा वेळ ताठरता येते व वीर्य स्खलनाचे काम संपल्यानंतर ती ताठरता आपोआप कमी होते. हि ताठरता निर्माण होण्यासाठी निसर्गाने शिस्नामध्ये काही खास व्यवस्था केली आहे. शिस्नामध्ये आपल्या बोटाच्या आकाराच्या तीन नळ्या असतात. या नलिकांमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. एखाद्या फुग्यामध्ये हवा भरून तो फुगवावा तसे या नलीकांमध्ये रक्त भरले जाते व त्यामुळे लिंगाला ताठरता येते. वीर्य स्खलनाचे काम संपल्यानंतर हे रक्त पुन्हा या नलिकांमधून बाहेर जाते व लिंग पुन्हा शिथिल होते. हि सर्व क्रिया मेंदू, नसा आणि संप्रेरके म्हणजे हार्मोन्स यांवर अवलंबून असते.

पुन्हा आपल्या विचित्र रुग्णाकडे वळू या. अशा विचित्र ताठरतेची, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये 'प्रायापिझम' अशी संज्ञा आहे, अनेक कारणे असू शकतात. तसे म्हनावे तर रुग्णाच्या दृष्टीने ही एक मेडिकल इमर्जन्सीच आहे. शिस्नामधून रक्त बाहेर घेवून जाणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे अथवा रक्त प्रमाणापेक्षा जास्त घट्ट होणे हि त्यातील मुख्य करणे असतात. या रक्त वाहिन्यांच्या आसपास कर्करोगाचा प्रादुर्भाव हेही एक कारण असते. चार तासांपेक्षा जास्त वेळ शिस्नामध्ये रक्त राहिल्यास ते गोठते व त्याच्या गाठी तयार होतात आणि या गाठी शस्त्रक्रिया करून त्या काढाव्या लागतात व त्यानंतरच हि ताठरता कमी होते. अर्थात या शस्त्रक्रियेनंतर अशा दुर्दैवी रुग्णाचे लिंग पुन्हा ताठ होवू शकत नाही.
आपल्या पेशंटला हा त्रास का झाला याविषयी दुसरी एक धक्कादायक माहिती डॉक्टर जाधव यांनी सांगितली.
"ह्या पेशंटला शीघ्र वीर्य पतनाची व्याधी होती. त्याने कोठून तरी एक रबराची अंगठीसदृश रिंग पैदा केली होती. काल रात्री लिंग उत्थापित झाल्यानंतर त्याने हि रिंग शिस्नाच्या मुळाच्या भागावर चढवली होती. बराच वेळ समागम झाल्यानंतर व स्खलन झाल्यानंतर जेंव्हा रिंग काढली तेंव्हापासून हि ताठरता तशीच आहे."
"अरे देवा, त्या रिंगमुळेच हा घोटाळा झालेला दिसतो आहे. जास्त वेळ रक्त लिंगामध्ये राहिल्यामुळे आणि कदाचित रक्त जास्त घट्ट असल्यामुळे याच्या शिस्नामध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या असाव्यात व त्यामुळे आता शस्त्रक्रियेशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही." मी म्हणालो.
मी डॉक्टर जाधव आणि पेशंटचे नातेवाईक यांच्याशी हि सर्व चर्चा केली. एका कागदावर चित्र काढून नेमका काय दोष झाला आहे व काय करावे लागणार याची कल्पनाही दिली. त्यावेळी हि शस्त्रक्रिया फक्त पुण्यातच होत असे. शिवाय खर्चाचा प्रश्न होताच ! या पेशंटला देवाप्रमाणे मदत करू शकतील असे एकाच नाव माझ्या नजरेसमोर उभे होते आणि ते म्हणजे ससूनमधील मानद मूत्ररोग शल्यविशारद डॉक्टर शिवदेव बापट! आम्ही तातडीने फोनवरून सरांशी संपर्क साधला. सरांनीही ताबडतोब पेशंट पाठवा व मी लगेच शस्त्रक्रिया करतो अशी हमी दिली आणि आमचा हा विचित्र पेशंट पुढच्या एसटीने पुण्याला रवाना झाला आणि मी हि पुढच्या कामाला लागलो.

सन १९८०

माझ्या खाजगी वैद्यकीय व्यवसायाचे सुरुवातीचे दिवस होते ते. अनेक डॉक्टर मित्रांनी या काळामध्ये मला मदत केली. अशा मित्रांपैकी एक डॉक्टर विजय हेमगुडे. पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये यांचे एक नर्सिंग होम होते. एके दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला.
"सुरेशराव, माझ्याकडे एक सिरियस केस आली आहे. हा सुमारे पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे. काल रात्री जेवणापूर्वी दारू प्याला होता. तेन्हापासून पोटात दुखू लागले आणि उलट्या सुरु झाल्या म्हणून माझ्याकडे आणले होते. गेल्या तीन तासांमध्ये तीन सलाईन गेलेत पण बिपी अजूनही वर येत नाही. इसीजी काठाला आहे त्यात खूपच अनियमितता दिसते आहे. हृदयाचे ठोके खूपच अनियमित आहेत. मला जर काळजी वाटते आहे. मी गेले चार तास येथेच आहे. आपण प्लीज जर लवकर आलात तर बरे होईल."
पुढील काही मिनिटांतच मी हेमगुडे हॉस्पिटलमध्ये होतो.
पेशंटचा इसीजी फारच अबनॉर्मल होता. हृदयाचे ठोके खूपच चुकत होते. नेहेमी हृदयाचे स्पंदन सुरु होतांना हृदयातील एसए-नोड नावाच्या भागात एका विद्युतलहरीच्या स्वरुपात सुरु होते व हि लहर हृदयाच्या चारही कप्प्यांमध्ये पसरते व स्नायूंना चेतना देते व अशा प्रकारे एक नॉर्मल ठोका तयार होतो. या पेशंटच्या इसीजीचा अभ्यास केला असता त्याच्या हृदयाची संवेदन-क्षमता खूपच वाढल्यामुळे त्याच्या हृदयाच्या चारही कप्प्यांमध्ये विद्युत लहरी तयार होवून अनियमित ठोके तयार करताना दिसत होते. त्यामुळेच त्याच्या हृदयाचे काम कमी होवून बीपी कमी झाले होते. आपला रुग्ण तरुण असल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होती. दारूमुळे असे होण्याची शक्यता नव्हती. ती जास्त विचार करण्याची वेळ नव्हती. आम्ही ताबडतोब हृदयाची क्रिया नियंत्रित करण्यासाठी झ्यालोकेन हे इंजेक्शन शिरेतून दिले आणि पुढील काही क्षणांतच त्याची हृदयक्रिया नॉर्मल झाली. अनादिकाळापासून सुरु असलेले हृदय-संगीत पुन्हा सुरु झाले. पुढील काही वेळातच त्याची तब्बेत पूर्ण सुधारली. हृदयावर असा परिणाम का व्हावा हे कोडे मात्र उलगडले जेंव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली. कोठल्यातरी पिवळ्या पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे आपण एका रात्रीमध्ये पाच सहा वेळा समागम करू शकत नाही व आपल्यामध्ये पुरुषत्व कमी आहे असे त्याला वाटत असे. त्याने कोठूनतरी एक 'पलंगतोड' गोळी पैदा केली होती व दारूमध्ये मिसळून ती रात्री घेतली होती. डॉक्टर मार्डीकर नावाचे औषधशास्त्रातील तज्ज्ञ माझ्या परिचयाचे होते. आम्ही लगेच त्यांना फोन लावून या गोळ्यांची व अशा दुष्परिणामांविषयी चौकशी केली. ते काय म्हणाले ते त्यांच्या शब्दांतच सांगतो.
"आपल्या समाजामध्ये लैंगिक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे भोंदू लोक त्याचा नेमका फायदा घेतात. अशा गोळ्यांमध्ये काही झाडपाल्याचा अर्क असतो. या अर्कामध्ये नैसर्गिक अल्कलाॅयिड्स असतात ज्यांचा आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अर्थात त्याचे औषधशास्त्रानुसार प्रमाणीकरण झालेले नसते व त्यामुळे ओव्हरडोस होण्याची शक्यता असते जसा तुमच्या पेशंटला झालेला दिसतो. तुमच्यापर्यंत वेळीच पोहोन्चल्यामुळे तो वाचला हे मात्र खरे."
अशा प्रकारच्या गोळ्यांच्या जाहिराती तर वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा आपण वाचत असतो पण त्याचे असेहि 'परिणाम' आपल्यापर्यंत पोहोन्चत नाहीत. आजपर्यंतच्या माझ्या वैद्यकीय प्रवासात असे अनेक प्रसंग मी अनुभवले जे केवळ लैंगिक शिक्षणाचा अभाव, अनावश्यक आणि अतिलज्जा, गरिबी व अंधश्रद्धा यामुळेच असेच म्हणावे लागेल.

लैंगिक औषधशास्त्रविश्वामध्ये क्रांती घडवलेल्या व्हायग्रा या बहुचर्चित औषधाविषयी काही मनोरंजक व उदबोधक माहिती घेवू या पुढील भागामध्ये ....क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वायग्रा वगैरेचे पण असेच एकले की लाँग टर्म मध्ये त्या गोळ्या हृद्यावर परीणाम करत्तात.
कधी कधी वायग्रा, सियालिस ड्रग्ज्स्ने शिसन. ताठरता सुद्धा दिर्घ काळ रहाते वाचलय.

-----
बरे एक प्रश्ण, रक्तातील गाठी काढायचा. दुसरा उपाय न्हवता शस्त्रक्रियेशिवाय? गाठ डिसॉल्व करून वगैरे?
कारण नंतर शिसन निकामी होते हे रुग्णाला किती वाईट.
का हे उपचार पद्धती आता काळानुसार बदलेले आहे.

मला वाटतं कदाचित त्या काळी ब्लड थिनर्स मधे आजच्या इतकी प्रगती झाली नसावी (तर्कानुसार) बाकी खरे खोटे देव अब डॉक्टर मंडळी जाणोत

छान लिहिलंत डॉ. शिंदे.

लिंगाला ताठरता आणून मग त्यात रिंग घालायचा प्रकार सायनमध्ये असताना १-२ केसेस पाहिल्यात.
सर्जरी करूनच करावे लागते सॉल्व.
पॅराफायमोसिस, इन्फेक्शन आणि स्वेलिंग झालेला एक रुग्ण वार्डात अ‍ॅडमिट असताना सर्जरीच्या रेसिडेंट डॉक्टर बाई हाताने अलगद मसाज करून स्किनफोल्ड पूर्ववत करताना पाहिले आहे.

वायग्राची एक युनिक केस पाहिल्येय इकडे . आमचे हॉस्पिटल सुरु झाल्याच्यानंतर पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी.
दिवसभर सुट्टी असणार म्हणून हे महाशय भल्या पहाटेच वायग्रा खाऊन बसले.
आधीच बीपीचे पेशंट. त्यांना झटकन हार्ट अ‍ॅटॅक आला.
थ्राँबोलाईज करून पेशंट तर वाचला. पण नंतर त्या पेशंटच्या डॉक्टर जावयाला सिक्वेन्स ऑफ इवेंट कसे समजवावे कळेना.
तो पेशंट जावईबापूंना काही सांगू नका म्हणून मागे लागला होता.

सिल्डेनाफिल (वायग्रा) घ्यावे लागणारे प्रायमरी किंवा सेकंडरी पल्मोनरी हायपरटेंशनचे रूग्ण खूप असतात.
त्यातही जन्मजात हृदयरूग्ण (कन्जनायट्ल हार्ट डिसीज) पौगंडावस्थेतले युवक असतील तर त्यांची प्रायापिझम मुळे वाईट अवस्था होते.
अश्या एका रूग्णाविषयी मागे मी वाहत्या पानावर लिहिले होते.

प्रॅक्टीस करताना असे अनेक अनुभव येतात, मात्र ते रोचकपणे मांडतानाच लोकशिक्षण करण्याची हातोटी फार थोड्या लोकांकडे असते.
तुम्ही अशा प्रज्ञावंतांपैकी एक आहात!

डॉ बाविस्करांचे कौतुक तर किती सांगू आणि किती नको.
आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेला हा माणूस अत्यंत डाऊन टू अर्थ रहातो.
नॉलेज शेअर करायला अगदी तत्पर.
आमच्या एम डी च्या वेळी त्यांची किर्ती ऐकून आम्ही इतके इम्प्रेस्ड होतो की काही मुले त्यांना जाऊन भेटली.
एक व्याख्यान आमच्या वर्गासमोर द्याल का विचारायला.
हा भला माणूस स्वखर्चाने मुंबईत आला.
वेगळी व्यवस्था करू नका सांगून माझ्याच बॅचमेट्सच्या वसतीगृहातल्या खोलीवर दोन दिवस राहिला.
शेकडो गंमती, विंचूदंशानंतर शरीरात होणार्‍या रासायनिक अभिक्रिया अगदी सोप्या शब्दात शिकवल्या.
दोन दिवस एक मित्र म्हणून रूमवर रहाताना आपल्या ज्ञानाचा, क्षेत्रातील आपल्या अधिकाराचा मुळीच तोरा दाखविला नाही.
आणि मग केवळ आमच्या वर्गालाच नव्हे तर अख्ख्या मेडिसीन डिपार्टमेंटला एक सुंदरसं लेक्चर आणि प्रेझेंटेशन देऊन गेला.

ते इतके साधे आहेत की 'मला हे शिकवायला खडू /फळा सुद्धा पुरेल, मला कुठलेही गॅडगेट (गॅझेट्चा उच्चार ते असा करतात) लागत नाही म्हणाले.

अक्षरशः तेथे कर माझे जुळती.

अर्थात त्यांना भेटण्यापूर्वीच कोंकणात काम करणारे आम्ही डॉक्टर (मी दीड वर्षे रत्नागिरीत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेय, पी जी मिळण्याअगोदर) त्यांच्याच उपायाने विंचूदंश बरा करत होतो कारण प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी येऊन स्वतः पीएच सी - पी एच सी त जाऊन मार्गदर्शन करून ठेवले होते आणि लोक ते फॉलो करत होते.

एक युनिक उदाहरण त्यांनी दिलेले आठवते. फक्त एक -दिड वर्षाचे बाळ, त्याला विंचू दंश झाला. आधीच लहान मुलांच्या इसीजीत सायनस अरिद्मिया असतात, त्यात विंचूदंशामुळे वेगळेच अरिदमियाज.
पण बिंचू दंश होताना आईने पाहिले होते.
पोरगे आता वाचत नाही असे जवळच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर लास्ट रिसॉर्ट म्हणून बाविस्कर डॉक्टरांकडे घेऊन आले.
पण बाळ प्राझोसिनची गोळी गिळण्यास तयार नाही, पावडरही गिळेमा.
त्या माऊलीने सरांकडून गोळीची पावडर मागून घेतली आणि स्वतःच्या स्तनाग्राला लावून बाळाला दूध पाजले.
काही तासांतच बाळ बरे झाले.

इकडे आमच्या कर्नाटकातल्या जिल्ह्यात विंचूदंश तसा कॉमन नाही. आणि विंचूदंश झाल्यावर कार्डीअ‍ॅक काँप्लिकेशन झालेला एकही रूग्ण इकडे पाहिला नाही.

डॉ. काका व साती ताई,

एक से बढकर एक किस्से, तुमच्या सारखे, डॉ. बाविस्कर, डॉ. मार्डीकर ह्या लोकांसारखे डॉ. हे आमच्या सारख्या ले-मॅन साठी खरे देवदूत च. साती ताईंनी लिहिल्याप्रमाणे तुम्हा सर्वांसाठीच
अक्षरशः तेथे कर माझे जुळती !!

-प्रसन्न

सुंदर लेख. लिहिण्याची शैली तर भन्नाटच आहे..
साती, तुम्हीदेखील असे किस्से चांगले लिहू शकता. वेळ काढून अवश्य लिहा.

मूळ लेख आणि डॉ.सातींच्या प्रतिक्रियां, सगळेच एकदम माहितीपूर्ण.
खरंच देवदूत आहेत ही माणसं.
धन्यवाद.

डॉक्टर शिंदे, खूप उपयुक्त माहिती . नेहमीप्रमाणेच अगदी सोप्या पद्धतीनी सांगितली आहे.

अनेक अनुभव येतात, मात्र ते रोचकपणे मांडतानाच लोकशिक्षण करण्याची हातोटी फार थोड्या लोकांकडे असते.
तुम्ही अशा प्रज्ञावंतांपैकी एक आहात! >> अगदी अगदी

डॉ. बावसकरांविषयी प्रथम वाचले ते अनिल अवचटांच्या "कार्यरत" या पुस्तकात. अक्षरशः थक्क करणारं व्यक्तिमत्व. मेडिकलचा तो ग्रे चा ठोकळा त्यांना तोंडपाठ होता म्हणे. बरोबरीची मुलं त्यांना "अमुक पानावरची अमुक माहिती सांग बरं" असं सांगत की ते सगळं घडाघडा म्हणून दाखवत.

साती म्हणते तसं अगदी तेथे कर माझे जुळती अशी व्यक्ति.

सातीच्या प्रतिक्रियाही आवडल्या.

_/\_ एखादी रोमांचकारी रहस्यकथा वाचताना जशी आपल्याला खिळवुन ठेवते तशा प्रकारचेच आपले लेखन खिळवुन ठेवते. कारण त्या केसमधे आम्ही वाचकदेखिल इतके तदृप झालेलो असतो की त्या रुग्णाचे निदान पुढे कसे होईल ही प्रचंड उत्सुकता मनात दाटलेली असते. शिंदेसर, वर सातीताई म्हणाल्या तसं तुम्ही खरोखरंच प्रज्ञावंत आहात.

सातीताई, तुम्ही देखिल आपल्या अनुभवांची पोतडी उघडा आणि आम्हाला त्याचा रसास्वाद घेऊ द्या.

डॉ. साहेब,

एक वेडपट शंका. रक्त पातळ करण्याचे औषध देऊन गाठी जातात का किंवा किमान रक्तपुरवठा सुरु होतो का ? याची शहानिशा आपण ऑपरेशनचा निर्णय घेण्याआधी करत असालच ना ?

माझा एक मित्र डॉक्टरांनी नीट अ‍ॅनेलीसीस न केल्यामुळे एका विनाकारणाच्या ऑप्रेशनला सामोरा गेलाय. त्याला लॅटेक्स ची अ‍ॅलर्जी होती पण डॉक्ट्रसाहेबांनी टाईट थायमस चे निदान करुन त्याचे ऑपरेशन करुनही टाकले. पुन्हा जेव्हा त्याने लॅटेक्स वापरले आणि सुज आली तेव्हा डॉक्टरसाहेबांनी किमान यावेळी सुज नियंत्रणात आहे असे सांगुन त्या मित्राची पाठवणी केली.

भारी प्रकरणे! छान लिहिलेत डॉ. काका Happy आपण लिहिलेल्या वैद्यकीय निदानकथा वाचतांना, एखादी डिटेक्टिव्ह कथा वाचतोय असाच फील येतो!

साती ताई, आपले अनुभवपण मस्त!

खुपच छान!!!

नेहमीप्रमाणेच तुमच्या लेखनशैलीला सलाम
_/\_

सातीताई, तुम्ही देखिल आपल्या अनुभवांची पोतडी उघडा आणि आम्हाला त्याचा रसास्वाद घेऊ द्या.
+१

काका, छान लेख.
विठ्ठल +१
साती, तु पण छान लिहितेस, तुझ्याकडचेही किस्से येऊदेत.

ग्रेट आहेत सारेच डॉक्टर.. तिथलेही आणि इथलेही..
पुढील भागाच्या प्रतीक्षेत..
साती तुम्हीही लिहा की तुमचे अनुभव किस्से ..

मस्त आहे लेख. व माहिती. सातींचे प्रतिसाद देखील माहिती पूर्ण. बावस्करांबद्दल साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकामध्ये वाचले आहे.

पुरुषांचे स्वतःबद्दलचे गैर समज ह्यावरही एक लेखमाला बनेल. कठीणच आहे त्यांचे. जनरली.

हे असे गैर समज करुन देणार्‍या पुस्तके आणि पॉर्न वर सिगरेट पाकिटासारखा वैधानिक इशारा लिहायला पाहिजे.
डॉ शिंदे, लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

हे असे गैर समज करुन देणार्‍या पुस्तके आणि पॉर्न वर सिगरेट पाकिटासारखा वैधानिक इशारा लिहायला पाहिजे. >> वैधानिक इशारे वाचुन देखिल सिगारेट ओढतातच की. आणि लेखाचं शीर्षक वाचा .. त्यामुळे...

थोडं अवांतर आहे पण विषय निघालाच आहे तर लिहितो.

वयात येताना मुलीला तिच्या शरिरात होणा-या बदलांची माहिती तिच्या आईकडून, स्त्री शिक्षकांकडून, इतर प्रौढ स्त्रियांकडून मिळते. मी शाळेत असताना सरकारी डॉक्टरांची लेक्चर्स होत पण ती फक्त मुलींसाठी असत.

मग मुलांच काय? त्यांना सांगणारं कुणीच नाही. वर्तमानपत्रात येणारे लेखही मुलींनाच उद्देशून असतात. मुलांना जी माहिती इतरांकडून मिळत नाही ती मग स्वत: मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यात जोडीला इंटरनेट आणि समवयस्क मित्र असतातच. त्यातून मिळणारी माहिती अपुरी आणि चुकीची असू शकते. आणि अपुरं ज्ञान धोकादायक असतं.

मुलींच्या आरोग्याविषयी सगळेच बोलतात, लिहितात पण मुलांच काय? त्यांना कोण सांगणार?

उत्कृष्ट लेख. डॉक्टर, आपण तज्ज्ञ तर आहातच पण सेवाव्रती आहात आणि उत्तम लेखकही आहात. आपले लेख बोर्डावर पाहिले की कधी चुकवत नाही. याही लेखात उत्कंठा आणि ओघ छान राखला आहे. किचकट माहितीसुद्धा कधीच बोजड वाटत नाही.
डॉ. साती, आपल्याकडेही अनुभवांची पोतडी आणि उत्कृष्ट लेखनशैली आहे. आपण या विषयावर लिहावेच. आपला जो लोकप्रबोधनाचा धर्म, तोही यातून साधेल.

अनेक अनुभव येतात, मात्र ते रोचकपणे मांडतानाच लोकशिक्षण करण्याची हातोटी फार थोड्या लोकांकडे असते.
तुम्ही अशा प्रज्ञावंतांपैकी एक आहात! >> +१

डॉ. चे 'निदान' पुस्तक वाचून काढले. खुप छान लिहले आहे.
त्यांनी सदर पुस्तक स्वाक्षरी करून विनामुल्य घरपोच पाठवले.
सर्व अनुभव छान आहेत जरुर वाचावेत...

राजेंद्र देवी

Pages