सावरिया -- स्वाती, वैभव, विवेक

Submitted by चाफा on 22 October, 2007 - 12:29

सावरिया

Virtual Reality म्हणजे काय ते मायबोलीकरांना कोणी सांगायला नको. देहाने ऑफिसात वा घरात, पण मनाने मायबोलीवर - अशी योगसाधना ते गेलं दशकभर करतायत.
त्यात गेल्या वर्षींपासून दिवाळी अंकात multimedia चा समावेश करून मायबोलीने या reality ला एक नवीनच परिमाण दिलेलं आहे.
सांगायला आनंद होतो, की आपल्यापुढे सादर करत असलेल्या या गीताच्या निमित्ताने आम्ही या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
श्री. वैभव जोशी यांनी पुण्यात बसून लिहीलेलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे कुवेतस्थित संगीतकार श्री. विवेक काजरेकर यांनी,
आणि गायलं आहे अमेरिकेतील मायबोलीकर सौ. स्वाती आंबोळे यांनी.
मायबोलीच्या जगभर विखुरलेल्या रसिक वाचकांना हा प्रयोग आवडेल अशी आशा करून आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत - 'सावरिया'.

सावरिया

रे सूर तुझे मज स्पर्शुनी जाती वेड लाविती सावरिया
तू दूर राहुनी काय म्हणुनी छेडिशी वेणू सावरिया

मोरपिसापरी झुलते अंग निळे सावळे उठती तरंग
चित्त बावरे होई बसंती विहरत येता केशरी रंग
रंगरंगिले सूर बरसता चिंब चिंब मी केसरिया

रे कशास अवचित साद घालिशी सांजवेळ जाहली
ते सूर स्पर्शुनी जाता राधा मोहरून चालली
मुरलीवर फिरता अंगुलिया अवघी काया बन्सुरिया

ओढ लागली अपार तू लपलास कुठे मोहना
काय साधशी छळून मजला देवकीच्या नंदना
या मना कशी मी घालू आवर, सावर रे सावरिया





(श्रवणीय विभाग: आपल्या संगणकावर MP३ प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आवश्यक आहे)


Download

गीतकार : वैभव जोशी
गायिका: स्वाती आंबोळे
संगीतकार : विवेक काजरेकर

विशेषांक लेखन: