प्रेम वरदान

Submitted by abhishruti on 22 October, 2007 - 11:10

'कि
तीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी, माझ्या नंतर... '

सलीलचे शब्दमिश्रित हळवे स्वर कानावर पडत होते आणि अचानक....

हल्ली असंच होतं.. कधी कधी अशा एकाकी संध्याकाळी एखादा सूरही मनाला जुन्या आठवणीत घेऊन जातो.. काही उत्कट क्षण मनात रेंगाळत राहतात.. आपल्या अनेक भेटीतली 'ती' भेट आठवते.. मोत्याचा सर तुटल्यावर जसे अलगद एकेक मोती हातात येतात तशा एकेक आठवणी मनाला भारुन टाकतात.. मनाचा तोल ढळेल की काय असे वाटते.. अशावेळी आपणच आपल्याला सावरायचे असते हे ही सवयीने माहीत झालेले असते..

याचा अर्थ असा मुळीच नाही की मी सुखी नाही किंवा असंही नाही की मी कोणाच्या मनाशी, भावनेशी, जीवनाशी प्रतारणा करतेय. अगदी चारचौघींसारखी जबाबदार गृहिणी आहे, मोठ्या प्रेमाने आणि हौसेने संसार करतेय. पण असं कसं म्हणू की मी सगळं विसरलेय किंवा असं तरी कसं म्हणू की तुझा विचार माझं मन विचलीत करत नाही.. एका क्षणाकरता का होईना, हृदयात हळूवार एक कळ उठतेच. शेवटी हे जगमान्य सत्य आहे की Once in love is always in love! मग ते प्रेम सफल असो वा असफल, समर्थ असूदे की दुबळं, एकतर्फी असो वा दुतर्फी, स्वीकारलेलं किंवा झिडकारलेलं, व्यक्त किंवा अव्यक्त! त्याची intensity कायम तेव्हढीच रहाते - अगदी नकळत! हे कोणी जाणूनबुजून करत नाही, हे नैसर्गिकच आहे. पण हे कळायला खूप वेळ लागतो आणि कळलं तरी मन हे सत्य स्वीकारायला तयार नसतं. उगाचच अपराधी भावना मनाला चाटून जाते . पण म्हणतात ना 'दिल पे किसी का जोर नही...'

कितीही काळ लोटला, कितीही आयुष्य उपभोगलेलं असलं तरी हृदयाचा एक दुखरा कोपरा तसाच राहतो. नाही, त्यावर काही उपाय नाही, उपाय शोधून सापडणारही नाही. तो तसाच जपायचा असतो. सजवायचा असतो. त्यातच खरी मजा आहे. त्याचा जसजसा जास्त विचार करावा तसं उगाचच रितेपण वाढत जातं. तसं आपल्याला काहीही कमी नसलं तरी ही उणीव कोणीच भरुन काढू शकत नाही, कशानेच भरुन निघत नाही. हे इतक्या वर्षाच्या अनुभवाने समजलंय.

आता शरीर एव्हढं थकलंय की कोपर्‍यापर्यंत जायला पंधरा मिनिटं लागतात पण मन मात्र एका सेकंदात कुठून कुठे जातं! कधी कधी विचार करायला लागलं की असं वाटतं 'क्षण एक पुरे प्रेमाचा...' असं म्हणतात ना! मग माझं प्रेम एव्हढं क्षणभंगूर का? मग मनच समजावतं 'अग वेडे, क्षणभंगूर कसं? आता म्हातारपणीही ते विस्मरणाच्या पडद्याआड गेलेलं नाही. ते शारिरीक कधीच नव्हतं, हिशोबीही नव्हतं. ती एक नैसर्गिक निर्मिती होती. क्षणभर जीव एकत्र आले, गुंतले आणि अलग झाले. पण त्याची खूण मात्र पक्की राहिली. नकळत गुंतलेला जीव मी आजवर पूर्णपणे सोडवू नाही शकले. मी तसा आवर्जून कधी प्रयत्नही केला नाही. त्या हळव्या आठवणींना उजाळा देता देता परत तरुण व्हायचंय मला! नकळत मनात हळूच चोरपावलांनी शिरकाव करणारं कोणी, नंतरचं अस्वस्थ, अनभिज्ञ भावनेने गोंधळलेलं मन, स्वप्नाळू जग, मोरपंखी दिवस! अजूनही त्याचं स्पष्ट प्रतिबिंब डोळ्यात चमकतं! ते दिवस परत अनुभवायचेत. हे सगळं आठवणीच साध्य करु शकतात. कधी कुठल्या प्रसंगाने, कवितेतील शब्दांनी, स्वरांनी हा शांत सागर तळापासून ढवळून निघतो. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर नंतर कितीतरी वेळ पागोळ्यांचे थेंब टपटपत रहातात, तसंच काहीसं आठवणींचं होतं..

विचार करताना कधी कधी खूप मजा वाटते. आपल्याला आयुष्यात शेकडो व्यक्ती भेटतात, काहीजण अजिबात लक्षातही रहात नाहीत, थोडे लोक अजिबात आवडत नाहीत, तर थोडे थोड्या दिवसासाठी जवळचे वाटतात, काही जणांच्या सवयी कायम लक्षात राहतात, काही जणांचे काही गुण, लकबी, कला मनाला भावतात पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकतरी व्यक्ती अशी असते की जिची आठवण मनात घर करुन राहते.

प्रेमात खरंतर चूक, बरोबर असं काही नसतं. प्रेम केवळ सुंदर असतं. त्याचा अनुभव, त्याची अनुभूती केवळ सुंदरच असते. त्यामुळे त्याची आठवण ही शेवटी आनंद देणारीच ठरते. पण ती तशी व्हावी किंवा असते हे कळायला खूप वेळ लागतो. सुरुवातीला तीच आठवण त्रासदायक, मनाला छळणारी वाटते. कारण तो काळच तसा असतो, तेंव्हा आपण काही विचार करण्याच्या मन:स्थितीत नसतो, सगळ्या जगावर, स्वतःवर चिडलेले असतो. अपरिपक्व असतो. हळूहळू कळायला लागतं, स्वतःची स्वतःला नव्याने ओळख पटते. सगळं आपल्या मनासारखं होतंच असं नाही याचाही अनुभव येतो. आणि शेवटी यात देवाची काहीतरी योजना असेल ही समजूतही पटायला लागते.

प्रत्येक नात्याचाही एक प्रवास असतो. प्रवासात जसा वेगवेगळा अनुभव येतो, वेगवेगळी स्थळं पहायला मिळतात, काही लगेच मनाला भावतात तर काहींचं सौंदर्य कळायला वेळ लागतो. अगदी तसंच नात्याचं असतं. त्यात प्रेमाचं नातं तर सगळ्यात उच्च, महत्वाचं! सुरुवातीला अनभिज्ञ वाटणारं, मग सुखद रोमांचक हवंहवंस वाटणारं मग कधी सुखाने तर कधी दुःखाने हळवं बनवणारं, कधी छळवादी तर कधी खट्याळ खोडकर, कधी गोंधळात टाकणारं पणं ultimately एक परिपक्व, दिव्य अनुभव देणारं, सगळ्या भौतिक, शारिरीक सुखाच्या पलिकडचं सुख देणारं, मित्रत्व साधणारं. कधीही एकटेपणा जाणवू न देणारं! सदैव टवटवीत, सदाफुलीसारखं नित्यनियमाने फुलणारं!

प्रेमाची व्याख्या जशी नेमक्या शब्दात सांगता येणार नाही, तशीच त्याची खोली, सफलता वगैरे सांगता येणार नाही. अशी प्रेम मोजायची चूक कोणी करु नये, असं प्रेम मोजायचं नसतं ! चार भेटी झाल्या म्हणून कमी आणि चाळीस वेळा एकत्र होतो म्हणून जास्त, असा नसतो हिशोब! प्रेम - अंतरात किती वेळा जाणवतं, किती अस्वस्थ करतं हे ज्याचं त्यालाच कळतं! कोणाजवळ कबुलीजबाब नोंदवायची गरज नाही. नाकबूल केलं म्हणून ते लपत नाही आणि जाहीर प्रदर्शन केलं म्हणून खपत नाही. मनाच्या कोपर्‍यात आपलं अस्तित्व जे अविरत टिकवून धरतं ते प्रेम!

-अभिश्रुती

विशेषांक लेखन: