प्रिटी वूमन - भाग ५

Submitted by sunilt on 9 February, 2009 - 03:42

मागील भाग -
प्रिटी वूमन - भाग १
प्रिटी वूमन - भाग २
प्रिटी वूमन - भाग ३
प्रिटी वूमन - भाग ४

शेवटची ओळ वाचून मौलवींनी कुराण शरीफ मिटले तशी मर्जिना लगबगीने ऊठली. किचनमध्ये जाऊन खास नियाझसाठी काढून ठेवलेले जिलेबीचे ताट घेऊन परत बाहेर आली. मौलवी आणि त्यांचे पाच सहा शागीर्द आता निघण्याची तयारी करीत होते. जिलेबीचा एक-एक तुकडा मोडून त्यांनी तोंडात टाकला आणि धूपाचे भांडे फिरवून तोंडातल्या तोंडात काहीसे पुटपुटत दुवा दिला.

ठरलेली बिदागी घेऊन ते सगळे घराबाहेर पडले तेव्हाच नजमा आणि मर्जिनाने पंजाबी ड्रेसवर घातलेला बुरखा काढला!

गेले कित्येक दिवस नजमाची तब्येत ठीक नव्हती. अनेक उपचार झाले - अगदी डॉक्टरांपासून ते झाडपालावाल्यापर्यंतचे सगळे - पण गुण काही येत नव्हता. तेव्हा गावाहून कुलसूमने सुचवल्याप्रमाणे घरी नियाझ ठेवला होता.

घरभर अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि अचानक काही आठवल्यासारखे करून मर्जिना उठली. कपाटातून आपला मोबाईल बाहेर काढला. मौलवी घरात आल्यापासून, म्हणजे जवळ जवळ ३ तास मोबाईल सायलेन्ट मोडवरच होता.

आलेले कॉल्स ती बघत होती. तीन तासात पाच-सहा कॉल येऊन गेले होते. त्यातील तीन तर केवळ प्रवीणशेठचेच, एक हवालदाराचा आणि एखाद-दुसरा असेच कुठलेसे.

कुणाचे असतील बरे ते?

"त्या"चे तर नसेल ना?, मर्जिनाच्या मनात विचार आला.

छे छे. त्याचा कुठचा? तो बोललाय तरी कुठे अजून, तर नंबर विचारेल?

आणि हो, गेले कित्येक दिवसात तो आलेलाही नाही. का आला नाही बरे? दुसरीकडे जातो की काय?

जाऊ दे; मला काय, असा विचार करून ती मोबाईलचा रिंगटोन पूर्ववत करणार, तोच फोन पुन्हा वाजला.

तिने पाहिले. प्रवीणशेठच!

"हॅलो"

"हॅलो कौन काजल? क्या बात है? कबसे फोन कर रहा हूं. फोन नही उठा रही?"

"घरमे पूजा रखा था ना इसलिये सायलेन्ट पे रखा था"

"पूजा? किस बात का? अच्छा कोई बात नही", प्रवीणशेठला पूजेत रस नव्हता, "आज आ रही हो ना? मै आ रहा हूं. "

"नही. आज नही आउंगी, आंटीको दवाखाना लेके जाना है"

"अरे क्या बात कर रही हो?"

"नही. मुझे उन्हे लेके जानाही पडेगा. तब्येत ठीक नही उनकी कितने दिनोंसे"

"ठीक है फिर", पवीणशेठला नजमाच्या दुखण्यातही फारसा रस नव्हता, "कल दोपहर को तो मिलना"

"देखो, मैने पहिले भी बहूत बार बताया है, की मै ऐसे किसीको बाहर नही मिलती"

"अरे, मै ऐसाही कोई हूं क्या?"

"फिरभी नही"

"लेकीन क्यो? स्वीटी तो आती थी"

"तो बुलाओ उसी को", असे म्हणून मर्जिनाने फोन ठेऊन दिला.

*******

फोन हातात धरून प्रवीणशेठ बराच वेळ नुसताच बसून राहिला.

स्वीटीशी जुळलेली दोस्ती तोडून काजलशी दोस्ती करण्यामध्ये आपले काही चुकले का, असा विचार त्याच्या मनात अनेकदा येऊन गेला.

स्वीटीही तशी देखणीच. काजलच्या मानाने जरा सावळी. शिडशिडतीत बांध्याची. उंच अन तरतरीत! अगदी काजलची गोलाई तिच्यात नसली तरी बांधेसूदच.

बारमध्ये तर ती भेटायचीच. हसायची, बोलायची, अगदी खेटून उभी राहायची. आणि महिन्यातून कधी मधी बाहेर बोलावले तर अगदी आनंदाने यायची!

नितिन कंपनीसमोरील बाटाचे शोरूम ही त्यांची ठरलेली जागा. तिथे ती उभी राहणार. मग प्रवीणशेठ गाडी घेऊन आला की गाडीत बसणार की गाडी सुसाट निघणार कापूरबावडीच्या दिशेने. तिथल्या एका लॉजमधली रूम प्रवीणशेठने बूक केलेली असायचीच.

आणि मग तिथे स्वीटीबरोबर व्यतित केलेले ते क्षण! तिचा तो उष्ण सुगंधित श्वास!

नुसत्या त्या आठवणीनेच त्याची कानशिले गरम झाली!!

करावा काय फोन स्वीटीला? दहाव्यांदा प्रवीणशेठच्या मनात विचार आला.

आणि त्याच बरोबर त्याला आठवला तो प्रसंग. अगदी नकोनकोसा वाटणारा.

***

आज प्रवीणशेठचा खिसा भलताच गरम होता. कसल्याशा व्यवहारात आज चांगली कमाई झाली होती. त्या खुषीतच तो आज बारमध्ये आला होता.

त्याला पाहताच दरवानाने एक सलाम ठोकला आणि दरवाजा उघडून दिला. आत येताच वेटर मंडळींची त्याला आपल्या टेबलपाशी घेऊन जाण्याची चढाओढ सुरू झाली. शेवटी एका कोपर्‍यात तो बसला आणि समोर पाहिले. समोरच्याच टेबलावर तीन-चार जणांचा ग्रूप बसला होता आणि त्यांच्या टेबलाशेजारीच स्वीटी. एक जण हसत हसत तिच्या कानात काही सांगत होता आणि नंतर स्वीटीदेखिल त्याच्या कानात काही बोलत होती. प्रवीणशेठकडे तिचे लक्षच नव्हते!

"कौन है ये लोग?", त्याची नेहेमीची फोस्टर घेऊन आलेल्या वेटरला त्याने विचारले, "हमेशा आते है क्या?"

"नही साब. पयलेबार आया है", वेटर उत्तरला, "बहोत पैसा उडाया है स्वीटीपर अबतक"

त्या घोळक्याने फर्माईश केलेली गाणीच वाजत होती, स्वीटी त्यावर नाचत होती, नोटांची उधळण होत होती!

आणि प्रवीणशेठ उद्विग्नपणे एका मागोमाग एक घोट घेत होता.

नाही म्हणायला स्वीटी एकदा त्याच्या टेबलवर येऊन गेली. हातात हात देऊन गोड हसली. "कैसे हो" विचारले आणि लगेचच त्या घोळक्याच्या टेबलजवळ गेली!

दुसरी फोस्टरदेखिल संपली पण त्याची तगमग काही कमी होईना. शेवटी न राहवून त्याने वेटरला बोलावले.

***

नोटांची माळ गळ्यात पडताच मर्जिना चमकली. अजूनपर्यंत कोणी दोस्त आला नाही बारमध्ये आणि ही हजाराची माळ?

वेटरने प्रवीणशेठकडे बोट दाखवले.

"अरेच्चा, हा तर स्वीटीचा दोस्त!", मर्जिना मनातल्या मनात म्हणाली, "अच्छा तो ये बात है!"

गाणे संपताच ती त्याच्या टेबलजवळ गेली. त्याच्या हातातली हजाराची नोट घेता घेता त्याने तिचा हात हळूच दाबला.

आपल्या कथित अपमानाचा बदला घ्यायला, स्वीटीला धडा शिकवायला प्रवीणशेठला आता साधन मिळाले होते. आणि त्याचा तो पुरेपूर उपयोग करणार होता. खिसा तर गरम होताच शिवाय पोटातून डोक्यात गेलेली दारूदेखिल आपले काम चोख करीत होती.

प्रवीणशेठ आता पुरता पेटला होता. गाणी वाजत होती, मर्जिना नाचत होती आणि नोटांचा पाऊस पडत होता. वाकवाकून नोटा गोळा करताना वेटरांची दमछाक होत होती.

आणि स्वीटी चुपचाप पहात होती.

त्या घोळक्याने आता बिल मागवले होते!

प्रवीणशेठ परतला तो उन्मादातच. इकडे मेकअप रूममध्ये स्वीटी आणि काजलमध्ये काय खडाजंगी झाली याची फिकिर करायचे त्याला कारणच नव्हते!

अर्थात, कस्टमरांची जुगलबंदी आणि त्यांच्यावरून होणारी मुलींमधील भांडणे ही गोष्ट बारला काही नवीन नव्हती!

*******

"Would you like to have dance?", त्या अर्धवट कपडे घातलेल्या मुलीने विचारले.

त्याने मानेनेच नकार दिला.

मित्रांच्या आग्रहाला बळी पडून तो इथे आला होता आणि आता कुठे येऊन पडलो असे त्याला झाले होते.

अगम्य इंग्रजी गाणी दणादणा वाजत होती. अर्ध्यामुर्ध्या कपड्यातील मुली स्टेजवरील खांबावर चढून कसरतीचे प्रयोग करीत होत्या. खाजगी नृत्य हवे का असे विचारत काही मुली फिरत होत्या आणि दुकानापेक्षा पाच-सहा पटीने महाग मिळणारी बियर त्याच्या घशाखाली उतरत नव्हती.

त्याला तिथून पळून जावेसे वाटले पण त्याच्याकडे गाडी नव्हती. गाडीवाला मित्र निघेपर्यंत थांबणे भागच होते.

"इंडिया जैसा मजा नही इधर यार", मित्र सांगत होता. आणि त्याचे मन उडत उडत पार मुंबईपर्यंत पोचले होते.

त्याच्या डोळ्यासमोत मर्जिनाचा चेहरा आला. इथल्या यांत्रीकपणे वावरणार्‍या मुली पाहून त्याला तिचीच आठवण आली.

काय तिची ती अदा, काय ती नजाकत!!

*******

"ऑपरेशन करावं लागेल. वीस हजार तरी खर्च येईल", डॉक्टर म्हणाले.

"पण ऑपरेशन करावच लागेल का?" मर्जिनाने विचारले.

"नुसत्या औषधाने नाही का बरी होणार मी?", नजमाने प्रश्न केला.

"नाही. औषधं खूप झालीत. उशीर कराल तर जास्त वाढेल", डॉक्टरांनी निर्वाणीचा इशारा दिला.

त्या दोघी दवाखन्यातून बाहेर पडल्या.

तीन मजले चढून वर येता येताच नजमाला धाप लागली. घरात शिरल्या शिरल्या खूर्चीवर धपकन बसून तिने डोळे मिटले.

मर्जिना आत चहा ठेवायला गेली.

चहा घेता घेता नजमा म्हणाली, " शरीफाला इकडे बोलावून घ्यावे असे वाटतेय"

"काय?", मर्जिना दचकली, "नाही नाही. तिला नको इकडे"

"अग, तुला समजत नाही का? मी काही आता काम करू शकेन असं वाटत नाही. खर्च किती वाढतोय? खाणारी तोंडे दहा आणि कमावणारी तू एकटी"

"त्यातून तू कष्टमर बरोबर बाहेरही जात नाहीस...", नजमा बोलायचे थांबत नव्हती.

नजमा बोलायचा अवकाश तोच मर्जिना कडाडली, "त्यावर आपलं अनेकवार बोलण झालं आहे, पुन्हा तो विषय नको"

"मी नाही जाणार कस्टमरबरोबर बाहेर. नाही म्हणजे नाही", मर्जिना अजून रागाने थरथरत होती.

"म्हणूनच तर म्हणतेय मी की शरीफाला बोलावून घेऊ", नजमा.

"नाही. ती आता सातवीत आहे. तीन वर्षे झाली की तिची दहावी होईल. मग तिचे लग्न करून देऊ", मर्जिना स्वप्न रंगवीत होती.

"आणि तोपर्यंत काय सगळ्यांनी उपाशी मरायचं?"

"उपाशी का? मी आहे ना?"

"अगं, तुझ्या एकटीच्या जोरावर कसं होणार? तेच म्हणतेय मी मगाचपासून", नजमा हेका सोडत नव्हती.

***

अंधारून आलं तरी खोलीत दिवा लावण्याचे भान मर्जिनाला नव्हते. मावशीशी वाद झाल्यापासून ती एकटीच खोलीत बसली होती.

आज आई असती तर? मला येऊ दिलं असतं तिने या लायनीत? शक्यच नाही.

ठीक आहे. मला यावं लागलं परिस्थितीमुळे. पण शरीफाला मी आणणार नाही इथे.

मग कसं भागणार? मावशीच्या उपचारात जवळची पुंजी संपत आलीय. त्यातून गावी आजीला, मोठ्या बहिणीला दरमहा पाठवावेच लागतात. कसं जमायच?

करावा काय प्रवीणशेठला फोन? नाहीतरी बारवाली म्हणून बदनामी झालेलीच आहे. सोवळेपणा ठेऊन काय फायदा?

नको? मग काय शरीफाला बोलवायचं इथे? मग आईच्या स्वप्नांचं काय?

विचार कर करून तिचे डोके फिरायची वेळ आली!

******* ******* *******

(क्रमशः)

गुलमोहर: 

छान आहे कथा.. पण पुढचा भाग मात्र लवकर टाका.

----------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

नायिकेची तगमग छान शब्दा॑कीत केली आहे... परिस्थितीचा लाचारपणा, शील जपण्याची धडपड, धाकटीला या लायनीत येऊ न देण्यासाठी, तिच्या स्वप्ना॑साठी स्वतःच्या तत्वा॑ना लावावा लागणारा चुड... अप्रतिम वर्णन! पुढचे भाग लवकर येऊदेत ना...

काय सुंदर शब्दचित्र रंगवले आहे. व्वा!

शरद

छानच

पुद्चा भाग कधधि कि विसर्ललि ? Taste mat kharab kar der kar ke

बरेच दिवस झाले.....पुढचा भाग कधी लिहिणार???? विसरलात तर नाहि ना!!!!!!!!!

Roops..........

" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."

kahi bhul to nahi gaye ki part 6 bhi likna hai yaar ab tak ??? kab likoge yaa is story ka itdhar tak hi क्रमश tha ha ha ha ha ha
kidding yaar pudcha part yevuch de aata

छानच ... पुढील भाग लिहा लवकर..