तीन पत्त्यांचा तमाशा

Submitted by टवणे सर on 19 October, 2007 - 07:42

डव्या तिडव्या गल्ल्या कापत, रिक्षावाला, एखाद्या दुचाकीच्या सुलभतेने, दुथडी भरून वाहणारा रस्ता काटत होता. स्टेशन जवळ येत होते. घटनाबद्ध नियमाप्रमाणे, स्टेशनच्या जवळ वेश्यावस्ती पसरली होती.

'धडाक् धडाक् धडाक्' आचके देत रिक्षा थांबली.
'च्यायला ह्याची रिक्षा इथेच बंद पडायची होती का?' मी मनाशीच विचार करत खाली उतरलो.
रिक्षावाला पांचट हसत म्हणाला, 'त्याल संपलं. आलुच घिउन. येक जण इकतो जवळंच.' आणि एक प्लास्टिकची बाटली घेऊन पळाला.

रिक्षा नदीवरच्या पुलावर बंद पडली होती. ह्या पुलाला समांतर रेल्वेचा पूल होता. दोन्ही पुलांखालून अवघ्या दहा वीस फूट रुंदीचं नदीनामक गटार, वाहण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होतं. उरलेल्या एके काळच्या नदीपात्रात, घनदाट झोपडपट्टी पसरलेली.

पुलावरुन एक जिना खालच्या झोपडपट्टीकडे जात होता. जिन्यावर, मला पाठमोर्‍या, दोन बायका बसल्या होत्या. दोघींचे परकर कमरेपाशी साडीच्या बाहेर आले होते. आपल्या आजुबाजुला गुटक्याचा अविरत सडा मारत त्या एका मिथुन-स्टाइल दिसणार्‍या दल्ल्यासोबत बोलत होत्या. बहुतेक त्या मिथुनने त्या दोघींपैकी एकीकडे पैसे मागितले असावेत. मला नीट काही ऐकू आले नाही कारण मी बराच लांब होतो. पण तेवढ्यात एक बाई कडाडली, 'बहिण म्हणुन पैसे मागतोस होय रे, XXX. तुझ्या XXX. XXX तुझ्या बहिणीला, XXX." आणि पचाक करुन एक सणसणीत पिचकारी.

'चला, जाता जाता कान तृप्त झाले. आता किती दिवस मराठी भाषेचे हे दागिने कानावर पडणार नाहीत माहिती नाही', मी मनात विचार केला.

---------------------
जनरलचं तिकीट काढून मी प्लॅटफॉर्मवर आलो. भारतातल्या सर्व स्टेशनवरच्या, सर्व प्लॅटफॉर्म्स प्रमाणे, हा पण तुडुंब भरला होता. 'व्यापार, शेअर बाजार आणि बिझनेस स्कूल्स' ह्या गोष्टींची गहन चर्चा करणारी दोन मॅगझीन्स काखोटीला, हातात The Clash of Civilizations and Remaking of World Order हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परामर्श व भवितव्याची चर्चा करणारा थिसिस आणि पाठीवर एक सॅक त्यात दोन चड्ड्या आणि एक शर्ट, अश्या अवतारात मी प्लॅटफॉर्मच्या शेवटाला आलो. जनरलचा डबा पहिला आणि मग थेट शेवटी असतो.

कुलुपं लावलेल्या पत्र्याच्या ट्रंका, वळकट्या, कानांच्या गाठी मारलेल्या नायलॉनच्या पिशव्या आणि आदिदास ते यामाहा असे वाट्टेल ते लिहिलेल्या रस्त्यावर मिळणार्‍या हॅंडबॅग्ज, इत्यादी सामान प्लॅटफॉर्मवर पसरले होते. काही जण ट्रंकांवर बसून पोलिस टाईम्स वाचत होते. लालबुंद अक्षरातली हेडलाइन - 'अनैतिक संबंधातून डबल मर्डर' - अंगावर येत होती. बहुसंख्य जनता, ज्या गावाला जायचे आहे आणि ज्या कारणासाठी जायचे आहे त्याची सर्वसमावेशक चर्चा करत होते. अधुनमधून गुटखा, मावा, तंबाखू यांचे आदानप्रदान आणि पिचकार्‍यांनी प्लॅटफॉर्मवर नक्काशी काम चालू होते. काही शांत म्हातारे, आपल्या खुरट्या दाढ्यांवर हात फिरवत, सामानाला नाहीतर खांबाला रेलून शांतपणे बिड्या पीत होते. बिडी संपली की ती जमिनीवर विझवून तिच्या मागच्या चपट्या टोकाचा दात कोरण्यासाठी देखील उपयोग होत होता. आता दाताच्या फटीमधून काही निघालचं, तर ते जिभेच्या टोकावरुन हाताच्या बोटावर घेतलं जात होतं. आणि मग काही क्षण निरखून टिचकीनं आसमंतामध्ये भिरकावून दिलं जात होतं.
'तू जिथून आला होतास, तिथेच तू आज परत जात आहेस' अशी उदात्त भावना ह्या क्रियेमागे असावी. मला चर्चच्या बाहेरच्या भिंतिवर लिहिलेल्या सुवचनांची आठवण झाली. 'प्रभू तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे प्ला.क्र. २७८२ ' किंवा असलेच काहितरी.

मी दोन्ही मॅगझीन्स आणि थिसिस पेपर शांतपणे सॅकमधे कोंबले.

--------------------
ट्रेन आली. विजेच्या चपळाईने पोलिस टाईम्सच्या घड्या झाल्या, विड्या विझून कानामागे गेल्या आणि सामान दोन्ही हातात पकडून सर्वजण युद्धास सज्ज झाले. गाडी थांबताच, वीरश्री संचारलेल्या, आत चढणार्‍या व बाहेर पडणार्‍या लोकांमध्ये, तीन फूट रुंदीच्या दरवाज्यामध्ये तुंबळ युद्ध माजले. पाचच मिनिटांत सर्वजण आपापल्या इच्छित स्थळी पोचले. आत चढलेल्यांवर अजुनदेखील 'इंच इंच लढवू' घोषणेचा प्रभाव होता. काही वेळानंतर व बर्‍याच शिवीगाळीनंतर, प्रत्येकजण आपापल्या प्राप्त केलेल्या जागेवर विराजमान झाला.

मला जाण्यायेण्याच्या पॅसेजमध्ये, जमिनीवर खाली बसण्यापुरती जागा मिळाली. मी शिताफीने पाठीवरची सॅक पोटावर घेतली. पाठ साइड-सीटच्या कॉलमला लावली आणि मी स्थिरावलो. माझ्या शेजारी एक गलेलठ्ठ आणि काळीकुट्ट बाई फतकल मारुन बसली होती. तिच्या काखेतल्या घामाची वर्तुळं जाऊन चौकोन बनले होते व पार, ब्लाउजच्या टोकापर्यंत ओलं झालं होतं. सर्वात भयानक म्हणजे तिला जाम भयाण वास मारत होता.

केवळ चार तासांपुर्वी मी मित्याच्या मांडीवर डोके टाकून, होस्टेलच्या लॉनवर पहुडलो होतो. मित्या!! तिच्या अंगालाच किती गोड वास होता. मित्या अजून कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाली नव्हती. बॅच मधल्या काही शेवटच्या नोकरी न लागलेल्या लोकांमध्ये ती होती. बाकी जनता जोरदार पार्ट्यांमधे दंग होती. मी माझ्या परीने तिला धीर देत होतो की लागेल आता नोकरी लवकरच.

बॅचमधे सगळ्यात पहिला प्लेस मी झालो होतो. ऑफिशिअल प्लेसमेंट वीक सुरु व्हायच्या कितीतरी आठवडे आधी. मित्या काय खुश झाली होती तेव्हा! पण मला शेवटची सेमिस्टर त्या कंपनीमध्येच इंटर्न म्हणुन प्रोजेक्ट करायचा होता. म्हणजे शेवटच्या ज्या चार महिन्यात मजा करायची असते, तेव्हा मी सात-आठशे मैल दूर काम करणार होतो. मित्यापासून दूर!

माझी इंटर्नशिप सुरू झाली. ह्या शुक्रवारी सुट्टी होती. तीन दिवसांचा वीकेंड पकडून मी कॉलेजवर आलो होतो. पण सध्या फक्त स्टायपेंड मिळत असल्याने खिश्यात खडखडाट होता. तिकडे घराचे डिपॉझिट देतानाच अर्धा स्टायपेंड गुल झाला. रोजच्या मित्याला करायला लागणार्‍या फोनाफोनीत उरलेला अर्धा. खिशात केवळ तीन चारशे रुपडे टाकून मी आलो होतो. जनरलच्या डब्यात बसायला लागण्याचे हे कारण. नशिबाने तिकडे एक दळभद्री हॉटेल होते जिथे पंधरा रुपड्यात भाताचा डोंगर आणि सांबाराची बादली मिळते. महिन्याचे राहिलेले तीन दिवस रात्रीचे जेवण तिथे निघाले असते.

पण एकदा का कोर्स संपला की फूल पगार मिळणार होता. मग काय फक्त विमानाने यायचे जायचे. आणी मित्याच्या आई बापाला पटवायचे. हे जरा अवघड होते, पण 'प्रयत्नांती परमेश्वर'. मग मी आणि मित्या, एक छोटंसं घर आणि कल्पनेनचं मी खुद् करुन हसलो.

------------------
शेजारच्या त्या लठ्ठ बाईनं 'काय येड्यागत हसतुया' अश्या नजरेनं मला बघितलं आणि पाण्याची बाटली पुढे करुन, 'पाणी हवं का' असं खुणेनंच विचारलं. त्या बाटलीत ती खात असलेल्या तंबाखुची पाने तरंगत होती. बहुतेक बर्‍याच वेळात बिचारीला तंबाखू थुंकायची संधी मिळाली नव्हती. मी मानेनंच नाही म्हणालो. तिची मुलगी तिच्या शेजारीच, एक तान्हं मूल थानाला लावून बसली होती. मुलीनं हुबेहुब आईचा रंग उचलला होता. फक्त ती बर्‍यापैकी सडपातळ होती. कपाळावर नाण्याएवढं मोठं ठसठशीत कुंकू आणि नाकात एक अजस्र नथ. साइडच्या सीटवर तिचा नवरा बसला होता. जावई असल्याचा पुरेपूर रुबाब साहेबांच्या अंगात होता. लेदरचे स्वस्त बूट बहुतेक प्लॅटफॉर्मवर, सासर्‍याच्या पैश्याने, पॉलिश करुन घेतलेले दिसत होते. त्या लठ्ठ बाईचा मुलगा समोरच्या सीटच्या वरच्या फळीवर बसला होता. आई, मुलगा, बहिण यांच्यामध्ये ते ज्या लग्नाला निघाले होते त्याबद्दल, आजवर घरात जी काही लग्नं झाली त्याबद्दल आणि विशेषत: कुठल्या लग्नात रितीपरमानं काय न्हाय झालं याबद्दल गहन चर्चा सुरू होती. जावई अधुनमधून हुं हुं असं हंबरून अनुमोदन देत होता.

एक मोठा भोंगा वाजवून गाडी निघाली. इतका वेळ बेकरीच्या भट्टीसारख्या तापलेल्या डब्यात गार हवा आली. पण मी जमिनीवर बसलेला असल्याने फक्त केसांना आणि थोडीफार चेहर्‍याला हवा लागत होती. जांघेमधे घामाचे पाट वाहुन खाज सुटली होती. अशक्य झाल्याने मी उभा राहिलो. मी उभा राहताच, शेजारच्या लठ्ठ बाईचा, खुरट्या दाढीवाला म्हातारा नवरा, दरवाज्याकडून आत सरकला. त्याचा पाठलाग करत बिडीचा उग्र दर्प.

मी त्या म्हातार्‍याच्या दरवाज्याकडच्या जागेकडे गेलो. गिरणीमधे जसा काठोकाठ भरलेला पीठाचा डबा गदागदा हलवला की पीठ खाली बसतं, तसंच गाडी सुरू झाल्यावर, खचाखच भरलेल्या त्या डब्यामध्ये लोकांना हलता येईल इतकी जागा मोकळी झाली होती.

दरवाज्याच्या पॅसेजमधे डेली प्यासिंजरची गॅंग उभी होती. रोज आजुबाजुच्या गावातून शहराला हापिसाला येणारं पब्लिक. गावातल्या दुधसंघ किंवा साखर कारखाना ह्यापैकी कुठल्यातरी इलेक्शनबद्दल चर्चा सुरु होती.
'सायकल जिंकणार बघा ह्या येळंला. आणि बी. डी. जगताप हाणनार शेक्रेटरीची पोश्ट.' - तंबाखू दाढेखाली भरत पहिला म्हणाला.
'न्हाय हो. मेनबत्तीवाल्यांनी लय जोर लावलिया. ए. व्ही. शिंदेच शेक्रेटरी होतुया की न्हाय बघा तुम्ही. कसं?' - दुसर्‍याने मतप्रदर्शन केले.
'अवो, बीडींना जिल्ल्यातनं सपोर्ट हाय. गावात एव्हीनं कितीबी जोर लावला तरी, शेवटाला वरतून आदेश येणार. कोन काय काम केलं हेनं कायबी फरक पडत न्हाय. शेवटी कुनाच्या डोस्कीवर कुनाचा हात हाय ते मत्वाचं.' - पहिला आपल्या पोजिशनवर ठाम.
'आता आपल्या कीर्केटच्या टीममधीच बघा. त्यो डालमीया हाय तर गांगुली कप्तान आणि तेंडुलकर हाय म्हणुन त्यो त्याचा मुंबईचा XXX बोलर टीममंदी. ख्याख्याख्या.' तिसर्‍याने आपली विशेष टिप्पणी दिली.
'अरे पण त्या बोलरनं मुसल्याच्या पोरीशी पाट लावलाय. पेपरात फोटु आलता एकदम गरती हाय' - ख्याख्या हसत आणि डोळे मिचकावत, पहिल्यानं मला टाळी द्यायला हात उचलला. मी रिस्पॉन्स न देता तसाच उभा राहिलो. मग त्यानं उचललेल्या हातानं माझ्या पाठीवर थाप मारली आणि आणखी थोडावेळ हसला.

दरवाजात बसलेला माणूस संडासात गेला आणि मी पाय पायरीवर सोडून दरवाजात खाली बसलो. खिशातनं काढून एक सिगारेट पेटवली. मागे चर्चा चालुच होती.

'पण मानला पाहिजे XXX तेला. मुसल्याची पोरगी केलान्, न्हायतर फिलीम इंडश्ट्री मदी बघा. सगळे मुसल्याचे हिरो आमच्या पोरींशी लगीन लावलेत.' - पहिला.
'अवो, नटनट्यांचं सोडा. तुमच्या गावातल्या जी डींची पोरगी न्हाय पळाली मुसल्याच्या पोराबरोबर. साली जीडीची भावकीतच आब्रू न्हाय राहिली. खाली अजुन दोन बहिनी हायेत लग्नाच्या. बोला!' - तिसर्‍याने परत पिंक टाकली.
'अरं म्हनुन तर औंदा बीडी सायकलचा लीडर झाला न्हवं. न्हायतर आदी जीडीच्या समूर बीडी मुतायला न्हाय उबा र्‍हायचा.'

अशा तर्‍हेने चर्चा परत सायकल-मेणबत्ती-बीडी-जीडी-एव्ही ह्या ओरिजिनल ट्रॅकवर आली. भारतातील पूर्वोत्तर राज्यांमधील फुटीरवाद आणि युनोच्या सिएरा लिओनमधील शांतिसेनेची कामगिरी ह्या दोनच गोष्टी बहुदा त्या चर्चेमधून सटकल्या होत्या.

पहिल्यानं परत तंबाखू मळायला सुरुवात केली. दुसरा म्हणाला, 'जरा डबल घ्या'. तिसरा म्हणाला, 'न्हाय, तिबलच घ्या. माज्याकडं निस्ता चुनाच राहलया.'

---------------
गाडी तालुक्याच्या स्टेशनाला थांबली. सगळी डेली प्यासिंजर गॅंग उतरली. प्लॅटफॉर्म ह्या डब्याच्या बराच आधी संपला होता. चहावाला, केळीवाला इकडे यायचं काहीही चिन्ह दिसत नव्हतं. मी खाली उतरून आणखी एक सिगरेट शिलगावली.

गाडी निघाल्यावर मी आत आलो. पहिल्याच कंपार्टमेंटमधे वरच्या फळीवर एक जागा रिकामी होती. मी वर चढलो. माझ्या शेजारी एक उंच तरुण यामाहा लिहिलेली हॅंडबॅग बाजुला लावुन बसला होता. त्याच्या पलिकडे एकदम आतल्या बाजुला, एक विशीतली बाई पिवळी गडद साडी नेसून बसल्या बसल्याच झोपली होती. तिचा नवरा सारखा खालून वरती बघत होता. मी बसलो होतो तिथली मधली लाकडी फळी गायब होती. मनातल्या मनात चार शिव्या घालत मी तिथेच रुतून बसलो. गाडीनं चांगलाच वेग घेतला होता.
'कुठं निघालाय?' - माझ्या शेजारच्यानं मला विचारलं. मी सांगितले कुठे ते.
'काय करता तिथं?' - पुढचा प्रश्न. थोडक्यात ते पण सांगितलं मी.
'सैन्यात जॉइन व्हायला निघालोय. मी आणि ह्यो.' - समोरच्या खालच्या बाकावर बसलेल्या एकाकडं बोट दाखवून तो म्हणाला. त्या समोरच्याच्या बाजुला एक जाडी बाई जरा जास्तच ठळक दागिने घालून, छातीवर हाताची घडी घालून बसली होती. जणुकाही ती आजूबाजूच्या सगळ्यांपेक्षा थोडी वर होती. तिच्याशेजारी एक विशीतला पोरगा, बारीक तोंड करुन, खिन्नसा खिडकीबाहेर नजर लावून बसला होता.
'जिल्ह्याच्या गावाला भरती लागली होती. आम्ही दोघं शिलेक्ट झालो. जॉइन व्हायला निगालूया.'
'छान. सैन्यात नोकरी म्हणजे छानच.' मी उगीचच म्हणालो.
'व्हय. खरचं.' असं म्हणत खुश होउन त्याने माझ्या मांडीवर थाप मारली.

गाडीने चांगलाच वेग पकडला होता. वरच्या फळीवर आम्ही गदागदा हालत होतो. आमच्या फळीवर शेवटाला बसलेल्या बाईला ह्या भावी जवानाचा दोन-तीनवेळा धक्का बसला आणि ती जरा आकसून बसली. अचानक खाली बसलेला तिच्या नवर्‍यानं ताडकन उठून जवानाच्या कानाखाली खण्ण करून वाजवली.
'धक्का कशाला देतुया रे मगापासनं, XXXXX. नीट बसता येत न्हाय का?'
गालावर हात दाबत जवान म्हणाला, 'मुद्दामसून कशाला धक्का देतूया मी. गाडी हालायलीये गदागदा. दिसत न्हाय का?'
एवढ्यात बाकीच्या लोकांनी मध्ये पडून मामला शांत केला आणि त्या बाईला नवर्‍याच्या शेजारी खाली बसवले. जवानाच्या शेजारी त्याचा दोस्त वर चढून बसला.
सगळं शांत झाल्यावर जवान म्हणाला, 'दोन खून अलाउड हायेत आमाला, आर्मीवाल्यांना. चांगल्या घरची हाय म्हनुनश्यान सोडतूया.' पण बिचार्‍याच्या आवाजात धमकीपेक्षा रडूच जास्ती होतं.

मला एव्हाना डुलकी लागली. स्वप्नात, मित्याच्या अजुनही न पाहिलेल्या आई-वडिलांना मी भेटायला गेलो होतो. बहुतेक काहीतरी भांडण झाले असावे कारण मी तडातडा शूज पायात घालून त्यांच्या घरचा जीना उतरत होतो. मित्या मागून पळत आली आणि मला मिठी मारून रडू लागली. तिच्या अश्रूंनी माझा खांदा ओला झाला. पण मला कळेना की खांदा चिकट चिकट का लागतोय. मी एकदम जागा झालो. झोपेत लाळ गळून खांदा ओला आणि चिकट झाला होता. मी रुमालानं तोंड पुसलं आणि खाली बघितलं. डब्यात स्मशान शांतता होती.

-----------------
भडक दागिने घातलेली मगाची ती बाई आणि बारीक चेहरा करून खिडकीशी बसलेल्या मुलाच्या मध्ये एकजण, मांडीवर रुमाल टाकून, तीन पत्ते सटासट इकडे तिकडे फिरवत होता. त्याचा हात इतका भरभर चालत होता की तो कुठला पत्ता उचलून कुठे ठेवतोय ह्याचा अजिबात पत्ता लागत नव्हता. त्याचे केस मानेच्या खालपर्यंत वाढले होते आणि पुढे दोन-तीन इंच उंचीचा कोंबडा होता. गालफडं वर आली होती आणि डोळे बेडकागत मोठे होते. पॅसेजमधे दोन हट्टे-कट्टे, इस्त्रीचा बुशशर्ट, इन न करता उभे होते. त्यांचे इस्त्रीचे कपडे बघून ते ह्याच डब्यातून प्रवास करत असावेत ह्याबद्दल शंकाच होती. कंपार्टमेंटमधल्या प्रत्येकाची नजर केवळ त्या तीन पत्त्यांवर खिळली होती. तो इसम मला, न्हाव्याच्या दुकानात वेगवेगळ्या केसांच्या स्टाईल केलेल्या मॉडेल्सचा तक्ता असतो, त्या मॉडेल्सप्रमाणे वाटत होता.

केसांचा तो मॉडेल पत्ते घुमवायचे थांबला. आता त्याच्या मांडीवर तीन पत्ते पालथे पडले होते. खिडकीजवळच्या बारक्या तोंडाच्या मुलाने मधल्या एका पत्त्यावर बोट ठेवले. केसांच्या मॉडेलने पत्ता उलटा केला.

बदामची राणी!!

सगळ्या कंपार्टमेंटने एकदम श्वास सोडला. केसांच्या मॉडेलनं खिशातून शंभराच्या दोन नोटा काढल्या आणि बारीक तोंडाच्या मुलाच्या हातात दिल्या.

'दहा रुपयापासनं सुरु केलं व्हतं त्यानं. बदामच्या रानीचा पत्ता बराबर वळकला की पैसा डब्बल.' - शेजारचा दोन मर्डर अलाउड असलेला जवान, माझ्या कानात फिसफिसला.

हळूहळू जिंकत चाललेली रक्कम दोन-चार हजाराला पोचली. तो पोरगा जिंकलेले सगळे पैसे परत पुढच्या डावावर लावत होता. मध्येच त्यानं अर्धेच पैसे लावले. चुकीचा पत्ता लागला. पुढच्या डावाला उरलेले अर्धे पण गेले. इतका वेळ बाकाच्या अगदी टोकावर बसलेला तो मागे सरकला. तसेही त्याच्या खिशातून सुरुवातीचे दहा-वीस रुपडेच गेले होते.

तेवढ्यात इस्त्रीचा शर्टवाल्याने खिशातनं शंभराची नोट काढली आणि त्या पोराच्या हातात कोंबून म्हणाला,
'आज तेरा नसीब गरम है. अबे, पत्ते घुमा बे.'
केसांच्या मॉडेलने परत पत्ते घुमवले. इस्त्रीच्या शर्टवाल्याने पोराचा हात पकडून मधल्या पत्त्यावर ठेवला.

बदामची राणी!!

----------------
जिंकलेल्या दोनशे मध्ये बुशशर्टवाल्यानं आणखी पाचशे टाकले. डाव परत सुरू झाला. आता बुशशर्टवाला सांगत होता त्या पत्त्यावर पोरगा बोट लावत होता. हजार, दोन हजार, चार हजार, सहा... पोरगा दहा हजारावरचा डाव जिंकला. डोळे पार विस्फारून फळीच्या टोकावर बूड टेकून तो बसला होता.

मैफिलीमध्ये तबलेवाला जसा मानेला झटका देऊन द्रुत लयीवर घसरतो, तशी गाडीपण आता झटका देऊन जोरात निघाली. आजूबाजूचा प्रत्येक जण रुमाल आणि त्यावरचे तीन पत्ते ह्यावरच नजर खिळवून होता.

पोरानं दहा हजार लावले. पत्ते घुमायचे थांबले. बुशशर्टवाल्यानं पान सांगितलं.

चौकटची छक्की.

सगळे चक् चक् चुकचुकले.

बुशशर्टवाला पोराला म्हणाला,
'बेटा, तू आज जीतेगा. और लगा तू. डर मत. ऐसा दिन बार-बार नहीं आता. फिकर मत कर. पैसा है तेरे पास?'
पोराचे डोळे रुमालावरून हलेनात.
'देख जरा. बॅगमें देख. कुछ तो होंगे.'

झपाटल्यासारखं पोरानं सीटखालची बॅग बाहेर ओढली आणि आतनं शंभरच्या नोटांची एक गड्डी काढली. सत्तर-ऐशी नोटा असाव्यात. इतक्या वेळात पहिल्यांदाच तो आपले पैसे लावत होता. केसांच्या मॉडेलने परत पत्ते घुमवायला सुरुवात केली. ताल वाढतच होता. समेची मात्रा चुकवत तो पत्ते जोर-जोरात घुमवु लागला. गाडीनेदेखील ठेका पकडला. तीन पत्ते रुमालावर पालथे पडले होते. ह्यावेळी बुशशर्टवाला शांत उभा होता. सगळ्या डब्याने श्वास रोखून धरला होता. पोराने मधल्या पत्त्यावर बोट लावलं.

चौकटची दश्शी!

नशीबानं समेवर तान संपवली. तबला आदळला. मैफिल संपली.

कंपार्टमेंटमधे सन्नाटा पसरला. आजुबाजुच्या कंपार्टमेंटमधले लोक, जे पॅसेजमधे गर्दी करून उभे होते, ते मागं मागं सरकत आपापल्या जागेवर परतले. पोरगा डोकं हातामध्ये गच्च आवळून बसला होता. पत्ते फिरवणारा केसांचा मॉडेल पैसे खिशात टाकून, रुमालाची घडी करुन, कधी सटकला कुणालाच कळले नाही. पोरगा त्वेषाने एकदम दोघा बुशशर्टवाल्यांच्या अंगावर धावून गेला. इतका वेळ बाहेरच्या दरवाज्याशी उभा असलेला, एक रेड्यासारखा तगडा इसम आता आत घुसला. गळ्यात एक सोन्याची बिभत्स जाड चेन. त्यानं किडा झटकल्याप्रमाणं, पोराला कॉलर पकडून, सीटवर भिरकावला. बुशशर्टवाले, दरवाज्यात जाऊन उभे राहिले. त्या रेड्याने मान गोल वळवून कंपार्टमेंटमधल्या प्रत्येकाकडे बघितले आणि पोराच्या शेजारी बसला. प्रत्येकजण, मान खाली घालून, बुब्बुळं हलवत, इकडे तिकडे बघत बसला.

पुढचं स्टेशन आलं. गाडी थांबली. रेडा पोराच्या खांद्यावर हात दाबत उठला. प्लॅटफॉर्मवर रेडा आणि बुशशर्टवाले, पोराच्या खिडकीच्या बाहेर येऊन शांतपणे उभे राहिले. कंपार्टमेंटमधला कुणीही जागेवरुन हालला नाही.

---------------
गाडी सुरु झाली. स्टेशन मागं पडलं. ह्या लोकांची कशी टोळी असते, ते कसं भुलवतात, पोरानं लैच लालच केलं, ह्या विषयांवर लोकांची सविस्तर चर्चा सुरु झाली. मी उठून दरवाज्याशी गेलो. थोड्यावेळाने दुसर्‍या दरवाज्यात पोरगा येऊन बसला. मी जाऊन त्याला एक सिगरेट दिली. स्वतः एक पेटवली. बाहेरचं बघत पोरगा म्हणाला,
'माँ मर गयी. कल बापका फोन आया था. काँट्रॅक्टरसे पैसे उधार लेके निकला था. चौथे का खर्चा.'
आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तो पहिल्यांदाच बोलला. त्याच्या आवाजात कोणताही भाव नव्हता. वार्‍यामुळे फक्त थोडा कापरा आवाज येत होता.
'कुछ बचे है पैसे अभी भी?' - मी विचारलं.
'चालीस पचास से ज्यादा नही. अब गाँव जाके भी क्या फायदा.'
मी नुसतंच हुं म्हटलं आणि दुसर्‍या दरवाज्याशी जाऊन सिगरेट पीत बसलो. गाडी अगदी हळूहळू चालली होती. बहुतेक ट्रॅक खराब असावा किंवा पुढे सिग्नल असावा. बाहेर काळाकुट्ट अंधार साचला होता. माझ्या पाठच्या दरवाजातनं काहीतरी पडल्याचा भास झाला. मागं वळून बघितलं तर पोरगा दरवाज्यात नव्हता. का कोण जाणे, पण खोल पाणी असलेल्या विहिरीत दगड टाकल्यावर जसा बदका 'दब्ब' करुन आवाज येतो, तसा आवाज माझ्या कानात घुमत राहिला.

-शंतनू बेडेकर

विशेषांक लेखन: