नीजवेळा !

Submitted by चैतन्य दीक्षित on 16 December, 2015 - 04:54

झोपलेसे माझे पिल्लू छातीवर ।
हृदया हळुवार धडधड ।
श्वासांनो तुम्हीही लांबचा घ्या मार्ग ।
स्वप्नांना संसर्ग नको त्याच्या ।
कुंतल कुरळे कुरवाळू नका ।
हातांनो, नेमका उठेल तो ।
ओठांनो आवरा चुंबनाचा मोह ।
डहुळेल डोह निरागस ।
हळूच थांबवा स्पंदनांनो नाव ।
पऱ्यांचा तो गाव, आला बघा ।
मना, राही जागा, ठेवी पंचप्राण-
जागे, भोगी क्षण, दुर्मिळ हे ।
पिल्ला येता नीज, संवेदना जागे
गुंफले हे धागे देवाजीने ।
धाग्यांची त्या शाल हळू पांघरता
हास्य फुलें ओठां झोपेतच ।
-चैतन्य दीक्षित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वासांनो तुम्हीही लांबचा घ्या मार्ग ।
स्वप्नांना संसर्ग नको त्याच्या ।
>>
आईगं!
कसलीच गोडूली आणि मस्त जमलीये.
वात्सल्य, ममत्व प्रत्येक शब्दात जाणवतंय Happy
जियो!

मना, राही जागा, ठेवी पंचप्राण-
जागे, भोगी क्षण, दुर्मिळ हे ।
पिल्ला येता नीज, संवेदना जागे
गुंफले हे धागे देवाजीने ।>>>> खासच! Happy

__/\__

<,श्वासांनो तुम्हीही लांबचा घ्या मार्ग ।
स्वप्नांना संसर्ग नको त्याच्या ।<<
आहा... केवढी तरलता!
गोडुली झालीय कविता!

पुनश्च धन्यवाद!

@ प्राजक्ता, हे अभंग वृत्त आहे.
पहिल्या तीन चरणात ६ अक्षरे आणि शेवट्च्या चरणात ४ अक्षरे असे ढोबळ लक्षण सांगता येईल अभंगाचे.
क्वचित ६ च्या ऐवजी ७ अक्षरेही येतात. म्हणताना मात्र ती ७ ही अक्षरे ६ अक्षरांना लागणार्‍या वेळातच म्हटली जातात.