Submitted by वैभव_जोशी on 19 October, 2007 - 00:15
फुलायचे असेल तर अजूनही विचार कर
लगेच लागतील दर.. अजूनही विचार कर
मुळात पापण्या अशा, जशी सुसज्ज तोरणे
तश्यात आर्जवी नजर? अजूनही विचार कर
उरास चूड लावुनी मजेत हिंडतोस तू
जळेल रे उभे शहर.. अजूनही विचार कर
कशास तेच ते पुन्हा बजावतेस तू मला
असा पडेल का विसर? अजूनही विचार कर
अजूनही तुला मला हवी तशी हवा इथे
करायला हवी कदर.. अजूनही विचार कर
सदैव चावडीवरी मिळेन वावडीपरी
कशास काढशी खबर? अजूनही विचार कर
धरू नको जमेस अन वजा करू नको मला
फिरेलही पुन्हा लहर.. अजूनही विचार कर
सुचेन मी कधीतरी.. सुचेन जीवना तुला
अजूनही विचार कर.. अजूनही विचार कर
-वैभव जोशी
विशेषांक लेखन:
शेअर करा