Submitted by वैभव_जोशी on 18 October, 2007 - 06:14
मज डसून गेली कुठली, चांदरात सळसळणारी
देहावर दंश दिसेना, पण काया तळमळणारी
अन भल्या पहाटे झाली शीतल झुळुकेशी सलगी
वणव्यासम पसरत गेली ती ठिणगी दरवळणारी
रानात उडावा जैसा पाचोळा भिरभिरणारा
यौवनभर फिरला अल्लड पारिजात हा भिनणारा
मज तलम धुक्याचेसुध्दा रेशीम नकोसे झाले
काट्याने निघतो काटा, डंखावर डंख उतारा
अंगांग तळमळे माझे, हा दंश नसावा साधा
हे कसले जहर अनोखे, ही कसली रे विषबाधा
लाटांवर उठती लाटा, तृष्णेला फुटती वाटा
वैराग्या डसली प्रीती .... मीरेची झाली राधा
-वैभव जोशी
विशेषांक लेखन:
शेअर करा