'शी बाई, कित्ती हळू हळू चाललाय समोरचा.... कार तर चांगली दिसतेय. काय होतं मेल्यांना जरा जोरात हाकायला कोण जाणे...', ही!
'कार चांगली आणि चालवणारा असेलही चांगलाच बिचारा... बाजूच्या सीटमध्ये काय ते बघायला हवं....', मी.
एकूणच आपल्या बरोबर काहीही वाहून नेणार्या समस्त पुरुषांबद्दल मला आपुलकी आहे. आणि तसंही बायकोला ना, आपण सोडून सगळं वेगात जायला हवं असतं.
'काय म्हणालात?', इति, अर्थात ही!
'अगं बाजूला ते सुप्रसिद्ध कटाच्या आमटीचं पातेल आणि पाठीशी दस्तुरखुद्द विचारेकाकू बसल्या असतील तर चालवणारा मायकल शूमाखर असला तरी त्याचा झटक्यात 'सायकल' शूमाखर होईल.', इतकं हसू-बिसू येऊ शकण्यासारखं विनोदी वगैरे बोलूनसुद्धा तोंड वाकडं करीत मी म्हणालो.
'काही सांगू नका. तुमचंच ते! आपल्याच हाताने पायावर कुर्हाड मारून घ्यायची आणि जगाला बोल!', ही!
दोन वर्षं झालीत तरी कटाच्या आमटीची कटकट, विचारेकाकूंनी दंडाला काढलेला चिमटा, नुसतं त्यांचंच नव्हे तर कटाच्या आमटीचं नाव काढलं तरी, सगळं आठवतं मला. 'आ बैल मुझे मार' नावाचा काही योग असल्यास तो माझ्या कुंडलीत सगळ्या घरांत आहे. पाहुणा म्हणून नाही, घरचाच असल्यासारखा, कायम. ही म्हणते ते काही खरं नाही. मला आपल्या पायावर मारण्यासाठी कुर्हाड शोधावी लागत नाही, बैलाला 'आ' सुद्धा म्हणावं लागत नाही.... सगळे मारकुटे बैल, गाई, म्हशी, झुंजीचे एडके, माझा पत्ता शोधत येतात. योगच आहे तसा.
काकूंना हौस आहे आमटी करून न्यायची. कोणत्याही सार्वजनिक कार्याला सिडनीत, त्यांच्या कटाच्या आमटीचा 'कट' कार्यक्रमाच्याही आधी शिजतो. जेवण करतात सुंदरच पण ही म्हणे त्यांची सिग्नेचर डिश आहे. त्याचं पेटंट घेणार असल्याचंही ऐकलंय, खरं खोटं एफ.बी.आय. किंवा सी.आय.ए. ला ठाऊक, ब्रम्हदेवालाही नाही.
अगदी मनापासून सांगायचं तर मला कटाची आमटी मुळीच आवडत नाही. व्यवस्थित पुरणपोळ्या करण्यासाठी शिजत लावलेल्या डाळीच्या वरची 'मळी' काढून टाकायच्या ऐवजी.... तिची आमटी! हा 'टाकाऊतून टिकाऊ' वगैरे प्रकार जेवणात कशाला? आमची बीबी नेटवर कसले कसले BB वाचून असले प्रयोग घरात करते.
पण हा विषय घरात काढायची हल्ली सोय राहिली नाही. कशालाही ही आजकाल ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत नेऊन पोचवते.
'तुम्हाला एन्व्हायर्नमेंटचं काही नाहीच. ग्लोबल वॉर्मिंग नुसतं चटचटतंय आणि तुम्हाला मेला एक पदार्थ घशाखाली उतरत नाही! काय उपयोग त्या ग्रीन पार्टीला मत देऊन? कुंडीत फेका ते मत त्या पेक्षा.'
काय नव्हेच!
आधी 'पौष्टिक आहार आणि आरोग्य' या भागातून डाऊनलोड केलेला 'भरली कारली' किंवा 'कारल्याची न पिळता भाजी' असला पदार्थ.
दोन्ही साहजिकच (जवळ जवळ सगळीच) उरतात. मग सुरू होतो तो 'टाकाऊतून टिकाऊ' नावाचा डोकेखाऊ प्रकार. त्या रशियन बबुष्का डॉल सारखे एका टाकाऊतून दुसरे टिकाऊ पदार्थ बाहेर पडतात. फरक इतकाच, की पुढचा पदार्थ आकाराने मोठा आणि अधिक टाकाऊ असतो.
मग उरलेल्या 'न पिळता भाजी'चे 'कारल्याचे गुळातले भरीत' आणि भरल्या कारल्यातले सगळे भरलेले काढून टाकून 'तुपातले साखर-कारले'.
ते आधीचे कडू जहार आणि आता कडू-गुळमट झालेल्या भाजी-कम-आमटी गतीचे दोन्ही प्रकार उरतातच.
ह्याच्या पुढच्या दोन्ही पदार्थांवरच्या सुधारणा सारख्याच....... वेगवेगळ्या कारणासाठी ऑपरेशन टेबलवर आलेले सगळे पेशंट्स, एका विशिष्ट क्रिटिकल स्टेजच्या पुढे कसे एकाच दिव्यातून जातात.... तसंच.
त्यापुढे मग त्यात पुरेल इतके (म्हणजे बरेच) भाजलेले बेसन घालून 'कारल्याचे भरभरीत'. ते उरलेलं 'भरभरीत' ताकात सरसरीत कालवून त्याचे कुरकुरीत (अजूनही कडूच) डोसे....
असं करत करत ते कारलं अगदी चौर्याऐंशी नाही तरी गेला बाजार एकोणैंशीतरी लक्ष जन्मांत फिरून शेवटी 'झाडाला खत' पदाला पोचतं. कारल्याचा झाडापासून सुरू झालेला प्रवास असा परत झाडाच्या मुळाशी जाऊन पोचतो.
सगळंच environment friendly, green!... हिरवंगाऽऽऽर, घ्या!
असो.... तर काकूंची कटाची आमटी!
ती 'कट' नावाची मळी काढून ठेवल्यावर उरलेला मुद्द्याचं- शिजलेल्या डाळीचं त्या काय करतात कोण जाणे. त्यांच्या गुप्त रेसिपीचा एक भाग असावा- 'गुप्त कट'!
ते काही असो, पण आमटीला आणि आमटीची पाठराखीण म्हणून त्यांना, वाहून न्यायला सहसा कुणी तयार नसतं.
************
परवा सुद्धा तेच झालं. दिवाळी कमिटीची मीटिंग झाली. दिवाळीला विविध करमणुकीचा कार्यक्रम, आधीची, नंतरची उस्तवार इथपर्यंत ठीक आहे. पण मग दुपारी गणपती मंदिरात सत्यनारायणाची महापूजा, अभिषेक, प्रसादाचं जेवण इ. इ. कटकटींनी युक्त असा 'मदर ऑफ द कट' बाहेर आला. अपरिहार्य कलमासारखी कटाची आमटी होतीच.
बाहेर पडून आपापल्या गाड्यांकडे जाताजाता उरलेल्या तुरळक कामांची वाटणी चालली होती.बाकी बर्याच कामांना वर जाणारे हात, काकू आणि आमटीच्यावेळी खिशात होते, माझाही होताच माझ्या खिशात.
शिंक येणार असं वाटून मी हातरुमाल काढत होतो, तर हिला वाटलं की मी हात वर करणार म्हणून तिने जमेल तसा, मिळेल तिकडे चिमटा काढला. कितीही हळू म्हटलं तरी बायकोने नवर्याला दुरूस्त करण्यासाठी, चारचौघात दुसर्या कुणाला कळणार नाही अशा गनिमी शिताफीने.... काढलेला चिमटा.... तो जोरातच असतो!
माझ्या 'आय' ओरडण्यावर, अध्यक्ष काका कानिटकर अतिशय तत्परतेने म्हणाले, 'यू? शाब्बास! अशी जिद्द हवी. ठरलं तर. काकू, आणि आमटी वाहून आणण्याची जबाबदारी तुझी!'.
आपापल्या गाड्यांकडे परत जाणारे सगळे माझ्या पाठीवर थाप मारून, थोपटून, कौतुक करत, का हळहळ दाखवत गेले. त्या सगळ्यांनी एकेकदा वाहिलीये, आमटी. खरंतर हिच्यामुळे झाला होता हा गोंधळ. नवर्याला सुधारायची ती वेळ होती का? पण असल्या संध्या सोडतील तर त्या बायका कसल्या? ज्याम कबूल करायला तयार नव्हती. बरं, त्या 'आय' ओरडण्यात मी शिंकायचंही विसरलो त्यामुळे सिद्धही करता येईना. या भोगाचंही खापर पुन्हा माझ्याच माथी!
***********
विचारे काकूंच्या प्रत्येक गोष्टीमागे एक विचार असतो, त्यांचा, त्यांनाच कळेल असा, त्यांच्याच "तंत्राने" विकसित झालेला. काकूंची आमटी वाहून नेण्यामागेही त्यांच्याच विचारांनी विकसित झालेलं एक महा स्व"तंत्र" शास्त्र आहे. ते तंत्र फॉलो करताना इतरांची तंतरते!
"एका विशिष्ट मोठ्ठ्या पातेल्यात, गरम गरम आमटी, पुढच्या सीटवर, झाकण न लावता ठेवून, फोडणी टाकल्यावर, तासात न्यायची."
माझं म्हणणं की घरून करून कशाला न्यायची? तिथे मंदिरावर जाऊनच आमटीचा एल्गार करा ना! तिथेच ते 'भांडी वाजो लागली' वगैरे होऊन जाऊंदे. पण नाही! खरं कारण माहीत नाही. मला वाटतं, पेटंट घेईपर्यंत चार-चौघात आमटी होणे नाही.
उघडं पातेलं! आमटीच्या भांड्याला झाकण लावायचं नाही, का? तर म्हणे झाकणाचं पाणी पडून आमटीची चव बदलते. तरी जेवणावळीच्या शेवटी शेवटी एकदा पाणी आणि एकदा मसाला घालून आमटीचा 'वाढदिवस' करताना हिनेच काय, मी पण बघितलंय अनेकदा.
पुढच्या सीटवर का? तर मागच्या सीटवर त्या स्वत: असतात.... हे त्यांना बघितल्यावर कुणालाही कळेल.
बुटात का नाही? तर 'कुठलं कुठलं, काय काय माती, मसणं नेलं असेल त्या बुटातून देवाला ठाऊक. प्रसादाची आमटी पुढच्याच सीटवर हवी'. ह्यावर कुठलाही युक्तीवाद चालत नाही.
फोडणी टाकल्यावर तासात, कारण फोडणीची expiry date/time तासाचाच आहे, बहुतेक. काकू आमटीला जिवंत फोडणी देतात म्हणे.... तासात प्राण जात असावा, फोडणीचा.
गाडीच्या काचा उघडायच्या नाहीत. आमटी थंड होते पेक्षा काकूंची केशरचना विसकटते. काकूंचे केस माझ्यापेक्षा जऽऽऽराच जास्त आहेत, तेसुद्धा लांबीला. दाटपणा माझ्याइतकाच असावा.
कसेही रचायला आधी केस हवेत ना? आता, असल्या केसांच्या कसल्याही रचनेला 'केशरचना' म्हणणं म्हणजे हत्तीच्या शेपटीला चवरी म्हणण्यासारखं आहे.
तर....., ते आमटीचं पातेलं, काकू आणि त्यांच्या accessories नेऊन सोडायचं होतं गणपती मंदिराच्या हॊलवर.
आमटी वाहून नेलेली गाडी चांगली दोनेक आठवडे तरी दुरूनही ओळखता येते, वासानेच. म्हणून मी माझ्या वतीने एक गरीब आणि माफक प्रयत्न करून पाहिला, 'काकू, मी काय म्हणतो, झाकण लावलं ना, तर वास आतच राहील, म्हणजे... उडून जाणार नाही कोलोनसारखा...'.
'एक भुरका मारलास आणि हात धुतलास तरी हाताचा वास जाणार नाही आठाठ दिवस. कोलोनसारखा उडून जाईल म्हणे...' विचारे काकूंनी मला कोलोनपेक्षाही फास्ट उडवून लावला.
मग ते उघडं पातेलं पुढच्या सीटवर!
त्या 'लबक-डबक' करीत पातेल्याचा काठ चाटणार्या आमटीच्या लाटांवर एक डोळा, उरलेला एकुलता एक डोळा समोरच्या रस्त्यावर. गणपती मंदीराला पोचेपर्यंत मी चकणा किंवा तिरळा झालोय की काय असं वाटत होतं.
रीअर मिररमध्ये बघायला तिसरा डोळा हवा होता म्हणण्यात अर्थ नाही कारण, अख्ख्या रीअर मिररमध्ये पाव-अधपाव फक्त काकूच दिसत होत्या त्यामुळे मागे बघण्यात अर्थच नव्हता.
आम्ही ज्या गतीने चाललो होतो, त्यामुळे तीनचाकी सायकलच्या वरची सगळी वहानं ओव्हरटेक करून जात होती.
वर आणखी काकूंच्या सूचना-
'अरे हळूऽऽऽ'. आता ह्यापेक्षा हळू म्हणजे पाठीवर पातेलं आणि काकूंना ठेऊन सरपटत जायला हवं.
'अरे अरे, बघितलास का? तो ट्रक बघितलास का?' .एव्हढा मोठ्ठा ट्रक मला दिसत नसल्यास ठार आंधळा वाटलो की काय त्यांना.
'जपून! तुला काय? माझी आमटी जाईल सांडून...'. ह्यांना नक्की काय वाटतंय काय?, ह्यांची आमटी गाडीत सांडून घेण्याच्या गंमतीसाठी मी माझी गाडी ट्रकला चाटेन?
मी ती कटाची आमटी नेत नसून अमृतमंथनानंतर असुरांनी कट करून देवांकडून अमृत पळवून नेलं होतं ना? तसं काहीतरी वाटत होतं. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुणी राक्षसिणी असल्या ना, तर असंच डोकं खाल्लं असलं पाहिजे त्यावेळी सुद्धा त्या बिच्चार्या राक्षसांचं.
'त्याच्यासाठी नको थांबूस, चल लवकर. किती हळू चालतात लोक तरी, एक मेला रस्ता क्रॉस करायचा तर, डावीकडे बघणं काय, उजवीकडे बघणं काय, पाय घसटत चालणं काय.... गाडीतल्यांचा कित्ती खोळंबा!'. हे पेडेस्ट्रीयन क्रॉसिंगला! मी काकूंना क्रॉस करताना बघितलय माझ्या डोळ्यांनी परवाच्या गाण्याच्या कार्यक्रमाला. व्यवस्थीत 'पादचारी'- म्हणजे चारही पादांवर चालत असल्यासारख्या.... फास्ट नाही, हळूच. व्यस्तप्रमाण नाही, समप्रमाणच. म्हणजे एका पादाला एक पूर्णांक तीनशेचौर्याहत्तर सेकंद तर चार पादांना किती? असलं!
'अरे, कुठे बघतोयस? आमटीकडे लक्ष आहे ना तुझं? बघ हो, एकदाची मंदिरात नेऊन त्यांच्या हाती सुपूर्द केली की सुटले बाबा यातून....' आता ही आमटी म्हणजे त्यांची लग्नाला जबरदस्तीने घेऊन चाललोय अशी पळपुटी नवरी मुलगी असल्यासारखंच बोलत होत्या.
मी दर आठेक सेकंदाला आमटीकडे वळून बघितलं नाही तर मध्येच दार उघडून ती पातेल्यासकट पळून जाईल असं वाटतंय की काय ह्यांना? घरून निघताना त्यांनी विचारलं होतं की त्या दाराला 'चाईल्ड लॉक' आहे का?... यासाठीच असावं बहुतेक.
'चार पावलावर तीस अंशात खड्डा येतोय, संभाळून, आमटी सांडेल!'.
चार पावलावर, तीस अंशात? त्यांची चार पावलं बोलून संपण्यापूर्वी न चुकवता येणारा तो खड्डा चाकाखाली आलासुद्धा. बघता बघता आमटीने पातेल्याचा गळा एका बाजूने दाटून आला अन, एकोणपन्नासाव्या आवंढ्याने माझा, सगळ्या बाजूंनी.
पातेल्याला ओकारी येईपर्यंत कशाला भरायचं पातेलं, म्हणतो मी? म्हणे सांडेल....
'अरे अरे किती वळवतोस? फार वळवू नकोस, पातेलं कलंडेल'. सगळ्यात चीड येणारी सुचना. ह्यात सगळच चीड येणारं. रस्ता वळतोय तरी वळू नकोस. रस्त्याइतका तरी वळू की नको? तर फार वळू नकोस. इथे मी भोवंडायची वेळ आलीये... म्हणे पातेलं कलंडेल....
कान बंद करता आले तर किती बरं अशा गतीला आलेले. त्याच आमटीच्या डोहात बुडी मारून जीव द्यावा तर. पण आठाठ दिवस वास न जाणारा आत्मा वरती घेतील की नाही कुणास ठाऊक.... का आजकाल नरकात उकळत्या तेला ऐवजी काकूंची आमटीच वापरत असावेत?
....त्या आमटीच्या वासाने 'धुंद' झालेल्या मला भलभलते विचार सुचत होते.
************
इतक्यात एक गोरापान दैत्य आणि मला पातेल्यात बसवून कडेवर घेऊ शकेल असली एक दणदणीत अप्सरा ऑस्ट्रेलिअन पोलिसांच्या रूपात आडवी आली. रॅंडम ब्रेथ टेस्टसाठी पोलिसांनी थांबवलं. अतिशय हळू हळू मी गाडी कडेला घेतली. ते बघून दुसर्या एखाद्या पोलीसाने गहिवरून येऊन, सेफ ड्रायव्हिंगचं पारितोषिकच दिलं असतं मला.
गाडी थांबली तेव्हा एक चाक रस्ता उतरून खाली गेलं होतं. त्यामुळे पावसाळ्यात नदी धोक्याची पातळी गाठते ना, तशी पातेल्याची 'त्या' बाजूची धोक्याची पातळी गाठून, आमटी पातेल्याबाहेर वाकून बघत थांबली होती.
खरंतर 'त्या बाजूची' याला काही अर्थ नाही. 'या' बाजूची पातळी गाठली असती तरी तोच अनावस्था प्रसंग होता. एका आचमनात का ओंजळीत धरून तो सांडणार्या आमटीचा डोह प्यायला मी काही अगस्ती नाही.... त्यांनाही ही आमटी 'परवडली' नसती... खूप तिखट असते!
तिथेही काकूंचं 'अरे, सटक रे तू, मग बघता येईल काय ते. पण हळू सटक हं, म्हणजे जोरात नको.. जरा हळू हळूच...' चालू होतंच. अशक्य!
गाडीची ड्रायव्हरसाईडची खिडकी उघडल्याबरोबरच आलेल्या भपकार्याने तो पोलीस आधी दोन फूट मागे सरकला. त्या ऒस्ट्रेलियन पोलीसाला बिचार्याला काय समजावून सांगायचं?
संशयाने माझ्याकडे बघत अतिशय दक्षतेने त्याने माझी टेस्ट घेतली. आणि त्याचं लक्ष उघड्या पातेल्याकडे गेलं.
जमेल तितक्या लांबून, वास न घेता पण आमटीला आपादमस्तक न्याहाळून बघण्याचा प्रयत्न करीत त्याने विचारलं "what is this? Is this some kind of industrial slurry? where are you disposing this off?".
अरे देवा, हा त्या मातकट काळ्या रंगाच्या शुद्ध डाळीच्या आमटीला हा केमिकल स्लरी समजला होता. मग बोट घालून मी ते चाखून दाखवत ती 'केमिकल स्लरी' नसून 'एडिबल करी' आहे ते सिद्ध करून दाखवलं.
उगीच संशय नको म्हणून, त्याबरोबर बाकीचं सागणं आलंच. एव्हढी आमटी कशाला, कुठे इ. इ.
आमच्यात एलेफंट गॉडच्या टेम्पलमध्ये होमा करतात, म्हणजे आग लावतात आणि त्यात घी म्हणजे सॉलिडिफाईड बटर टाकतात.
टेम्पलमध्ये हंड्रेड ऍन्ड एट पार्टनर्स बसून सत्यनारायणा गॉडची महापूजा करतात. ऍन्ड नो! एलेफंट गॉड हॅज नो ऑब्जेक्शन, डुईंग इट इन हिज टेंपल.
महाप्रसादा असतो. नो वन कॅन से 'नो' टू सत्यनारायणा महाप्रसादा. आणि शिवाय यावेळी अभिषेकाही आहे.
अभिषेका म्हणजे पाणी किंवा दूध थेंब बाय थेंब.... वगैरे वगैरे इंग्रजीत समजावून सांगताना माझ्या शर्टाच्या आत धार बाय धार घामाचा अभिषेक सुरू झालेला जाणवत होता.
माझी ही कथा श्रद्धेने श्रवण करणाया त्या उर्वशीने मुंबईतले दूध पिणारे गणपती वगैरे नुकतेच SBS वर बघितले होते. त्यामुळे इथल्या गणपतीला curry पाजत असतील असं म्हणून सोडलं आम्हाला.
सुटलो? पण नाही. गोंडस दैत्य अजून उत्सुक होता. त्याने वरवर निरागस दिसणारा आसुरी प्रश्न विचारला, 'असा वास कसा काय येतो तुमच्या सगळ्याच पदार्थांना?', दैत्य घरच्या राक्षसिणीसाठी इंडियन बनवत असावा.
काकूंचं मोठ्ठ्या आवाजात सुरू झालं, 'tell you what, we indians give phoDaNee to everything. that is the trick, you know. take oil, heat it, put mustard seeds, when they pop pop pop, add curry leaves, add hing means asaa... asaapho... asaapoT...'
'काय मेली इंग्रजी नावं तरी.... हा!'
... 'asaphaTaakaa and quickly put the cover. otherwise the smell will fly off. finished phoDaNee, done! this is very general recipe. ok?. for this particular curry I have given the 'live phoDaNee'. Have you seen that show on TV? what Do you call it?.... that steel chef.... or ironing chef or something like that?.... same technique for the "live phoDaNee"..... you know how they burn.....'
काकूंचा हा लाईव्ह फोडणीचा 'लाईव्ह डीज्जे' चालू होता. थोडावेळ टक लावून त्यांच्या कडे, एकदा आश्चर्याने आमटीकडे, एकदा हताशपणे घड्याळाकडे, एकदा करुणेने माझ्याकडे, एकदा सूचकपणे एकमेकांकडे, हे सगळे बघण्याचे प्रकार, दोन-तीनदा करून, त्या रंभेने शेवटी 'हलवा आता गाडी' चा इशारा दिला.
दैत्यानेही "टेक केअर माइट" असं आमटीच्या पातेल्या कडे बघत, काकूंकडे बघायचं टाळत, मला म्हटलं. बर्यापैकी प्रेमळ वाटला तेव्हा.
काकूंचं सुरू- 'अरे, नुसतं घी म्हटलेलं कळतं हल्ली त्यांना... सॉलिडिफाईड बटर काय, थेंब बाय थेंब काय, तुझं म्हणजे कायतरीच असतं.....'
***********
त्यांच्या आमटीची फोडणी मरण्याआधी पोचणं अत्यावश्यकच होतं. मग झालेला उशीर भरून काढण्यासाठी काकूंनी सुचवलेला शॉर्टकट घेतला. त्या रस्त्याने त्या दर शनिवारी देवळात जातात. त्यांच्यामते 'हाच सगळ्यात शॉर्टेस्ट कट आहे'. बरोब्बर! आमटीच्या वासाने 'हाय' झालेल्या माझा त्यावेळी कशावरही विश्वास बसला असता.
सहा वळणांचं नाही काही वाटलं! पण......
गेला शनिवार आणि आज या मधल्या काळात आम्ही, आमटी 'रेस' इथे खेळणार असं कळल्याप्रमाणे, 'कट' करून, रस्त्यावर मोजून अठरा स्पीडब्रेकर घातले होते. नव्वेच्या नव्वे, कोरे करकरीत, घट्टमुट्ट, टणटणीत अठरा स्पीडब्रेकर्स..... घ्या!
प्रत्येक स्पीड्ब्रेकरला, आमटीच्या पातेल्यात मधोमध एक त्सुनामीची उठणारी लाट!
त्याबरोबर माझं ह्रदय उचंबळून येऊन घशात!
त्सुनामी पातेल्याच्या काठांना आपटून मोठ्ठा 'डुब्बुक'!
मागून काकूंचं 'हुश्श, बाई'!
मग काकूंना घेऊन मागच्या चाकांचं 'धब्बक'!
आणि माझ हृदयाचं पोटातल्या रिकाम्या भांड्यात पडून 'धड्डाम'!
मी 'गट्टळ्ळ गर्रर्रम' करीत आवंढा गिळून, अडीच-एक श्वास घेतोय तोपर्यंत पुढचा स्पीडब्रेकर!
हे सगळं मोजून वट्टात अठरा वेळा. मला फक्त फेफरं यायचं बाकी होतं.
स्पीडब्रेकर्सना 'हुश्श बाई' आणि वळणांवर 'किती उशीर, छ्छे किती उशीर'! काकूंचं भजन मागे चालूच होतं. मंदिराचा कळस दिसला आणि मला अगदी 'भेटी लागी जीवा', पासून 'निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे' पर्यंत सगळे अभंग आठवले.
तिकडे मंदीरात, काकू आणि आमटी लवाजम्याला उतरवून घ्यायला काका, त्यांचे जावई, आमच्या सिडनी कब्बड्डी संघाचे दोघे आदी भरभक्कम मंडळी हजर होती.
जेणू काम तेणू थाय....
काका काय ते आपल्या पद्धतीने त्यांना उतरवायला पुढे आले होते... त्यांना सोडायचं त्यांच्या नशिबावर तर ते नाही. मग हात दाखवून अवलक्षण कोण करेल? ती संपूर्ण जबाबदारी माझी नाही का?
आमटीच्या वाटेला जायचं नाही या एकाच उद्देशाने मी काकांना म्हटलं, 'तुम्ही आमटीचं काय ते बघा. मी काकूंना उतरवून...'
मला वाक्य पूर्णही करू न देता काका टुण्णकन उडी मारून गाडीच्या दुसया बाजूला गेले सुद्धा. सवाई सुपरमॅन!
मी काकूंचा दरवाजा उघडून आमटी कशी वाहून नेतात ते बघत उभा राहिलो. सगळे गडी वर्षांच्या प्रॅक्टीसने तयार झाले होते.
"भले.... हो!" करून त्यांनी पातेलं गाडीतून खाली उतरवलं. मग 'हैश्शा भले, भले रे भले' करीत दोन दोन पावलं करीत ते नेऊ लागले.
इकडे आपला सगळा देहभार माझ्यावर घालीत काकूंनी गाडीबाहेर पाऊल टाकलं तेच मुळी माझ्या पायावर. माझी प्राणांतिक आरोळी आमटी-वाहकांच्या 'हैश्शा भले....' मध्ये वाहून गेली. वर आणखी 'केव्हढ्यांदा ओरडतोस लहान मुलासारखा?' असं मला दटावून उजव्या दंडाला कसला सणसणीत चिमटा काढलाय म्हणुन सांगू!
त्यांच्या आमटीइतकाच हा सिग्नेचर चिमटा आहे हे पटलं मला लगेचच.
तसाच कळवळत आणि दरवळत घरी गेलो. आठाठ जन्म धुवूनही जाणार नाही असला वास अंगालाच काय पण सगळ्या आसमंतात भरून राह्यलाय असं वाटत होतं. बायको कधीच मंदिरात गेली होती.
सकाळी उटणं, मैसोर सॅंडल सोप वगैरेने युक्त मनसोक्त दिवाळीचं अभ्यंगस्नान झालच होतं.
पण ते 'प्रोक्षण' वाटेल, असली खसा खसा घासून आंघोळ करून कपडे बदलले. तरीही एक रात्रतरी आपल्यालाच सोडा-साबणात भिजवून ठेवायला हवं असलं काहीतरी वाटत होतं.
मग हाताला लागले ते दोन-तीन अत्तराचे फवारे मारले. तरीही तो दुष्ट खमंगपणा जाईना अंगाचा. मग लेकाच्या खोलीतला एक घेऊन मारला. त्या वासाने फक्त बेशुद्ध पडलो नाही इतकंच. बाकी चालतोय की तरंगतोय कळण्याच्या पलीकडे गेलो होतो.
गाडी, दरवाजे काचा उघडून हवा देत बॅकयार्डमधे ठेवली होती, तिच्याकडे बघून हेवा वाटला तिचा, आणि स्वत:ची कीव आली.
तितक्यात हिचा फोन आला. कुजबुजत बोलत होती. 'कुठे आहात? कित्ती उशीर?'
मनात म्हटलं 'अरे, व्वा, कधी नव्हे ते बायको कुजबुजत विचारतेय, कुठे आहात? कित्ती बाई......'
पण नाही, हिने फोनवरच मला जिवंत फोडणी द्यायला सुरूवात केली.
'एक साधं आमटी आणि काकूंना देवळात सोडायचं, तर दोन तास लागले तुम्हाला! इथे सगळे वाट बघतायत आमटीची. आता तरी लवकर या. आणि आंघोळ करा जरा स्वच्छ!'
मला बोलायची जराही संधी न देता पुढे, 'आणि अहो, येताना आपलं पॅंट्रीच्या माळ्यावरचं मध्यम आकाराचं पातेलं घेऊन या, झाकणासकट. नाहीतर ते ठेवाल घरी. काकूंनी किनई आत्ताच उरलेल्या कटाच्या आमटीची, मेथी घालून रस गोळ्याची रस्साभाजी करायची रेसिपी......'
जगातले सगळे सुतळी बॉम्ब एकाचवेळी माझ्या कानात वाजले!
-Daad