प्रवासवर्णन

Submitted by नरेंद्र गोळे on 16 October, 2007 - 22:20

रंगाबाद

यंदाच्या गणेशोत्सवाच्या सुट्टीत औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा आणि पैठण फिरून येण्याचा संकल्प केला. गणेशचतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी औरंगाबादेस कूच करून, ज्येष्ठागौरी विसर्जनाचे दिवशी रात्रीपावेतो डोंबिवलीस परतण्याचे नियोजन केले. रविवारी सकाळी सात वाजता तपोवन एक्सप्रेसने कल्याणहून निघून दुपारी दीडपर्यंत औरंगाबाद स्थानकावर पोहोचलोही. औरंगाबाद स्टेशनबाहेर एक कोळशाचे इंजिनही प्रदर्शनास्तव मांडून ठेवलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पर्यटक-रहिवास तिथून पाच मिनिटांत चालत जाता येईल अशा अंतरावर आहे.

देवगिरीचा किल्ला

आमचे पहिले प्रेक्षणीय स्थळ होते देवगिरीचा किल्ला. काही इतिहासतज्ञ मानतात की वेरूळची कैलास लेणी ज्यांच्या समर्थ अधिपत्याखाली साकारण्यात आली, त्याच राष्ट्रकूट वंशाच्या सम्राटांनी देवगिरी किल्ल्याचीही निर्मिती केली असावी. मात्र, दक्षिणेतील ह्या सर्वात जुन्या किल्ल्याचा ज्ञात इतिहास यादव वंशाच्या उदयापासून सुरू होतो. ११८७ ते १३१८ ह्या १३१ वर्षांच्या काळखंडात, ह्या किल्ल्यावर यादव राजांचे राज्य होते. ११८७ चे सुमारास नाशिकजवळील सिंदेशचा राजा, यादव वंशाचा पाचवा राजा भिल्लम ह्याने ह्या किल्ल्याचा पाया रचला. पुढे ह्याच वंशाच्या जैत्रपाल, सिंघनदेव, कृष्णदेवराय, महादेवराय, रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्या राजांच्या काळात देवगिरी समृद्ध झाला आणि त्याची कीर्ती महाराष्ट्राबाहेर पसरली. १२९४ मध्ये अल्लाऊद्दिन खिलजीने देवगिरीवर हल्ला करून रामदेवरायाचा पराभव केला. पण तह होऊन सत्ता रामदेवरायाकडेच राहिली. १३०७ मध्ये मल्लिक कौफरने शंकरदेवाचा पराभव करून त्याला ठार केले. पुढे १३१८ मध्ये कुतुबुद्दिन मुबारक खिलजी ह्याने हरपालदेवास जिवंत पकडून मुख्यद्वारी फाशी दिले. याबरोबरच यादवांचे साम्राज्य संपुष्टात येऊन देवगिरी दिल्ली सल्तनतीचे हाती लागला.
देवगिरीच्या महाकोटाचा बुरुज. या बुरुजावरुन संपूर्ण किल्ला आणि शहराचे विहंगम दृष्य नजरेस येते.

१३२७ मध्ये महंमद बिन तुघलकाने भारताची राजधानी देवगिरीस हलवली आणि देवगिरीचे नवे नामकरण केले "दौलताबाद". त्यानंतर काही काळपर्यंत देवगिरीचा किल्ला "दौलताबाद" नावाने, सबंध भारताची राजधानी राहिला. १३४७ मध्ये दिल्ली दरबारचे वतीने देवगिरी सांभाळणार्‍या हसन गंगू बहामनीने देवगिरीवर सत्ता प्रस्थापित केली. पुढे १५० वर्षे देवगिरीवर बहामनी राज्य चालले. १४९९ मध्ये बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन अहमदनगरच्या निजामशाहीने देवगिरी ताब्यात घेतला. पुढे १३५ वर्षांपर्यंत देवगिरी निजामांचे ताब्यात राहिला. निजामाचा वजीर मलिक अंबर ह्याने देवगिरीजवळ खडकी (खडकाळ भागात वसवलेली नगरी-खडकी) नावाचे नगर वसवले. तेच आज औरंगाबाद (संभाजीनगर) म्हणून ओळखले जाते.

१६३३ मध्ये देवगिरीवर शहाजहानने ताबा मिळवला आणि १६३५ मध्ये औरंगजेबाने देवगिरीस दक्षिणेची राजधानी केले. १७२४ मध्ये देवगिरी, असफजाहीचा संस्थापक असलेल्या हैद्राबादच्या निजामाचे ताब्यात आला. १७६० ते १७६२ ही दोन वर्षे सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव करून देवगिरीचा ताबा मिळवला होता. तेवढी दोन वर्षे वगळता तेव्हापासून ते १७ सप्टेंबर १९४८ रोजी तो स्वतंत्र भारतात सामिल होईपर्यंत देवगिरी निजामाचेच ताब्यात राहिला. त्या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्रामास यश येऊन हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. अशाप्रकारे ज्ञात सातशे एकसष्ट वर्षांच्या विस्तीर्ण कालावधीत देवगिरीने आठ राजघराण्यांचे उदयास्त पाहिले. यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, मुघल, असफजाही आणि माराठेशाही. स्वातंत्र्योत्तर सुमारे वर्षभराने, तो स्वतंत्र भारताचा अविभाज्य घटक झालेला आहे.

दोन हत्तींचे देवगिरीच्या तटावरील सुंदर शिल्प

Chand_Minar.jpg देवगिरीच्या किल्ल्यातील हत्ती हौदात हत्ती उतरू शकेल अशी जागा नाही. मात्र हत्तीसारखा मोठा असल्याने हत्ती हौद म्हणतात. सध्या कोरडाच असतो. हत्तीहौदाजवळ एक घुमटाकार प्रवेशद्वार आहे. आत एक, चौरस, विस्तीर्ण, खुले मैदान आहे. मैदानापाठीमागे कोरीव खांबांच्या मंदिरात भारतमातेची सुंदर, अष्टभुजा, उभी मूर्ती आहे. मैदानाभोवताल अलंकारिक शिल्पकलेने मंडित दगडी खांबांच्या ओळी आहेत. त्या आपल्याला, ह्या भव्य, वैभवशाली मूळ मंदिराची आठवण करून देतात. हे मंदिर यादवांच्या काळात बांधलेले, मूळ जैन मंदिर असावे. १३१८ मध्ये, कुतुबुद्दिन मुबारक खिलजी ह्या दिल्लीच्या सुलतानाने, त्याच्या इथल्या थोड्याशा वास्तव्याच्या काळात त्याचे मशीदीत रुपांतर केले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर लगेचच भारतमातेच्या वर्तमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

अत्यंत योगायोगाने, ह्याच मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या एकोणसाठाव्या वर्धापनदिनी आम्ही देवगिरीवर सकाळी दहा चे सुमारास येऊन पोहोचलो होतो. किल्ल्यावर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मरणार्थ एका भव्य, चौरस, चहुंकडून बंदिस्त, फरसबंद मैदानात, भारतमातेचे एक मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे. तिथे, त्या मंदिरात एक स्मरणसमारंभ सुरू होता. आम्हीही अत्यंत विनम्र भावनेने त्यात सहभागी होऊन भारतमातेस आदराने प्रणाम केला.

वेरूळ

वेरूळ येथील विहार आणि लेणी मंदिरे, औरंगाबादच्या उत्तरेला, २६ किलोमीटर अंतरावरील डोंगरात, सुळक्यांच्या काठाने कोरून काढण्यात आली आहेत. सरळ रेषेत वसलेल्या येथील एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने किंवा प्रार्थनागृहे, विहार किंवा आश्रम तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत, सुमारे ६०० वर्षे चाललेल्या येथील कोरीव कामांमधील धुमर लेणे (लेणे क्रमांक २९) हे सर्वात प्राचीन आहे. भव्यता आणि कलात्मकता यांबाबत अजोड मानले जाणारे कैलास लेणे (लेणे क्रमांक १६) हे वेरूळ लेण्यांमधले सर्वाधिक उठून दिसणारे लेणे आहे. जगातील सर्वात मोठी एकसंध वास्तू म्हणून ख्यात असलेले हे लेणे म्हणजे वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. वेरूळ लेण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, अजिंठा लेण्यांप्रमाणे त्यांचा अपघाती शोध लागला नाही. प्राचीन काळापासून भाविकांना आकर्षित करणारे वेरूळ हे नेहमीच एक पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

बिरबलाची एक कहाणी आपल्या सगळ्यांनाच ज्ञात असते. फळ्यावर एक रेघ काढून, तिला न पुसता लहान कसे करता येईल हा प्रश्न दिला असता, त्याने तिच्याजवळच एक आणखी लांब रेषा काढून तो सोडविला होता. वेरूळ व अजिंठ्याच्या लेण्यामध्येही ह्याच धड्याचा कित्ता बौद्ध, हिंदू आणि जैन संस्कृतींनी निरनिराळ्या काळात, निरनिराळ्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली गिरवलेला दिसून येतो. मुसलमानी आक्रमकांचा अपवाद सोडला तर एतद्देशीय सर्वच राज्यकर्त्यांनी सृजनशीलतेचे नवे धडे घालून देत जुनी सभ्यता प्राथमिक असल्याचे लेण्यांमध्ये कोरून ठेवले आहे.

वरून खाली आणि समोरून मागे कोरीव काम करत करत केवळ छिन्नी हातोडी च्या साहाय्याने कैलास लेणी साकारणे म्हणजे अतिशय अलौकिक काम आहे. दीडशे वर्षे, सहा पिढ्या, राष्ट्रकूट सम्राटांच्या सक्षम अधिपत्याखाली काहीतरी योजना आखून, मनात उतरवून घेऊन, दगडात साकार करणार्‍या विश्वकर्म्याच्या वारसांना मन:पूर्वक प्रणिपात. ते अभियंते, ते स्थपती, ते कारागीर, ते पाथरवट, ते शिल्पकार सगळ्या सगळ्यांनी आपल्या पुराणांतील, संस्कृतीतील, अनेकानेक प्रसंगांना अचूक आत्मसात करून, पत्थरी डोंगरात हुबेहुब साकारलेले आहे. आपण जीवनात एकदा तरी आपल्या संस्कृतीची ही खुली पुस्तके चर्मचक्षूंनी अनुभवावीत अशीच आहेत. आम्हाला ते साधले म्हणून आम्ही सुदैवी.

बौद्धांनी, हिंदूंनी, जैनांनी लेण्या खोदाव्यात आणि "बुतशिकन" म्हणजे मूर्तिभंजक मुसलमानी सम्राटांनी त्या तोडाव्यात असाच इतिहास आपल्याला ज्ञात आहे. मात्र चाँद मिनारासारखी इमारत व पाणचक्कीसारखी परियोजना (इथे गरीबांच्यासाठी धान्य दळण्याची मोफत सुविधा करण्यासाठी जलौघ वळवून आणला आहे) मुसलमानांच्याही सृजनशीलतेची साक्ष देतात.

अजिंठा: एक जागतिक वारसा स्थळ

Ajintha.jpg अजिंठा लेणी औरंगाबाद शहरापासून सुमारे १०७ किलोमीटर अंतरावर आहेत. औरंगाबाद लोहमार्ग-स्थानकानजीकच असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 'एलोरा' ह्या वातानुकूलन-विरहित पर्यटक-रहिवासापासून सकाळी साडेआठ वाजता निघाल्यास आपण अकराचे सुमारास तिथे पोहोचतो. तीन, साडेतीन वाजता परतीच्या मार्गावर आपण पुन्हा प्रवास सुरू करतो आणि औरंगाबादेस संध्याकाळी साडेपाच ते सहा दरम्यान परत येतो. औरंगाबाद ते औरंगाबाद एका दिवसाच्या ह्या २ X २ बैठकींच्या वातानुकूलन-विरहित बसने केलेल्या प्रवासासाठी दरमाणशी रु. ३००/- आकारण्यात येतात तर लेण्यांभोवतीच्या अभयारण्यात प्रवेश करतांना जी प्रदूषणविरहित बस वापरावी लागते तिच्या दुहेरी भाड्यापोटी दरमाणशी रू. ३०/- घेतात. अजिंठा लेणी सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत पर्यटकांसाठी खुली असतात. सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी लेणी बंद ठेवली जातात. लेण्या पाहण्यासाठी दर भारतीय पर्यटकास रु.१०/- तर परदेशी प्रवाश्यांना प्रत्येकी ५ अमेरिकन डॉलर्स अथवा रू.२५०/- प्रवेश शुल्क आकारले जाते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अथवा भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या कुठल्याही कार्यालयातून ह्या प्रवासाची नोंदणी करता येते.

औरंगाबादच्या ईशान्येस असलेल्या "दिल्ली दरवाज्यातून" बाहेर पडून आपण जळगावच्या दिशेने प्रवास करत असतो. बाहेर पडता पडता उजव्या बाजूला हर्सूल तलावाचे नेत्रसुखद दर्शन घडते. तर डाव्या बाजूला दूरदर्शनचा मनोरा दूरवर उभा दिसतो. अडीच तासांच्या ह्या प्रवासात सध्यातरी रस्त्याची अवस्था बर्‍यापैकी चांगली आहे. म्हणून १०९ किलोमीटरचा प्रवास अडीच तासात संपन्न होण्याची आशा सार्थ होऊ शकते. नुकताच पावसाळ्याचा समारोप होत असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेते आणि हिरव्या रंगांच्या अनंत छटांची वृक्षराजी मन प्रसन्न करत होती. ज्वारी-बाजरीची, तुरी प-हाटीची, ऊसाची शेती सर्वदूर पसरलेली दिसत होती. क्वचित कुठे केळीची बाग, तर एखादे सूर्यफुलांचे शेत. पिवळ्या फुलांची बाभळीगत काटेरी झाडे तर नजरसुखाची खाणच उलगडून ठेवीत होती. रस्ता औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील "गोळे"गावातून जात असल्याचे पाहून मला आमच्या आडनावबंधूंनी कुठे कुठे पताका लावली आहे ते कळून आले. आणि मला माझ्या आडनावाचा सार्थ अभिमान वाटू लागला.

अजिंठा लेण्यांभोवतीचा परिसर अभयारण्य म्हणून संरक्षित आहे. त्यामुळे इतक्या तर्‍हत-हेच्या वनस्पती आणि वृक्षराजींनी सर्व परिसर प्रसन्न वाटत होता. स्वच्छ ऊन आणि गार हवा. वाघोरा नदीच्या मुळाकडे पाहत उभे राहिलो तर, खो-‍यासभोवतीच्या उजव्या बाजूच्या डोंगरात लेण्या आहेत तर डाव्या बाजूला, जिथून जॉन स्मिथला लेण्या प्रथम दिसल्या तो "व्ह्यू पॉईंट" आहे. आपण नदीच्या लेण्यांच्याच बाजूने प्रवेश करतो. वाघोरा नदी आपल्याच दिशेने येतांना दिसते.

बौद्ध वास्तुशास्त्र, भितीचित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणा-‍या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेली चैत्य दालने किंवा प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्षू वापरत असलेले विहार किंवा आश्रम यांचा समावेश आहे.

अजिंठा ह्या शब्दाचा उगम 'अजाणता' सापडलेल्या लेण्या असा असावा, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकृत मार्गदर्शक सांगतात. त्याची मूळ कहाणी अशी, की १८१९ साली शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ ह्या इंग्रज लष्करी अधिका-‍यास अवचितपणे त्या दृष्टीस पडल्या. त्याला ज्या ठिकाणावरून त्या दिसल्या, त्या ठिकाणास हल्ली "दर्शनस्थळ" म्हणजेच "व्ह्यू पॉईंट" असे म्हणतात.
रमणीय सृष्टीसौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घळीमध्ये, खडकात कोरलेली अजिंठा लेणी वसलेली आहेत. लेण्या असलेल्या नालाकार घळीच्या दरीतून, नालाकार वाहत असणा-या वाघोरा नदीचा खळखळाट वर लेण्यांपर्यंत सारखा पोहोचत असतो. लेण्या, वाघोरा नदीच्या एकाच बाजूच्या डोंगरावर आहेत. तर दुस-‍या बाजूच्या डोंगराला वळसा घालून वाघोरा नदी वाहत असते. त्या डोंगराच्या शिखरावर "दर्शनस्थळ" आहे. तिथून सार्‍या लेण्या स्पष्टपणे पाहता येत असाव्यात.

औरंगाबाद महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातला आमचा प्रवेश मजेशीर झाला. आम्हाला दुपारी पैठणच्या सहलीला जायचे असल्याने केवळ सकाळचाच वेळ हाताशी होता. म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर आटपून, उद्यान उघडता उघडता ठीक ९ वाजता तिथे पोहोचलो. तिकिटे काढली. पण औरंगाबादेत एवढ्या सकाळी कुणी उद्यानात येईल, अशी कुणाचीही अपेक्षा नसावी. मत्स्यालय, छोटी रूळगाडी, वनखात्यातर्फे दाखवले जाणारे अभयारण्यावरील, वन्यजीवनावरील चित्रपट इत्यादी गोष्टी संध्याकाळी गर्दी झाल्यावरच सुरू होतात असे समजले. सर्पालय आणि प्राणिसंग्रहालय साफसफाईसाठी का होईना लवकर उघडत होते. तिथे निराळे तिकीट लागते. तेही काढले. आणि निर्मनुष्य फाटकातून सरळ आत शिरू लागलो. तर काय आश्चर्य, शेजारच्या झुडूपातून एक साडेतीन फूट उंचीचा, संपूर्ण वाढ झालेला माणूसच आमच्या समाचारासाठी पुढे आला.

"तिकीट?" त्याने विचारणा केली. आम्ही स्तिमित.
एव्हाना माझा कॅमेरा सज्ज झाला होताच. मी विचारले,
"तुम्हीच रखवालदार का?" तो म्हणाला "हो!",
"तुमचे नाव काय?" तो म्हणाला "संतोष श्रीवास्तव". इतर बंदिस्त प्राण्यांना पाहायला येणार्‍या स्वतंत्र माणसांवर देखरेख करायला आपली नेमणूक केल्याखातर श्रीवास्तवजींना संतोष होता.

मग श्रीवास्तवजींच्या संमतीने त्यांचे रूप कॅमे-‍यात बंदिस्त करून, औरंगाबाद महापालिकेच्या औचित्यपूर्ण नियुक्तीबद्दल मनोमन खूष होत, आम्ही इतर प्राण्यांकडे वळलो.

साळिंद्र, कोल्हे, लांडगे, बिबळ्या, पांढरा वाघ इत्यादिकांमध्ये शहामृगांनीही वर्णी लावून घेतलेली दिसून आली. अचानक पिळदार शिंगांच्या हरीणांनी लक्ष वेधून घेतले. चेह-‍याचा कोन उन्नत करत नेणारी पिळदार शिंगे मोठ्या ऐटीत मिरवत एक हरीण रवंथ करत बसून होते. एवढ्या दिमाखदार प्राण्यास, केवळ आपल्याला पाहता यावे म्हणून, बंदिवास व्हावा आणि निमिषार्धात मैदाने पार करण्याचे सामर्थ्य असणार्‍या पायांना निवांत बसून रवंथ करण्यापुरताच डौल उरावा ह्याचे मला वैषम्य वाटले.

मग सर्पालय नामक लांबच लांब गुहेत प्रवेश केला. ह्या गुहेचे प्रवेशद्वार मात्र फारच आकर्षक तयार केलेले आहे. आत असलेला अस्वच्छतेचा वास सापांचाच असल्याचा समज आम्ही करून घेतला. एका पिंज-‍यात अजगर ठेवलेले होते. त्याच पिंज-यात काही कोंबडीची पिलेही मुक्तपणे फिरत होती. अज्ञानातले सुख प्रच्छन्नपणे अनुभवत होती. अचानक एका अजगराने एक पिल्लू तोंडात पकडले. "ते पाहा", "ते पाहा" म्हणतोय तोवर ते पिल्लू आतही सरकले होते. कॅमेरा चित्रमालिका काढू लागला तेव्हा पोटात खोलवर सरकत असलेल्या पिल्लाचा फुगवटा आणि बाजूलाच बाहेर स्वतंत्रपणे फिरत असलेल्या दुस-‍या पिल्लाची चित्रफीत मला "जीवो जीवस्य जीवनम्"चा जागता पुरावाच वाटत होती.

अस्वलाच्या गुहेकडे फारच आक्षेपार्ह वास येत असल्याने आम्ही किनारा गाठून पुढे सरकलो. तिथेही "खास" बदके मजेत विहरतांना दिसली. "प्लवा" बदकही "अपनी मासूम जवानी की पनाहों में" वावरत असल्याचे आढळून आले. एका उंचच उंच शेडच्या तोंडाशी माहूत, दोन हत्तींना वटणीला आणून साखळदंडाने ठाणबद्ध करण्याच्या प्रयत्नात होता. अगदी 'भारत पारतंत्र्यात पडतोच कसा?’ ह्या चालीवर, ‘अचाट शक्तीचे ते अफाट प्राणी असल्या माहुताकरवी ठाणबद्ध होतातच कसे?’ ह्याचे मला आश्चर्य वाटले. वाईटही. मग पिंज-‍यात खुडबुडणारे पांढरे शुभ्र ससे दिसले. ते पाहून, आता प्राणिसंग्रहालय संपले असे लक्षात येऊन, हुश्श करत हिरवळीवर जरा टेकतो आहोत, तर आम्हाला पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालयाच्या पिंज-‍यांबाहेर स्वतंत्र जीवन सुखैनैव साजरे करत असलेल्या खारी दिसल्या.

श्यामलीने सांगितले होते की बसस्थानकाजवळ एक राजस्थानी "भोज" नावाची खाणावळ आहे. ती स्टेशनरोडवर, वरद गणेश मंदिराच्या चौकातच मिळाली. तिथली सगळी वेषभूषा, वाढपी, पंगती आणि खाद्यान्ने सगळेच अस्सल राजस्थानी थाटाचे. सुरूवातीस स्वागतपेय म्हणून जलजिरा. गरम, गरम फुलके. वर साजूक तुपाची धार. साखर घालून दही. कढी. कोथिंबिरीची छोटीशी तळलेली करंजी. एक लहानसा गरम गरम गाकर. वर तूप. पानाशेजारी (बहुधा ताडीचा) गूळ आणि साजूक तूप ठेवलेले. अनेक भाज्या व कोशिंबिरींच्या छोट्या छोट्या वाट्या. त्यामुळे वाया फारसे जात नाही. मात्र संपताक्षणीच वाढपाची उत्तम सोय. सरतेशेवटी भात वा खिचडी (खिचडा?). हे सगळे अमर्यादित. केवळ रू. ७५/- दर माणशी ह्या माफक दराने. मग स्वीट डिश म्हणून फ्रुट सॅलड, रसमलाई वा गुलाबजाम. त्यांचा आकार मात्र वेगळ्याने द्यावा लागतो. पण पदार्थ सगळेच रुचकर आणि स्वच्छ!

पैठण

Paithan.jpgआम्ही दुपारी अडीच वाजता पैठणला जाण्यासाठी निघालो. वातावरण ढगाळलेले होते. मात्र रस्ता चांगला होता. तुरी-प-‍हाटीची शेते आजूबाजूला दिसत होती. तासा-दीड तासातच आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नदीच्या सगळ्यात मोठ्या धरणाच्या भिंतीवर जाऊन पोहोचलो. धरणामागे पसरलेला विस्तीर्ण जलाशय. भारतातले सगळ्यात मोठे मातीचे धरण. जायकवाडी. आमच्या सुदैवाने नुकतीच उघडलेली धरणाची कवाडे. त्यातून रोंरावत, फेसाळत धरणापलीकडे कोसळणारे धुंआधार पाणी. सारे पाहून मन भरून आले. प्रसन्न झाले. महाराष्ट्रात तरी मी एवढे मोठे नदीचे पात्र पाहिलेले नव्हते. धरणाच्या खालच्या बाजूस थोड्याच अंतरावर एक जुना पुल आहे. त्याच्या एखादा इंचच खालून पाणी सुसाट वाहत होते. आजूबाजूच्या प्रदेशातून रिक्षा, टॅक्सी करून पाणलोट पाहायला आलेले खूप लोक त्या पुलावर गर्दी करून होते. धरणाची आणखी काही कवाडे उघडली असती तर त्या पुलावरून नि:संशय पाणी वाहिले असते. परतून घरी पोहोचल्यावर टी.व्ही.मध्ये आम्ही तेही दृष्य पाहिले आणि बातमी होती, "जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडले."

पुलावर उभे राहून जल्लौघाचा मनसोक्त अनुभव घेऊन, जलप्रपाताचा नाद अंतरात भरून घेतच मग आम्ही नाथमंदिराकडे वळलो. एकनाथांच्या भारुडांचे गारूड, त्यांच्या स्पृश्यास्पृश्यतेच्या पलीकडच्या धर्मभावना आणि वस्तुनिष्ठ शिकवणीची छाप पैठणच काय पण सा-याच महाराष्ट्रावर आजवर पडलेली आहे. भव्य, चौसोपी तटबंदीत, प्रासादिक नाथमंदिर विराजमान आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. उजव्या बाजूच्या तटास लागून असलेल्या ओवरीमध्ये प्रवचन चालू होते. पाठीमागच्या तटातून बाहेर पडल्यावर गोदावरीच्या घाटाचे चित्र समोर साकारते.

समारोप

अशाप्रकारे आमचा सर्व सहल कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाल्यावर वीस तारखेच्या तपोवनने आम्ही परतीच्या प्रवासास निघालो.

"I could see this girl once a day" ह्या शेक्स्पिअरच्या 'द टेम्पिस्ट' कादंबरीतल्या नायकाच्या भावनेप्रमाणे, मलाही वाटत होते की मनुष्याने आयुष्यात एकदा तरी पाहावेच अशा, अविस्मरणीय प्रेक्षणीय स्थळांची सहल मी आज संपन्न करीत होतो, आणि अशी स्थळे मला किमान वर्षातून एकदा पाहायला, अनुभवायला मिळोत ह्यासाठी मनोमन प्रार्थना करीत होतो. परतीचा प्रवास सुरू केलेला होताच. पण केवळ 'पुनरागमनाय'च.

-एन.व्ही.गोळे

विशेषांक लेखन: