अबोली

Submitted by पूनम on 16 October, 2007 - 07:22

०९.०७.२००७

ग्लानीत झोपलेल्या अबोलीकडे आशिष पहात होता.. काय अवस्था झाली होती तिची.. सलाईनचा स्टँड शेजारीच होता. नुकताच ऑक्सिजन मास्क काढला होता. नाकातून नळ्या फुफ्फुसात गेल्या होत्या.. त्याच्या दुसर्‍या टोकाला पिशव्या लटकत होत्या.. एक साध्या सर्दीचं निमित्त. नेहमीचीच सर्दी म्हणून केलेलं दुर्लक्ष आणि नंतर त्याचा डेव्हलप झालेला सायनस आणि ब्रॉन्कायटीस! त्याला बघवेना तिची अवस्था. का नाही बोलली ही काही? एरवी इतकी बोलायची, पण हा इतका त्रास होतोय याचं सूतोवाचही केलं नाही तिने! किंवा कदाचित हे इतकं गंभीर असेल असंही वाटलं नसेल तिला.. सर्दीनं डोकं दुखत असेल आणि सर्दीचाच खोकला असेल असं म्हणत अंगावर काढलं सगळं. पण परवा टेंपरेचर १०४ डीग्रीपर्यंत एकदम शूट झालं आणि खोकला थांबेचना, तेव्हा डॉक्टरना दाखवलं आणि त्यांनी लगेच इथं ऍडमिटच करून घेतलं. प्रचंड कफ साठला होता दोन्ही फुफ्फुसांत आणि डोक्यातही. सतत खोकत होती.. नंतर तर श्वासही घेता येत नव्हता.. तडफडत होती बिचारी.. ताबडतोब उपचार सुरू झाले. कफाचं प्रमाण कमी करणं अत्यावश्यक होतं. म्हणूनच त्या नळ्या-बिळ्या. आता ताप कमी होता, कफ बराच काढून टाकला होता आणि सतत सीडेटीव्हज् वर ठेवलं होतं तिला. दोन दिवसांत डॉक्टरांनी अगणित टेस्टस् केल्या होत्या.. कशाच्या? का? काहीही सांगितलंच नव्हतं त्यांनी! आज त्यांनी भेटायला बोलावलं होतं.

तो डॉ. पाठकांच्या केबिनमध्ये शिरला. डॉक्टरांनी त्याला बसण्याचा निर्देश केला.

"आता बर्‍याच स्टेबल आहेत मिसेस सोहोनी. आपल्याला कल्पना येत नाही पण सायनस हा कधी कधी फार गंभीर रूप धारण करू शकतो. मेंदूवरही थेट परिणाम होऊ शकतो. पण सुदैवाने त्यांच्या मेंदूला काहीही झालेले नाही. त्यांचा सायनस काबूत आहे. आता, ब्रॉन्कायटीसबद्दल- यामध्ये काय होते, की फुफ्फुसात कफ साठतो, पूर्ण घसा ऍफेक्ट होतो आणि फुफ्फुसात कफ असल्यामुळे तापही बराच येतो. मला वाटते त्यांनी अंगावर बरेच दिवस हा त्रास काढला असावा. कारण कफ सगळीकडेच पसरला होता. आता आपण तो काढला आहे. पण.. "

डॉक्टर बोलता बोलता थांबले. त्यांचा आवाजच असा होता की अशिषचं मन आशंकीत झालं एकदम. पण काय? काय झालंय नक्की? तो नुसताच त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिला.. डॉक्टरच पुढे म्हणाले, "एक वाईट बातमी मला तुम्हाला सांगावी लागणार आहे. या आजारामुळे मिसेस सोहोनींचं स्वरयंत्र डॅमेज झालंय पूर्णपणे. आय ऍम सॉरी, पण त्यामुळे त्या आता बोलू शकणार नाहीत."

आशिषला जणू विजेचा झटका बसला! हे असलं काही ऐकायची त्याची मुळीच तयारी नव्हती.

"काय?"

"हो, हे सांगायला मला फार वाईट वाटतंय, पण हे खरं आहे. मी कन्फर्म करून मगच सांगतोय. व्होकल कॉर्ड्स खूप नाजूक असतात आपल्या. तुमच्या मिसेसचा ब्रॉन्कायटीस फ़ार गंभीर होता. कफामुळे स्वरयंत्रावर ताण आला आणि त्यामुळे कॉर्ड्स श्रिन्क झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये काही ताकद राहिली नाहीये."

"म्हणजे तुम्ही म्हणताय की अबोली आता कधीच नाही बोलू शकणार? कधीच नाही? असं कसं शक्य आहे डॉक्टर? साध्या सर्दी-तापानं असं कसं होईल? तुम्ही पुन्हा टेस्ट करता का? मी दुसर्‍या कोणत्या डॉक्टरला दाखवू का? काहीतरी चुकलं असेल तुमचं. असं बोलणारं माणूस एकाएकी गप्प कसं होईल?" आशिषला हे डॉक्टरांचं डायग्नोसिस सहन होईना. तो जवळजवळ ओरडायला लागला.

"मिस्टर सोहोनी तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरूर सेकंड ओपिनियन घ्या. पण माझं निदान चुकणार नाही, आणि चुकलं तर मला आनंदच होईल. मला कल्पना आहे हे खूप अवघड आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही स्वत:ला सावरा आणि मिसेस सोहोनींनाही. थोड्या दिवसांनी बाकी त्या अगदी नॉर्मल होतील."

हं! नॉर्मल! आवाजाशिवाय अबोली! आणि नॉर्मल? माणूस नुसतं हिंडतं फिरतं असलं की नॉर्मल असतं का सगळं? देवा! हे असं कसं झालं अचानक? आणि का झालं हे असं? कोणती शिक्षा आहे ही? का? हे कसं सांगू मी तिला? आणि सगळ्यांनाच? आई-बाबा, सायली, शेजारपाजारचे, असंख्य मित्रमंडळी, अबोलीच्या शाळेत, तिच्या चिमुकल्या मुलांना? कसं सांगायचं की आता तुमची अबोली खरंच अबोल झालीये! आशिषला काहीच समजेनासं झालं.

सीमाताईंच्या तर डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. या सगळ्याचा दोष त्या स्वत:लाच देत होत्या. ’मी सतत म्हणायचे की अबोली, किती बोलतेस, जरा गप्प हो बरं दोन तास’ म्हणूनच झालं असं. माझीच काळी जीभ भोवली! कशी माझी उत्साहानं सळसळणारी पोर.. देवाला बघवलं नाही. दृष्टावली बिचारी. असं कसं झालं रे देवा? किती लाघवी बोलणारी, सगळ्यांना चटकन आपलसं करणारी.. नेमकं तिलाच असं का व्हावं? मी तर कौतुकानं म्हणायचे, ’एखाद्या मुक्या माणसालाही बोलतं करील आमची अबोली’ आणि आता तीच अबोल झाली? दिवसभर नुसती चिवचिव करायची.. प्रत्येक गोष्टीत उत्सुकता, आणि प्रश्न! तिने काही नवीन केलं की तेही लग्गेच सगळ्यांना सांगायची घाई. किती चिंता वाटायची की या माझ्या भाबड्या मुलीला सासर कसं मिळेल? पण आशिषतर हिच्या गोड बोलण्यावरच भाळला! आणि विद्यानिकेतनमधली चिमुकली- त्यांची तर ही आवडती अबोलीटीचर.’ त्यांना पुन्हा कढ आले. आठवतील त्या सर्व देवांना नवस केले त्यांनी. जप करता करता त्यांचा बसल्या बसल्याच डोळा लागला.

अबोलीला जराशी जाग आली. किती वाजले होते कोणास ठाऊक, पण सगळीकडे पूर्ण शांतता होती, त्या अर्थी रात्र असणार. तिचं अंग दुखत होतं आणि घसा सुकला होता.. पाणी हवं होतं.. ती नर्सला, आईला हाक मारायला लागली, पण घशातून फक्त कण्हण्याचा आवाज आला.. त्या आवाजानेही सीमाताईंना जाग आली.. त्या झटकन अबोलीच्या उशाशी आल्या.

"काय गं, काही होतंय का?"

अबोलीनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला.. "पाणी," पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना.. तिनं हातानं खूण केली. तिची खूण पाहून सीमाताईंना अकस्मात रडू फुटलं. झटकन त्या पाणी आणायला पाठमोर्‍या झाल्या. त्यांच्या या अनपेक्षित रडण्यानं अबोली एकदम सावध झाली. तिनं यावेळी जाणीवपूर्वक, मुद्दाम बोलायचा प्रयत्न केला. पण नाही. शब्द आले नाहीत, विचित्र आवाज आला फक्त. आता मात्र अबोली सलाईनच्या नळीची पर्वा न करता तटकन उठून बसली. तिने ’आई’ असं जोरात म्हणलं, तिचे ओठ उघडले, घसा दुखला.. पण हाक मनातच राहिली, बाहेर काहीच उमटलं नाही.. सीमाताईंना तिचे हुंकार ऐकू आले. त्या भरभर तिच्याजवळ गेल्या. एव्हाना अबोली घाबरी झाली होती. कण्हत, हातवारे करून, डोळ्यांमधून आईला विचारत होती.. ’आई, माझा आवाज बाहेर पडत नाहीये.. काय झालंय मला? मला बोलता का येत नाहीये आई.. मला जे वाटतंय तसंच झालंय का? माझा आवाज गेलाय का?? .. काहीतरी कर आई, नुसती रडू नकोस.. आशिष कुठाय? डॉक्टरांना बोलाव.. आई, माझा आवाज गेलाय गं!’ तिचा आक्रोश सीमाताई हताशपणे नुसत्या बघत रडत राहिल्या. कोणालाच काही सांगायची गरज लागली नाही. त्यांच्याकडे पाहूनच अबोलीला कळलं.

होय, ती मुकी झाली होती!

१८.०९.२००७

हॉस्पिटलमधून परत आलेली अबोली जवळजवळ डिप्रेशनमध्येच गेली होती. छताकडे बघत सतत विचार करायची.. ’माझा आवाज गेला, म्हणजे माझं ’व्यक्त होणंच’ संपलं! माझं माध्यम गेलं. काय आहे आयुष्यात आता बाकी? एक सर्दी काय अंगावर काढली थोडी आणि त्याची इतकी महाभयंकर शिक्षा? आई म्हणायची तशी दिवसाकाठी दोन-चार तास गप्प राहिले असते तर असं झालं नसतं का खरंच? मी जाणतेपणी तरी कोणाशी वाईट नाही वागले, कोणाला त्रास नाही दिला.. तरी हे मलाच का झालं? काय करू मी आता? पुस्तक वाचू, टीव्ही पाहू? त्यावर बोलावसं वाटणारच ना.. हेच तर केलं आजवर.. जे जे नवीन सापडलं ते ते वाटलं, चर्चा केली, मतं जाणून घेतली. आणि माझी मुलं? ती तर आता दुरावलीच. त्यांना काय नवीन टीचर मिळेल. पण मी काय करू? ही पोकळी तयार झालीये ती कशी भरू? माझा कसा वेळ घालवू? आशिषला काय वाटत असेल? त्याची 'बोलकी बाहुली' होते मी. आणि अशी 'मोडकी' झाले आता. जगतीये तरी कशाला मी?’ सारखा विचार करकरून अबोली शरीराबरोबर मनानेही दिवसेंदिवस खंगत चालली.

आशिषच्या आईनी अबोलीला हाक मारली,

"अबोली, ये गं. हे बघ सूप केलंय, खाऊन घे गरम-गरम. मीही बसते जेवायला पाठोपाठ."

पाय ओढत अबोली कशीबशी डायनींग टेबलपाशी येऊन बसली. आई काहीतरी बोलत होत्या, पण तिचं लक्ष नव्हतं, स्वत:च्याच तंद्रीत होती ती. त्याही तिच्या शेजारी त्यांचं पान घेऊन बसल्या.

"अगं घे ना सूप. खावंसं नाही वाटत? बरं, मग वरणभात खातेस?" त्या मायेने म्हणाल्या.

अबोलीने मानेनेच नकार दिला आणि सूप प्यायला लागली. एक चमचा सूप प्यायल्याबरोबर तिने कसंसं तोंड केलं. आई तिच्याकडेच पाहत होत्या. त्यांना वाटलं ती खायची टाळाटाळ करत्ये.

"हे बघ, अगं खाल्लं नाहीस तर शक्ती कशी येणार? पाहिलंस ना किती अशक्त झालीयेस ती. ही एवढी औषधं घेतेस, अंगात ताकद नको का? संपव बरं ते पटकन."

अबोलीने मुकाटपणे सूप संपवलं आणि तशीच बसून राहिली. आईंचंही जेवण झालं. इतक्यात त्यांचं लक्ष गेलं.. थोडं सूप होतं पातेल्यात.

"अगं हे थोडं सूप उरलंय.. संपवतेस?"

अबोलीने मानेने नकार दिला. आता काही हीला सक्ती नको करायला असं वाटून त्यांनी त्यांच्या वाटीत ते सूप घेतलं आणि चमच्याने खायला लागल्या. अबोली त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्यांचं लक्षच नव्हतं. खाल्ल्याबरोब्बर त्यांच्या लक्षात आलं.

"अगं!!! हे तर खारट झालंय.. मी धांदरटपणे दोनदा मीठ घातलं की काय! अगंबाई चांगलच खारट आहे गं. तसंच खाल्लस तू! काय गं बाई तरी! अगं बोलायचं नाही का?"

अनवधानाने त्या बोलून गेल्या आणि त्यांनी जीभ चावली. अबोलीही चांगलीच दुखावली गेली. डोळ्यात पाणी घेऊनच ती तिथून उठली. आईंना तर खूपच वाईट वाटलं आणि अपराधीही. चुकून का होईना, पोरीच्या वर्मावर बोट ठेवलं आपण.. त्यांना चुटपुट लागून राहिली.

२१.०९.२००७

आशिष, त्याचे आई-बाबा, अबोलीचे आई-बाबा आणि बहिण- सायली- सगळेच हॉलमध्ये सचिंत चेहर्‍यांनी बसले होते. आज तर आई-बाबांना बघून अबोली चिडलीच होती. ’मी बरी आहे, काही होत नाही मला, सारखी सारखी काय माझी चौकशी करता?’ अशा अर्थाच्या खुणा करून ती चक्क तिच्या खोलीत ताडताड निघून गेली होती. आशिष म्हणाला,

"काय करायचे समजत नाहीये. अबोलीला हा धक्का पचणार नाही याची कल्पना होती हो आपल्याला. खुद्द आपण तरी कुठे हे सहन करू शकलो आहोत? पण अबोलीची अवस्था आता चिंताजनक व्हायला लागली आहे. आपण होऊन नाहीच, पण कोणी काही विचारलं तरी ती लक्ष देईनाशी झालीये. दिवसभर नुसती पडून राहते रिकाम्या नजरेने. घरातल्या-घरातही हिंडत नाही. कितीतरी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी भेटायला येऊन जात आहेत. पण हिचं मनच रमत नाही कुठे."

सीमाताईंना राहवेना. "पण हे असं किती दिवस चालायचं? काहीही उपाय करू, पण पोर पुन्हा हसती व्हायला हवी हो. बघवत नाही तिची अवस्था. डॉक्टरांनाच पुन्हा विचारावं का? का कोणाचा तरी सल्ला घ्यावा?"

सल्ला म्हणल्याबरोबर आशिषला काहीतरी आठवलं. त्याने अबोलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुळेबाईंची मदत घ्यायचे ठरवले. त्या अनुभवानी मोठ्या होत्या. अबोलीही त्यांना खूप मानायची. कदाचित त्या तिला काही समजावू शकल्या असत्या.

२९.०९.२००७

मुळेबाई भेटायला येणार असं आशिषनी सांगितल्यामुळे अबोली जरा आवरून बसली होती. तोही आवर्जून घरी थांबला होता. मुळेबाई अबोलीच्या ’रोलमॉडेल’ होत्या. मुळेबाईंनाही हसरी, उत्साही अबोली आवडायची. त्या दिवशी त्या एकट्या आल्या नव्हत्या. बरोबर अजून एक प्रौढ बाई होत्या आणि एक आठ-नऊ वर्षांचा मुलगाही.

aboli_0.jpg

"अबोली, कशी आहेस?" अबोली फ़िकट हसली.

"मी ओळख करून देते.. या मिसेस नाडकर्णी आणि हा अद्वैत."

अबोलीने त्यांना नमस्कार केला आणि अद्वैतकडे पाहिलं. तोही तिच्याकडे उत्सुकतेने पाहत होता, पण बोलला काहीच नाही.

"अबोली, मिसेस नाडकर्णी आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यांचीही शाळा आहे ’अमृतानंद’ नावाची.. ऐकल्यासारखं वाटत आहे ना नाव? बरोबर, आपल्या शाळेत काही वर्षांपूर्वी आली होती यांच्या शाळेतली मुलं दोन-तीन तास व्हिजीटला. यांची शाळा ’कर्णबधीर’ मुलांची आहे. ही मुलं बाकी एकदम व्यवस्थित असतात, पण ऐकू येत नाही हा प्रमुख दोष असतो त्यांच्यात. हा अद्वैत पण तिथलाच आहे. याला ऐकायला येत नाही, आणि त्यामुळे बोलता येत नाही. अशीही काही मुलं आहेत यांच्या शाळेत ज्यांना ऐकू तर येतं, पण काही ना काही कारणांमुळे बोलता येत नाही. अशा मुलांना रोजच्या जीवनात स्वयंपूर्ण करणे हेच यांचं उद्दिष्ट आहे."

ऐकता ऐकता अबोलीच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. तिने अद्वैतकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले आणि मग नाडकर्णीबाईंकडे. त्यांना तिचे पालटलेले भाव कळलेच होते. त्या तिच्याकडे पाहून हसल्या आणि त्यांनी अद्वैतला हाताच्या खुणेतून आणि एक-एक शब्द मुद्दाम जोरात उच्चारून सांगितले.. "ही अबोलीताई आहे ना तिला बरं नाहीये. तिला ’तू कशी आहेस’ विचार."

अद्वैतने लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकलं, त्याला ते समजलंही. तो अबोलीजवळ आला. तिच्याकडे तर्जनी दाखवत त्याने खुणेने आणि तोंडातून थोडे आवाज काढत तिला विचारलं, ’तू कशी आहेस?’ आणि कपाळावर हात ठेवून पुढे म्हणला, ’तुला ताप आहे?’

अबोलीला भडभडून आलं. त्याचे हात पटकन हातात धरून तिनेही त्याला अंगठा आणि तर्जनी जुळवून खुणेनीच सांगितलं, ’ताप नाही, मी मस्त आहे!’

अद्वैत एकदम हसला. या ताईला त्याचं बोलणं कळत होतं आणि इतकंच नाही, तर तिला त्याच्यासारखं बोलताही येत होतं की!

त्यांच्यातल्या या छोट्याश्या देवाणघेवाणीने तिथला मूडच बदलला. मुळेबाई आणि नाडकर्णीबाईंना हेच अपेक्षित होतं, फक्त ते इतक्या लगेच होईल अशी कल्पना नव्हती त्यांना. पण अबोली होतीच तशी. लहान मुलांना चटकन प्रिय होणारी. त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू, तर आशिषच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. अबोलीला तर जणू दुसरा जन्मच मिळाला होता.

०७.०९.२००८

आशिष अबोलीला घ्यायला बसस्टॉपवर निघाला. हातातल्या घडाळाच्या तारखेकडे सहजच लक्ष गेलं त्याचं. अरे! आज सात सप्टेंबर! आज बरोब्बर एक वर्ष झालं. गेल्या वर्षी याच दिवशी अबोलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. झर्रकन त्याच्या डोळ्यापुढून मागचं वर्षं सरकलं.. अबोलीचा तो आजार, ती गलितगात्र अवस्था.. आणि तो दिवस- ज्या दिवशी अद्वैत घरी आला होता.. तो त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरला होता! अबोलीच्या जीवनाला त्यामुळे एक दिशा मिळाली होती.

त्यानंतर नाडकर्णीबाईंच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली अबोली जिद्दीने ’खुणेची भाषा’- साईन लँग्वेज - शिकली होती. आठवड्यातून दोन वेळा ’अमृतानंद’मध्ये लिप-रीडींग शिकवायला जायला लागली होती. त्या मुलांच्या आनंदासाठी अनेक उपक्रम सतत तिच्या डोक्यात चालू असायचे. तिची ऊर्जा मार्गी लागली, तीही तिच्या आवडीच्या क्षेत्रातच. आशिषलाही ती जमेल तसं सगळं सांगायची. शक्य तितकं खुणेनेच नाहीतर लिहून. हळूहळू आशिषलाही तिची भाषा समजायला लागली होती. जुने दिवस परत येणं तर शक्य नव्हतं, पण त्याची खंत त्यांना वाटत नव्हती. उलट आज त्या दोघांचं नातं जास्त समृद्ध होतं. आज तर अबोली पंधरा मुलांना घेऊन ट्रिपला गेली होती.

तो बसस्टॉपजवळ पोचला. लांबूनच त्याला दिसले.. दिवसभर धमाल करून मुलं परत आली होती आणि आपापल्या बसची वाट पहात होती. दमली असली तरी त्यांचा उत्साह काही कमी झाल्यासारखा वाटत नव्हता. त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. भरपूर हातवारे करत, जमेल तसं बोलत, थोडे आवाज काढत, हसत खिदळत सगळ्यांच्या ’गप्पा’ चालू होत्या. अबोली अर्थातच त्यांच्या गराड्यात होती. तीही त्यांच्यासारखीच मनापासून हसत होती. बाकी जगापासून दूर, सगळ्यांपासून अलिप्त असा एक मस्त ’संवाद’ चालू होता त्यांचा.

अतिशय अभिमानाने त्याने अबोलीकडे पाहिले. नकळतच त्याचे डोळे पाणावले.. नियतीने अबोलीचा आवाज काढून घेतला असला तरी ती तिला ’गप्प’ करू शकली नव्हती.

-Psg

विशेषांक लेखन: