हास्य(बोध)कथा १
________________
ससा आणि कासव
________________
कासवाने सशाला धावण्याच्या शर्यतीत हरवले. या अपमानाने ससोबा पांढर्याचे अगदी काळेनिळे झाले. ते काही नाही, या अपमानाचा बदला घ्यायचाच. ती डोंगरावर जायची शर्यत लांब पल्ल्याची म्हणून आपल्याला झोप लागली. सहा महिने उलटले. ससोबाने कासवाला जाहीर आव्हान दिले. यावेळी शर्यत लांब पल्ल्याची नव्हे तर शंभर मीटर होणार हे देखील त्याने जाहीर केले. कासवाला इच्छा नसतानाही शर्यतीला हो म्हणावेच लागले.
महिनाभराने शर्यत होणार. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स सगळीकडे हीच बातमी. काहींनी त्यावर कव्हरस्टोरी केली तर काहींनी खास बुलेटीन्स. पेज थ्री पासुन पेज ट्वेल्व्ह पर्यंत फक्त ससा आणि कासव. ही संधी सट्टेवाले कसे सोडतील. जोरदार बेटिंग चालू झाले. ससोबा हॉट फेवरीट! त्यांचा भाव कमी पण कासवाचा भाव एकास दहा.
आणि तो दिवस उजाडला. स्टेडीयम खचाखच भरलेले. दोघांचे पाठीराखे हातात बॅनर्स घेऊन जल्लोष करत होते. शर्यतीला झेंडा दाखवल्यावर स्टेडीयमवर शांतता पसरली. सगळेजण श्वास रोखून पाहू लागले. काही सेकंदात ससोबा फिनिश लाईन पलिकडे होते. कासव पार मागे पडले होते. कासव समर्थक पार निराश झाले आणि ससोबा समर्थकानी ससोबांची मिरवणूक काढली.
दोन दिवस उलटले आणि 'सबसे तेज' चॅनेलवर ब्रेकींग न्यूज झळकली.
"डोप टेस्ट पॉजिटीव्ह आल्याने ससोबांचे विजेतेपद काढून घेतले. कासव विजेता घोषित!"
________________
हास्य(बोध)कथा २
________________
टोपीविक्या आणि माकडं
________________
करीम ज्युनियर टोप्या विकून परतत होता. रस्त्यात त्याला ते झाड नेहमीच खुणावायचे. याच झाडावरच्या माकडानी काही पिढ्यांपूर्वी त्याच्या खापरपणजोबांच्या टोप्या पळवल्या होत्या आणि मोठ्या चातुर्याने त्यांनी त्या परतही मिळवल्या होत्या.
हल्ली त्या झाडावरची माकडं कमी झाली होती तरी या पिढीतील काही हुप्पे अजूनही त्यावर राहात होते. दाढी वाढलेले बेढब हुप्पे तसे थोडे उग्रच दिसत होते. करीम ज्युनियर त्यांच्या वाटेला कधीच जात नसे आणि ते झाड तो जाणीवपूर्वक टाळत असे.
आज मात्र तो पार थकला होता. दूरवर विश्रांती घेण्यासारख एकही झाड नव्हत. नाईलाजाने तो झाडाखाली बसला. टोप्यांची थैली त्याने अगदी छातीशी कवटाळून ठेवली. थोड्यावेळाने त्याला डुलकी लागली.
जागा होउन पाहतो तर काय त्याच्या टोप्या घालून हुप्पे झाडावर बसले होते. त्याला आता आपल्या पूर्वजाने लढवलेली शक्कल आठवली. त्याने आपली टोपी काढून जमिनीवर फेकली. हुप्पे मात्र टोपी घालुनच आनंदाने उड्या मारत होते. ही शक्कल काही कामी आली नाही. शेवटी त्याने हात जोडून हुप्प्याना टोप्या परत करण्याची विनंती केली. वरुन एक हुप्प्या ओरडला "वेडा आहेस का. अरे आमचा एक दूरचा नातलग दाढी वाढवून आणि टोपी घालून प्रसिद्ध गायक बनला. आम्हीही कधीचे दाढी वाढवून टोप्यांची वाट पाहात होतो!"
________________
हास्य(बोध)कथा ३
________________
सिंह आणि उंदीर
________________
सिंह महाराज आपल्या गुहेबाहेर ऊन खात बसले होते. तेवढ्यात एक उंदीर त्यांच्या अंगावर चढून खेळू लागला. महाराजांना राग आला. त्यांनी उंदराला पंज्यात पकडले. आता मात्र उंदीर घाबरला. गयावया करु लागला. 'महाराज मला सोडा, मी पुढेमागे आपल्या उपकारांची फेड करेन' असे म्हणू लागला. महाराज हसले. म्हणाले, 'मी या जंगलचा राजा. तू इटुकला पिटुकला. मला काय मदत करणार?' उंदीर आणखीच काकुळतीला आला. महाराजांना शेवटी दया आली आणि उंदराला अभय दिले.
वर्षा मागून वर्षे उलटली. राजेशाही जाऊन जंगलात लोकशाही आली. लोकशाही म्हणजे ओघाने निवडणूक आलीच. जोरदार निवडणूक झाली. महाराजांच्या पक्षानेही सगळ्या जागा लढवल्या. मात्र बहुमत कुणालाच मिळाले नाहि. सत्ता हातची जाणार की काय याचीच चिंता महाराजाना लागून राहिली. विरोधकांनीही जाळं जोरदार विणले होते.
एवढ्यात त्यांना फोन आला. "महाराज मी उंदीर बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही मला अभय दिले होते. आज त्या उपकारची फेड करायची वेळ आलेय. या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. जर योग्य मोबदला मिळाला तर मी बाकी अपक्षांचा पाठींबाही तुम्हाला मिळवून देतो."
अशा रीतीने महाराजांभोवती विरोधकांनी विणलेल्या जाळयातून महाराज सही सलामत बाहेर पडले.
________________
हास्य(बोध)कथा ४
________________
अप्रामाणिक लाकुडतोड्याची गोष्ट
________________
प्रामाणिक लाकुडतोड्याला जलदेवतेने सोने, चांदी आणि लोखंडाच्या तीन कुर्हाडी बक्षिस दिल्या. त्याने त्या जपून ठेवल्या आणि प्रामाणिकपणे जगत राहिला. त्याच्यापुढच्या पिढ्या मात्र नालायक निघाल्या. त्यांनी त्या सोन्याचांदीच्या कुर्हाडी विकून खाल्या.
लाकुड तोडून काही फार कमाई होत नव्हती. या अप्रामाणिक लाकुडतोड्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. त्याच विहीरीत ही लोखंडी कुर्हाड टाकून प्रामाणिकपणाचे नाटक करुन आपण्ही सोन्या चांदीच्या कुर्हाडी मिळवू शकतो.
त्याने त्या विहीरीत मुद्दाम कुर्हाड टाकली. जलदेवतेचा धावा सुरु केला.
थोड्या वेळाने मिष्किल हसत जलदेवता बाहेर आली. हातात तीन कुर्हाडी होत्या, एक लोखंडाची, दुसरी चांदीची, तिसरी सोन्याची. 'यातली तुझी कुर्हाड कुठली ती घे', देवता म्हणाली. आता नाटक करणे शक्य नव्हते. चरफडत लाकुडतोड्याने आपली लोखंडी कुर्हाड घेतली आणि देवता अंतर्धान पावली.
-Ajai