आमची(ही) पिकनिक

Submitted by कवठीचाफा on 10 October, 2007 - 01:48

"मी
आधीच सांगतो या जाड्याला मी माझ्या गाडीवर घेणार नाही! " ठाम स्वरात पक्या म्हणाला.
गेला अर्धा तास घरात हा धुमाकूळ चालू होता. चहाचे कपावर कप रिकामे होत होते पण नक्की कोण कुणाच्या गाडीवर जाणार याबद्दल अजूनही एकमत होत नव्हते. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हा कार्यक्रम ठरवला असे मला वाटायला लागले होते.
पक्या, संज्या, निल्या, महेश उर्फ़ पिंट्या, तेजु, पिनु, मी.. आम्ही सगळे कॉलेजातले परमवीर आणि वीरांगना आज बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर एकत्र भेटत होतो. सगळेच आता चाकरमानी झालो होतो त्यामुळे भेटी या फक्त ई-मेल वरुनच म्हणजे संज्याच्या भाषेत "ईऽऽऽमेलं!" वरुन व्हायच्या. अधेमधे कुणाचे फोन आले तरच.. ते ही ऑफिसचा फोन वापरुन फुकटात! म्हणून उद्याच्या या पिकनिकचा घाट घातला होता. हे वाक्य अर्थात पिनुचे, ती कुठलीही गोष्ट कधी ठरवत नाही, तर घाट घालते. श्रीखंड-पुरीचा घालावा तसा.

शनिवारच्या दुपारपासूनच एक-एक वीर यायला लागला होता. सर्वात पहिला दार ठोकणारा प्राणी नेहमीप्रमाणेच पिंट्या. याची खोड कधी जायची कुणास ठाउक! दारावर डोअरबेल नावाचा काही पदार्थ असतो हे तो पार विसरुन आदिमानवी स्टाईलने दाण दाण दार ठोकतो. आत आल्या आल्या पहिला प्रश्न "मला उशीर तर झाला नाहीये ना?" साला याला बनवताना कुठले द्रव्य कमी पडलेय देवाकडून कुणास ठाउक! पण वेळेपेक्षा आधी पोहोचून पुन्हा उशीर झाला नसल्याची खात्री करुन घेतोच. ऑफिसमधे शिपायाच्या आधी पोहोचणारा हा एकटाच प्राणी आहे. तिथेही तो शिपायाला तो आल्या आल्या विचारत असेल "मला उशीर तर नाही ना झाला?" एकदाचा हुश्यऽऽ करुन मोऽठा सुस्कारा टाकत स्वारी ए.सी. फुल्ल करुन सोफ्यावर पसरली.

याच्या चहाची सोय करेपर्यंत बाहेरुन गाडीखाली आल्यावर कुत्रं ओरडावं तसा आवाज आला- ही निशाणी संज्या आल्याची. आपल्या गाडीला तो इतके चित्र-विचित्र हॉर्न लावतो की पार पन्नास फुटावरुनही कळते तो आल्याचे. आता बेल जीव खाऊन केकाटणार, याची कल्पना आल्यामुळे मी आधीच दरवाज्याकडे धाव घेतली.. दारात ध्यान म्हणता येईल अशा अवतारात संज्या उभा. बेलच्या बटणाकडे जाणारा त्याचा हात धरतच मी त्याला घरात ओढला. आत आल्या आल्या पिंट्याच्या डोक्यात टप्पल मारुन त्याने त्याच्या शेजारी बसकण मारली आणि हाताने समोरच्या टीपॉयवर ताल धरला. किडकिडीत शरीरयष्टीचा हा इसम कायम चिवटे-बावटे शर्ट घालतो, इतके चिवटे-बावटे की मला संशय येतो की हा घाऊकीत लुंग्या घेउन त्यांचे शर्ट शिवत असावा, नाहीतर इतके विचित्र डिझाइन्स आजकाल मिळतात कुठे? म्युझिकचे फार वेड याला. पण धडधाकट संगीत नाही काहीतरी दुर्गम म्हणजे आपल्या भाषेत कानठळ्या बसवणारे आणि बेताल, म्हणूनच की काय याचा आवडता गायक हिमेश रेशमिया आहे!

"थांब! दरवाजा बंद करु नकोस.. पक्या माझ्या मागोमाग येतोय." आपले ठोक-काम थांबवत संज्या गरजला.
"अरे पण तुझ्या बरोबर आला का तो?" माझा भाबडा सवाल.
"तसे बरोबरच निघालो आम्ही पण तो सिगारेट घ्यायला थांबला होता, माझं तिथे काय काम? मी निघून आलो."

सहज स्वरात संज्याने उत्तर दिले. म्हणजे हा धुरंधर इतक्या लांब पुण्यावरुन महाडपर्यंत त्याच्या सोबत आला आणि दहा मिनिटांच्या अंतरावर हा त्याला मागे सोडून आला तर! हे असले प्रकार हाच करु जाणे. दहाची पंधरा मिनिटे गेली, अर्धा तास झाला पक्या उगवलाच नाही! पाऊण-एक तासाने हा आला. साहजिकच मी त्याला विचारले,
"काय रे? सिगारेट घ्यायला इतका वेळ?"
"छट! मी कधीच इथे आलोय. तुमचे कारस्थान शोधत होतो" माझ्या हातातला चहाचा कप पडता पडता वाचला.
"कारस्थान? कसले कारस्थान?" प्रयत्न केला. पण आवाजातला बावळटपणा काही लपला नाही.
आईचा भाऊ कोण? असे विचारायला आलेल्या शेंबड्या मुलाकडे आपण पहातो तसे माझ्याकडे पहात पक्या उत्तरला, "आयला, कारस्थान म्हणजे कार ठेवायचे स्थान म्हणजे पार्कींग लॉट!"
या वाक्यात कुठेतरी 'अबे तुच्छ बालक' असे ऐकल्याचा मला भास झाला. पक्याच्या या सवयीचा मला पार विसर पडला होता. शब्दांचे हे असे खेळ करण्यात याचा हात काय आणि तोंड काय कुणीच धरणार नाही. मी बाकीच्या मंडळींकडे एक चोरटी नजर टाकली. कुणालाच धक्का बसल्याचे जाणवले नाही. समोरच्या खुर्चीची मानगूट धरुन पक्याने ती उलटी केली. हा पठ्ठ्या कधीच आपल्यासारखा खुर्चीला पाठ लावून बसत नाही. खुर्चीची पाठ ही त्याच्या मते हनुवटी टेकण्यासाठी चांगली जागा आहे.

शेवटी नेहमी प्रमाणे संज्या आणि पक्या मिळून पिंट्याला पिळायला लागले. पिंट्या एक ट्युब लाईट आहे आणि ती देखील नादुरुस्त असे संज्याचे दुरुस्त (म्हणजे त्याच्या मते) मत आहे. आख्खा हॉल दणाणून टाकत दोघे बाहेर सगळ्या सोसायटीला घरात कुणी पाहुणे आल्याचे कळवत होते. तासभर जरी असा गेला असता तर सोसायटीतली सगळी मुले काकांना वेड लागल्याची अफवा पसरवत फिरली असती, पण तेवढ्यात दारावरची बेल थकल्यासारखी क्षीण आवाजात वाजली. मी दार उघडायच्या आतच पक्या म्हणाला "उघड उघड ते हत्तीचं पिल्लूच आलेय" त्याचे हे विधान निल्याला उद्देशून होते ते कळायला कुणी जाणकार नको होता. दरवाजा उघडल्यावर घामेजलेला खांदे पाडलेला निल्या आत आला. याचे नाव निलेश आहे पण वजनाने भरमसाठ वाढलेला संज्याच्या मते हा निलेश नाही तर कॅलरीजने भरलेला 'कलश' आहे म्हणून मग....!

तर हा निल्या, अवास्तव वजनामुळे हालचाली महा सावकाश, एक एक मूव्ह जणू जीवावर उदार झाल्यासारखी करतो. आजूबाजूला हा असला की सगळ्याच हालचाली मंद वाटतात. पक्या तर म्हणतो ह्याच्या बरोबर जाताना लिफ्टमधे जागा तर मिळतच नाही पण लिफ्ट एक मजला वर चढेपर्यंत आम्ही चार मजले पायी वर चढून जातो. पण एक आहे, कितीही बोला निल्या कधी भडकलेला मी पाहिलेला नाही. आता मोर्चा निल्याकडे वळला होता संध्याकाळ होत चालली होती, पिनु आणि तेजुचा पत्ता नव्हता. वास्तविक या दोघी जवळ नव्या मुंबईतल्या, पण अजून उगवल्या नव्हत्या.

"आता या दोघी आणखी कुठे सांडल्या?" संज्या बरळलाच.
"काय रे ? वाटेत कुठे ब्युटीपार्लर नाहीये ना?" ही मुक्ताफळे अर्थात पक्याची.
"का रे बाबा? तुला काय हेअरस्टाईल करायचेय का?" त्याच्या पसारा आवरायला लागलेल्या केशसंभाराकडे नजर टाकत संज्याचा प्रतिप्रश्न.
"नाही रे! चुकला फकीर मशीदीत, तशा चुकल्या पोरी ब्युटीपार्लरमधे...."

त्याचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच पिनु-तेजुची जोडी दरवाजातून प्रवेश करती झाली "यूऽऽऽऽ !" याच्या पुढे काही शब्द न सुचल्याने हातातली छत्री घेउन तेजु पक्याकडे धावली. " ईऽऽऽऽ पाल !" पक्याच्या मदतीला संज्या धावला. जितक्या वेगाने तेजु पक्याकडे धावली होती त्यापेक्षा दुप्पट वेगाने मागे पळाली आणि एव्हाना टेबलावर चढून बसलेल्या पिनुला विचारती झाली, "कुठाय? कुठाय?" सगळ्यांच्या हास्याच्या धबधब्यात तिचे शब्द कुठच्या कुठे वाहून गेले होते. हा सगळा इरसालपणा संज्याचा आहे हे लक्षात आल्यावर तिने " संज्या तू पक्का पक्का ऽऽ " बास यापुढे तिची गाडी जाणार नाही हे आम्हाला माहीत होते. तिचा हा मोठा प्रॉब्लेम आहे- वेळेवर अपशब्द सुचतच नाहीत!!

"किती उशीर? च्यायला, तुम्ही दोघी काय चालत आला काय? उशीर होईल हे तरी निदान कळवायचे तुमच्या कुंडलीत नाहीये का? आणि मोबाईल स्विचऑफ करुन का ठेवला?"

पिंट्याच्या या भडीमाराने नाही म्हटले तरी सगळेच जरा गडबडले पण त्याचा स्वभावच मुळात तसा आहे. स्वत:पेक्षा दुसर्‍याची काळजी त्याला जास्त. मागच्या महिन्यात एकदा गाडीवरुन जाताना पुढे चाललेल्या गाडीचे मागचे दार नीट लागलेले नाहीये हे सांगायला तो भन्नाट वेगात पुढे निघाला आणि त्याच गाडीवर आपटून चार टाके पाडून घेतले. नुकसान झालं ते वेगळंच.. पण ह्याला भेटायला गेलो तेव्हा मला सांगतो, "अरे काय डेंजर असतं माहीतेय असं दार उघड राहीलेलं! वाचला तो.."
"अरे पण नालायका त्याने तुझ्याकडून नुकसान भरपाई घेतली ना?" माझा व्यावहारिक प्रश्न.
"आयला! आता त्याच्या गाडीची काच फ़ुटली तर तो घेणारच ना भरपाई" पिंट्या महाराजांनी समजूत घातली. असो, पण माणूस एकदम शांत आणि त्याला असा धाड धाड मारा करताना ऐकून सगळे सुन्न.
" आम्ही दोघी कधीच्या आलोय पण तेजु म्हणाली आपण करमरकरांकडे वडा खाऊयात म्हणून वेळ लागला." पिनुचे स्पष्टीकरण. आता काय डोंबल बोलणार?

आख्खी संध्याकाळ गप्पा टप्पा करत केंव्हा पसार झाली कळलेच नाही. स्वयंपाक करण्याचा प्रश्नच नव्हता. बाहेरुनच डीश ऑर्डर केल्या होत्या. खरा राडा सुरु होणार होता तो रात्री झोपायच्या वेळी. आणि तो झालाच. पिनु-तेजुने एक बेडरुम पटकावली होतीच त्यांचा प्रश्न नव्हता पण उरलेल्या दोन बेडरुममधे कोण-कोण झोपणार यावर जोरदार वाद चालू झाले. ते प्रत्येक सहलीच्या वेळी होतात कारण पक्याच्या शेजारी झोपायची कुणाचीच इच्छा नसते. हा प्राणी भयानक घोरतो, अगदी भयानक. बरं घोरणार्‍या माणसांची मला ऍलर्जी नाही कारण एका ठराविक वेळेनंतर आपल्या कानांना त्या आवाजाची सवय लागते.. ट्रेनमधे नाही का झोपत आपण इतका आवाज करत असते तरी? पण हे झालं एका लयीत घोरण्याबद्दल. पक्याचं घोरणं कुठल्याच लयीत बसत नाही. हा सतत ट्रॅक बदलून बदलून घोरत असतो. निल्याच्या शेजारी झोपण म्हणजे सकाळी उठू की नाही हे सांगता येत नाही हा घोरतबिरत नाही पण एखाद्याच वेळी हात असला जोऽऽरात अंगावर टाकतो की शेजार्‍याची अवस्था पार आळवाच्या फतफत्यासारखी व्हावी. आमचा नेमका प्रयत्न असतो तो पक्या आणि निल्याला एका रुम मधे टाकायचा पण तो कधी यशस्वी झालेला नाही. या सगळ्या गडबडीत पिंट्याने सोफ्यावर पसरुन टाकले होते म्हणजे ती शेवटची जागाही हातची गेली. शेवटी निल्या आणि पक्याला दोन बेडरुम आख्ख्या देऊन मला आरामखुर्चीत झोप घ्यायला लागली. संज्या गॅलरीतल्या झोपाळ्यावर लहान मुलासारखा झुलत झोपी गेला.. तसा त्याच्या आकारामुळे तो कुठेही मावतो.

सकाळी लवकर उठणार्‍यात माझा नंबर कधीच नसतो. हे लवकर उठणं मला जमणारा प्रकार नाही. मधेच केव्हातरी पिंट्या उठला. त्याच्या जागेवर मी झक्क ताणून दिली होती. भूकंपाचा धक्का बसल्याने खाड्कन जाग आली, तर पक्या मला धरुन गदागदा हलवत होता. डोळे उघडताच मलाच एकट्याला उशीर झालेला नाहीये याची पहिल्यांदा खात्री करुन घेतली. बाहेर झोपाळ्यावर एक मुटकुळं पडलेल दिसत होत म्हणजे संज्या अजून उठला नव्हता. उठून बसत परिस्थितीचा अंदाज घेतला. पक्या मला उठवण्याचं सत्कार्य केल्याच्या आनंदात त्याची दिवसातली पहिली सिगारेट पेटवत होता, तेजु त्याच्याकडे मांजराने उंदराकडे बघावं तशी टवकारुन बघत होती ."आता पक्याला लेक्चर बसणार!" मनात एक खुशनुमा विचार आला पण तेवढ्यात पिनु चहाचे कप घेऊन आली आणि मला आवरायला पळावं लागलं. नाहीतर उशीरा उठल्याबद्दल मला लेक्चर बसले असते. मी आवरुन बाहेर आलो तर संज्या उठून तयार झाला होता. मी बावळटासारखा त्याला विचारतोय "संज्या आंघोळ नाही करायची?" "धबधब्यावर जाऊन काय पूजा घालायचेय?" इति संज्या. इतक्यात पक्याचा आवाज घुमला "मला आता ड्यु टी आहे दुसर्‍यांदा" माझी ट्युब जरा उशीराच पेटली. पण पिनुने त्याला पुन्हा चहा आणून दिला.

शेवटी सगळे एकदाचे तयार झाले निघायची वेळ झाली आणि पुन्हा एकदा निल्याचा प्रश्न उभा राहिला. त्याच्या आकाराइतक्याच मोठ्या प्रमाणावर, याला गाडीवर कोण घेणार? "मी याला गाडीवर घेणार नाही पुन्हा एकदा सांगतो" पक्याने पुनरुक्ती केली. पक्या आणि संज्या दोघेही निल्याला गाडीवर नेणार नाहीत हे पक्के होते कारण त्याच्या शांत हालचालींमुळे दोघांनाही रस्त्याने जाताना मस्ती करत जाता यायचे नाही. शेवटी एकदाचा निल्याला माझ्या गाडीवर घेऊन मी तो वाद मिटवून टाकला आणि एकदाची आमच्या चार गाड्यांची पलटण रस्त्याला लागली.

गाड्या भन्नाट पळायला लागल्या. एव्हाना पावसाने भुरभुर चालू केली होती. सर्वात पुढे पळणारा संज्या आता पुन्हा मागे आला होता.
"ए गाढवा माझ्या मधे येऊ नको ना!" बहुधा कसाबसा सिगारेट पेटवून द्यायला तयार केलेल्या पिंट्याने पक्याची सिगारेट पाडली होती.
"मूर्खा माझी सिगारेट पाडली ना या पिंट्याने" माझा अंदाज खरा ठरला.
"अरे पण गेली तर गेली एक सिगारेट त्यामुळे संज्यावर कसला भडकतोयस?" मनातला प्रश्न सरळ ओठांवर आला.
"अरे यार पण या पिंट्याने ती माझ्या मागच्या खिशात पाडली ना!" पक्याच्या रागाचे खरे कारण कळले.
"आयला पण पाऊस तर पडतोय ना मग लगेच विझली असेल ना ती?" संज्या 'जले पे नमक' असला प्रकार करत होता.
" अबे, ज्याची जळते त्यालाच कळते" रोकठोक बोलताना पक्याचा आवाज शिगेला पोचतो.

साहजिकच पिनुने गाडी जवळ आणत चौकशी सुरु केली, आणि तिला पत्ता लागू नये म्हणुन गाड्या आणखी वेगात पुढे सरकल्या. भांडत-तंटत एकदाचे आम्ही उंबरठ मागे टाकले आणि धबधब्यापाशी पोहोचलो. आता इथून पुढच्या जवळजवळ प्रत्येकाच्या हालचाली मला आधीच माहीत होत्या. त्या तंतोतंत समोर प्रत्यक्षात उतरत होत्या. पक्याची धबधबापूर्व सिगारेट पेटली होती आणि तेजुला येताना बघून पक्याने रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला धूम ठोकली. त्याचा नाद सोडून तेजुने पाण्यात हात घातला आणि ते गाऽऽर असल्याची अभिनव माहिती पुरवली. संज्याने आगापिछा न पहाता सरळ धबधब्याकडे धाव घेतली. परिणाम इतकाच झाला की निसरड्या दगडावरुन पाय घसरुन तो धबधब्यात शिरायच्या आधीच चिंब भिजला. पिनु कॅमेरा सरसावून फोटो काढायच्या मूडमधे आली पण पाण्याचे उडणारे तुषार फोटो काढून घ्यायच्या मूड मधे नव्हते. नाईलाजाने कॅमेरा पुन्हा डिकीत गेला. निल्या आजूबाजूला शोधाशोध करत होता. त्याला जवळपास कुठे चहाची टपरी दिसते का याचा शोध लागायचा होता. तशी तिथे समोरच एक टपरी होती, पण बंद. मग मात्र स्वारी तोल सांभाळत वर धबधब्याकडे निघाली. पिंट्या विचारपूर्वक नजरेने धबधब्याकडे पहात होता. त्याला हटकल्यावर त्याने आणखी एक नवीन शंका मांडली, "वरुन एखादा दगड पडला तर कसला जोरात लागेल ना?" च्यायला, मी सुन्न! धबधब्याकडे सरकणारा निल्या पुन्हा 'बॅक टू पॅव्हीलियन'. मग एकदाची त्याची समजूत काढली, की बाबा इथे तसला काही धोका नाहीये म्हणून तर आपण हा स्पॉट निवडला! एकदाची त्याची समजूत पटली आणि ती जोडगोळी एकमेकांना सावरत रवाना झाली. मला तर कधी एकदा त्या जोरदार पडणार्‍या झोताखाली जातोय असे झाले होते. पडत धडपडत सगळे वर धबधब्याजवळ पोहोचलो.

संज्या एव्हाना पाण्यात बागडायला लागला होताच पण गुढघाभर पाण्यात. कारण? पोहता येत नाही! सगळे पाण्यात उतरेपर्यंत ह्याची भीड बर्‍यापैकी चेपली होती. आता पिनु आणि तेजुने पाण्यात प्रवेश केला. दरबारात करतात तसा. बिचकत, बाचकत पण लवकरच त्या ही दंगामस्तीत सामिल झाल्या. निल्या पाण्यात पोहण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही तो आपला घोटाभर पाण्यात उभा राहून धबधब्याचे पाणी अंगावर घेण्यात समाधान मानतो. पक्या आत्ता कुठे उगवला आणि येताक्षणीच धप्पऽऽदिशी पाण्यात उडी मारली आणि दुर्देव! पाणी नेमके तिथेच खोल नव्हते, गडी जोऽऽरात आपटला. ह्यावर खुष होऊन संज्याने पाण्यातच हसून लोळण घ्यायचा प्रयत्न केला, आणि जमिनीवर कसेबसे टेकवलेल्या पायांनी जमिनीशी नाते तोडले! पाण्याच्या जोरदार फोर्समुळे तो सरळ वहात निघाला आणि पुढेच उभ्या राहिलेल्या निल्यावर टॉर्पेडो सारखा आदळला! व्हायचे तेच झाले. संज्याच्या अंगावर निल्याची रास कोसळली- म्हणजे मारुती एट-हंड्रेडवर ट्रक कोसळण्यासारखाच प्रकार होता, साहजिकच संज्या पाण्याखाली बराच वेळ अडकला. कुणास ठाऊक किती पाणी प्यायला ते! आता निल्याची धडगत नव्हती, पण एकंदर प्रकारात घुसमटल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा संज्या शांतच राहीला.

तिकडे पिनु, तेजु एकमेकींवर पाणी उडवण्यात गर्क, पिंट्या अर्धा पाण्यात आणि अर्धा पाण्याबाहेर असा आडवा पडला होता. पक्या बहाद्दराने धबधब्याच्या आतल्या बाजूला जायची वाट शोधली होती आणि संज्यासह त्याचे गिर्यारोहण चालू झाले होते. संज्या आपल्या आकार आणि वजनाचा फ़ायदा घेत सहजासहजी त्या निसरड्या रस्त्याने वरच्या खबदाडीत पोहोचला पण आता पक्याचे हाल सुरु झाले, अर्धवट वरती चढल्यावर त्याला वर जायची हिंमत होईना पण म्हणून खाली उतरावे, तर ते त्याही पेक्षा कठीण काम होऊन बसलेले! आता मात्र पक्याचे अवसान गळाले त्याने संज्याला हाक मारली. पण तो कशाला येतो? आधीच निल्या अंगावर पडल्यामुळे त्याला आपल्या वस्तुमानाचे वास्तविक अनुमान आले होते त्यात पक्या आडदांड- पडला असता तर संज्यासहित हे सगळ्यांनाच माहित होते. तो वरुनच सूचना करत होता "डावा हात त्या दगडाला धर, हां अस्साऽऽ आता उजवा पाय त्या कपारीवर ठेव" या टायपातल्या! या सगळ्या प्रकारात पक्याची आगेकूच तर झाली नाहीच पण अख्खे शरीर दगडाला चिकटवलेली घोरपड मात्र झाली. शेवटी सदा मदतीस तत्पर पिंट्या महाराज गरज नसतानाही मदतीला धावले आणि दोन्ही हात दगडांना गच्च पकडून बसलेल्या पक्याला आपल्या अंगाखांद्यांचा आधार देत एकदाचे पाय उतार केले.

या नव्या अनुभवाने भारलेला पक्या दूर जाऊन सिगारेट पेटवायच्या तयारीत होता. निल्याने समोरची टपरी उघडल्याचे आपले ताजे निरीक्षण सांगितल्यावर सगळेच तिकडे धावलो. त्या अमृततुल्य कशायपेयाची लज्जत चाखायला! तेवढ्यात पिनुने तिथेही चिंचेचे झाड शोधून काढले आता सगळ्यांना हात दुखेस्तोवर दगड मारुन चिंचा पाडण्याखेरीज गत्यंतर नव्हते. पोरींना चिंचा इतक्या का आवडतात हा एक संशोधनाचा विषय आहे. एकदाच्या आठ-दहा चिंचा दिड-दोनशे दगडांच्या बदल्यात मिळवून दोघींना दिल्यावर त्यांचे समाधान झाले आणि आम्ही मंडळी पुन्हा धबधब्यात शिरलो.

या सगळ्या मस्तीत दुपार झालेली अजिबात कळली नाही. चहा घेतल्यावर ताज्या दमाने आम्ही परत पाण्यात उतरलो होतो ना! हळूहळू तिथे आणखी काही जणांचे आगमन झाले, बहुतेक कॉलेजचा एखाद ग्रुप असावा. जोपर्यंत ती मंडळी त्यांच्या मूडमधे होती तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण शेवटी त्या पोरांचा मोर्चा पिनु आणि तेजुकडे वळला. त्यांच्याकडे पाहून अचकट विचकट कॉमेंट्स यायला लागले. कदाचित हे प्रकरण थोड्याफार सामंजस्याने मिटलेही असते पण.... संज्या, पक्या गरम खोपडीचे! आणि मुख्य म्हणजे यांच्या तोंडाने एकदा का मर्यादा तोडल्या की भांडण, मारामारी पर्यंत नकळतच पोचतं. नेमकं तेच व्हायचं बाकी होतं. तेवढ्यात कुठेतरी हरवलेला निल्या तिथे पोहोचला.

बस! बाजू इतकी मजबूत झाल्यावर संज्या कुणाला ऐकणार? एव्हाना पिंट्यासकट आम्ही पाचही जण युद्धाच्या तयारीत, ते 'वेडात दौडले वीर' असले काहीतरी झाले असते नक्कीच आमचे, पण तिथे गावकरी मंडळी आल्याने तात्पुरता युद्धविराम झाला. त्याचाच फायदा घेत पिनु आणि तेजुने आम्हाला पाण्याबाहेर काढले आणि घरी निघायला भाग पाडले. एक तो जोश असतो ना! त्यात माणूस काहीही करायला निघतो! खाली उतरता उतरता एक एक वास्तव जाणवायला लागले, ते बारा आणि आम्ही पाच.. त्यात निल्याचा उपयोग दाखवण्या पुरता. प्रत्यक्षात हा जागचा हलला असता की नाही कुणास ठाऊक! संज्या रगेल पण फासळ्या मोजून घ्याव्यात असा. राहिलो मी आणि पक्या. किती वेळ टिकलो असतो? कारण पिंट्या मुळातच सगळ्यात शेवटी पळायला सोप्या जागी उभा राहिल्याचे मी हेरले होतेच. ह्या सगळ्या नादात कधी खाली उतरुन गाडीजवळ आलो ते कळलेच नाही. आता वरुन धमक्या यायला लागल्या होत्याच 'जरा थांबा, बघतो' वगैरे. त्यांची विमाने बहुतेक विरळ वातावरणापर्यंत पोहोचली असावीत. दोघी मुलींकरता आता निघणे भाग होते पण आता निल्या कुठेतरी भरकटला होता. बहुतेक मारामारीच्या कल्पनेनीच गड्याला घाईची लागली असावी, शेवटी दहा पंधरा मिनिटांनी महाराज प्रकट झाले आणि आमच्या गाड्या परतीच्या रस्त्याला लागल्या.

उंबरठ मागे पडले कुणीच कुणाशी काही बोलेना! गाड्यांचे ऍक्सिलरेटर आणखी जोरात पिळले जायला लागले. आता यांच्या बरोबर रहायचे तर मलाही जोर करणे भाग होतेच पण मागे बसलेला निल्या वेगाच्या बाबतीतही भित्रा! अखेर त्याची पर्वा न करता एकदाची गाडी हाणली जोरात. पाठीमागून दोन्ही खांदे आवळले जायला लागले. दाब असह्य होऊन मी निल्यावर भडकलोच पण त्याने मुठीत धरलेल्या वस्तूकडे पहाताच माझ्या गाडीचे ब्रेक आपोआप लागले. मी थांबल्याचे लगेचच पुढच्यांना कळले कारण ब्रेकच असला खंग्री मारला ना! सगळ्या गाड्या वळून माझ्या जवळ! काय झालं ते बघायला, आणि निल्याच्या हातातल्या वस्तूकडे पाहून सगळ्यांचीच तोंडे वासली. त्याच्या हातात चक्क स्पार्क प्लग होते आणि ते ही सहा. अर्थ समजायला जेवढा वेळ गेला तोच, त्यानंतर निल्याच्या नावाचा जोरदार जल्लोष!! माझ्या डोळ्यासमोर बिना प्लगच्या गाड्या ढकलणार्‍या त्या मस्तवाल पोरांचे दृष्य साकार झाले आणि दयाही आली पण मांजराच्या गळ्यात घंटा बांघणार कोण? पक्या आणि संज्याने मला फाडून खाल्ला असता. पण म्हणतात ना स्त्रीचे मन कोमल वगैरे असते त्याचा प्रत्यय आला. तेजुने मधे पडून ते प्लग मागे गावात नेऊन द्यायला भाग पाडले. तिथपर्यंत चालायची शिक्षाही बस होती त्यांना. आणि आमच्या गाड्या पुन्हा एकदा घराकडे उधळल्या.

एक पिकनिक अशी जोरदार पार पडली आता पुढच्या पिकनीकची वाट बघणे चालू आहे. त्या टोळभैरवांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मध्ये-मध्ये फोनाफोनी चालू असताना हा विषय निघतोच आणि हास्याचे फवारे उडतात. यातून एक मात्र चांगली गोष्ट घडली. आता संज्या आणि पक्या निल्याला गाडीवर घेण्यासाठी कधीच नाही म्हणत नाहीत.

-Chaffa

विशेषांक लेखन: