अवगुंठन

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 October, 2007 - 01:30

avagunthan_1.jpg
उगाचच बिचारी वाटते माझी मी मलाच...
तुझ्याशिवाय....
सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं
सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं
कसा घेणार रे मी मोकळा श्वास...
कसली होतेय तडफड...
कळतंय का तुला काही

तुला कधी ते समजणारच नाही
तुला भेटायची ओढ
आणि तू जाताना दाटून आलेले कढ...
तुझी बेफिकीरी मात्र तश्शीच !

राग राग येतो अगदी...
चिडलेली छान दिसतेस म्हणे ... ...
बोलतानाही तेच
सगळं मीच डोळ्यातून वाचून काढायचं
माझेही शब्द माझेच आणि तुझेही
तू फक्त डोळ्यांनी बोलणार
बडबड फक्त माझीच ..

आता मी सुद्धा बोलणार नाहीये
ठरवलंच आहे मी तसं... ... ..

अरे पण हे काय..
तू रडतो आहेस....
मी बोलावं म्हणून..?
जे जे तू बोलावंस असं वाटायचं ते आता बोलतो आहेस... ...
उशीर केलास रे जानू.... ...

आणि फ़ोटोवर हा गुलाबाचा हार काय चढवला आहेस..
तुला माहितीये ना....
मला मोगरा आवडतो ते...

कधी सुधारणार आहेस रे राजा...

-जयावि

विशेषांक लेखन: