सुप्रसिद्ध अभिनेते श्री. ललित प्रभाकर ('जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील आदित्य देसाई) यांच्याशी गप्पा

Submitted by मीपुणेकर on 12 June, 2015 - 12:24

लॉस एंजिलीस येथे ३ ते ५ जुलै २०१५ दरम्यान होणार्‍या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या सतराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते व सध्या 'झी मराठी'वरच्या 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील 'आदित्य देसाई' म्हणून लोकप्रिय असलेले श्री. ललित प्रभाकर यांच्याशी नुकत्याच गप्पा झाल्या.

तुमचा आत्तापर्यंतचा अभिनयाचा प्रवास कसा झाला? तुमच्या घरी अभिनयाची काही पार्श्वभूमी होती का?

ललित - नाही, घरी तशी या क्षेत्राची काहीच पार्श्वभूमी नाही. माझी आई शिक्षिका व वडील आयटीआयमध्ये प्रोफेसर आहेत. पण मला लहानपणापासून कलाक्षेत्राशी संबंधित गोष्टींची आवड होती, म्हणजे कथाकथन, एकपात्री अभिनय. शिवाय वाचनाची आवडही होती. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा 'मितीचार', कल्याण या नाट्यसंस्थेशी माझा संबंध आला आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने माझा हा प्रवास सुरु झाला. आपल्याला नक्की काय काम करायचं आहे, कशाची आवड आहे, कोणती नाटकं आपण करू शकतो याची समज यायला लागली.

श्री. रवी लाखे हे आमचे सर, त्यांनी पाया पक्का करुन घेतला. आमची प्रक्रियेला महत्त्व देणारी संस्था आहे. फक्त अभिनयच नाही, तर तिथे नाटकात मी बॅकस्टेजपासून ते प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत, दिग्दर्शन या गोष्टीही केल्या. मला दिग्दर्शनासाठी, प्रकाशयोजनेसाठी राज्यस्तरीय पारितोषिक ही मिळालं. संस्थेत मला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, चांगल्या चांगल्या लेखकांच्या ओळखी झाल्या.

त्यानंतर मग टीव्हीवर एकदोन मालिकांमध्ये छोटीमोठी कामं केली. 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकेत एक नकारात्मक व्यक्तिरेखा होती, अगदीच रॉ म्हणता येईल अशी. जंगलात राहणारी, धोतर घालणारी, ज्याच्यावर कोणतेच संस्कार नाहीत अशी ही व्यक्ती होती. त्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्या भूमिकेनंतर लगेचच मला आदित्य देसाईची भूमिका मिळाली, जी या भूमिकेच्या अगदीच विरुद्ध होती.

एक अभिनेता म्हणून या दोन अगदी भिन्न पद्धतीच्या भूमिका मला करायला मिळाल्या आणि लोकांना त्या आवडल्या म्हणून बरं वाटलं, कारण आपल्याकडे पॉझिटिव्ह किंवा फक्त निगेटिव्ह भूमिकेचा एक शिक्का बसतो. पण पहिल्या नकारात्मक भूमिकेनंतर ऑडिशन वगैरे देऊन माझी निवड झाली.

तुम्हाला नाट्यशिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली होती ना?

ललित - हो, यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप, केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे जी दिली जाते, ती मला मिळाली होती. पूर्ण भारतातून तीस मुलांना निवडतात. त्यामध्ये लेखक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार असे सगळेच असतात. दोन वर्षांसाठी ती स्कॉलरशिप मला नाटक विभागासाठी मिळाली होती.

तुम्ही अभिनयाबरोबर दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीतसंयोजन यांसारख्या सर्व तांत्रिक बाबी आत्मसात केल्या, त्याचा सध्या अभिनेता म्हणून कसा उपयोग होतो? आणि या सगळ्यांत तुम्हांला जास्त काय आवडतं?

ललित - नक्कीच फायदा होतो, कारण कोणतीही कलाकृती म्हटली की त्यात या सगळ्या गोष्टी येतातच. अर्थात टीव्हीवरच्या मालिकेमध्ये आम्हांला नाटकाइतका वेळ नसतो. तरीही कलाकार म्हणून सजग राहावं लागतं. तुम्हांला तुमच्या जागा शोधाव्या लागतात. तुम्हांलाच इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं.

लाईट्स् कसे घ्यायचे, सावली कशी टाळायची, नेपथ्याचा, प्रॉपर्टीचा, संगीताचा वापर कसा करायचा या सगळ्यांमध्ये नाटकात या गोष्टी शिकल्याचा खूपच फायदा कुठेही होतो. तुम्ही जे करताय ते त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघता आलं पाहिजे. तर तुम्हांला कळेल की तुम्ही नक्की काय करत आहात. समोरच्या कालाकाराबरोबर तुम्ही कसा अभिनय करता हेही महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या समोर असलेला कलाकारही तितकाच महत्त्वाचा आहे. नाटक हे सगळ्या गोष्टी शिकवतं. मला नाटकाशी संबंधित सगळ्याच गोष्टी करायला खरंतर आवडतात. पण दिग्दर्शन सर्वांत जास्त आवडतं.

तुम्ही दिग्दर्शित व अभिनय केलेलं 'ईन्व्हिझिबल सिटी' हे नाटक या वर्षी मुंबईच्या काला घोडा महोत्सवात दाखवलं गेलं. कसा प्रतिसाद होता प्रेक्षकांचा?

ललित - प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. या नाटकात मी दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. दोन वर्षांपासून प्रयोग सुरू आहेत. बरीच पारितोषिकं मिळाली आहेत. 'थेस्पो', 'वसंत नाट्यमहोत्सव' आणि 'काला घोडा महोत्सव' या राष्ट्रीय स्तरावरच्या तीन नाट्यमहोत्सवांमध्ये आमचं हे नाटक सिलेक्ट झालं आहे. मालिकेमुळे मला मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा प्रायोगिक नाटकाला मिळायला हवा, असं मला मनापासून वाटतं.

तुमचा व्यावसायिक नाटकाकडे जाण्याचा विचार आहे का?

ललित - हो, नक्कीच आहे. किंबहुना मी आधीही एक व्यावसायिक नाटक केलं होतं - 'तक्षकयाग' नावाचं, अविनाश नारकरांचं. त्याचे फार प्रयोग झाले नसले तरी काम करायला खूप मजा आली.
आत्ताही माझं बोलणं सुरू आहे एका नवीन व्यावसायिक नाटकासंदर्भात, या आठवडाभरातच नक्की ठरेल. जुलैमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू होतील.

पण कमी बजेटमुळे प्रायोगिक नाटकाचे प्रयोग कमी होतात, त्याला प्रेक्षकही त्या मानाने कमी असतात. त्यामुळे मला प्रायोगिक नाटकही करत राहायचं आहे, जेणेकरुन माझा त्या नाटकाला फायदा होत राहील.

तुमचे सर्वांत आवडते नाट्यअभिनेते कोण? कोणाबरोबर काम करायला आवडेल?

ललित - माझा आवडता ग्रूप नसिरुद्दीन शहा यांचा 'मॉटली' हा आहे. ते नाटक नाही, खरंतर बरेचदा कथा सादर करतात. त्यांची सादरीकरणाची पद्धत खूप आवडते. त्यात नेपथ्य, लाईट्स् इत्यादी खूप कमी असतात किंवा फक्त पूरक असतात. सगळ्यांत जास्त भर त्यांचा अभिनेत्यावर आणि दिग्दर्शनावर असतो. आपल्याकडे बरेचदा एकांकिका, नाटकं यात गिमिक्स खूप केली जातात. त्यामुळे दिग्दर्शकाचं, अभिनेत्याचं काम सोप्प होऊन जातं थोडसं. पण हे न करता ते ज्या पद्धतीने सादरीकरण करतात, ते मला खूप आवडतं. त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच खूप आवडेल.

मला निळू फुले यांची नाटकं बघायला मिळाली नाहीत. ती बघायला मिळाली असती तर मला फार आनंद झाला असता.

तुम्हांला तुमची कोणती भूमिका जास्त आवडती आहे?

ललित - 'ईन्व्हिझिबल सिटी' हे पूर्ण नाटकच मी खूप एन्जॉय करतो. तसंच अजून एक नाटक आहे 'पगला घोडा' ज्यात मी ५५ वर्षं वयाच्या माणसाची भूमिका करायचो. ती भूमिका करायला मला आवडायचे.

तुमचा रंगभूमी ते टीव्ही हा प्रवास कसा झाला?

ललित - हे खरंतर तसं अचानक झालं. ठरवून काही झालं नाही. पण रंगभूमीवरून टीव्ही माध्यमात जाताना सुरुवातीला मला जरा, तांत्रिक बाबतींत नाही, पण मानसिक त्रास झाला. मी करतोय ते नक्की बरोबर करतोय ना, या विचाराने मी थोडा काँन्शस असायचो. पण प्रयत्न करत राहिलो. नाटक सोडायचं नाही हे स्वतःला बजावून पुढे जात राहिलो, राहतो.

गेली दीड वर्षं झी मराठी वाहिनीवर तुमची 'जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरू आहे आणि त्यात तुमची आदित्य देसाई ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली आहे. किती साम्य किंवा वेगळेपणा आहे तुमच्यात आणि आदित्य देसाईमध्ये?

ललित - (हसून) मला हा नेहमी विचारला जातो प्रश्न. लोकप्रियतेच्या बाबतीत म्हणाल तर आदित्य देसाई नक्कीच भरपूर लोकप्रिय आहे. मला फेसबुकवर भारतातून, तसंच भारताबाहेरून भरपूर मेसेजेस येत असतात, त्यावरून कल्पना येते. माझ्यात आणि आदित्यमध्ये साम्य म्हणाल, तर तसं दोन्ही कॅरेक्टर्स एकत्र होतात काम करताना. तुम्हांला तुमचं तिथे काही द्यावं लागतं. आमच्या स्वभावातले काही गुण, वैशिष्ट्यं, जे लेखकाला त्या व्यक्तिरेखेसाठी घ्यावेसे वाटतील त्या घेतल्या जातात.

वेगळेपणा म्हणाल तर, मी नास्तिक आहे पण आदित्य तसा नाही, म्हणजे तो अंधश्रद्धाळूही नाही, पण आस्तिक आहे. मी प्रत्यक्षात आदित्यपेक्षा जास्त मस्तीखोर आहे, कधी शांतही असतो. अशा बर्‍याच गोष्टी आहेत. काही बाबतींत साम्य आहे, काही बाबतींत नाही.

अशी कोणती गोष्ट, सवय आहे जी आदित्य देसाईमध्ये तुमच्याकडून, म्हणजे ललितकडून आली आहे आणि ललितकडे आदित्य देसाईकडून?

ललित - 'है ना?' हे म्हणायची सवय ललितकडून आदित्यकडे गेली आहे. तर आदित्य देसाईची भांग पाडायची सवय आता ललितला लागली आहे. या आधी मी कधीच हे केलं नाही. आतासुद्धा मी फक्त केसांना थोडं वळण द्यायचा प्रयत्न करतो.

तुम्हांला आदित्य देसाईच्या भूमिकेसाठी 'सर्वोत्कॄष्ट नायक' हा झी गौरव पुरस्कार मिळाला. या बद्दल तुमचं अभिनंदन! एक कलाकार म्हणून पुरस्काराची पावती मिळल्यावर नक्कीच छान वाटत असणार.

ललित - थँक्यू! हो, हे पुरस्कार मिळणं महत्त्वाचं अशासाठी वाटतं कारण त्यात प्रेक्षकांच्या मतांचा पण वाटा होता. नाटक करताना समोर प्रेक्षकांची दाद लगेच कळते. पण मालिका करत असताना ते शक्य नसतं. त्यामुळेच या पुरस्काराच्या रूपात प्रेक्षकांना काम आवडतं आहे, याची पावती मिळते. आत्मविश्वास वाढतो. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यातच पुढे शिकत जाऊन करायचं हे समजतं. त्यामुळे पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.

कोणत्याही दैनंदिन मालिका मूळ कथा न ताणता एका ठरावीक वेळेत संपवण्यात याव्या, याबद्दल तुम्हांला काय वाटतं?

ललित - माझं स्वतःच असं मत आहे की, कोणतीही मालिका साधारणपणे एका वर्षापर्यंत असावी. असं झालं तर नवीन मालिका येत राहतील, वेगळ्या लोकांना कामाची संधीही मिळेल. किंवा निदान कुठल्याही मालिकेचा आलेख, ती सुरू झाल्यानंतर कधी संपणार हे माहिती पाहिजे. त्यामुळे ती कथा व्यवस्थीत रचता येते. मग मालिकेचा आशयही छान, सकस राहील.

तुम्ही एक अभिनेता म्हणून स्वतःला सतत अद्ययावत ठेवण्यासाठी काय करत असता?

ललित - वेगवेगळे चित्रपट, नाटकं बघणे, भरपूर वाचन हे करतो. स्वतःचा साचा, कंफर्ट झोन तयार होऊ न देता काम करायचा प्रयत्न करतो. चौकट तयार होऊ न देता वेगळं काय करता येऊ शकेल हे बघतो. त्याचबरोबर ज्येष्ठ सहकालाकार आहेत, लोकेशदादा (लोकेश गुप्ते), गिरीशकाका (डॉ गिरीश ओक), सुकन्याताई (सुकन्या मोने) त्यांचं काम बारकाईने बघतो, त्यातूनही शिकायला मिळतं. हे सगळं आपसूक होत राहतं, वेगळं काही करायला लागत नाही.

तुम्ही मेथड अ‍ॅक्टिंगला महत्त्व देता की उत्स्फूर्ततेला?

ललित - असं ठरवून काही करत नाही. सीन वाचला की त्या सीनला जे योग्य असेल ते करतो. कधी मिळालेला सीन दोन पानी असला तरी लोकेशदादाबरोबरचे ,गिरीशकाकांबरोबरचे किंवा शर्मिष्ठाबरोबरचे बरेसचे सीन्स स्पाँटेनियसली ईंप्रोवाईज होत जातात. गिरीशकाका काही उत्स्फूर्तपणे बोलले की आम्ही भर घालतो. मग ही प्रक्रिया पुढे होत राहते. त्यामुळे दोन्ही पद्धतीने काम होतं.

एक अभिनेता म्हणून स्वतःमधली कोणती गोष्ट अजून सुधारायला हवी असं वाटतं?

ललित - टीव्हीवरच्या मालिकेमध्ये डबिंग नसतं. सीन चित्रीत होत असतानाच जे तुम्ही बोलता तोच आवाज रेकॉर्ड होत असतो. त्यामुळे बरेचदा हालचालींवर मर्यादा येते. आपण एरवी खरंतर नुसतं उभं न राहता काम करता करता बोलत असतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मी बरेचदा ज्या गोष्टीचा आवाज होणार नाही, असं काहीतरी करत राहून, हातात घेऊन, काम करत शक्यतो बोलायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट अजूनही जास्त शिकायचा प्रयत्न सुरू आहे.

सध्या तुम्ही दैनंदिन मालिका करत आहात, तर हे वेळेच्या बाबतीत किती आणि कसं अवघड आहे?

ललित - आमची रोज बारा तासांची शिफ्ट असते - ९ ते ९, ७ ते ७ अशी. महिन्यातून आम्ही कमीत कमी २६ दिवस शूट करतो. रविवार वगैरे अशी काही ठरावीक सुट्टी नसते. आदल्या दिवशी सुट्टीबद्दल कळतं. जर आम्हांला सुट्टी हवी असेल तर महिनाभर आधी सांगावं लागतं. हे असं काम करणं हेक्टिक नक्कीच आहे. तब्येत उत्तम राहावी, मानसिक ताणतणाव नसावेत याची काळजी घ्यावी लागते. कारण आजारी पडलं, सर्दी-ताप-कंटाळा आला तरी जावं लागतंच.

धावपळीच्या दिनक्रमामध्ये तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करता?

ललित - फिटनेससाठी मी वेळ मिळेल तेव्हा जिमला जातो. आत्ता एका महिन्यापासून कुंग-फूचे क्लासेस लावले आहेत. मार्शल आर्ट्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या सेटवरती जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, त्याने थकवा येत नाही. काम करायला खूप उत्साह मिळतो. सेटवर असणार्‍या छान वातावरणाचा, चांगल्या लोकांचा तुमच्या कामावर, तब्येतीवर चांगला परिणाम होतो.

या सगळ्यांतून घरच्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, स्वतःच्या छंदासाठी वेळ काढणं कसं जमवता?

ललित - आत्ताही दोनतीन महिन्यांपूर्वीपर्यंत मी मालिकेचं चित्रीकरण झाल्यावर रात्री १२ ते पहाटे ३ आमच्या एकांकिकेच्या तालमीसाठी वेळ काढायचो आणि सकाळी परत चित्रीकरणासाठी जायचो. हं, आता फक्त एक प्रॉब्लेम येतो की मला फिरायची खूप आवड आहे. ते कमी झालं आहे. अ‍ॅडजस्ट करावं लागतंचं घरच्यांना वेळ देणं कमी झालं आहे. पण तसं आधीही मी प्रायोगिक नाटकं करत होतो तेव्हा घरच्यांना फार जास्त वेळ देता येत नव्हता. बाकीच्या काही आवडी, जसं कविता करणे, मित्रांबरोबर क्रिकेट खेळणे वेळ मिळेल तशा करत असतो.

तुम्ही स्वतः टीव्ही बघता का? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीवर किंवा इतर काय बघायला आवडतं?

ललित - नाही, मी टीव्ही नाही बघत. अनेक वर्षांत मी टीव्ही पाहिलेला नाही. मी आत्ता राहतो तिथे टीव्ही नाही. पण मला चित्रपट बघायला आवडतात. मित्रांच्या कृपेने माझ्याकडे इटालियन, रशियन अशा वेगवेगळ्या भाषांतल्या चित्रपटांचा साठा आहे. घरी आलो की मी हे चित्रपट बघतो. आमच्या मालिकेचे भाग मी लॅपटॉपवर बघतो.

रंगभूमी, टीव्ही यांनंतर आता मोठ्या पडद्यावर यायला आवडेल का? तसा विचार आहे का?

ललित - विचार असा नव्हता केला कधी, पण आता ऑफर्स येत आहेत मराठी सिनेमाच्या. मालिकेनंतर मी त्यांचा नक्कीच विचार करेन. कारण माध्यमं वेगवेगळी असली तरी पाया एकच आहे. प्रत्येक माध्यमाची गंमत वेगळी, काम फक्त प्रामाणिकपणे करायचं.

आजकाल बरेचसे सेलीब्रिटी सोशल मिडियाचा वापर करून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात. तुम्ही सोशल मिडियावर कितपत अ‍ॅक्टिव्ह असता?

ललित - मी खूप कमी अ‍ॅक्टिव्ह आहे तसा सोशल मिडियावर. ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप मी वापरत नाही. फक्त फेसबुकवर माझं स्वतःचं पेज आहे, पण मी माझं ऑफिशियल फॅनपेज अस केलं नाहिये. फेसबुकवर माझ्या नावाने काढलेली बरीच फेक अकाऊंट्स् आहेत. पण पुष्कळ फॅन्स माझं खरं फेसबुक अकाऊंट शोधतात, मेसेज करतात, कमेंट देतात. त्यांत जे कोण खराखुरा अभिप्राय देतात, स्तुती असो वा टीका, त्यांना मी आवर्जून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

'मायबोली'वर तुमचा फॅनक्लब आहे.

ललित - (हसून) मला नक्कीच आवडेल त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. माझं काम आवर्जून बघणार्‍या, माझ्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांना भेटायला मी उत्सुक आहे. त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आत्ता जसे माझ्यावर प्रेम करत आहात तसं मी जेन्युईन काम करत राहिलो तर करत राहा आणि मी नक्कीच जेन्युईन काम करत राहीन.

आता तुम्ही महिन्याभरात लॉस एंजीलिस इथे बीएमएमच्या अधिवेशनाला येणार आहात. काय वाटतं त्याबद्दल?

ललित - बाहेरच्या देशात राहून आपल्या लोकांनी आपलं मराठीपण, संस्कृती, नाटकं, पुस्तकं, कला जपण्यासाठी, प्रसार करण्यासाठी बीएमएमचं अधिवेशन हा खरंच एक छान उपक्रम सुरू ठेवला आहे. हॅट्स ऑफ टू बीएमएम जे हा असा कार्यक्रम तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करतात.

भारतातून येणारे कलाकार, कार्यक्रम, इथल्या उत्तर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या मंडळांचे कार्यक्रम, स्टॉल्स् यांसाठी हे अधिवेशन हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. या वर्षी हे अधिवेशन लॉस एन्जिलिस, सिटी ऑफ हॉलिवुड येथे होत आहे. तुमच्या याबद्दल काही खास अपेक्षा आहेत का ?

ललित - हे अधिवेशन उत्तम व्हावं, हीच इच्छा आहे. त्यासाठी शक्य असेल ती मदत करता यावी आणि आपला कार्यक्रम तगडा होऊन, लोकांना आवडला पाहिजे हेच मनापासून वाटतं. तिकडच्या मराठी प्रेक्षकांचा, चाहत्यांचा प्रतिसाद, त्यांचं म्हणणं ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.

तुम्ही अधिवेशनात जो कार्यक्रम करणार आहात, त्याबद्दल काही सांगाल का?

ललित - बीएमएममध्ये 'लग्न पाहावं करून' हा आमचा कार्यक्रम आहे. नाटक आहे, म्हणजे एक नाट्यप्रकार आहे ज्यात स्किट आहे, यात गाणी, नृत्यही असतील. माझ्याबरोबरच यात टीव्हीमधले अजून खूप लोकप्रिय कलाकारही आहेत. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कार्यक्रमाच्या तालमीही सुरू आहेत.

अधिवेशनाला येणारे प्रेक्षक, मायबोलीचे वाचक यांच्यासाठी तुम्हांला काही संदेश द्यायचा आहे का?

ललित - हे जे तुम्ही कार्यक्रम करत असता, हे खरंच खूप चांगल आहे. तुम्ही मराठीचा ठेवा जपता, प्रसार करता यांबद्दल तुमचं खूप कौतुक आहे. हे कृपया असंच चालू ठेवा, तुम्हांला यासाठी काहीही मदत लागली तर सांगा. बीएमएमला नक्की भेटू!

ललित प्रभाकर - आवडत्या गोष्टी

१. छंद - वाचन (कुठेही जाताना बॅगमध्ये पुस्तक असतंच)

२. नुकतचं वाचलेलं व आवडलेलं पुस्तकं - Ayn Rand यांचं 'द फाऊंटनहेड'.

३. आवडते लेखक / लेखिका - विलास सारंग, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, इतालो काल्विनो

४. आवडते कवी - अरुण कोलटकर, गुलजार, पियुष मिश्रा

५. आवडता खेळ - स्वतः खेळायला बॅडमिंटन, बुद्धिबळ आवडतात. मित्रांबरोबर फुटबॉल, क्रिकेट

६. आवडता खेळाडू - मेस्सी

७. आवडता पदार्थ - मांसाहारी कुठलाही.

८. आवडता चित्रपट - हे खूप म्हणजे खूप आहेत, त्यामुळे सांगणं अशक्य आहे. मी प्रचंड सिनेमे बघतो. पण अगदी सांगायचंच तर चार्ली चाप्लीनचे सगळे सिनेमे...मला चार्ली चाप्लीन खूप आवडतो.

९. आवडतं गाणं - मला जुनी हिंदी गाणी खूप आवडतात. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं खास आवडीचं.

१०. आवडता गायक / गायिका- किशोर कुमार

थँक्यू ललित, तुम्हांला यापुढेही अशाच मनासारख्या भूमिका करायला मिळाव्या, यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
आणि या गप्पा मारण्यासाठी दिवसभराच्या शूटिंगनंतर, भारतात रात्री उशिरापर्यंत जागून एवढा वेळ दिला, अगदी भरभरून बोललात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

श्री. ललित प्रभाकर यांची छायाचित्रे त्यांच्या खाजगी संग्रहातून साभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली'वर तुमचा फॅनक्लब आहे.

ललित - (हसून) मला नक्कीच आवडेल त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. माझं काम आवर्जून बघणार्‍या, माझ्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांना भेटायला मी उत्सुक आहे. त्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की, आत्ता जसे माझ्यावर प्रेम करत आहात तसं मी जेन्युईन काम करत राहिलो तर करत राहा आणि मी नक्कीच जेन्युईन काम करत राहीन.
<<<
सार्थक झालं कल्ब काढल्याचं Proud

डीजे , रमड +10000

मीपु, मस्त झालीय मुलाखत . फोटोही मस्त आलेत

( काश मी घेतली असती तर मुलाखत!!! बाकी माझ्या आणि ललितच्या बर्याच्यशा आवडी निवडी सेम टू सेम आहेत ! Wink

अरे वा!!! छान मुलाखत!
डीजे आणि fans, होऊन जाऊ द्या आता एक भेट! Wink

ललितला शुभेच्छा!!! ( fans भेटीसाठी नव्हे तर एकूणच पुढील वाटचालीसाठी Lol )

मुलाखत छान झाली आहे .. आणि शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट .. मीपु आणि चिनूक्स थँक्यू ..

उत्तरंही मनमोकळी वाटतात .. Happy

ललितला ला शुभेच्छा!

रमड, डोळ्यात बदाम थेट!! मीपुणेकर यांनी "फेसबुकवर तुमचे रिलेशनशिप स्टॅटस काय?" असे लगे हाथ विचारून घ्यायला हवे होते नाही का Wink Happy

मीपु, टीव्ही बघता का चे उत्तर फार आवडले मला. Happy चांगले प्रश्न विचारलेत !!

पहिले दोन्ही प्रतिसाद 'ललितची मुलाखत आहे' इतकंच पाहून स्पॉन्टॅनिअसली दिले गेले Happy आता मुलाखतीबद्दल थोडंसं लिहीते.

मीपुणेकर, मुलाखत खरंच खूप चांगली झाली आहे. मनापासून आवडली. म्हणजे प्रश्नही चांगले विचारले आहेत आणि ललितने उत्तरंही एकदम टू द पॉइंट दिल्यासारखी वाटतात. हे छान वाटलं. फॅनक्लबाची आद्य मेंबर म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटायची उत्सुकता आहे. Happy त्याची जुयेरेगा नंतर कुठलं नाटक/मालिका/मूव्ही येत आहे का किंवा आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत असा एक प्रश्न पण हवा होता असं वाटलं.

सीमंतिनी Happy हो, डोळ्यात बदाम येतातच बाय डीफॉल्ट, तर ते लपवायचे कशाला?

मस्त मुलाखत Happy

'है ना?' हे म्हणायची सवय ललितकडून आदित्यकडे गेली आहे>>> 'है ना?' ची तर मी फॅन आहे.

पहिल्या फोटोत चिकणा दिसतोय.

मीपु, मस्त मुलाखत !
ईथला फॅनक्लब बीबी वाचून जुयेरेगा सुरुवातीपासून बघायला सुरुवात केलीये . मालिका मस्त आणि आदित्य देसाई पण मस्त Happy Happy Happy

मुलाखत वाचून आवडल्याचे ईथे कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद Happy

फ्युचर प्रोजेक्ट्स बद्दल वेगळ्या प्रश्नात उत्तरं मिळाली म्हणून वेगळ असं विचारलं नाही.

व्यावसायिक नाटकं करणार असल्याच त्यांनी सांगितल, तसचं सध्या सिनेमाच्या ऑफर्स येत असून वेळेअभावी सध्या शक्य नाही पण मालिका संपल्यावर सिनेमाचा नक्की विचार करणार असल्याचही ललितने सांगितल Happy

अजून एक सध्या सुरु असलेलं प्रोजेक्ट गप्पांमध्ये सांगितलं ते असं कि वेगवेगळ्या लेखकांच्या मराठी कथा त्याच्या आणि ईतर काही कलावंतांच्या ( अतुल कुलकर्णी आणि अजून बरेच) आवाजात मोबाईल अ‍ॅपद्वारे येत आहेत.

अरे वा, मस्त! मुलाखत चांगली झाली आहे. उत्तरे छान मोकळेपणाने दिली आहेत Happy

ललितची अ‍ॅक्टिंग, पर्सनॅलिटी, स्क्रीन प्रेझेन्स सगळेच मस्त आवडत आहे.

पण जरा तेवढे केस अजून कमी केले तर जास्त छान दिसेल ( एवढा देखणा चेहरा, आजकाल पुढे येणार्‍या केसांनी झाकला जातो) Wink

ललितच्या येणार्‍या नाटकाला, अमेरिकेतील कार्यक्रमाला, पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा Happy

वा! फार सुटसुटीत प्रश्न विचारले.

डीजे, रमड - भेटायला जायच असत ना तिथेच आला तर तो तुम्हाला भेटला असता.

मुलाखत आवडली. ललित मला दिसायला वगैरे काही खास वाटत नाही, पण उत्तरं चांगली दिली आहेत. चांगलं काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे हे वाचून बरं वाटलं Happy उत्तरं जेन्युइन वाटली.

मुलाखत वाचून त्यावर प्रतिक्रिया देणार्‍यां सगळ्यांना धन्यवाद Happy

ललितला त्याच्या मुलाखतीची लिंक मागे दिली होती. हा ललितचा रीप्लाय, त्याच्या शब्दात..


प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांपर्यंत प्लीज आभार पोहोचवं.
प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. आलेल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवेन. थँक्यु!

-ललित