आज रांधण्यात दंग

Submitted by मिल्या on 15 October, 2007 - 05:52

चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी

आज रांधण्यात दंग बायको 'करी'
माधवा जरा जपून जा तुझ्या घरी ॥

ती कुठेतरी पदार्थ रोज पाहते
पाहुनी लगेच त्यास किचन गाठते
घाबरून का तुझे शरीर कापते
बाटल्या भरून औषधे जवळ बरी ॥

एकदा असेच जेवणात वाढले
'पारसी कबाब' आणि 'फ्रेंच कारले'
ज्यास त्यास गॅस गॅस गॅस जाहले
बघ उडून जायचास तू फुग्या परी ॥

चायनीज तर कधी इटालियन करे
मेक्सिकन, मलेशियन गुमान चाख रे
पाहुनी प्रयोग हे 'कपूर' ही डरे
मासळीविना करेल 'वंग फिश करी' ॥

वजन घटविणे मनात खूळ हे घुसे
ज्यात त्यात भोपळा नि दोडका असे
सांगतोस हाल जर तुला कुणी पुसे
बोकडावरून त्या जशी फिरे सुरी ॥

मंडळामध्ये कुकिंग क्लास रंगला
येउनी घरी करेल बेत 'चांगला'
वाटले तुझा खरेच खेळ संपला
वाचवू शकेल काय तो हरी तरी ॥

आज रांधण्यात दंग बायको 'करी'
माधवा जरा जपून जा तुझ्या घरी ॥

तळटीप : 'माधवा' च्या जागी मी 'रे मिल्या' घालून वाचले. तसेच प्रत्येक पुरुषाने आपापले नाव घालून वाचावे. Happy

-मिल्या

विशेषांक लेखन: