लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग १

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 07:33

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे " गृहिणीमित्र किंवा हजार पाककृती " असे पुस्तक माझ्या आईकडे होते. त्या पुस्तकाच्या
लेखिका लक्ष्मीबाई धुरंधरच होत्या का ते मला खात्रीने सांगता येणार नाही पण त्या पुस्तकात त्यांचा फोटो होता,
आणि आमच्या घरात त्या पुस्तकाचा उल्लेख तसाच होत असे.

या पुस्तकाचा प्रकाशनकालही मला आठवत नाही. आमच्याकडची प्रतही फारच जीर्ण होती. पण ते दुसर्या
महायुद्धाच्या काळात लिहिलेले असावे. कारण " आजकाल लढाईमूळे बदाम महाग झाले आहेत. " असा उल्लेख
त्यात होता.

त्या पुस्तकाची किंमत रुपये..आणे..पैसे अशी होती. आतल्या पानावर डोंगरे बालामृत आणि जाई काजळ
या जाहीराती होत्या. लेखिकेच्या कुटुंबियांचा त्यात फोटो होता. टिपीकल पुर्वीचे फॅमिली फोटो असत तसा.
म्हणजे खुर्चीवर नऊवारीतली बाई बसलेली, शेजारी कोट घातलेला रुबाबदार पुरुष, कडेवर गोंडस बाळ, शेजारी टेबल, टेबलावर फुलदाणी, शिवाय मागे वर्तुळात काही फोटो.. वगैरे. शिवाय ती पहिली आवृत्ती नव्हती.
कारण त्यात काही अभिप्रायही छापलेले होते. बडोद्याच्या सयाजीराव गायकवडांच्या तर्फे आलेला एक अभिप्राय
शिवाय काही प्रतींची मागणी होती.

काही काही पाककृतीत काही खास उपकरणांचे उल्लेख होते, पण त्याचे चित्र "चित्रपटा"त पहा असे लिहिले होते.
त्याचा अर्थ मला कळला नाही. पुस्तकात बाकी चित्रे नव्हती किंवा कदाचित ती वेगळी दिली जात असावीत.

पण हे पुस्तक लिहिण्यामागे लेखिकेने भरपूर कष्ट घेतले होते हे मात्र खरे. त्यातली माहिती मिळवण्यासाठी
पण ( त्या काळातली संपर्क साधने बघता ) त्यांना भरपूर वेळ द्यावा लागला असणार.

त्यात एक प्रकरण ब्रिटीश टेबल मॅनर्स वर होते. स्वतः कसे खायचे हे तर होतेच पण वाढताना कसे वाढावे
हे पण लिहिले होते. गडीमाणसे निरक्षर असणार हे गृहीत धरून, नॅपकिन्स वर भरतकाम करून चित्रे
काढावीत व ती त्यांना समजून द्यावीत, असे लिहिले होते.

हे करून पहा... मधे नेहमीचा मजकूर तर होताच पण एकाचा उल्लेख इथे केल्याशिवाय रहावत नाही.

"बगळ्याचे हाडाची पूड करून ती माश्याच्या आतील भागास चोळल्यास, काटे विरघळतात असे ऐकून आहोत.
पण अनुभव घेता आला नाही. तरी आमच्या शिकारीबंधूनी अनुभव घेऊन आम्हास जरूर कळवावे" असे एक
वाक्य होते.

दशमान पद्धत यायच्या पुर्वीचे हे लेखन होते त्यामूळे तोळा, मासा, शेर, पायली अशीच मापे होती. या मापांचे
कोष्टकही होते. पदार्थाचे प्रमाण सहज मोठ्या कुटुंबाला पुरेल असेच होते.

मसाल्यांमधे गोज्वारांचा मसाला, घाटी मसाला, करी पावडर असे सगळे प्रकार होते. पण आपण आजकाल
ज्याला सांबार मसाला म्हणतो त्यापेक्षा त्यातला सांबारे चा मसाला वेगळा होता. सांबार म्हणजे सम + भार
अशी फोडही दिली होती.. अनेक नावांच्या अशा फोडी होत्या. अन्न + आरसे , गौ + आहारी, शर्करा + पाळे
वगैरे.

भाज्यांमधे वांग्याच्याच भाजीचे अनेकानेक प्रकार होते. अनेक पाककृती वेगळ्याच होत्या. त्यांची नावे पण खास
होती. पुरणाची वांगी, ग्वाल्हेरी भरली वांगी, सगळाले बटाटे.. त्या काळातही क्वचित मिळत असणार्या
मॅरो वगैरे भाज्यांच्या कृती होत्या. रानभाज्याही होत्या. शेवळांचे अनेक प्रकार होते आणि टाकळा, पोफळाच
नव्हे तर आजही डेलिकसी मानली जाणारी कोरलाची भाजी पण होती ( आपट्याच्या पानासारखी पाने
असणारी ही भाजी, पावसाळ्यातच मिळते. खुप चवदार असते. या भाजीची फुलपुडी सारखी पुडी बांधून विकायला
आणतात. )

लेखिकेचे वास्तव्य बहुतेक हैद्राबाद भागातले असावे. काही तेलंगी ( तेलुगु ) पदार्थ त्यात होते. त्यांनी एका
पानांचा उल्लेख केला होता. ( नाव बहुतेक केनी ) त्या पानांची भजी केली असता, ती पाने तळताना फुगतात
असे लिहिले होते. ती पाने कसली ते मला अजून कळलेले नाही. महाळूंगाचे पण अनेक पदार्थ होते.
ते लिंबू वर्गातले फळ असावे.

मटणाचे आणि कोंबडीचे अनेक प्रकार होते. ( आई त्यातले अनेक प्रकार करत असे. ) माश्यांची भुजणी होती.
काही काही पदार्थ तर थेट संस्थानीच होते. हरणाची लेग नावाचा पदार्थ होता. एका पदार्थाचे नाव चक्क "शिकार"
होते. त्याचे साहित्य " दोन तित्तर, चार लाव्हे... " असे काहीसे होते.

आजही क्वचित कुठल्या पुस्तकात असेल असे घरगुति पदार्थ त्यात होते. घरच्याघरी व्हीनीगर ( उसाच्या
रसापासून ) व्हॅनिला इसेन्स ( व्हॅनिलाच्या शेंगा वापरून ) बेकिंग पावडर कसे करायचे ते सविस्तर लिहिलेले
होते.

द्राक्षासव ची पण सविस्तर कृती होती. त्यातला एक घटक " धायटीची फुले" मला या पुस्तकामूळेच कळला
( महाराष्ट्राच्या घाटात ही लाल फुले मुबलक फुलतात. चवीला गोड लागतात. फर्मेंट करण्यासाठी वापरतात.
महागही असतात, तोळ्यावर विकत असत. ) त्या कृतीतील शेवटचे वाक्य, मजेशीर होते. " यातला गाळ
गडीमाणसांना द्यावा. ते तो भक्तीने पितात. ... "
गुलकंदासारखास "भेंडेकंद" असा प्रकारही होता त्यात. चक्क भेंडीचा गोड प्रकार.

बेकिंगचेही बरेच प्रकार होते. भट्टी कितपत तापली आहे हे बघण्यासाठी कागदाचा कपटा कसा वापरायचा ते पण
लिहिले होते. आता तयार मिळणारी पफ पेस्ट्री घरी कशी करायची, ते पण लिहिले होते. त्यासाठी लार्ड किंवा
बोकडाची चरबी वापरायची असे सुचवले होते.

त्या काळातील एखाद्या अभ्यासक्रमासाठी ( कदाचित गृहितगामा ) हे पुस्तक अभ्यासाला लावलेले असावे. कारण काही पदार्थांवर हायर लेवल, लोअर लेवल असे मार्क्स होते. त्यापैकी एका पदार्थावर तर " हा पदार्थ
करण्यासाठी थोड्याफार कौशल्याची गरज आहे " असा शेरा होता. ( लेखिकेचाच ) तो पदार्थ माझ्या आठवणी
प्रमाणे "मधमाश्याचे पोळे" हा होता. साधारण केक सारखा प्रकार होता पण त्यानंतर त्यावर षटकोनी सळीने
छिद्रे पाडून, वरून सिरप टाकायचा होता.

आईसक्रीम पॉट मधे करायच्या आईसक्रीमचे अनेक प्रकार होते. इराणी आईस्क्रीम नावाच्या प्रकारात नारळाचे
दूध वापरले होते.

घरच्याघरी आइसिंग कसे करायचे ते पण लिहिले होते. आइसिंग करण्यासाठी हस्तिदंती किंवा चांदीची सुरी
वापरावी असे सुचवले होते. त्यातले रंग पण कसे करायचे ते लिहिले होते. पिवळ्या रंगासाठी केशर, लाल रंगासाठी
बीट व हिरव्या रंगासाठी गुलाबाची पाने वाटून घ्यायला सुवचले होते. त्यावेळी उपलब्ध असलेली कोचिनेल
नावाचा रंगही वापरायला सुचवला होता. ( हा रंग निवडुंगावरील किड्यांपासून मिळवत असत आणि त्याच्या
फळापासून डोंगरे बालामृत बनत असे. महाराष्ट्रातील निवडुंगांचा नायनाट झाल्यामूळे ही दोन्ही उत्पादने
आता बंद पडली आहेत असे मी वाचले होते )

आपण कॉपीराईटस बद्दल आता जागृत आहोत पण त्या अधिकाराची जाणीव लेखिकेला होती. तिने पदार्थांच्या
नावातच त्याची सोय केली होती. उदा: "काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे", "सोकरीबाई यांची बदामाची थाळी", "लिबिग साहेबाचे कच्चे मासांचे सूप" अशी नावे होती. हे लिबिग साहेबाचे सूप तर विलक्षणच होते. त्यात खिमा
भरपूर पाण्यात घालून ढवळायचा आणि मग त्यात हायड्रोक्लोरीक आम्लाचे दोन थेंब टाकायचे असे सुचवले होते.

इतकेच नव्हे तर घटक घेतानाही, "तारकर कंपनीचा रवा" किंवा "कासवजी पटेल यांचे आंबे" घ्यावेत असे सुचवले
होते.

इतकी वर्षे वापरल्याने ते पुस्तक खुपच जीर्ण झाले होते आणि शेवटी २००५ च्या पावसात ते नष्ट झाले. त्याच्या
काही रीप्रिंट्स मी नंतर बघितल्या.. पण का कुणास ठाऊक नाही घेतल्या. माझ्या आईने त्यातले अनेक
पदार्थ केलेच पण काही मासिकांनी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेत यातले पदार्थ लिहुन स्पर्धकांनी
बक्षीसे मिळवलेली पण मी बघितली ( अर्थात या पुस्तकाचा उल्लेख नव्हता. )

पण एवढे सगळे लिहून मी वरच्या फोटोचा आणि लक्ष्मीबाईंचा काय संबंध ते लिहिलेलेच नाही... तर ते पुढच्या भागात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश Happy

किती कौतुक ओसंडतय तुझ्या लेखातून..

चांगला खवय्या आहेस.. ( उगीचच नॉन वेज खात नाहीस!!!! Proud )

नशीब ही शेवटची खालची टीप दिलीत दिनेशजी, नाहीतर काही जणाना चघळायला नवीन च्युईन्गम मिळालेच असते आता.:फिदी:

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....

ह्या पुस्तकाची विसावी आवृत्ती सध्या आहे बाजारात. Happy घ्यायला हवी.

मायबोलीवर नाहिये पण बुकगंगावार उपलब्ध आहे हे पुस्तक.

मनोरंजक माहिती.केनिच्या पानाची भाजी आमच्याकडे करायचे.बेळगावला ही पाने मिळायची.आपोआप उगवून आलेली.ही मुद्दाम लावलेली मी पाहिली नाहीत.

रंजक आहे माहीती. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
त्यातल्या व्हेज कृती आठवत असल्यास जरा सोपे करून लिहीणार का?

अरे वा.. खुप मस्त झालाय हा लेख. पुढचा भाग लवकर येउद्या.

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे " गृहिणीमित्र किंवा हजार पाककृती " असे पुस्तक माझ्या आईकडे होते.

आता पुढच्या भारतवारीत मी हे पुस्तक शोधणार आहे.

लेख आवडला.

कोरळ(कोरल ??)दादरला स्टेशन समोरच्या रस्त्यावर मिळतात. एक आजीबाई बसते.
मला चक्क मे महीन्यात खायला मिळाली होती.
छानच चव आहे त्या भाजीची.

खुप छान माहीती, दिनेशदा, एक असं कोणाचंतरी जुनं पुस्तक तोळा, मासा, शेर वगैरे परिमाणे आहेत ते खुप लहानपणी बहुतेक बडोद्यालाच बघितल्यासारखे, पुसटंस आठवतंय.

वर्षुताई राहुदेना दिनेशदाना वेज कॅटॅगरीत, आधीच आमची वेज लोकांची संख्या कमी आहे, ते आमच्यात आहेत तर आम्हांला आमची संख्या खुप मोठी असल्यासारखं वाटतं.

एव्ही, मला खुप उत्सुकता आहे त्या पानांबद्दल.
अन्जू.. एकंदर ते पुस्तक राजघराण्यात फार लोकप्रिय होते असे वाटतेय. मला वाटतं माझ्या वडीलांच्या बडोद्याच्या आत्याकडूनच ते आमच्याकडे आले होते.

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे " गृहिणीमित्र किंवा हजार पाककृती " माझ्याकडे आहे.
मस्त वाटते वाचायला.
लेख मस्त!!

मस्तच आहे लेख. बर्याच भाज्यांची नावे पहिल्यांदाच ऐकली.

बगळ्याचे हाडांचा चुरा.. दोन तित्तर >>> हे भारीये Lol

आता पुढचा भाग वाचते Happy

मस्त लेख Happy
बगळ्याचे हाडाची पूड...दोन तित्तर, चार लाव्हे...भेंडीकंद...मधमाश्याचे पोळे
भारी! हे पुस्तक मिळवून वाचायलाच हवे!

Pages