या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे नेमके सांगायचे झाले तर १९ जानेवारी २०१४ रोजी, मी मुंबई येथे झालेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉन मधल्या ‘पुर्ण मॅरॅथॉन’ (अंतर ४२.१९५ किमी) प्रकारामधे भाग घेउन ती स्पर्धा पूर्ण केली. मला स्पर्धा पुर्ण करायला लागलेला वेळ होता (गन टाईम) ५ तास ३५ मिनिटे. (बिब टाईम - ५ तास २९ मिनिटे ५४ सेकंद). उत्कृष्ट आयोजनाचा आदर्श नमुना बघायला मिळाला. माझा स्पीड साधारणपणे ताशी पावणे आठ किमी होता आणि पेस होता....
काय म्हणताय? बिब, पेस काही कळत नाहीये? ओह अर्रेच्चा, माझ्या लक्षातच नाही आले! केवळ काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘गन-टाईम’, बिब, पेस हे सगळे शब्द मलाही माहित नव्हते. अशा पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या माणसाने एक पुर्ण मॅरॅथॉन पळून पूर्ण केली ह्याचे माझे मलाच आश्चर्य वाटतेय तर मग मला ओळखणाऱ्या पण गेले काही महिने संपर्कात नसलेल्या इतर कोणाचा तर विश्वास तरी बसेल की नाही कोणास ठाउक.
तर त्याचे काय झाले, ओके मी अगदी सुरुवातीपासून सांगतो.
फ्लॅश बॅक
वर्ष २०१२
आमचा एक गृप होता.... आमचा ही एक गृप होता.... आमचा एक गृप ही होता....
काहीही म्हटले तरी चालेल
खरे तर सुरुवातीला हा गृप म्हणजे गडा-किल्ल्यांवर भटकायची आवड असलेल्या समान-धर्मी लोकांचे एक मित्रमंडळ. पण समस्त मराठी माणसांना, आयुष्यात कधी ना कधी लागते तशी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात 'काहीतरी' करायची भूक लागल्याने, (माझ्यामते सगळी गडबड झाली) आम्ही काही सेवाभावी उपक्रम सुरु केले. तर असे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी करायच्या हेतूने आम्ही आमच्या ग्रुपला नावही दिले ‘आयाम’. तर त्या ‘असे’ काहीतरी करण्यासाठी आमच्या बरोबर ट्रेकला न येणाऱ्या मित्रांना देखील आमंत्रित केले होते. तेव्हा त्या संदर्भात आयोजित एका उपक्रमाच्यावेळी माझी ओळख झाली अरुणशी. तो आमच्या गृपातल्या सुनीलचा मित्र. अरुण काही काळ अशा कार्यक्रमांना आमच्या बरोबर येत होता पण नंतर येईनासा झाला. तसाही हा पठ्ठ्या आमच्या बरोबर ट्रेकला कधीच न आल्या मुले त्याच्याशी फार अशी ओळख-मैत्री झाली नव्हती. पण तो आमच्या ईमेल-ग्रुप मधे असल्याने ईमेल द्वारे आणि सुनीलकडून प्रत्यक्ष अशी त्याची खबरबात कळायची. तो रेसकोर्स वर पळायला जातोय, त्याचा एक क्लब तयार झालाय, ते लांब अंतराच्या शर्यतींची तयारी करताहेत, कधी विद्यापीठात तर कधी खडकवासल्याला पळताहेत वगैरे ऐकून होतो. अधून मधून अशा प्रकारच्या त्याच्या इमेल आमच्या सगळ्याच ग्रुपला यायच्या. त्यात फोटोही असायचे, नुसतेच वाचता काय? सामील व्हा म्हणून आवाहनही असायचे.
पण एकतर आमच्या गृपचे, ट्रेकिंग आणि 'इतर' कार्यक्रम व्यवस्थित चालू असल्या कारणाने वेळ होता कुणाकडे आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे रोज सकाळी लवकर उठणार कोण? त्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या मेला-मेलीकडे मी व्यवस्थितपणे कानाडोळा केला.
असाही मी पळण्यापासून चार हात लांबच होतो. कधीतरी मधेच फिटनेसचा / व्यायामाचा झटका आल्यावर सकाळी उठून बाहेर पडलोच, तरी तेव्हाही, पळायचे ते माझे मित्रच, मी आपला चालायचो. चालणे, पोहोणे, डोंगर चढणे हे सर्व मी मनापासून करायचो पण पळणे हा माझा प्रांत कधीच नव्हता.
तरीपण अरूणच्या इमेल वाचून त्याच्या उत्साहाचे वारे एकदा मलाही लागलेच. पण त्याला सध्या किती अंतर धावताय म्हणून विचारले असता, उत्तर १५ किमी आले, बाप रे! मग काय आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास... इथे १.५ किमी देखील पळू शकेन का ही शंका, त्या १५ किमी पळणाऱ्या महामानवांबरोबर कोण पळणार? त्यामुळे माझ्या पुरता तरी ‘पळणे’ हा विषय तिथेच संपला.
अरुण तरीही इमेल पाठवत रहायचा, आज इकडे पळालो, आज तिकडे धावलो पुणे अर्ध-मॅरॅथॉन, गोवा अर्ध-मॅरॅथॉन, मुंबई पूर्ण मॅरॅथॉन.... आणि मग एक दिवस त्याचा लोकप्रभा मध्ये लेखच छापून आला.
http://www.lokprabha.com/20130329/yuth.htm
तेव्हाही त्याला उत्तर पाठवले, खूप छान आणि प्रेरणादायी लेख म्हणून पण खरेतर मी स्वतः फार काही प्रेरणाबिरणा घेतलेली नव्हती.
दुसऱ्यांना महात्मा बनवले की आपण त्या व्यक्तींसारखे, त्यांच्या इतके मेहनत न घेता, शिस्तबद्ध न वागता, कष्ट न करता, वाटेल तसे मनमुराद वागायला मोकळे असतो ना तसेच मी त्याला, तो ‘लय भारी’ आहे असे म्हणून मोकळे झालो होतो.
वर्ष २०१३
संपत आलेला ऑगस्ट महिना, या वर्षात आमच्या ‘आयाम’ ग्रुपच्या सगळ्या घडामोडी पूर्णपणे थंडावलेल्या. ट्रेकस दोनेक झाले होते आणि इतर कार्यक्रम तर जवळ जवळ बंदच...सगळेच आपापल्या उद्योगामध्ये व्यस्त. गाठ-भेट पण मुश्कील..
अशातच माझ्या वाढदिवसाला ‘आयाम’ मधल्या एका मैत्रिणीचा फोन आला की ती आणि सुनिल प्रभात रस्त्यावर पळायला जाणारेत म्हणजे सुनिलने सुरु करून काही दिवस झालेत आणि ती दुसऱ्या दिवसापासून जाणारे आणि तिच्याबरोबर मी पण म्हणे...
आणि अजून कोणकोण आहेत बरोबर म्हणून विचारले असता उत्तर आले, अरुण आणि त्याचा तो गृप ते सगळे सध्या टिळक तलावावर पोहताहेत, आणि नंतर तिकडेच प्रभात रस्त्यावर पळताहेत. त्यांच्या बरोबर आपणही पळायचेय.
मग काय, नाही म्हणायला फार काही वावच राहिला नाही. मागच्या वर्षीचे; ‘रेसकोर्स लांब आहे’, ‘खूप जास्त अंतर पळताहेत’ वगैरे बहाण-मुद्दे निकालात निघाले होते.
गेल्या काही वर्षांत, मी एक संकल्प करतोय की प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी शिकायचे किंवा नवीन गोष्ट करायची. २०१३चे ८ महिने उलटले तरी त्या संकल्पानुसार काहीही झाले नव्हते. तर मग हे सगळे असे असताना, आयतीच चालून आलेली ही संधी का दवडा? एकीकडे मनात म्हणत होतो रोज कोण येतंय इतक्या सकाळी उठून आणि पळायला तरी कितपत जमेल कोण जाणे असो पळायला जमले तर ठीकच नाहीतर लवकर उठायची सवय तरी लागेल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. असा विचार करून ५ सप्टेंबर रोजी मी भल्या पहाटे उठून आवरून सकाळी ५:५० ला टिळक तलावापाशी जाऊन थांबलो.
टिळक तलावावर पोचलो तर तिथे कोणीच दिसेना (हे आत्ता उन्हाळ्यातील तलावावरची परिस्थिती बघता खोटेच वाटेल पण तो सप्टेंबर महिना होता, काळं कुत्रं देखिल नव्ह्ते तिथे) मग माझ्या मैत्रीणीला फोन लावला तर ती माझ्या आधीच आलेली होती पण टिळक तलावाचे, छोट्या गल्लीतून पूर्वीचे प्रवेशद्वार होते तिकडच्या बाजूला होती. सुनिल अरूण जरा उशीराच आले. थोड्याच वेळात इतर सर्व नवीन मंडळीही आली आणि माझी त्या सगळ्यांशी ओळख झाली. राम, राजस, सिध्दु
आणि तो दिवस माझ्या जीवनास अक्षरश: कलाटणी देणारा ठरला. मला गाजर खायला मिळायचे नव्हते, माझी गाजराची पुंगी वाजायची होती...
क्रमशः
माझे धावणाख्यान २ - शिकवणी
http://www.maayboli.com/node/49334?page=1
क्रमशः ??? मस्त मजा येत होती
क्रमशः ???
मस्त मजा येत होती वाचायला.. मधेच लिंक तुटली.. पटकन पुर्ण करा प्लीज
वा मस्तच रे, वाट बघतोय
वा मस्तच रे, वाट बघतोय पुढल्या भागांची.. एका वर्षात फुल मॅराथॉन पळालास हे ग्रेटच!!
खरेच, पुढे काय ते वाचायची
खरेच, पुढे काय ते वाचायची उत्सुकता लागली आहे.
हं........
हं........
वाचतेय गुरूमहाराज! लवकर लवकर
वाचतेय गुरूमहाराज!
लवकर लवकर लिहा.
Are va! bara jhala lihayala
Are va! bara jhala lihayala ghetalat.. tumhala Arunbaddal je vatala tech sadhya mala tumachyababaddal vatatay!
karan mi 10 mtr suddha palu shakat nahi!!!
asa vatat, kiti palatat he
मस्त........इन्टरेस्टिन्ग!
मस्त........इन्टरेस्टिन्ग! पुढचा भाग येऊ दे!
येणार येणार पुढचा भाग लवकरच
येणार येणार पुढचा भाग लवकरच येणार....
चिमुरीचा पहिला प्रतिसाद आहे म्हणजे माझे लिखाण नक्की पुर्ण होणार (नंदीनीची मोरपिसे देखिल झाली म्हणून म्हणतो)
नंदीनी वाचलेसच हे तर कृपया सकारात्मक अर्थाने घे 
हुरुप वाढवल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद मंडळी
सही आहे.. तुमच्यामुळेच मला पण
सही आहे.. तुमच्यामुळेच मला पण सायकलिंगची गोडी लागली आणि आता मी सायकलिंगमध्ये लांब पल्ले गाठू शकलोय. बाकी तुम्हाला जॉइन करायचा बेत आहेच, तो केव्हा पूर्णत्वास जाईल ते माहित नाही.
हर्पेन मस्त सुरुवात झालीये.
हर्पेन मस्त सुरुवात झालीये. मी पण तुला 'लय भारी' वगैरे म्हणते.

पुढचा भाग मात्र लवकर टाक.
लेखातले तुमचेच शब्द उसने घेऊन
लेखातले तुमचेच शब्द उसने घेऊन
खूप छान आणि प्रेरणादायी लेख
सई, पिंगू, आडो, बोबो पुढच्या
सई, पिंगू, आडो, बोबो पुढच्या वर्षी मायबोलीवर तुम्हा सर्वांचे लेख वाचायला खूप आवडतील....
पुढचा भाग सोमवारी नक्की
सॉल्लिडे रे सगळेच ......
सॉल्लिडे रे सगळेच ......
हर्पेन, वरच्या लोकप्रभातल्या
हर्पेन, वरच्या लोकप्रभातल्या लेखाबद्दल धन्यवाद. मलाही त्या क्लबाचं मेंबर व्हावंसं वाटलं वाचल्यावर.
बरं त्या लेखात लिहीलंय की धावताना तोंडाने श्वासोच्छवास घ्यायचा. घसा कोरडा नाही का पडत असं केल्याने?
मस्त!!! पुढच्या लेखवाचनाला
मस्त!!! पुढच्या लेखवाचनाला अतिशय उत्सुक!
दर वर्षी एक तरी नवीन गोष्ट शिकायचे हा मस्त संकल्प आहे. तो कायम पूर्ण होवो याकरिता शुभेच्छा!!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त रे !! लिही पुढे पटापट..
मस्त रे !! लिही पुढे पटापट..
अरे काय धमाल उडवताय ?चक्क ४२
अरे काय धमाल उडवताय ?चक्क ४२ किमी चे मैरेथॉन आख्यान ?काही हरकत नाही .लेखन शैली आवडली .आठवड्याला साठे आठ किमीचा वेग ठेवलात तरी लिहा .बऱ्याच दिवसांनी अनुभवी नी बावनकशी वाचायला मिळणार .फुटबॉल इतकीच उत्सुकता वाढलीय .
भारी! वाचतेय..
भारी! वाचतेय..
वाट बघतोय पुढल्या भागांची
प्रोत्साहनपर शब्दांबद्दल
प्रोत्साहनपर शब्दांबद्दल अनेकानेक धन्यवाद
पुढचा भाग टाकलाय
http://www.maayboli.com/node/49334
छान लिहिलय... बाकी भागही
छान लिहिलय... बाकी भागही वाचले