ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे
हा फोटो जरूर पहा
https://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...
साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती
खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .
डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत )
Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे
हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .
वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो
या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .
या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .
साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ?
मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .
बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .
चहाची इतकी सवय असते ??
चहाची इतकी सवय असते ??
अभिनंदन... अजुन कमी होउ द्या...
A big WOW !!!!! Hats off
A big WOW !!!!!
Hats off Kedar.
A very practical and inspirational experience… thanks for sharing !!
क्या बात है! मनःपूर्वक
क्या बात है! मनःपूर्वक अभिनंदन!
आधी एका धाग्यावर तुमचे प्रतिसाद वाचले होते. इतके दिवस नेटाने प्रयत्न करून वजन कमी केल्याबद्दल हॅट्स ऑफ!
फक्त तो फोटो केदार
फक्त तो फोटो केदार जाहीरातीसाठी पाठवुन दे......
मस्त लिहिलंय.. महागड्या
मस्त लिहिलंय.. महागड्या जिम्समध्ये न जाता घरच्या घरीही करता वजन कमी करता येते हे बिफोर आणि आफ्टरच्या फोटोंमधुन कळते.
मी.. वजन कमी करायच्या आधीच्या
मी.. वजन कमी करायच्या आधीच्या केदारला पण भेटलोय आणि वजन कमी झाल्यावरच्या केदारला पण भेटलोय... हॅट्स ऑफ टू हिम..
केदार थँक्स फॉर
केदार थँक्स फॉर मोटीव्हेशन...
मला १० किलो कमी करायचय. आजपासुनच सुरुवात करणार.
घरी जाऊन व्यायाम, पाण्याच्या बॉटलमधलं पाणी आधी जाऊन फेकुन येते आणि लिफ्ट टोटली बंद
आय विश की पुढच्या ३-४ महिन्यात मीही इथेच लिहीन
अभिनंदन! मला इतके नाही पण १०
अभिनंदन! मला इतके नाही पण १० किलो कमी करायचेत. आळशीपणा झटकायला हवा!
तुमचं वाचून मी मनावर घेतेय...
तुमचं वाचून मी मनावर घेतेय... अजुन शिंगावर घ्यायचय, पन कासवाच्या गतीने सुरुवात करतेय..
तुम्हाला पुन्हा शुभेच्छा व अभिनंदन!
आत्ताच फोटो पाहीला, (लेख
आत्ताच फोटो पाहीला, (लेख वाचायचाय अजून पण उत्सुकता गप्प बसू देईना)
____________________________/\________________________________
माझा फोटो कधी असा डकवायला मिळतोय कोणास ठाऊक!!! (मार्जीन कमी अस्लं तरी बी तोंडावर कंट्रोल नायीच कसा तो...!!! सगळ्या चमचमीत नी काय ते हाय कॅलरी बिलरी वाल्या गोष्टीच लै आवडतात पुन्हा यायामाची बोंबाबोंब )
सुखद स्वप्न हताश पणे पाहणारी स्वप्नाळू बाहुली.... ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
>> तोंडावर कंट्रोल नायीच
>> तोंडावर कंट्रोल नायीच कसा<<
हाच तर प्रॉबलेम आहे ना, समोसा वगैरे इतका आवडतो ना, मग कधी पाणीपुरी होते, कधी भजी, श्रीखंड(गुढीपाडवा जोरात केला हे सर्व खावून)
असो. इथे डिस्करेज नाही करायचेय कोणाला.
फार प्रामाणिकपणे आणि
फार प्रामाणिकपणे आणि तळमळीनं लिहिलंय. अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
केदारचा हा प्रवास
केदारचा हा प्रवास तुकड्या-तुकड्याने अश्याच कुठल्या कुठल्या बाफवर वाचत आले आहे. त्याची चिकाटी दांडगी आहे. अभिनंदन केदार
आणि दीर्घकाल उत्तम प्रकृतीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
मस्त रे केदार.. अभिनंदन !
मस्त रे केदार.. अभिनंदन !
मायबोलीचे टीशर्ट घ्यायला जमलो तेव्हा तू भेटला होतास पहिल्यांदा आणि नंतर सायकल राईडला.. दोन्हीमध्ये ओळखू न येण्याइतका फरक होता..
फार प्रामाणिकपणे आणि तळमळीनं
फार प्रामाणिकपणे आणि तळमळीनं लिहिलंय. मनःपूर्वक अभिनंदन! >>>> +१००००........
भारी आहेस रे.
भारी आहेस रे.
अभिनंदन केदार! असाच
अभिनंदन केदार! असाच प्रमाणबद्ध राहा!
माझाही अनुभव इथे वाचता येईल.
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
धन्यवाद सर्वाना उदयन , खरोखर
धन्यवाद सर्वाना
उदयन , खरोखर चहाची अशी सवय (अगदी व्यसन म्हटल तरी चालेल )असते
आता ते पूर्णपणे मानसिक असत की खरोखर साखर , चहामधल्या घटकांमुळे होत माहीत नाही .
डाएट न करणार्यानाही त्याचा
डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा>> मस्त
एक जेन्युअन प्रश्न - रोज फक्त
एक जेन्युअन प्रश्न - रोज फक्त १ तास सायकलिंग किंवा सायकलिंग + चालणे आणि वरती दिल्याप्रमाणे आहार... इतकं पुरेसं आहे वजन उतरवायला?
आईच्या गावात.... फोटो आणि
आईच्या गावात.... फोटो आणि घटलेल्या वजनाचा आकडा ऐकूनच हा पोस्ट.. स्वता लठ्ठ नसल्याने अजून उत्सुकतेने वाचला नाही लेख, पण आज घरी जाताना बायकोसाठी प्रिंटच घेऊन जातो..
अवांतर - साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर >>>>>>>>>
हे सही हा.. मी वालचंदलाच असतो तर मी सुद्धा ८ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ ला पास ऑट असतो.. पण आमच्या नशिबी फायनल सर्टिफिकेट वीजेटीआय मुंबईचे लिहिले होते.
एक जेन्युअन प्रश्न - रोज फक्त
एक जेन्युअन प्रश्न - रोज फक्त १ तास सायकलिंग किंवा सायकलिंग + चालणे आणि वरती दिल्याप्रमाणे आहार... इतकं पुरेसं आहे वजन उतरवायला?
>>>>>>>>>>>>>>
तुझे वजन १०५ किलो होईल तेव्हा १ तास सायकल चालवणे म्हणजे काय असते हे तुला समजेल
अभिनंदन केदार , मला पण ३०
अभिनंदन केदार , मला पण ३० किलो कमी करायचेत. आपले नि मो का मी चे inspiration समोर ठेवले आहे. बघूया रेसुल्त कधी मिळेल ते. परत एकदा अभिनंदन .
मनःपूर्वक अभिनंदन! एक प्रश्न
मनःपूर्वक अभिनंदन! एक प्रश्न - भात थोडा खाल्ला तर चालेल का (रोज)?
अभिषेक दादा, मी इन जनरल
अभिषेक दादा, मी इन जनरल विचारलं. वजन कितीही असो पण १ तास सायकलिंग आणि आहार इतकंच पुरेसं आहे की आणखी काही करावं लागेल अशा अर्थी
इज दॅट यू?????????????????
इज दॅट यू?????????????????
आय मस्ट से
रोज फक्त १ तास सायकलिंग किंवा
रोज फक्त १ तास सायकलिंग किंवा सायकलिंग + चालणे आणि वरती दिल्याप्रमाणे आहार... इतकं पुरेसं आहे वजन उतरवायला? >> हो
लेखात एखादा खास पावित्रा नसणे
लेखात एखादा खास पावित्रा नसणे हे फारच आवडले. तसेच, यश मिळवल्याबद्दल अभिनंदन!
Pages