हकीगत एका अपघाताची (अंतिम)

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 March, 2014 - 09:02

http://www.maayboli.com/node/48010

३० जानेवारी २००७ रोजी मी सकाळी १० वाजताच निगडी पोलिस ठाण्यात पोचलो. मुंगसे हवालदार तिथे हजर होतेच. मुंगसे हवालदार म्हणजे कमालीचा सभ्य माणूस. बाहेर कुठे गणवेशाशिवाय भेटले तर ते पोलिस कर्मचारी आहेत हे सांगुनही कुणाला पटलं नसतं. तर मुंगसे मला म्हणाले, "चला तुम्ही पुढे कोर्टात आम्ही येतच आहोत मागून. पिंपरी कोर्ट माहीत आहे ना तुम्हाला?" "

"नाही. पिंपरी न्यायालयात जायचा कधी संबंध आला नाही. ग्राहक न्यायालयात काही वर्षांपूर्वी गेलो होतो पण ते पुण्यात आहे, पिंपरीत नाही. शिवाय न्यायालयात मी तुमच्या गाडीतून जाणार ना? एकटाच कसा जाऊ?"

"आमच्या या गाडीतून?" समोर उभ्या असलेल्या एका गडद निळ्या व्हॆन कडे निर्देश करीत ते म्हणाले, "नाही या गाडीतून आम्ही तुम्हाला कसे नेणार? या गाडीतून आम्ही बरेच खतरनाक आरोपी घेऊन जात आहोत. तुम्ही आमच्या मागे मागे तुमची गाडी घेऊन या."

मग पुढे आरोपींना घेऊन जाणारी, खिडकीला जाळी लावलेली पोलिस व्हॆन, आणि त्यापाठोपाठ बुलेटवर मी अशी आमची वरात निघाली. वीसेक मिनिटांत आम्ही पिंपरी न्यायालयाच्या आवारात पोचलो. तिथे पोचता क्षणी अनेक जणांनी पुढे येऊन व्हॆनला गराडा घातला. बंदोबस्तावरील पोलिसांनी लाठ्या उगारून त्या लोकांना पांगवून लावले. व्हॆनमधून आलेल्या आरोपींचे ते नातेवाईक होते. त्यानंतर व्हॆनचा दरवाजा उघडून पोलिस आरोपींना न्यायालयात घेऊन जाऊ लागले. त्यांच्यापाठोपाठ मीही निघालो.

मला पाहताच मुंगसे उद्गारले, "तुम्ही कुठे आमच्याबरोबर येताय?" "कुठे म्हणजे? अर्थातच न्यायालयात." मी आश्चर्याने उत्तरलो. "चला माझ्याबरोबर" असे म्हणत मुंगसे मला हाताला धरून बाहेरच्या दिशेने निघाले. एका टपरीवजा हॊटेलात त्यांनी मला बसविले. "ते सगळे, चोरी, दरोडी, मारामारी, बलात्कार, खून प्रकरणांमधले आरोपी आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही कुठे आत येता? तुमचा नंबर यायला अजून खूप वेळ आहे. नंबर आला की मी स्वत: तुम्हाला बोलवायला येईल. तोपर्यंत इथे बसून घ्या. चहा नाष्टा उरकून घ्या हवं तर." इतके बोलून मुंगसे हवालदार न्यायालयाच्या दिशेने निघून गेले.

मी त्या टपरीत बसलो असताना माझ्याजवळ काळ्या कोटातील तीन वकील आणि दोन नोटरी येऊन गेले. माझं न्यायालयात काही काम असल्यास ते अतिशय किफायतशीर दरात करून द्यायची तयारीही त्यांनी दर्शविली. अर्थात मला त्यांना विन्मुख परतविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोड्या वेळात मुंगसे हवालदार येताना दिसले. आपल्या नावाचा न्यायालयात पुकारा केला असावा या कल्पनेने मी लगबगीने उठू लागलो तोच मुंगसे जवळ येत मला पुन्हा बसायला सांगू लागले. मुंगसे मला न्यायालयात घेऊन जाण्याकरिता आले नसून माझ्यासारखाच अजून एक तथाकथित "सभ्य आरोपी" घेऊन ते त्याला माझ्याशेजारी बसविण्याकरिता आले होते. ह्या नवीन आरोपीचा गुन्हा काय तर त्याने त्याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान रात्री नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक काळ उघडे ठेवले होते. तर अशा आरोपीला खून, मारामारी, बलात्कार, चोरी प्रकरणातील आरोपींसोबत कसे बसविणार? म्हणून तोही माझ्यासारखाच इथे टपरीत बसणार.

अजून साधारण दोन तास तिथे कंटाळवाण्या अवस्थेत बसून काढल्यावर मुंगसेंनी मला बोलावून घेतले. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले, "हे पाहा, कोर्ट तुम्हाला विचारेल - गुन्हा कबूल आहे का? तर मनात कुठलीही शंका आणू नका. सरळ "कबूल आहे" म्हणा. नाही म्हणालात तर फार अडचण होईल - तुमचीही आणि आमचीही." त्यांचे बोलणे संपता संपताच आम्ही न्यायालयात प्रवेश करते झालो. न्यायालयात चिकार गर्दी होती. काही जण बसलेले आणि अनेक जण उभेही होते. अशातच एका अगदी किनर्‍या आवाजात माझ्या नावाचा पूकारा झाला. पाठोपाठ "गुन्हा कबूल आहे का?" अशी विचारणा झाली. मी "गुन्हा कबूल आहे" असे सांगताच पुन्हा त्याच आवाजात "आरोपी कोण आहे? मला दिसत नाहीये. जरा इथे समोर या" अशी सूचना झाली. खरे तर मलाही इतक्या गर्दीमुळे न्यायाधीश कोण आहे ते दिसत नव्हते. सूचनेसरशी मी समोर एकदम पुढे गेलो तर न्यायासनावर एक अतिशय लहान चणीची नाजूक दिसणारी तरूणी बसलेली होती. तिला पाहिल्यावर माझ्या कल्पनेतल्या न्यायाधीशाच्या प्रतिमेत ती कुठेही बसत नसल्याचे जाणवले. माझ्याकडे आश्चर्याने पाहत तिने पुन्हा मला गुन्हा कबूल आहे का असे विचारले. कदाचित मीही तिच्या आरोपीच्या कल्पनेत कुठे बसत नसेल. मी परत एकदा गुन्ह्याची कबूली दिल्यावर मला एका कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. मी स्वाक्षरी केल्यावर मुंगसेंनी मला पुन्हा बाहेर टपरीपाशी जाण्यास सांगितले.

थोड्याच वेळात मुंगसेही टपरीपाशी आले आणि मला अगदी आनंदात म्हणाले,"चला झाली तुमची सुटका. आताच दंड भरून आलो. किती दंड झाला असेल याची काही कल्पना आहे का तुम्हाला?" मला अर्थातच काहीच कल्पना नव्हती, पण मुंगसे पुन्हापुन्हा माझा अंदाज विचारत होते तेव्हा "झाला असेल चार पाचशे रुपये" असा माझा एक अंदाज मी ठोकून दिला. "फक्त शंभर रुपये." असे म्हणत मुंगसेंनी माझ्या हाती दंडाची पावती दिली. "हे कसे काय शक्य आहे?" मी विचारले. "इतक्या साध्या केसमध्ये कोर्ट थोडीच स्वत:चं डोकं लावतं? हा दंड किती आकारायचा हे आम्ही म्हणजे पोलिसांतर्फे मी आणि कोर्टातर्फे त्यांचे भाऊसाहेब आणि कारकूनच ठरवतात आणि या ठरलेल्या दंडाच्या पावतीवर कोर्ट सही करतं. शिवाय कोर्टानं काही शंका व्यक्त केलीच तर अडचण नको म्हणून आम्ही पंचनाम्यात अपोझिट पार्टीच्या गाडीचे दरवाजे खरडले जाऊन फक्त पाचशे रुपयाचं नुकसान झाल्याचं दाखवलं होतं. शिवाय त्याची गाडीही नोपार्किंग मध्ये उभी होती ही गोष्ट देखील तितकीच खरी होतीना? थोडक्यात तुमची चूक अतिशय किरकोळ असल्याचंच आम्ही प्रेझेंट केलं. त्याचप्रमाणे तुम्ही पहिल्याच सुनावणीत गुन्ह्याची कबूली दिलीत. तारखांवर तारखा पाडून कोर्टाचा वेळ वाया घालवला नाहीत यावरही कोर्ट समाधानी झालं. अर्थात यासाठी मला दोन कारकूनांना प्रत्येकी शंभर रुपये आणि भाऊसाहेबांना दोनशे रुपये द्यावे लागले." एकूण बेरीज करून मी मुंगसेंना पाचशेची नोट काढून दिली. "हे तर झाले कोर्टातले, मला काही नको का?" मुंगसेंनी अगदी गरीब चेहरा करीत विचारले. "किती देऊ?" मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवीत विचारले. "तुम्ही जे द्याल ते मी खुशीने घेईल." मुंगसेंनी पुन्हा चेंडू माझ्याच कोर्टात टाकला. मी निमूटपणे दोनशे रुपये काढून मुंगसेंच्या हाती दिले. ते घेऊन मुंगसे आनंदाने निघून गेले आणि मीही माझ्या घरी निघून आलो.

तिसर्‍याच दिवशी सायंकाळी श्री. शेख यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. पुन्हा त्यांच्या शिकवणी वर्गावर मला बोलावलं. त्याप्रमाणे मी तिथे गेलो. शेख यांनी मला पैशाची मागणी केली. त्यांची इंडिका त्यांनी टाटा च्या बीयू भंडारी यांच्या अधिकृत सेवा केन्द्रात दुरूस्ती करिता दिली होती. तिथे त्यांना दुरूस्तीखर्चाचा अंदाज नव्वद हजार रुपये इतका सांगितला गेला होता. अर्थात त्यांच्याकडे इतकी रक्कम नसल्यामुळे त्यांनी दुरूस्ती प्रलंबित ठेवली होती त्यामूळे त्यांना वाहनतळावर वाहन उभे करण्याचा खर्च म्हणून रोजचे २५० रुपये द्यावे लागत होते. तरी त्यांनी इतका प्रचंड खर्च करण्यापेक्षा बाहेरच्या गॆरेज मध्ये दुरुस्ती करायचे ठरविले होते. हा खर्चही साधारण पन्नास ते साठ हजार रुपये होता. ही रक्कम त्यांना माझ्याकडून अपेक्षित होती. मी अर्थातच ही रक्कम त्यांना देण्यास असमर्थता दर्शविली. ही रक्कम त्यांना माझ्या विमा कंपनीकडून मिळेल असे मी त्यांना आश्वासन दिले. तरीही पुन्हा रोज रोज त्यांची या रकमेकरिता दूरध्वनीवरून विचारणा होऊ लागली.

या रोजच्या कटकटीला कंटाळून मी एक दिवशी पोलिस ठाण्यात गेलो आणि पोलिसांना हा सारा प्रकार कथन केला. "अरे अशी कशी काय तुमच्याकडून नुकसान भरपाई मागू शकतात ते?" पोलिस तावातावाने बोलू लागले, "तुम्ही कायदेशीर रीत्या पोलिसांकडे आलात, पोलिसांनी तुम्हाला आरोपी केले. कोर्टात नेले, कोर्टाने तुम्हाला दोषी ठरविले. त्या दोषाची शिक्षाही दिली. ती शिक्षाही तुम्ही भोगलीत (अर्थात शंभर रुपये दंड भरला). आता तुम्ही शिक्षा भोगून झालेले एक सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही. दिलाच तर आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण देऊ. त्या शेखचा मोबाईल नंबर आम्हाला द्या. पुन्हा परत तुम्हाला त्याचा फोन येणार नाही ही आम्ही तुम्हाला खात्री देतो."

आणि खरंच त्यानंतर पुन्हा श्री. शेख यांनी मला आजतागायत संपर्क साधला नाही. आता या सर्व प्रकरणातील तांत्रिक बाबी अशा की, माझ्या वाहनाने श्री. शेख यांच्या वाहनास धडक दिली. माझ्या वाहनाचा चालक म्हणून माझ्यावर पोलिस फौजदारी खटला भरणार, पण प्रत्यक्षात पोलिस दोन्ही वाहनांची बाजू तपासतात. माझ्या वाहनाचा चालक म्हणून मी इंडिकाला धडक देताना चूकलो हे खरेच. परंतु, श्री. शेख यांची इंडिका ही अशा जागी रस्त्यावर उभी होती जिथे वाहने लावण्यास मनाई आहे, तरीही वाहने लावल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होते. दुसरी बाब अशी की रस्त्यावर धावणारे वाहन इतर वाहनांचे / व्यक्तिंचे किती नुकसान करू शकेल याची काहीच गणती नाही. म्हणजे असे की एखाद्या पन्नास हजार रुपये किंमतीच्या दुचाकीने एखाद्या मासिक एक लाख रुपये वेतन कमा‍वणार्‍या संगणक अभियंत्याला मृत्युमूखी पाडले तर त्याचे वारसदार सहज अडीच तीन कोटी रुपये नुकसान भरपाई मागू शकतात आणि ती रास्त असल्यामुळे द्यावीही लागते. दुचाकीमालक इतकी रक्कम कोठून आणणार? याकरिता रस्त्यावर धावणार्‍या प्रत्येक वाहनास तृतीय पक्ष विमा बंधनकारक आहे. वाहनमालकातर्फे विमा कंपनी ही भरपाई पीडित व्यक्तीला देते. त्याचप्रमाणे जर आपण वाहनाचा संपूर्ण विमा (Comprehensive Policy) उतरविला असेल तर विमा कंपनी आपल्या वाहनाला झालेला दुरुस्ती खर्चही देते. श्री. शेख यांचे वाहन कर्जात होते. अशा वाहनांना संपूर्ण विमा (Comprehensive Policy) बंधनकारक असतो. तो श्री. शेख यांनी उतरविला नव्हता. त्याचप्रमाणे कायद्याने बंधनकारक असलेला किमान तृतीय पक्ष विमा देखील त्यांनी उतरविला नव्हता. इतकेच नव्हे तर त्यांचे वाहन हे त्यांच्या स्वत:च्या नावावर नव्हते. ते कोणा विकास रोकडे यांच्या नावावर होते. या सर्व बाबी फौजदारी खटल्याच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आल्या होत्या.

फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यावर त्या निकालाची प्रत घेऊन दिवाणी न्यायालयात पीडिताने नुकसानभरपाईचा दावा दाखल करायचा असतो. हा दावा अपघा‍त घडवून आणणार्‍या वाहनाच्या चालकावर नव्हे तर मालकावर दाखल करायचा असतो. (म्हणजे आमच्या संदर्भात माझ्या वडिलांवर - कारण वाहन त्यांच्या नावावर होते). त्यानंतर या अपघात घडवून आणणार्‍या वाहनमालकाच्या वतीने त्याची विमा कंपनी दिवाणी न्यायालयात खटला लढते. जर कंपनी हरली तर न्यायालयाच्या आदेशानुसार ठरेल ती नुकसान भरपाई विमा कंपनी अपघात पीडितास देते. आमच्या संदर्भात श्री. शेख हा कायदेशीर मार्ग चोखाळू शकत नव्हते कारण फौजदारी खटल्यात त्यांचे इतके दोष नमूद करण्यात आले होते की दिवाणी दावा जिंकणे त्यांना अशक्यच होते. त्यामुळेच ते थेट माझ्याकडून काही नुकसानभरपाई मिळू शकते का हे पाहात होते. मी पोलिसांची मदत घेतल्यामुळे त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला.

या घटनेत माझ्याकडून व श्री. शेख यांच्याकडूनही काही चूका झाल्या. त्या चूकांवरून बोध घेऊन मी काही नियम कटाक्षाने पाळतो.

  1. जुनाट जड वाहन वापरण्यापेक्षा नवीन, हलके वाहन (जसे की माझी आताची मारूती ओम्नी) वापरणे जेणेकरून त्याची उपद्रव क्षमता किमान असेल.
  2. वाहनाचा कायम संपूर्ण विमा उतरविलेला असणे. (संपूर्ण विम्यात तृतीय पक्ष विमाही समाविष्ट असतो.)
  3. शक्यतो गर्दीच्या रस्त्यावरून पूर्णपणे बाहेर पडत नाही तोवर चौथ्या गिअरमध्ये वाहन न पळविणे. ब्रेक कधीही दगा देऊ शकतात अशा वेळी खालच्या गिअरमध्ये गती झटकन नियंत्रणात आणता येते.
  4. आपल्या हातून इतके करूनही जर चूक घडलीच तर आधी पोलिसांना माहिती देणे कारण इतर कुठल्याही देशाप्रमाणेच आपली न्यायव्यवस्था आरोपीला संरक्षण देते.

(समाप्त)

छायाचित्रासह सलग वाचनाकरिता:-
http://factsandimagination.blogspot.in/2014/03/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्याला नुकसानभरपाई देण्याची प्रक्रीया ही इतकी किचकट आणि वेळखाऊ असल्याने आणि पोलिस तपासणिपेक्षा वेगवेगळे सुटकेचे मार्गं दाखवून केस उडविण्यात रस घेत असल्याने असा अपघात झाल्यास वाहनचालकाला मारहाण करून जास्तीत जास्त रक्कम उकळण्याची लोकांची प्रवृत्ती वाढते.

<< एखाद्याला नुकसानभरपाई देण्याची प्रक्रीया ही इतकी किचकट आणि वेळखाऊ असल्याने >> त्याकरिताच आपले वाहन नवे असेल तर शक्यतो त्याचा पूर्ण विमा (Comprehensive Insurance) उतरविलेला असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपली विमा कंपनी आपल्या वाहनाची नुकसान भरपाई आपणांस देते आणि मग विरुद्ध पक्षाशी न्यायालयीन लढाई करून त्यांचेकडून / त्यांच्या विमा कंपनीकडून मिळविते.

जुनाट जड वाहन वापरण्यापेक्षा नवीन, हलके वाहन (जसे की माझी आताची मारूती ओम्नी) वापरणे जेणेकरून त्याची उपद्रव क्षमता किमान असेल>> अर्ध्या वाक्याला सहमत, पण ओम्नी सारखी गाडी वापरुन स्वतः रिस्क घेवु नये इतकच.

छान लिहिलं आहे तुम्ही. Happy
अपघात होताक्षणी फोटो काढणे व्हिडिओ करणे हिताचे आहे का आपल्या?

धन्यवाद.

<< पण ओम्नी सारखी गाडी वापरुन स्वतः रिस्क घेवु नये इतकच. >>

स्वानुभवाने सांगतो ओम्नी मध्ये इतर वाहनांच्या तूलनेत जोखीम बरीच कमी आहे. कशी ते याच संकेतस्थळावर इतरत्र एका धाग्यात विस्ताराने लिहीलंय.

<< अपघात होताक्षणी फोटो काढणे व्हिडिओ करणे हिताचे आहे का आपल्या? >>

होय. हे निश्चितच आपल्या फायद्याचे आहे. पोलिसांना त्यामुळे पंचनाम्यात काही खोटेपणा करता येणार नाही.

गुड, म्हणजे शेवटी पोलिसच मदतीला धावले. Happy
मी मागच्या लेखावरील माझी पूर्वीची प्रतिक्रिया मागे घेतो. Happy

>>>>>> एखाद्याला नुकसानभरपाई देण्याची प्रक्रीया ही इतकी किचकट आणि वेळखाऊ असल्याने आणि पोलिस तपासणिपेक्षा वेगवेगळे सुटकेचे मार्गं दाखवून केस उडविण्यात रस घेत असल्याने असा अपघात झाल्यास वाहनचालकाला मारहाण करून जास्तीत जास्त रक्कम उकळण्याची लोकांची प्रवृत्ती वाढते.<<<<<<<<<

साती, मारहाणीकरता केवळ तितकेच कारण नसते. अन्गात मुरलेली गुन्डागर्दी, एरवी बाहेर काढता येत नाही तर अशी निमित्ते मिळाल्यास हात साफ करणे / वेळेस खिसेपाकिट्/सोनेनाणे चोरणे/लुबाडणे / करमणूक करुन घेणे या कारणानेच अशी मारहाण होते. Happy
हे जाऊदेच, आख्ख्या भारतातल्या माहित नाही, पण महाराष्टा तल्या कोणत्याही रस्त्यावर/हायवेवर तुम्हाला अ‍ॅक्सिडेण्ट झाल्यास तुम्ही लुटले जाण्याची शक्यता सर्वाधिक असते व त्यात जवळपासाचे स्थानिक लोक ( सामान्य नागरिक बर्का ) सहभागी असतात. अशाच स्वरुपाची बसच्या अपघाताची सत्य कथा माबोवरच मागे कुणीतरी दिलीही होति

<< पण महाराष्टा तल्या कोणत्याही रस्त्यावर/हायवेवर तुम्हाला अ‍ॅक्सिडेण्ट झाल्यास तुम्ही लुटले जाण्याची शक्यता सर्वाधिक असते व त्यात जवळपासाचे स्थानिक लोक ( सामान्य नागरिक बर्का ) सहभागी असतात. >>२००८ साली मी निगडी शिरूर असा ८० किमीचा प्रवास स्कूटरने रोज दोनदा (सकाळी येताना व संध्याकाळी जाताना) करीत असे. सकाळी ठीक ०७:३० वाजता निघून ०९:०० वाजता कार्यालयात पोचत असे. एकदा असाच सकाळी जातेवेळी चाकण शिक्रापूर मार्गावर एका अवघड वळणावर (चाकणपासून १७ किमी आणि शिक्रापूर पासून १३ किमी अंतरावर) एक विदेशी दारूच्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक उलटून पडला होता. वाहतूक खोळंबा झाला होता कारण चारचाकी वाहने पुढे जाऊच शकत नव्हती. माझी दुचाकी असल्याने मी फटी बेचक्यांमधूने पुढे सरकत तिथवर आलो तर अनेक फुटक्या बाटल्या व ओसंडून वाहणारी दारू दिसत होती. अर्थात काही खोक्यांमधील बाटल्या अजूनही शाबूत होत्या. लोक पटापट जमतील तितकी खोकी उचलून नेत होते. महागड्या गाड्यांमधून आलेले प्रवासीही यास अपवाद नव्हते. कदाचित या अपघातामुळे त्यांचा जो कालापव्यय झाला त्याची किंमत बहुदा ते वसूल करीत असावेत. मला वेळीच कार्यालयात पोचायचे असल्याने मी हा खेळ पाहात थांबलो नाही. वाट मिळेल तशी स्कुटर पुढे काढीत वेळेत कार्यालयात पोचलोही. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली असताही मी कसा वेळेत पोचलो हे मी सहकार्‍यांना कथन केले. तर "एखादा तास उशिरा पोचला असतात तरी काही बिघडले नसते. तुमच्या पूर्ण दिवसाच्या वेतनाएवढी रक्कम आम्ही दिली असती की पण दोन, तीन खोकी आमच्याकरिता घेऊन यायला हवी होती." अशी प्रतिक्रिया ऐकावी लागली.

पण महाराष्टा तल्या कोणत्याही रस्त्यावर/हायवेवर तुम्हाला अ‍ॅक्सिडेण्ट झाल्यास तुम्ही लुटले जाण्याची शक्यता सर्वाधिक असते व त्यात जवळपासाचे स्थानिक लोक ( सामान्य नागरिक बर्का ) सहभागी असतात.
<<
लिंबूटिंबू यांनी लिहिलेल्या या वाक्यात काहीही चुकीचे नाही. आपल्या देशभर हीच परिस्थिती आहे.

चेतन, पुर्ण कथा वाचली, माझे ३ अनुभव आहेत २ अपघाताचे आणि एक ब्रेक फेल होण्याचा.
नशिबाने ब्रेक फेल होते तेव्हा अपघात झाला नाही.

बाकी वर दारूच्या ट्रकबद्दल आणि लुटीबद्दल जे लिहिले आहे, असे होते हे जरी माहित असले तरी वाचून मन फारच उद्विग्न, विषण्ण आणि काय काय झाले.
आपल्या देशात अनेक लोकांच्या तनामनात मुरलेली ही अतिशय भिकार, लुटारू आणि स्वार्थी मनोवृत्ती कशी बदलली जाईल हेच कळत नाही. Sad

महेश....

"...अतिशय भिकार, लुटारू आणि स्वार्थी मनोवृत्ती कशी बदलली जाईल हेच कळत नाही...."

~ तुमच्या प्रतिसादाला पूर्ण अनुमोदन देत असताना वरील वाक्यासंदर्भात [अनुभवाने] इतकेच म्हणू शकेन की, "महेश, हे होणे नाही.....".

@ चेतन सुभाष गुगळे

"...महागड्या गाड्यांमधून आलेले प्रवासीही यास अपवाद नव्हते...." ~ काय बोलावे अशा मनोवृत्तीच्या लोकांबद्दल ? मन खिन्न होऊन गेले असेल तुमचे ते दृष्य पाहताना. मागे एकदा पुणे-कोल्हापूर हाय वे नंबर ७ वर पेट्रोल टॅन्कर उलटला होता तर बाजूच्या खेडेगावातील लोक बादली, टमरेल, बाटल्या, इतकेच नव्हे तर स्वयंपाकाची भांडीदेखील आणून ते गळणारे पेट्रोल घेऊन अक्षरशः पळत होते....आणि त्या वाहत्या पेट्रोलला आग लागल्यावर त्यातील काही सापडलेदेखील.....त्याच मार्गावर विवाहसमारंभाचे चित्रण करायला चाललेल्या दोन मित्रांनी या "लुटमारी"चे चित्रण केले होते.....फार शोचनीय अशी अवस्था होती ती....."फुकटचे" नामक शब्दाचा मोह नावाचा प्रकार अजूनही सुटत नाही.

अशोकजी,

तुम्ही म्हणता तसेच आहे हे, पण अजुनही काही होऊ शकेल असे वाटते कधी कधी.
जमल्यास या विषयावर अन्यत्र चर्चा करूयात.

अशोक आणि महेश,

आपल्या नागरिकांच्या लुटारू वृत्तीबद्दल आपण सखेद चिंता व्यक्त केली आहे. अर्थात सर्वच जण असे नाहीत हे खरे असले तर बहुसंख्य लोक असेच आहेत. ट्रकच्या मागे लिहीलेले असतेच - "सौमें नब्बे बेईमान फिर भी मेरा भारत महान".

अर्थात या लुटीला दुसरीही एक बाजू आहे - आपल्या देशाचे नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा नाहक नाडले जातात, पोलिसांकडून, वकिलाकडून, इतर सरकारी अधिकार्‍यांकडून, गल्लीतल्या गुंडांकडून. मग अशी कधी संधी मिळाली तर हे लुटले जाणारे लुटण्याची हौसही भागवितात.

>>पोलिसांकडून, वकिलाकडून, इतर सरकारी अधिकार्‍यांकडून, गल्लीतल्या गुंडांकडून
हे पण आधी नागरिक आहेत. शेवटी सगळे मिळून राजकारण्यांकडे बोट दाखवतील.

उत्तम कांबळेंचा हा लेख वाचा.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=e5I4P

महत्वपुर्ण माहीती व अनुभव तुम्ही लिहिला आहे.
मी तुम्हाला सीटबेल्टची आवश्यक्यता याबाबत जे लिहिले ते पटले याबद्दल धन्यवाद. Happy

धन्यवाद महेश आणि सिनि,

बाय द वे, माझा टेम्पो ट्रॅक्स वाहनाचा ज्यांच्या इंडिका वाहनासोबत अपघात झाला ते नौशाद अहमद शेख(वय 53, रा. आकुर्डी) आता सध्या पुन्हा चर्चेत आहेत.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/crime/articlesho...

http://www.globalmarathi.com/20141118/4961294214696045367.htm

http://news.nwn.in/2014/11/15/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4...

http://www.lokmat.com/storypage.php?catid=12&newsid=3682193