गेडेसालचा झुंजार योध्दा

Submitted by स्पार्टाकस on 9 December, 2013 - 18:21

ही रुढार्थाने शिकारकथा नाही. जनावरावर गोळी घालून मी त्याची शिकार केली अथवा त्याला जखमी केलं असं या कथेत घडलेलं नाही. उलटपक्षी या शूर आणि धाडसी योध्द्यावर मी एकदाही गोळी झाडली नाही आणि कधी झाडणारही नाही. त्याच्या धैर्याबद्दल आणि दिलदारपणाबद्दल मला अपार आदर होता. आजही तो जर जीवंत असला तर त्याच्या कळपाचा लाडका नायक म्हणून तो निश्चीतच जंगलात फिरत असेल याविषयी मला शंका नाही. त्याला माझा जवळचा मित्रं म्हणवून घेणं मला फार आवडलं असतं

उत्तर कोइंबतूर जिल्ह्यात गेडेसाल हे एक लहानसं खेडं आहे. गावची बहुतेक सर्व वस्ती शोलगा आदिवासींची आहे. कोल्लेगल शहरापासून डिमबमकडे जाणा-या रस्त्याचा सर्वात वरच्या वळणापाशी रस्त्याला लागूनच गेडेसालचा डाकबंगला आहे. गेडेसाल आणि डिमबम दरम्यानच्या टेकडीवरून वळणं घेत हा रस्ता सुमारे पाच मैल खाली उतरतो आणि शेवटचे दोन मैल पुन्हा उंचीवर चढून डिमबम गावात पोहोचतो. डिमबमच्या दक्षिणेला तीव्र वळणं घेत हा रस्ता पठारावर उतरून सत्यमंगलम शहराकडे जातो.

गेडेसालच्या पश्चिमेला बिलीगिरीरंजन पर्वतरांग पसरलेली आहे. या पर्वतरांगेच्या उतारांवर गवताच्या जंगलातून मध्येच पुंजक्यासारखी झाडं उगवलेली दृष्टीस पडतात. मधूनच पुंजक्यासारख्या उगवलेल्या आणि बेटांप्रमाणे दिसणा-या या जंगलाच्या तुकड्यांना या भागात शोलगा म्हणतात. गेडेसालच्या पूर्वेला या पर्वतराजीपेक्षा ब-याच लहान टेकड्या आहेत. या टेकड्यांवर उंच गवताचं जंगल पसरलेलं आहे. हे गवत सुमारे दहा फुटांपर्यंत वाढतं. हत्तीचा अपवाद वगळता जंगलातला कोणताही प्राणी त्यात लपून राहू शकतो. या गवतातच मधून मधून उगवलेली जंगली खजूराची अनेक झाडं दृष्टीस पडतात. साधारण डिसेंबरच्या सुमाराला या खजुराच्या झाडांना पिवळसर रंगाच्या खजुराच्या फळांचे घड लागतात. हे खजूर खाण्यासाठी अनेक पक्षांची आणि जनावरांची झुंबड उडते.

हा सगळा प्रदेश सांबर, अस्वल आणि रानरेड्यांच्या हालचालीसाठी अत्यंत योग्य आहे. कोल्लेगल - डिमबम रस्ता ज्या दक्षिणोत्तर पसरलेल्या दरीला लागून जातो ती दरी म्हणजे तर जनावरांच्या दृष्टीने स्वर्गच ! याच रस्त्यावर गेडेसालची वस्ती आणि डाकबंगला आहे.

गेडेसालचा डाकबंगला इतर बंगल्यांच्या तुलनेने बराच मोठा आहे. बंगल्याच्या आवारातच वनखात्यातल्या कर्मचा-यांची सरकारी निवासस्थानंही आहेत. बंगल्याच्या फाटकाभोवती जंगली गुलाबाची अनेक झुडूपं वाढलेली आहेत. या गुलाबाच्या लहानलहान फुलांचे ताटवे अतिशय प्रेक्षणीय दिसतात.

डाकबंगल्याच्या दक्षिणेला एक लहानसं तळं आहे. या तळ्याच्या आसपासचा प्रदेश काहीसा दलदलीचा आहे. या संपूर्ण प्रदेशात फक्तं इथेच हिरव्या गवताचा पट्टा असल्याने चितळांचे अनेक कळप इथे नेहमीच दृष्टीस पडत. त्यापैकी एका कळपाच्या नायकाने माझं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. त्याची शिंगं अत्यंत प्रेक्षणीय आणि डौलदार होती. देव करो आणि तो कोणाच्याही गोळीला बळी न पडता त्या जंगलात सुखाने भटकत राहो !

रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या कमी उंचीच्या टेकड्या आणि पश्चिमेला रस्त्याला लागूनच असलेल्या दरीमध्ये रानरेड्यांचे अनेक कळप फिरताना नजरेस पडत. एक मोठ ओढा या दरीतून वाहतो. टेकड्यांवरून वाहत येणारे अनेक लहान-लहान झरे या ओढ्याला येऊन मिळतात. बारमाही पिण्याचं पाणि उपलब्धं असल्याने या भागात राहणारे रानरेडे सहसा दुसरीकडे जाणं पसंत करत नाहीत.

रानेरेड्यांच्या कळपात वीस पासून चाळीस अथवा त्यापेक्षा कितीही जास्तं जनावरं असू शकतात. कळपात मुख्य भरणा असतो तो म्हशी आणि वेगवेगळ्या वयातल्या रेडकांचा. त्यांच्याव्यतिरीक्त सुमारे सहा-सात थोराड नरही कळपात असतात. सर्वात वयस्कर आणि अनुभवी नराकडे कळपाचं पुढारीपण अर्थातच चालून येतं. जो पर्यंत एखादा तरूण नर त्याला हुसकावून त्याची जागा घेत नाही अथवा तो एखाद्या मांसभक्षक शिका-याच्या हल्ल्याला बळी पडत नाही तोपर्यंत कळपावर त्याची सत्ता चालते. क्वचित एखादा रानरेडा आपला कळप सोडून जंगलात एकटाच भटकताना आढळतो. असा रानरेडा अतिशय आक्रमक आणि घातकी असतो.

जंगलात वावरणा-या रानरेड्यांमध्ये गुरांमध्ये आढळणारा तोंडात आणि पायात किडे पडण्याचा रोग पुष्कळ वेळा दिसून येतो. या भागात राहणा-या शोलगा आदिवासींच्या जंगलात येणा-या गुरांमुळे हा रोग रानरेड्यांत पसरतो. अनेकदा या रोगाला रानेरेडे बळी पडल्याचं या विभागात आढळलेलं होतं.

रानरेड्यांचा एक मोठा कळप माझ्या नेहमी दृष्टीस पडत असे. या कळपात सुमारे तीस जनावरं होती. या कळपाचा नायक एक मोठाथोरला रेडा होता. उगवत्या सूर्यकिरणांत दवबिंदू चमकत असताना किंवा संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला ३९ आणि ४१ व्या मैलाच्या दगडांच्या दरम्यान तो हटकून दिसत असे. त्याचं डावं शिंगं आतल्या बाजूला वळून पुढे आलेलं होतं. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे इतर रानरेड्यांमधून त्याला हुडकून काढणं अगदी सोपं होतं.

त्याचं शिंगं असं वाकडं झाल्यामुळेच रानरेड्याच्या शिंगांच्या मागे असणारे शिकारी अद्याप त्याच्या वाटेला गेलेले नसावेत. समोरासमोरच्या टकरीत त्याचं वाकडं झालेलं शिंगं हे अतीशय उपयोगी पडणारं शस्त्रं होतं. शिंगाच्या वैशिष्ट्यामुळे झुंजीत कोणत्याही जनावराला एकाच जागी खिळवून ठेवणं अथवा उचलून फेकूण देणं त्याला सहज शक्यं झालं होतं.

या रस्त्यावरून रात्रीच्या अंधारात अनेकदा मी कारने भटकत असे. कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात अनेकदा वेगवेगळे प्राणी माझ्या नजरेस पडत असत. दोन-तीन वेळा मला एका भल्या मोठ्या रानरेड्याचे डोळे हेडलाईटच्या प्रकाशात चमकताना दिसले होते. नीट निरखून पाहिल्यावर ते डोळे या रानरेड्याचे असल्याचं माझ्या ध्यानात आलं होतं.

या रानरेड्याने काही वर्षांपूर्वी प्रथम माझं लक्षं वेधून घेतलं होतं. मी बिलीगिरीरंजन रांगांच्या पायथ्याशी भटकंती करण्यास निघालो होतो. या भागात एक लहानशी वाट जंगलातून फिरून पश्चिमेच्या बाजूने मुख्य रस्त्यावर येऊन गेडेसाल गावाला वळसा घालते आणि झरा ओलांडून पर्वताच्या पायथ्यावरून वर चढत एका खिंडीतून पलीकडच्या दरीत उतरते. पलीकडच्या दरीत उतरलेली वाट पुढे दक्षिण भारतात कॉफीच्या अनेक मळ्यांचा मालक असलेल्या आणि उत्तम शिकारी म्हणून प्रसिध्द असलेल्या रॅन्डॉल्फ मॉरीसच्या कॉफीच्या मळ्यात शिरते. खिंडीपासून ब-याच अंतरावर अलि़कडे वनखात्याचं एक लहानसंच शेडवजा विश्रामगृह होतं. जंगलात फेरफटका मारणा-या अधिका-यांना आणि परवानाधारक शिका-यांना त्याचा उपयोग होत असे. कोणी दूरदर्शी माणसाने वेलींच्या सहाय्याने तयार केलेली मजबूत शिडी इथे ठेवलेली होती. झाडांवर चढण्याची कला अवगत नसणा-यांसाठी माचाणावर चढण्याकरता या शिडीचा उपयोग होत असे.

त्या सकाळी या शेडवजा विश्रामगृहावरून पुढे आल्यानंतर मी एका लहानशा दरीच्या कडेने चाललो होतो. काही अंतरावरूनच मला शिंगांच्या टकरीचे आणि डुरकण्याचे आवाज येऊ लागले. आवाजावरूनच रानरेड्यांची झुंज चालू असल्याचा मला अंदाज आला होता. मिळेल त्या आडोशाचा आधार घेत दबकत दबकत मी त्या दिशेने गेलो. काही वेळातच माझ्यापासून सुमारे तीनशे यार्डांवर दरीत एकमेकांशी झुंजणारे दोन रानरेडे माझ्या नजरेस पडले. आपली शिंगं रोखून आणि भलंमोठं कपाळ एकदुस-याला भिडवून मोठ्या त्वेषाने ते एकमेकाला भिडले होते. दोघंही आपला सगळा जोर लावून प्रतिस्पर्ध्याला मागे रेटण्याच्या प्रयत्नात होते. काही क्षण डोकं मागे घ्यावं आणि मग जोरात ढुशी द्यावी असं सतत चाललं होतं.

त्या दोनपैकी एका रानरेड्याचं शिंगं वळून पुढे आल्याचं माझ्या ध्यानात आलं. आपल्या शिंगाचा खुबीने वापर करून त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला जागोजागी घायाळ केलेलं दिसत होतं. त्याचा प्रतिस्पर्धी मान, खांदे आणि दोन्ही बाजूंना झालेल्या जखमांतून वाहणा-या रक्ताने न्हाऊन निघाला होता.

सुमारे वीस मिनीटे ते आवेशाने झुंजत होते. घामाने आणि रक्ताने दोघांचंही अंग भरलं होतं. त्यांच्या तोंडातून गळलेली लाळ त्यात मिसळत होती. दोघांपैकी कोणीही मागे हटायला तयार नव्हतं.

मी यापूर्वी कधीही रानरेड्यांची झुंज पाहीली नव्हती त्यामुळे त्याचा निकाल काय लागतो याची मला उत्सुकता होती. सुदैवाने मी कोणताही आवाज केला नव्हता. वाराही नेमका त्यांच्या कडून माझ्या दिशेने वाहत असल्याने त्यांना माझा वास जाण्याचाही संभव नसता. झाडाआडून त्यांची कुस्ती पाहणा-या एकुलत्या एका प्रेक्षकाची त्यांना काहीही कल्पना नव्हती.

वाकड्या शिंगाचा त्या रानरेड्याची हळूहळू सरशी होत असल्याचं माझ्या ध्यानात आलं. आपल्या शिंगाचा उपयोग करून त्याने प्रतिस्पर्ध्याला भोसकून काढलं होतं. त्याला स्वतःलाही अनेक जखमा झाल्या होत्या. सुमारे दह-पंधरा मिनीटांनी दुसरा रानरेडा कच खाऊ लागला. माघार घेताना तो अनेकदा गुडघ्यांवर धडपडत होता. त्या वेळी तो वाकडं शिंगवाला आपल्या अचूक मोका साधत वाकड्या शिंगाने प्रहार करत असे ! अखेरीस दुसरा रानरेडा पळून जाण्यासाठी वळला आणि अडखळत काही अंतर जातो न जातो तोच या रानरेड्याने त्याच्या पार्श्वभागावर जोरदार धडक दिली. त्या युध्दाचा शेवट काय झाला हे मात्र मला कळू शकलं नाही. दरीच्या एका टोकाला जात ते दोघं जंगलात दिसेनासे झाले.

निव्वळ उत्सुकतेपोटी मी दरीत उतरून त्या जामिनीचं निरीक्षण केलं. दोन्ही रानरेड्यांच्या खुरांमुळे वीस यार्डाच्या परिघातली जमीन उखडून निघाल्यासारखी दिसत होती, सर्वत्र रक्ताचा आणि लाळेचा सडा पडलेला होता.

त्यानंतर काही महीन्यांनी तो मला पुन्हा दिसला. एका वाघाने गेडेसालच्या गुराख्यांची दोन-तीन गुरं मारली होती. त्याच्या मागावर मी त्या परिसरात आलो होतो. ४१ व्या मैलाच्या दगडापासून सुमारे पाव मैलांवर पूर्वेला असलेल्या एका लहानशा पाणवठ्याच्या परिसरात वाघाचा वावर होता. गुराख्यांनी कित्येक वेळी या वाघाला पाहिलं होतं.

मी सुमारे साडेचारच्या सुमाराला त्या पाणवठ्याचुआ परिसरात पोहोचलो. पाणवठ्यावर कोणत्या जनावरांचा वावर होता याचा तपास करण्याच्या हेतूने मी त्याच्याभोवती एक प्रदक्षीणा घातली. हत्ती, रानरेडे, सांबर, चितळ, तरस आणि रानडुकरांचे माग मला गवसले. वाघ तीन वेळा त्या पाणवठ्यावर येऊन गेला होता. पंजांच्या ठशावरुन वाघाची शेवटची फेरी तीन दिवसांपूर्वी झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं.

रानरेड्याच्या ठशांपैकी एका रानरेड्याचे ठसे चांगलेच मोठे होते. दलदलीच्या प्रदेशाता त्याच्या पायांमुळे सुमारे फूटभर खोलीचे खड्डे पडले होते. त्या परिस्ररात अनेक ठिकाणी मला त्याचा संचार असल्याची कल्पना आली. मी बरोबरीच्या शोलगा आदिवासी तरूणाकडे या रानरेड्याच्या मागांची चौकशी केली. त्याने आणि सर्वच गावक-यांनी अनेकदा तो रानरेडा आपल्या कळपासहीत चरत असलेला पाहीला होता. त्याचं डावं शिंगं वाकडं होऊन पुढे आलेलं होतं. शिंगाचं ते वैशीष्ट्य माझ्या चांगलंच ध्यानात होतं. मी झाडाआडून मी निरीक्षण केलेया झुंजीत विजेता ठरलेला रानरेडाच होता तो !

त्या शोलगा आदिवासीची त्या रानरेड्याचा माग काढण्याची तयारी होती. त्या पाणवठ्याच्या आसपासच तो आपल्या कळपासह चरत असतो असंही त्याने मला सांगीतलं. मी त्यावेळी त्याला नकार दिला. भरदिवसा रानरेड्याचा माग काढणं हे सोपं नसतं. उपलब्ध आडोसा आणि वा-याची दिशा अशा वेळेला खूप महत्वाची असते. रानरेड्याची दृष्टी अधू असली तरी त्याचं घ्राणेंद्रीय अत्यंत तीक्ष्ण असतं. मैलभर अंतरावरूनही तो वासाने आपल्या शत्रूला ओळखू शकतो.

आम्ही जंगलातून गुरांच्या पायवाटांनी आरामात भटकत होतो. अशाच एका पायवाटेवरून जाताना अचानक सुमारे तीस यार्डांवरचं गवत दुभंगल्यासारखं बाजूला झालं आणि एका प्रचंड रानरेड्याचं डोकं आणि बळकट खांदे आम्हांला दिसले. त्याचं डावं शिंगं वाकडं होऊन पुढे वळलेलं होतं. त्याला मी पाहताक्षणीच ओळखलं.

आम्हाला पाहताच तो आमचं निरीक्षण करत उभा राहीला. त्याच्या डोळ्यात भीतीचा लवलेशही नव्हता पण आमची फारशी दखल त्याने घेतल्याचं जाणवलं नाही. आणखी काही यार्ड आम्ही पुढे जातात तो एकदम वळला आणि उंच गवतात दिसेनासा झाला.

त्या दिवसानंतर अनेकदा तो मला दिसला. आपल्या कळपासह ४१ व्या मैलाच्या दगडापाशी चरताना तो हटकून नजरेस पडत असे.

एकदा एक चोरटा शिका-याने त्या मार्गाने येताना एका रानम्हशीवर गोळी झाडली. त्याला दुसरी गोळी झाडायला अवसर मिळण्यापूर्वीच एका मोठ्या रानरेड्याने त्याच्या जीपला धडक दिली आणि ती शिंगाने उलटवली. उलटलेली जीप एका कोरड्या ओढ्याच्या पात्रात जाऊन पडली ! नशीबाने जीपमधल्या शिका-यांचा निकाल लागला असावा अशी समजूत झाल्याने त्याने पुन्हा हल्ला केला नाही. शिका-याच्या जीवावरचं संकट पाय दुखावण्यावर आणि रायफलीचा चक्काचूर होण्यावर निभावलं. शिका-याबरोबर असलेल्या शोलगा आदिवासीने हल्ला करणा-या रानरेड्याला जवळून पाहीलं होतं. तो डावं शिंग वाकडं असलेला गेडेसालचा रानरेडाच असल्याचं त्याने खात्रीपूर्वक सांगीतलं. मला काही महिन्यांनी ही हकीकत कळल्यावर त्याचा अभिमानच वाटला. कळपाचा नायक म्हणून आपल्या कळपाचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्यंच होतं आणि त्याने ते योग्य प्रकारे पार पाडलं होतं !

१९५३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी डिमबमच्या वाटेवर असताना मला राचेन नावाचा एक आदिवासी गेडेसालजवळच रस्त्यात भेटला. मी त्या परिसरात शिकारीसाठी भटकताना नेहमी मी त्याला बरोबर नेत असे, जनावरांचे माग काढण्यात तो पटाईत होता. त्याला पाहताच मी गाडी थांबवली.

" काय राचेन, जंगलाची काय खबर ?" त्याने केलेल्या अभिवादनाचा स्वीकार करत मी प्रश्न केला.

उत्तरादाखल त्याने मला दोन रात्रींपूर्वीच जंगलात वाघ आणि दुस-या एका मोठ्या जनावरामध्ये झालेल्या जोरदार लढाईची बातमी सांगीतली !

गावापासून जवळच जंगलात दोन जनावरांची जबरदस्त झुंज लागली होती. दोनपैकी एक वाघ होता हे त्याच्या डरकाळ्यांवरून समजून येत होतं. दुसरा प्राणी कोण असावा याबद्दल गावक-यांच्या मनात संभ्रम होता. बराच वेळ चाललेल्या युध्दावरून ते रानडुक्कर नसावं असा गावक-यांचा तर्क होता. हत्ती असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण हत्ती असता तर त्याच्या ट्रंपेटसारखा आणि चित्कारल्याचा आवाज आला असता. रात्री उशीरापर्यंत जनावरांचे आवाज येत होते परंतु मध्यरात्रीनंतर हळूहळू आवाज बंद झाले. झुंजीचा शेवट होण्यापूर्वी वाघाच्या वेदनायुक्त डरकाळ्यांचा आवाज गावक-यांनी ऐकला होता. त्यावरून वाघ चांगलाच जखमी झाला असल्याची त्यांना कल्पना आली होती.

दुस-या दिवशी सकाळी उत्सुकतेपोटी आदिवासींनी त्या जागी जाऊन पाहणी केली. आदल्या रात्रीच्या कुरुक्षेत्राची जमीन अक्षरशः उध्वस्त झालेली होती. लढाईच्या क्षेत्राच्या एका बाजूला वाघ मरुन पडलेला होता ! एका मोठ्या रानरेड्याने वाघाला ठिकठिकाणी तुडवलं होतं ! आपल्या धारदार शिंगाने त्याने वाघाला जागोजागी भोसकलं होतं ! मात्रं वाघाला यमसदनी पाठवणा-या रानरेड्याचा आता तिथे मागमूस नव्हता. बहुतेक जंगलाच्या अंतर्भागात जाऊन तो देखील मरण पावला असावा. आदिवासींनी वाघाची कातडी सोडवली आणि गाव गाठलं.

दुपारचे बारा वाजले होते. हाताशी भरपूर वेळ असल्याने ती जागा नजरेखालून घालावी असा मी विचार केला. राचेनसह मी गेडेसाल गाठलं. गावात प्रवेश करतानाच वाघाची कातडी जमिनीवर वाळत घातलेली माझ्या दृष्टीस पडली. संपूर्ण कातडीला राख फासलेली होती. मीठाची कमतरता असल्याने कातडी खराब होण्यापासून वाचवण्याचा तेवढा एकच मार्ग शोलगांना ठाऊक होता.

मी वाघाच्या कातड्याचं नीट निरीक्षण केलं. पूर्ण वयात आलेला मोठा नर वाघ होता तो. रानरेड्याने वाघाला अनेक ढुशा दिल्या होत्या. लाथांनी जोरदार तुडवलेलं दिसत होतं. कातड्यात पाच मोठी भोकं पडलेली स्पष्टं दिसत होती. रेड्याचं धारदार शिंगं तिथे वाघाच्या शरिरात घुसलेलं होतं ! सर्वात डाव्या बाजूला पडलेल्या भोकावरून शिंग वाघाच्या ह्रदयात घुसल्याने त्याला मृत्यू आल्याचं समजून येत होतं !

मला आता ती झुंजीची जागा नजरेखालून घालण्याची तीव्र इच्छा झाली. तिथल्या जमिनीची अवस्था वादळात सापडल्यासारखी दिसत होती. आसपासच्या सर्व झाडा-झुडूपांची वाघ आणि रानरेड्याच्या वजनाखाली वाताहात झालेली होती. जमिनीवर आणि झुडूपांवरही जागोजागी रक्ताचा सडा पडलेला होता. आदिवासींनी वाघ नेमका कुठे मरून पडला होता ती नेमकी जागा मला दाखवली.

एकंदर सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर वाघाला खलास करणारा रानरेडाही जबरदस्त जखमी झाला असावा असा मी कयास केला. जंगलात फिरून त्याचं कलेवर शोधावं अथवा जखमी अवस्थेत मरणासन्न होऊन पडलेला असल्यास त्याचा माग काढून त्याला यातनांतून मुक्त करावं असा विचार माझ्या मनात आला.

एखाद्या नवख्या माणसालाही त्या रानरेड्याचा माग काढता आला असता इतकं रक्तं वाटेवर सांडलेलं दिसत होतं. टेकडी उतरून तो जंगलातून वाहणा-या झ-याच्या दिशेने गेलेला दिसत होता. सुमारे दीड तासात रक्ताचा माग काढत आम्ही त्या झ-यापाशी पोहोचलो. एका मोठ्या झाडाला टेकून रानरेडा झ-याच्या पात्रात उभा होता. त्याचे पाय पाण्यात बुडालेले होते. आमचा आवाज जाताच त्याने वळून आमच्याकडे पाहीलं.

मी त्याला पाहताक्षणीच ओळखलं ! त्याचं डावं शिंगं वाकडं होऊन पुढे वळलेलं होतं !

तो माझा मित्र - गेडेसालचा रानरेडाच होता !

आम्ही उभे होतो त्या जागेवरूनही तो गंभीर जखमी झाल्याचं आम्हाला दिसत होतं. त्याचा चेहरा, मान, पाठ आणि पार्श्वभागावर वाघाचे धारदार दात आणि पंजांच्या नख्यांमुळे झालेल्या जखमा दिसत होत्या. पोट फाटलं होतं आणि एक लालसर आकाराचा तुकडा लोंबत होता. तो त्याच्या आतड्याचा भाग होता. कदाचित पोटावरच्या कातडीचाही तुकडा असू शकत होता. तो उभा होता त्या जागी सावली असल्याने ते नक्की काय होतं हे माझ्या नजरेस पडलं नाही.

मात्र त्याच्या डोळ्यांत अद्यापही भीतीचा लवलेशही नव्हता. आपली बेदरकार नजर रोखून तो आमच्याकडे पाहत होता.

काही क्षणांनी तो वळला आणि झरा ओलांडून पलीकडच्या काठावरच्या जंगलात निघून गेला.

त्याला गोळी घालून वेदनांतून मुक्त करावं असं क्षणभर मला वाटलं. पण तो विचार मी रहीत केला. नुकतंच त्याने वाघासारख्या शत्रूला पाणी पाजलं होतं. नुसतं पळवून लावण्यात समाधान न मानता वाघाशी निकराची लढाई करून त्याने त्याचा निकाल लावला होता.

त्याच्या शौर्याचा अपमान करण्याची माझी हिम्मत नव्हती.

पुन्हा कधीही तो मला दिसणार नाही याबद्दल मला हुरहुर लागून राहीली.

पण त्यानंतर काही महिन्यांनी मी पुन्हा गेडेसालला गेलो असताना तो मला दिसला ! ४१ व्या मैलाजवळच्या त्याच्या आवडत्या प्रदेशात आपल्या कळपासह तो मजेत चरत होता. त्याची पोटाची जखम पूर्ण भरून आलेली होती !

देव करो त्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या मालकीच्या त्या रानात तो आणखीन बरीच वर्षे सुखाने कालक्रमणा करत राहो !

( मूळ कथा : केनेथ अँडरसन )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, ही कथा देखील शिकारकथा नसूनही खूपच सुरेख जमलीये....

एक रानरेडा एका वाघाला लोळवतो हे आतापर्यंत कधीही ऐकले नव्हते, कोणी सांगितले असते तर त्यावर विश्वासही बसला नसता ...

अँडरसनसाहेबांच्या जंगलातील अनुभवांच्या पोतडीत काय काय भरले असेल याची ही तर चुणुकच वाटते - प्रत्यक्षात हा माणूस पूर्ण जंगल वाचू शकणारा (तिथल्या झाडे, पक्षी, प्राणी, आदिवासी यांसकट) असा वाटतोय....
केवळ ग्रेट व्यक्तिमत्व ..... कॉर्बेट साहेबांसारखे यांचे नावही एखाद्या अभयारण्याला द्यायला हवे होते......

अनुवाद अप्रतिम.... असेच लिहित रहा, आम्ही आवडीने वाचत आहोत.. Happy

स्पार्टाकस,

अप्रतिम....तुमच्या सर्व अनुवादित कथा मी वाचल्यात....निव्वळ अप्रतिम. Happy
केनेथ अँडरसन आणि तुम्ही दोघे ही भारीच Lol

स्पार्टाकस, < असेच लिहित रहा, आम्ही आवडीने वाचत आहोत..> +१ तुमची अनुवाद शैली जबरदस्त आहे... >>> नक्किच , पुन्हा एकदा धन्यवाद ! Happy

सर्वांचे मनापासून आभार.
कथेचं श्रेय अर्थात अँडरसन आणि त्यांचा आणि आपलाही मित्र झालेल्या बहाद्दर रानरेड्याला..!!

अँडरसन ला श्रेय आहेच, पण तुमचा अनुवाद ही मस्तच आहे.
केनेथ अँडरसन च्या कथा वाचायला तुमच्यामुळे मिळाल्या. यापुर्वी वाचल्या न्हवत्या. जिम कॉर्बेट आणि मारुती चितमपल्ली यांच्याच कथांमधून आतापर्यंत जंगल सफर होत होती. मनापासून धन्यवाद.

मस्तच

रानरेडे म्हणजेच गवे असतात का ??? पायात पांढरे सॉक्स घातल्यागत ज्यांचे पाय गुढग्या पर्यंत पांढरे असतात ते ?? मी रानम्हशींचा एक जबरदस्त अनुभव घेतला आहे, थोडक्यात सांगतो,

माझा मुळ जिल्हा अकोला आहे, आमच्या जिल्ह्याच्या उत्तर टोकाला अकोट तालुका आहे, ह्याच तालुक्यात जे जुने दक्षिण रक्षक किल्ले होते त्यांच्या रांगा आहेत असाच अकोट तालुक्यात नरनाळा नावाचा किल्ला आहे (प्राचिन गोंड आदिवासी राजांनी हा वसवल्याचे म्हणतात, ह्या किल्ल्याचा दक्षिणे कडचा उतार हा अकोट तालुक्यात मानवी वस्ती अन शेती शिवाराचा बनलेला आहे, तर उत्तरेकडचा उतार म्हणेच मेळघाट टायगर रिझर्व चे दक्षिण टोक आहे. ह्याच बाजुला समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेला श्री क्षेत्र वारी हनुमान पण आहे, आमच्या कडुन जंगलात भटकायला जाऊन रात्रीच परत यायचे असेल तर ह्या नरनाळ्याच्या उत्तर टोकाकडे उतरुन थोडे भटकुन परत येतात लोकं, इकडे सहजी पट्टेदार वाघ दिसत नाहीत, कारण ते कोर एरीयात (ढाकणा, कोलकास तालुका धारणी जिल्हा अमरावती ) असतात, इकडे एकदा एका मित्राच्या फार्महाऊस ला गेलो असताना एक अनुभव आला
मित्राच्याच जीप ने आम्ही गडाला वळसा घालुन पलिकडे रिझर्व ला उतरलो होतो, कारण वर गाडी जाते तरीही ती उत्तरेकडे उतरु शकत नाही, मित्रच गाडी चालवायला होता, थोडी "नाईट सफारी" म्हणुन आम्ही दिवेलागणी नंतर ही २०-२५ मिनिटे तिथे रेंगाळत होतो, इतक्यात रस्त्याच्या उजवी कडुन म्हणजे बहुतेक पश्चिमेकडुन कडुन खसफस झाली, आम्ही बोलेरो च्या आत दारे लावुन बसलो होतो, तेवढ्यात जवळपास २५ गव्यांचा कळप समोर आला कच्या रस्त्यावर, त्याचा नायक एक धिप्पाड नर होता साधारण मान उंच केली ताणुन तर महिंद्रा बोलेरो च्या उंची इतके त्याच्या शिंगाचे वरचे टोक टेकेल इतका, त्याने आम्हाला पाहताच "खॉक" करुन आवाज काढला अन एकदम त्या हुशार जनावरांनी चक्क एक चक्रव्युह बनवला !, अर्धवतुळाकार उभे, सर्वात समोर नर (५) मागे माद्या (१०-१२) त्यांच्या मागे लेकुरवाळ्या माद्या (४-५) अन कोर ला बछडे (३-४) अश्या जय्यत तयारी ने ते खटले पुढे उभे ! अन मालक खुराने माती उकरायला लागलेला!!, तेवढ्यात आमच्या मित्राने जोराने हॉर्न मारला अन हायबीम वर लाईट सुरु केले तसे सावकाश एक एक पाऊल मागे सरकत पुर्ण कळपाने रस्ता पार केला अन गायब झाला.

बॉस त्या दिवशी "मंत्रमुग्ध" होणे हे "अनुभवले" पहिल्यांदा Happy

(स्पार्टाकस च्या लेखनशैली चा कित्ता गिरवु पाहणारा) बाप्या Wink

मस्त Happy