नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी

Submitted by मुग्धटली on 18 September, 2013 - 02:20
natural icecream
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
दुध - १ वाटी/कप,
साय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप,
दुध पावडर (nestle everyday) - १ वाटी/कप,
आवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप,
साखर - चवीनुसार,

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.

वैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.

अधिक टिपा: 

टिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.

माहितीचा स्रोत: 
नणंदबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा शहाळ्याची मलई वापरली. अशी टीन मध्ये वगैरे मिळते का याची कल्पना नाही.
मी आपलं एक मोठी वाटी या मापाने सर्व काही जिन्नस घेतले होते. मलई सुद्धा तेवढीच होती. साधारण त्याचे पाच जणांना दोन वेळा सर्विंग होईल एवढे झाले आईस्क्रीम.

सस्मित 2 लीटर दुधाच्या आइसक्रीम ला 1 मीडियम जाड़ मलाई वाला कोकोनट पुरेसा होतो....

बोकलत, ५० ला दोन शहाळ? कुठे?
२ लिटर दुध म्हणजे साधारण ४ कप. मग क्रीम, मिल्क पावडर पल्प सगळं ४ कप?
उद्या एक कपाच्या प्रमाणात करणार आहे. अपडेट देईन.

मुग्धटली, अगदी मस्तच झालं आईस्क्रीम. आजच केलं. अंगारकी स्पेशल Wink Wink Wink मोदक करायला जमणार नव्हतं. पण हे खाऊन मेम्बरं खूश. फोटो टाकता येत नाहीये अॅपमधून.

मी मागे एकदा ह्या रेसिपीने प्रयत्न केला होता पण काही स्टेप्स विसरल्याने तो फसला..

you can’t teach old dog new tricks हा नियम असल्यामुळे मी मागिल चुकांपासुन काही शिकण्याची शक्यता आता शुन्य झालेली आहे. दरवेळी नवी चुक करायची हेच माझे value addition…

तर, यावेळेस अर्ध्या कपाचा प्रयोग करायचा असे ठरवुन अमुल क्रिम आणले. अर्धा लिटर दुध गॅसवर तापत ठेवलेले त्याचे एक कप दुधात कधी रुपांतर झाले हे मोबाईलच्या भानगडीत लक्षातच आले नाही. तरी वेळेत लक्षात आले म्हणुन टोप जळला नाही व दुध आटल्यामुळे आइसक्रिमात अज्जाबात बर्फ होणार नाही असा दुहेरी आनंद मनाला मिळाला.

यथावकाश थंड केलेले प्रत्येकी अर्धा कप अमुल क्रिम, ईव्हॅपोरटेड मिल्क ( Happy ) , तयार आंब्याचा हाताने काढलेला सरबरीत रस आणि शुद्ध मिल्क पावडर (म्हणजे नेस्ले डेअरि व्हाईटनर नाही) हे एकत्र करुन गरगटले आणि साखर घालायला घेतली तेव्हा साखर संपलीय हे लक्षात आले. ( मी उस्फुर्त सैपाकी असल्याने भाजीसाठी कढई गॅसवर ठेवल्यानंतर ‘भाजी आणलेलीच नाही’ हे लक्षात येते, ते एक असो). आंब्याचा गोडवा पुरेसा होणार असे स्वतःला समजावत गरगटलेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतुन फ्रि़झरमध्ये ढकलले. (आइस्क्रिम अ‍ॅलुमिनियमच्या भांड्यात करा असे कुठेतरी वाचले होते, केकची भांडी सोडुन बाकी काही अ‍ॅलु. माझ्याकडे नाही).

हे आइसक्रिम दोन तासांनी बाहेर काढुन परत एकदा गरगटवा हे ईथे लिहिलेले नाही पण उगीच रिस्क कशाला म्हणुन बाहेर काढुन गरगटवले आणि फ्रिझरात ठेवले.

दुसर्या दिवशी मोठ्या आशेने भांडे बाहेर काढुन बघितले…. बघुनच कळले, आत आईस क्रिस्टल झालेत. नेटवर शोधशोध केली तेव्हा कळले की झाकण घट्ट हवे नाहीतर क्रिस्टल्स होणारच, क्लिंग फिल्म वापरली तर बेस्ट. केकच्या भांड्याला कसले आलेय झाकण, त्यामुळे मिळेल ती ताटली झाकण म्हणुन मी ठेवली होती, त्याचा फटका बसला.

आइसक्रिमरुपी दगडाला थोडा पाझर फुटल्यावर चव घेतली.. आंब्याचा गोडवा अज्जिबात जाणवला नाही, क्रिस्टल्समुळे आइसक्रिम कुरकुरीत लागत होते.

आइस्क्रिमात साखर थोडी जास्त ढकला, गोठल्यावर साखरेचा गोडवा थोडा कमी होतो हे वाचले होते पण ते ऊशिरा आठवले.

( साखरविरहीत आइसक्रिम कसे संपवावे हा धागा माबोवर मनातल्या मनात काढला. बनाना/वॉलनट/ अ‍ॅपल वगैरे लोफ नैतर चॉकलेट ब्राऊनी करा व त्यावर आइसक्रिम घालुन खा अशा प्रतिक्रिया मनातल्या मनात दिसायला लागल्यावर नालासाठी घोडा नको म्हणुन धाग्यावर काट मारली.)

संपलेल्या साखरेबाबत काहीतरी करणे भाग असल्यामुळे संध्याकाळी साखर आणली, रात्री परत आइअस्क्रिम बाहेर काढुन त्या दगडाला आवश्यक तितका पाझर फोडला, साखर घालुन गरगटवले आणि निट बसणारे ताट झाकण म्हणुन ठेऊन परत एकदा फ्रिझरात ढकलले.

सकाळी उठल्यावर आधी आइसक्रिम बघितले. रुपडे बघितल्यावरच कळले की क्रिस्टल्स नाहियेत. चमच्याने थोडे काढायचा प्रयत्न केला तर चक्क मऊसुत स्कुपेबल होते, दगड अज्जिबात नाही. चव तर ग्रेटच.. फक्त मिल्क पपावडरची चव जरा लागली, पण पावडर फार जुनी होती म्हणुन चव लागत असावी असे स्वतःला समजावले. ती चव जर दुर करता आली तर अगदी नॅचरल्सचे आइसक्रिम बनेल.

तर इथवर वाचायचे श्रम ज्यांनी घेतले व आइसक्रिम दगडासारखे घट्ट होते, क्रिस्टल्स होतात वगैरे तक्रारी ज्याना आहेत त्यांनी़ घट्ट झाकणे वापरा.

आइसक्रिमच्या टेक्शरमध्ये साखरेचा रोल यावर नेट शोधाशोध करायला हवी. दोन तासांनी गरगटवुनही आइसक्रिम दगडासारखे घट्ट झाले, तेच साखर घातल्यावर स्कुपेबल झाले यात साखरेने काहीतरी उद्योग केला असणार यात मला शंका नाही. हा रोल कळला तर गोडव्यासाठी खजुर किंवा अन्य काही वापरता येईल का हे कळेल. दुध पावडर व क्रिम हे कॅलरी बॉम्ब आहेतच, सोबत साखर पण.. त्यामुळे कितीही वाटले तरी खाण्यावर मर्यादा येणार.

बापरे. एवढा खटाटोप केला असेल तर एखाद्या दिवशी कॅलरी मीटर सुट्टी घेऊ शकतो. मग पुढचे दोन दिवस साखरेचे तोंडही बघूया नको.
ता.क. एवढं चुकणारी माणसं दिसली की आपण एकटेच नाही हे लक्षात येतं. अगदी हुरुप येतो. Wink

चिन्मयी, सगळे व्यवस्थित करणार्‍या सुगरणी अपवाद समजाव्यात. चुकणे हाच धर्म आहे, चुकला नाहीत तर नवा शोध लागणार कसा??

मी तर रिटायरमेंटनंतर इथल्या व फेसबुकातल्या रेसिपिज करायचा धडाका लावणार आहे. या रेसिपिज मधुन खास माझ्या किती रेसिपिज तयार होतील विचार करा, प्रत्येक वेळी नवी चुक, नवी रेसिपि.. घोडामैदान जवळ आलेय…

साधना प्रतिसाद खूप आवडला. प्रांजल पणे लिहिले आहे. सर्व नव्याने घेउन परत एकदा करुन बघ. मस्त होईल. माझ्याकडे आमरस दूध साखर मिक्स केले की ते आइसक्रीम लेव्हल ला जातच नाही. मिक्क्षरच्या भांड्यातुन चमच्याने स्वाहाच.

खरं तर, घट्ट झाकणाचे स्वयंपाकघरातील स्थान यावर कोणीतरी मूलभूत संशोधन करण्याची जाम गरज असेल आहे.
कॅरामल कस्टर्ड- झाकणासहित आणि झाकणारहीत- अक्षरशः जमीन अस्मानाचा फरक पडतो.

आज सीताफळ आईसस्क्रीम करुन बघितले. चवीला चांगले झाले होते. सर्वांनी डबा फस्त केला.

फक्त एकच उणीव उद्भवली ती म्हणजे फ्रिजरमधून काढल्यावर दगडासारख कडक झालेल आईसस्क्रीम. थोडा वेळ त्यामुळे बाहेर ठेवून मग खायला घेतले.
वरच्या सूचना फॉलो नीट केलेल्या. डब्याला घट्ट झाकण लावलेलं. घटक पदार्थ सांगितलेल्या प्रमाणात घेतले होते. काय चुकले असेल ?

Pages