माझा मराठी बाणा

Submitted by anandghare on 17 November, 2008 - 08:56

भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊन गेली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. किंबहुना 'माय मराठी' आता 'My Marathi' झाली आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सर्व प्रसारवाहिन्यांवरून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच 'मराठी' भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

प्राचीन काळातले लोक रानावनात एकाद्या विशाल वृक्षाच्या छायेत बसून ध्यानस्थ होऊन मनन, चिंतन वगैरे करायचे आणि त्यांना त्यातून बोध मिळत असे. मुंबईत राहतांना तशी सोय नसल्यामुळे मी आपला गादीवर पडल्या पडल्याच जमेल तेवढा विचार करून घेतो. सासवा-सुना , नणंद-भावजया वगैरेंना एकमेकींच्या उखाळ्या पाखाळ्या काढतांना दाखवणा-या मालिका टी.व्ही. वर चालल्या असल्या तर मला विचार करायला निवांत वेळसुद्धा मिळतो. असाच एकदा मराठी भाषाप्रेमी लोकांनी लिहिलेले लेख वाचून आणि तेच विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मला एक बारीकसा साक्षात्कार झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे एक (मुख्य ) कारण माझ्या लक्षात आले. आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती
सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपल्या जीवनात येऊन आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक महत्वाचे कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे. तेंव्हा 'मूले कुठारः ' घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. (संस्कृत भाषा मराठीची जननी असल्यामुळे मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण चालते, किंबहुना ती समृध्द झाल्यासारखे वाटत असावे.) त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.

सकाळी उठून स्वच्छतागृहात गेलो. आमच्या गांवाकडच्या वाड्यातल्या न्हाणीघरात होत्या तशा पाण्याचा हौद, पाणी तापवण्याचा बंब, कळशी, बिंदगी, घमेली, तपेली, तांब्ये, कपडे आपटण्याचा दगड असल्या कोणत्याच वस्तू तिथे नव्हत्या. साधी सांडपाण्याची मोरीसुध्दा नव्हती. इथे तर पायाखालच्या फरशीपासून डोक्यावरच्या छतापर्यंत सगळीकडे भाजलेल्या चिनी मातीचे चौकोनी तुकडे बसवले होते आणि त्याच पदार्थापासून तयार केलेली विचित्र आकाराची परदेशी बनावटीची भांडी होती. पण आणीबाणीची परिस्थिती आलेली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. त्या जागी आंग्ल संस्कृतीचे झालेले अतिक्रमण सहन करून घेण्याखेरीज त्या वेळी मला गत्यंतर नव्हते.

पण सकाळी उठल्यावर पहिल्या क्षणी झालेल्या या पराभवाने मी खचून गेलो नाही. अनेक रसायने मिसळून बनवलेला एक लिबलिबीत पदार्थ आणि तो दातांना फासण्याचा बारीक कुंचला या गोष्टींनी दांत घासायची मला संवय होती. रोजच्या वापरातील या गोष्टी मी तिरीमिरीने कच-याच्या पेटीत टाकून दिल्या. गांवाकडून येऊन गेलेल्या कोठल्याशा पाहुण्याने आणलेली माकडछाप काळी भुकटी खणात राहून गेलेली होती. पण तिच्या डब्यावर 'दंतमंजन' या मराठी शब्दाऐवजी आंग्ल भाषेत लिहिलेले शब्द वाचल्यानंतर तिच्या शुद्धतेची खात्री वाटेना.

पूर्वीच्या काळात मराठी माणसे दांत घासण्यासाठी राखुंडीचा उपयोग करतात असे ऐकले होते. पण या राखुंडीत नक्की कशाची राख मिसळलेली असते याची मला कल्पना नव्हती. घरात तर औषधाला भस्मसुध्दा नव्हते. "संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी" असे म्हणतात. इथे संन्यास घेण्यासाठी (अंगाला फासायला) राखेपासून तयारी करावी लागणार होती. माझ्या भिकार
लिखाणाचे चिटोरे या निमित्ताने जाळून टाकावेत असा एक प्रस्ताव समोर आला, पण त्या राखेने घासून दांत स्वच्छ होतीलच अशी खात्री नव्हती. शिवाय त्यात कांही 'स्फोटक सामुग्री' आहे असे सांगून मी त्यांना ज्वलनापासून वाचवले.

"तुम्ही आपले दांत मिठाने घासता कां?" असे जाहिरातीतली एक बाई ज्याला त्याला विचारत असते. तेंव्हा साध्या मिठानेच दांत घासावेत असे म्हणून ते आणायला स्वयंपाकघरात गेलो, तेवढ्यात 'टाटा' नावाच्या कोणा पारशाने त्यातही 'आयो'पासून सुरू होणारे एक मूलद्रव्य मिसळले असल्याची जाहिरात कानावर आदळली आणि डोक्यात तिरिमिरी उठली. या सद्गृहस्थाने एक तर स्वदेशी नैसर्गिक मिठात परकीय वस्तूची भेसळ केली आणि त्याचेच मोठे कौतुक करतो आहे . त्याची धिटाई तर पहा! चिमटीत घेतलेले मीठ मी टाकून दिले.

खडेमीठ विकत आणण्यासाठी पिशवी घेऊन वाण्याकडे गेलो. तो मुळातला मारवाडी असला तरी माझ्याशी मराठीत बोलायचा. "मला पावशेर खडेमीठ दे" असे त्याला सांगताच तो ताडकन उठून उभा राहिला आणि हळूच माझ्या तोंडाजवळ नाक नेऊन त्याने हुंगून पाहिले. मी पावशेरच काय पण छटाकभर देखील 'मारलेली' नाही याची खात्री करून घेतल्यावर म्हणाला, "शेठ, आता पावशेर, अच्छेर वगैरे राहिले नाहीत. आमचा समदा व्यापार किलोमंदी होतो."

मी म्हंटले, "तुझा होत असेल, पण मी या आंग्ल शब्दांचा उच्चार माझ्या जिभेने करणार नाही." असे म्हणत मी समोरच्या पोत्यातले बचकाभर खडेमीठ उचलून त्याच्या तराजूच्या पारड्यात टाकले आणि त्याचे वजन करून किती पैसे द्यायचे ते सांगायला सांगितले. मराठीसहित बावीस भाषांमध्ये मूल्य लिहिलेले कागदी चलन त्याला दिल्यावर त्याने कांही नाणी परत केली. पण
त्यांवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होती. त्यामुळे ती न स्वीकारता त्याबद्दल हवे तर मूठभर शेंगदाणे किंवा फुटाणे द्यायला त्याला सांगितले. "अहो, माझी मस्करी करता काय? त्यासाठी आणखी नोटा द्याव्या लागतील." असे म्हणत त्याने एक लिमलेटची गोळी देऊ केली. तिच्या वेस्टनावर सुध्दा 'रावळगाव' असे इंग्रजीत लिहिलेले पाहताच मी ती गोळी दुकानात आलेल्या
एका मुलाला देऊन टाकली. त्या मुलाने "काका, तुम्ही पुन्हा केंव्हा दुकानात येणार आहात ?" अशी माझी प्रेमाने चौकशी केली.

त्या खडेमीठाचे चूर्ण करण्यासाठी माझ्या घरी जाते, पाटा-वरवंटा, खलबत्ता असले कांहीच साधन नव्हते. त्यामुळे ते खडे एका रुमालात गुंडाळून त्यांना कुलुपाने ठेचले. त्यात तो रुमाल वाया गेला, कुलुपाचे काय झाले कोणास ठाऊक, पण थोडे चूर्ण मिळाले. ते दांत घासण्यासाठी वापरले. या खटपटीत दोन तीन जागी हिरड्या खरचटल्या जाऊन थोडे रक्तही आले, पण ध्येयाच्या साधनेसाठी रक्त सांडण्यातही एक प्रकारचे दैवी समाधान मिळते असे म्हणतात. त्याची प्रचीती आली. त्यामुळे मी माघार घेतली नाही.

"आधी केले, मग सांगितले" हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे माझा कृतनिश्चय मी घरात कोणाला सांगितला नव्हता. घरातील इतर मंडळींनी आपला दिनक्रम सुरू ठेवला होता. रोजच्याप्रमाणेच त्यांनी अमृततुल्य ऊष्ण पेय प्राशन केले. या परकीय पेयाला जरी आपण मराठी नाव दिले असले आणि आता ते भारताच्या इतर राज्यांत मुबलक प्रमाणात पिकत असले तरी महाराष्ट्रासाठी ते परकीयच आहे. त्याच्या सोबतीने आलेली इतर पेये अजून आंग्ल नांवानेच ओळखली जातात. शिवाय त्याच्या बरोबर किंवा त्यात बुडवून खाण्याच्या भट्टीत भाजलेल्या मैद्याच्या चकत्याही आल्याच. त्यांनी आपले आंग्ल नांव सोडले नसल्यामुळे त्यांचा त्याग करणे आवश्यक होते. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला.

स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेलो. इथे पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाचा प्रवेश कधी झालाच नव्हता. विद्युल्लतेच्या वहनाला अवरोध करून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेचा उपयोग त्यासाठी केला गेला होता. पण त्या साधनाचे इंग्रजी नांवच मला माहीत होते. ते सुरू करावयासाठी अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत 'कळ' असे म्हणतात असे ऐकले होते पण घरात कोणीच तसे म्हणत नाहीत आणि बाजारात देखील 'कळ' मागायला गेलो तर ती मिळत नाही. त्यामुळे ऐन वेळी ते नांव आठवले नाही. काय करावे ते न कळल्यामुळे ' नळ' राजाची तोटी सोडली आणि थंड पाण्यानेच स्नान करून घेतले. आता मात्र मोठाच प्रश्न समोर उभा राहिला आणि भरीत भर म्हणून डोक्यात एक नवीनच प्रकाश पडला. बहुधा थंड पाण्याच्या स्पर्शाचा परिणाम असावा.

अंग पुसण्यासाठी जे रेषारेषांनी युक्त असे चौकोनी फडके मी ठेवले होते त्याचे फक्त इंग्रजी नांवच मला ज्ञात होते. बाजारातून विकत आणल्यापासून ते वापरतांना, धुवून वाळत घालतांना किंवा घडी करून कपाटात ठेवतांना अशा सर्व प्रसंगी त्या अंगपुसण्याचा उल्लेख त्याच्या आंग्ल नांवानेच होत असे. त्याच्या बदल्यात राजापुरी पंचा आणायला हवा होता. एवढेच नव्हे तर
माझ्या अतर्वस्त्रावरील 'वायफळ इब्लिस परदेशी' या शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे (व्हीआयपी) मला वाकुल्या दाखवीत होती. आतापर्यंत मी बाहेर जातांना जे कपडे अंगात घालत आलो होतो त्यांची नांवे देखील इंग्रजी होती तर घरात वापरात असलेले कपडे परप्रांतातून आलेले होते. मराठी बाणा जपायचा झाल्यास मला कंबरेला पंचा किंवा धोतर गुंडाळून वर कुडते, बाराबंदी,
उपरणे असे कांही तरी परिधान करावे लागणार. ही वस्त्रे तर माझ्याकडे नव्हतीच. शिवाय ती कोणत्या दुकानात मिळतात हे सुध्दा मला ठाऊक नव्हते.

दोन हजार वर्षापूर्वी कोठलासा वेडा शास्त्रज्ञ "सापडले, सापडले" असे ओरडत न्हाणीघरातून निघाला आणि रस्त्यातून विवस्त्र स्थितीत पळत सुटला होता म्हणे. आता मीसुद्धा "कोठे सापडेल? कोठे मिळेल?" असे ओरडत रस्त्यातून धांवतो आहे या विचाराने मला दरदरून घाम फुटला आणि मी खडबडून जागा झालो.

गुलमोहर: 

खुप मस्त...खरोखर पुर्णपणे मराठी वापरणे अवघड आहे...

मराठी पुर्ण वापरणे अवघड आहे.... मान्य आहे.
पण जास्तीत जास्त मराठी वापरणे सोपे आहे ना....

खुप छान.... आवडले.

आपण खुप शब्द ईंग्रजी वापरतो हे खरे आहे. पण तरीही,

माय टॉमी, यु नो, ओन्ली इम्पोर्टॅड डॉगफुडच खातो, त्याला होममेड फुड जराही डायजेस्ट होत नाही. लगेच स्टमक अपसेट होतं.

यापेक्षा,

माझा टॉमी फक्त बाहेरचे डॉगफुड खातो, घरचे जेवण त्याला पचत नाही, लगेच पोट बिघडते.

हे मराठीच्या जास्त जवळ वाटते. आणि हे चटकन सुचण्यसारखे आहे, मराठी प्रतिशब्द शोधत बसावे लागत नाहीत..

छानच विषय. आणि लिहिलेही छान.
पण अजून लिहिता येईल तुम्हाला.

एक दिवस तरी पुर्ण करून दाखवा हो.. Happy

--
भेटण्याआधीच ठरलेली असते वेळ जेव्हा जायची-
शहाण्या मुलासारखी खेळणी आवरून घ्यायची..!!

सकाळी उठुन आंघोळ करीपर्यंतच वेड लागुन पळायची पाळी आली, दिवस पुर्ण करत बसले तर आत्महत्याच करावी लागेल.. Happy

साधना

परवा बस मधून घरी येताना, अगदी चालकाच्या मागच्या बाकड्यावर बसले होते, कुठुन तरी उगिचच डोक्यात विचार आला, की स्टिअरिंग व्हील ला मराठीत काय म्हणतात? Uhoh
काही केल्या आठवेना, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या जवळ्च्या २/३ मैत्रिणींना दुरध्वनी पण केला, कोणालाच माहीत नव्हते. अजूनही मला स्टिअरिंग व्हील ला पर्यायी मराठी शब्द गवसलेला नाही. Sad

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

दक्षिणा,

स्टिअरिंग व्हील ला मराठीत सुकानु असे म्हनतात.

सागर

खुप छान लेख, आवडला..

दक्षिणा,
आणि ड्रायव्हरला काय म्हणतात माहित्ये का?

चक्रधर.... Happy

हवा, पाणी वगैरे शब्द पर्शियन की अरबी कुठल्याशा भाषेतून मराठीत आले.
पाव, बटाटा हे शब्द पोर्तुगीज मधून आले.

भाषांची देवाणघेवाण ही चालूच राहणार.. जी भाषा सोवळ्यात राहील ती तगेल कशी? शेवटी 'शुद्ध' म्हणजे तरी काय? कुठली मराठी शुद्ध - मुंबईची, पुण्याची, कोकणाकडची, मराठवाड्यातली, विदर्भातली, खानदेशातली की कर्नाटक, आंध्रच्या सीमेलकतच्या भागांतली?

लेख मात्र छान जमला आहे. इच्छुकांनी सावरकरांचे 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचावे. कमीत कमी अमराठी शब्द वापरले आहेत.

मंजु, चक्रधर... Lol हे मला खरंच माहीती नव्हतं.
ड्रायव्हर म्हणजे चालक
आणि कंडक्टर म्हणजे वाहक हे यांत्रिक (का तांत्रिक? :अओ:)
शब्द माहीत होते मला. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

आव्हान आहे आपणा सर्व मराठी माणसांना

खालील मराठी शब्द हे कोणत्या इंग्रजी शब्दांना पर्याय आहेत ते सांगा

१) परिरक्षा

२) उदवाहन

३) अनुज्ञप्ती

मला हा लेख आवडला.
मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.
ते 'मूळ मराठी' काय ते समजावे म्हणून काही जुनी गाणी उकरून काढली नि ऐकली. घनःश्याम सुंदरा गाणे प्रसिद्ध आहे. त्यात 'दध्योदन भक्षी' असे आहे. संस्कृत थोडेफार शिकल्याने त्याचा अर्थ कळला - 'दहीभात खा' (हो ना?)

अशी अनेक उदाहरणे सापडतील. तर आता 'मूळ मराठी' हे असे बोलायचे का?

मी पण तुमच्यासारखा विचार केला, नि मला असे जाणवले की पूर्वी भावना व्यक्त करायला मराठी शब्द होते नि ते वापरले जात. पण आता भावनांच्या इमोशन्स झाल्या. त्या व्यक्त करत नाहीत, त्या एक्स्प्रेस कराव्या लागतात, त्यामुळे emotions express करायला english words only convenient नाहीत का?

आता हे english words नंतर only म्हणजे 'च' हे असले इंग्रजी इथे बोलत नसल्याने मी विसरलो होतो.

शिवाय लहान मुलाला तीनदा सांगितले 'पुट इट डाऊन' असे तरी तो ऐकत नाही, म्हणून मग
पुट रे बाबा इट डाऊन असे शुद्ध मराठीत सांगावे लागते.

तर अश्या रीतीने मराठी भाषा 'समृद्ध' होते असे म्हणायचे नि we are मात्र very proud of our marathi language only हं. we always speak in marathi अश्या शब्दात तुमच्यासारख्यांना दिलासा द्यायचा. (म्हणजे तुम्हाला फील गूड होईल)

Happy