टिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्ट धरत ती घराबाहेर पडली.
रिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.
पाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.
ब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.
चक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.
पुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.
’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.
ऑफिस.... कामाचा डोंगर. दोन दिवसांनी डिपार्टमेंटल एक्झामचा रिझल्ट.
दिवसभर मार्कांची जुळणी... कोणी एका मार्काने पास तर कोणी नापास.
तळ्यात का मळ्यात...
कललेली दुपार....
ट्रिंग ट्रिंग....
सशाचे कान... काळजात धडधड....
घे... तुझाच आहे गं.
पावलं जडशीळ.... मार मार उडी मार... तळ्यात का मळ्यात... पावलं जडच.
मधल्या रेषेवर कधीच का उभं राहू देत नाही ?
फोन कानाला. खोल विवरातून अंधुकसे हॅलो...
पलीकडून सळसळता उत्साह....
" काय गं! बरी आहेस नं? असं काय मेलेल्या आवाजात हॅलो म्हणते आहेस? बरं ते सोड. ऐक.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद. मधली रेषा. बास...
" अगं ऐकते आहेस नं.... आज संध्याकाळी अशोकची पार्टी आहे. मी येतो वेळेवर. तू जेवायची मात्र थांबू नकोस. कालच्यासारखा उशीर नाही करणार.... प्रॉमिस! बच्चू प्रॉमिस! बाय! "
फोन बंद...
तळ्यात का मळ्यात...
खच्चून भरलेली लोकल. पाठीला पाठ... पोटाला पोट.
मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!
देव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं.
बरंच आहे. कोणाकोणाला वाटणार आणि कोणाकोणाची घेणार...
स्टेशन... भाजी... पाळणाघर... रिक्षा... घर. देवापाशी दिवा. लेकाची गडबड... मऊ वरणभाताचा सुगंध... लेक तृप्त. डोळ्यावर पेंग.
ट्रिंग ट्रिंग..... " अगं मी बोलतोय. जेवलात नं? बच्चू झोपला का? मी निघतोच अर्ध्या तासात. साडेनऊला घरी. "
ती खिडकीत. रोजच्यासारखीच. जीवाची घालमेल.... रोजच्यासारखीच...
एक नजर घड्याळाकडे एक नजर खिडकीतून दिसणार्या अंगणाच्या तुकड्याकडे. रोजच्यासारखीच….
साडेदहा... रिक्षा... ब्रेक. नजरेत आशेचे दिवे... खाडखाड वाजणारी पावलं. विझलेली नजर...
तळ्यात का मळ्यात...
एक नजर घड्याळाकडे.... साडेअकरा.... साडेबारा.... सव्वा...
रिक्षा... ब्रेक..... गेटची करकर.... झोकांड्या खाणारी पावलं... हृदयात धडधड....खिडकी बंद.... दार उघडं.
जिन्यात हेलपाटणारे बूट... डोक्यावर ओढलेले पांघरूण... ओघळलेले दोन अश्रू.... सिंधूचं तळं...
कानावर गच्च दाबून धरलेले हात. तरीही फटीतून घुसलेले उलटीचे आवाज... आतडी खरवडून टाकणारे... मागोमाग व्हिवळणारे आवाज... असह्य आवाज...
" चुकलो गं मी. उद्या नाही... उद्या नाही.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद.
ओठावर ओठ घट्ट दाबले तरी बाहेर आलेले शब्द, " एकदाचा मर तरी. तूही सुटशील आणि मीही..."
तारवटलेले डोळे... वाढलेले काळे... बरोबर मधल्या रेषेवर लाल भडक टिकली...
देवाब्राम्हणासमक्ष लावलेली... असोशीने लावलेली... प्रेमाचं प्रतीक... निर्णयाची भीषणता... बच्चूचे भविष्य... लाल भडक टिकली...
उगवत्या दिवसाचा एकच सवाल..... तळ्यात का मळ्यात....?????
चांगल लिहीलय
चांगल लिहीलय
मस्त लिहिलयं
मस्त लिहिलयं
छान लिहिलंय तुम्ही ..
छान लिहिलंय तुम्ही ..
शैली आवडली.
शैली आवडली.