... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!

Submitted by ललिता-प्रीति on 17 November, 2008 - 00:23

'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.

------------------------------------------

खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!
... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना...

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) माझ्याच वयाची असल्यामुळे म्हणा पण त्या गृहस्वामिनीशी माझी बऱ्यापैकी ओळख होती. बऱ्याचदा आमच्यात पदार्थांची देवाणघेवाणही चालायची. आपल्या मराठी पदार्थांचं मी नेहेमी तिच्याजवळ वर्णन करत असे आणि गप्पांमधून मला हे ही कळलं होतं की तिला विशेषतः आपले गोड पदार्थ खूप आवडायचे.
श्रावणातले दिवस होते. नारळीपौर्णिमेनिमित्त घरात नारळीभात केलेला होता. नारळीभाताचा नमुना तिच्याकडे पोहोचवायची मला हुक्की आली आणि तसा मी तिला तो दिला. दुसऱ्या दिवशी ती डबा परत करायला आली. गोष्ट एवढ्यावरच थांबवायची की नाही? पण नाही! त्या नारळीभातावरच्या तिच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची अजून एक हुक्की मला स्वस्थ बसू देईना. (कारण त्या कुटुंबानं तो पदार्थ प्रथमच पाहिला होता हे मला आदल्या दिवशी समजलं होतं. )
(मूळ संवाद हिंदीत होते. )
"कसा वाटला कालचा भाताचा प्रकार?"
"फारच छान. एकदम चविष्ट."
"त्यावर तूप-बिप घालून खाल्लंत की नाही?" (स्वस्थ बसू न देणारी) हुक्की क्र. तीन.
"नाही, नाही. आम्ही त्याच्यावर दही घालून खाल्लं. फारच मजा आली जेवायला!!"
... दही? मजा?? माझा चेहेरा कसानुसाच झाला. मला हसावं की रडावं ते कळेना.
’नारळीभात, दही आणि मजा’ हा तिढा मला आजतागायत सुटलेला नाही. तरी, दहीयुक्त नारळीभाताची ती सृष्टी दृष्टीआडच ठेवल्याबद्दल मी दैवाचे आजही आभार मानते. पण अजून एका विजोड जोडीचं तर ’थेट प्रक्षेपण’ पाहणं आमच्या नशिबात होतं, ते असं...

काही वर्षांपूर्वीचा, जुलै-ऑगस्ट महिन्यातलाच एक दिवस. बाहेर पाऊस अक्षरशः ओतत होता. दुपारपासूनच वीज गायब होती. घरात पार गुडुप अंधार होण्यापूर्वीच मी रात्रीच्या जेवणासाठी ’फ्राईड राईस’ करून ठेवला होता - एक पदार्थ, एक जेवण! आणि स्वतःच्याच कल्पकतेवर खूष होऊन मजेत खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसले होते. इतक्यात परगावच्या आमच्या एका स्नेह्यांचा "जेवायला आणि रात्रीच्या मुक्कामाला येत आहे" असा फोन आला. (ते त्यांच्या कामासाठी आमच्या गावात आले होते. आपण सोयीसाठी त्यांना काका म्हणू. )
जेवणात नुसता फ्राईड राईस काकांना आवडेल न आवडेल असा विचार मनात आला आणि पावसाची मजा वगैरे सगळं विसरून मी लगेच उठले. रोजच्यासारखाच साधा स्वयंपाक - म्हणजे पोळीभाजी, आमटीभात - मी मेणबतीच्या उजेडात उरकला.
... सगळे जेवायला बसलो.
"काका, मी खास काही केलेलं नाही. रोजचेच पदार्थ आहेत."
"अगं, असू दे. मला काहीही चालतं."
मग हे आधी नाही का सांगायचं? (मी, मनातल्या मनात! )
...गप्पाटप्पा करत जेवणं चालू होती. काकांना ’काहीही’ चालतं हे कळल्यामुळे मी त्यांच्यासमोर पांढरा भात आणि फ्राईड राईस असे दोन्ही पर्याय ठेवले.
"वाढ गं काहीही. मला काहीही चालतं." पुन्हा तेच!
’काहीही चालतं’ची वारंवार उद्घोषणा झाल्यामुळे मी त्यांच्या पानात फ्राईड राईस वाढला. माझ्या आंतरराष्ट्रीय पाककलेचा त्यांच्यावर प्रयोग करायची मलाच नस्ती हौस आली होती. आता काका तो फ्राईड राईस खातील आणि शिष्टाचाराला अनुसरून जरा "वा!" वगैरे म्हणतील अश्या स्वप्नरंजनात मी मग्न होते. इतक्यात...

... इतक्यात, काकांनी पानातली वाटीभर आमटी त्या फ्राईड राईसवर वाढून घेतली!!
’अरे, मुझे कोई बचा ऽ ऽ ओ! ’ असं मला ओरडावंसं वाटलं. (रामायणातल्या सीतेच्या "हे धरणीमाते मला पोटात घे" या उद्गारांचं ’बचा ऽ ऽ ओ!’ हे आधुनिक रूप समजावं. ) मी आणि माझ्या नवऱ्यानं पटकन एकमेकांकडे पाहिलं. (बॅटन-रीले शर्यतीत घेणाऱ्याच्या हातातून बॅटन खाली पडलं की ते देणारा आणि घेणारा एकमेकांकडे असंच बघत असतील. ) अश्या प्रसंगी ’हसावं की रडावं' हे दोनच पर्याय का उपलब्ध असतात? हसावं, रडावं की अजून तिसरंच काहीतरी करावं काही उमगेनासंच झालं. ’काहीही चालतं’ हे काकांनी प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखवलं होतं. ’वाचवा ऽ ऽ’ चा मनातला आकांत काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यानंतरचं माझं जेवण मी कसं पूर्ण केलं मला काहीही कळलं नाही.

आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.

कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते.

गुलमोहर: 

सहीच ............. फ्राईड राईस विथ आमटी......... एकदा ट्राय करून बघायला पाहिजे ........... Lol

बाकी लेखन छान.... आवडलं ........... Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते >> Biggrin सही लिहिलय , आमच्या कडे माझे मामा
आमरस आणि भात खातात .. मला ते खाताना बघावसंही वाटत नाही .

छोटंसच सूत्र घेऊन मस्त गुंफलय.

ब-याच वर्षापुर्वी माझ्या एका सहका-याबरोबर मी पुण्याला गेले होते तेव्हा त्याने श्रीखंड मागवले आणि सोबत कोक. दोन्ही गोष्टींचा आनंद तो आलटुनपालटुन घेत होता, मला उलटीच यायची बाकी होती.

छान लिहिलय!
पण .......
कॅन्टिनमधला फ्राईड राईस त्यावर आमटी ओतुन खाण्याखेरीज आमच्या पुढे पर्यायच नस्तो हो! Sad ही रेग्युलर गोष्ट हे आमच्याबाबतीत
अन झालच तर, रात्रीची शिल्लक आमटी, एखाद चमचा कान्दालसुणमसाला अन भाण्ड दोन भाण्डी पाणी घालुन वाढवून उकळवायची अन तिच्यात बुडवुन पाव खायचा, हे तर सकाळच्या न्याहारीकरता पक्वान्न ठरत हो आमच्यासाठी! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

भन्नाट विषय निवडलाय. आमटी - ब्रेड आम्हीही खातो... अगदी आवडीने. माझ्या मामाने हक्का नूडल्स खुप तिखट झाल्या म्हणून त्यावर खजुराची चटणी ओतून घेतली होती... हा लेख वाचल्यावर ते आठवलं. Happy

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

हेसुद्धा छान. खरंय अश्या अचाट जोड्या लावतात खरं लोक कधीकधी.

कॅन्टिनमधला फ्राईड राईस त्यावर आमटी ओतुन खाण्याखेरीज आमच्या पुढे पर्यायच नस्तो हो! >>> आता मला शंका येतीये की हा लिंब्या तर तो काका नसावा ना? लिंबू दिवा.

खरच भन्नाट विषय निवडला आहे, मजा आलि वाचताना. नाइलाजाने नाहि तर अगदि आवडिने श्रीखंड आणि पाव खाणारा एक महाभाग मी बघितला आहे त्यामुळे आता कशाचच आश्चर्य वाटत नाहि :).

ललित लेख लिहिला छान पण तरीही आवडला नाही कारण अशा अजोड जोड्या देखील खाऊ पिऊ शकणारे बरेच जण असतात. आपल्या चांगल्या सवयी टाकून देऊन पाश्चात्त सवयी भारतीयांना हल्ली जडत आहेत. जसे जेवताना पाणी न घेता कोक घेणे. परदेशात अवश्य पहायला मिळेल. जेवन झाल्यानंतर चहा किंवा कॉफी हवीचं.

विदर्भात, भात पन्ह/आमरस खातात. भात आणि वडे कुस्करून खातात. भात आणि भाजी एकत्र मिसळून खातात. शेवई आणि आमरस्/पन्हे पण खातात.

केदार... खी खी खी खी..... असेल असेल!

आयला, पावाच्या दोन स्लाईसमधे जाम ऐवजी श्रीखण्ड लावून केलेला सॅण्डवीच काय भन्नाट लागतो म्हणून सान्गु! अरे खाओगे तो जानोगे ना! Proud
(तेल तूप शम्भर रुपयाच्या घरात गेलय, इथे कोण पुर्‍या तळून वाढणार हे? चितळेच नाहीतर अमुलच थन्डगार श्रीखण्ड पावाबरोबरच खाव लाग्त! दु:ख याच की बॅचलर अस्तानाच्या या सहज बाबी अजुनही सन्सारी आयुष्यात देखिल तशाच हेत येवढच नाही तर आता पोर देखिल तस खातात! Proud )

मला अजिबात आवडल नाही ते म्हणजे अधिकृत पणे फाईव्ह स्टार हॉटेल मधे देत असलेले आईस्क्रिम वर घालायचे तपकीरी काळे कडूशार गरम चॉकलेट (की तसच कायसेसे, नेमके नाव आठवत नाही)! एकदम याक याक थू थू! Sad आम्हाला आप्ले वाटले की चॉकलेटी दिस्तय तर कॅडबरी सारखच गोड गोड असेल, कस्ल काय????
ओल्ड मॉन्क ऐवजी देशी चा कडक घोट (बिन पाणी/सोड्याचा) घेतल्यावर जस वाटेल तस वाटल! Lol

बी, अगदी बरोबर, कोकणात देखिल आमरस्-भात एकत्र खाणे ही कॉमन गोष्ट हे! Happy
च्यायला, आमचा कॅन्टीनवाला कढीमधे भजी टाकून देतो, मग ती भाताबरोबर खावी लागतात, आता ही डीश कोणत्या प्रान्तातुन आयात झाली काय की!

चकोल्या, हा तसाच देशस्थी प्रकार आमच्यात लिम्बीकडून "आयात" झाला! उकळत्या आमटीत, हळद ओवा वगैरे घातलेल्या लाटलेल्या कच्च्या कणकेचे शन्करपाळीच्या आकाराचे पोळीचे तुकडे करुन सोडतात! अन भरपुर उकळल्यावर ताटात आमटीसहीत पसरवुन घेवुन वर साजुक तूप घालुन चाखत माखत खातात! (अयाईग, ज्या ज्या दिवशी हा जिन्नस आमच्यात बनवला जातो त्या त्या वेळी मी अर्धपोटीच रहातो! Sad )
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूटिंबू, चकोल्या म्हणजे वरणफळं! आमच्याकडे तो पदार्थ होतो, तेव्हा बाकीचं काही दिसत नाही नवर्‍याला! आवड एकेकाची ! Happy

बी, प्रश्न खाणारे असतात की नाही हा नाहीए.. एकाला आवडणारं कॉबिनेशन दुसर्‍याला आवडेलच असं नाही, त्याच्या डोक्यातही येणार नाही.. आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती!

विनोदी लेखन मधे लिहीलंय, आणि मला खूप हसू आलं! त्यामुळे ललिता प्रीती लेख एकद्दम जमलाय! Happy

अगदी बरोबर भाग्यश्री! Happy
कुणीकुणी मध देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!
एकदा ट्राय करायला हव, नाही का?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

तर एकदा काय गम्मत झाली, असाच एक मोठा कार्यक्रम होता, बरीच माणसे जेवायला येणार होती, अन जेवणाचा (कोण काय किती खाईल) याचा अन्दाज चूकल्यामुळे हे भलेथोरले पातेलेभर भात शिल्लक राहिला. आता याच काय कराव?
फेकुन देता येत नाही, कुणाला देता येत नाही (दिल तर कुणाला काय वाटेल काय की!)
रात्र बरीच झालेली, तेव्हा उद्या बघु अस म्हणून तेव्हा तो विषय सोडून दिला
आता कोणतीही गोष्ट फुकट वाया घालवायची नाही या कोकणस्थी गुणाचा काहीतरी वाण लिम्बीला पण लागलेलाच ना! तेव्हा मग ती अन तिची सासू यान्नी मिळून त्या भातात जिरे/ओवा पुड, तिखट,मीठ, आल्याचा किस अस काय काय घालून कालवला, गच्चीत चान्गला मोठ्ठा प्लॅस्टिकचा कागद पसरुन त्यावर त्या भाताचे सान्डगे घातले अन ठेवले वाळवत! Happy माझ म्हणण अस होत की तो भात त्याआधी मिक्सरमधून बारीक करुन घ्यावा, ते कुणी ऐकले नाही!
दोन दिवसान्नी हे भाताचे तळलेले सान्डगे जेवणात वाढले गेले! चान्गले लागत होते! Happy बरेच दिवस पुरले!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

कुणीकुणी मध देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!>>>>
मी खाल्लाय रे लिंब्या Happy

पण आमटी-ब्रेड?>>>>>>>
मी खाल्लाय आमटी ब्रेड, तसं बघितलं तर हे म्हणजे मिसळपाव सारखेच की Happy

फ्राईड राईस मध्ये आमटी घातल्याशिवाय मला तरी चैन पडत नाही, आमटी नसेल तर दही पण चालेल Happy

मी फ्रुटी घालुन चहा प्यालोय एकदा (अंगात मस्ती दुसरं काय :))

बाकी, लेख एकदम झक्कास जमलाय Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

ब्रेड आणी आमटि बेस्ट लागते..लहानपणी अख्खा ब्रेड मी सम्पवायचो...आता वय झालय...

फ्राईड राईस आणी आमटि सुद्धा बेस्ट..

मस्तय...मजा आली वाचताना...माझी धाकटी बहिण इडली आणि कैरीचं लोणचं खाते/केचप खाते. आमटी/ब्रेड नाही पण सांबार/ब्रेड खाल्लय खूपवेळा. मस्त लागते.

आमच्याकडे तो पदार्थ होतो, तेव्हा बाकीचं काही दिसत नाही नवर्‍याला >>> अगदी, मी पहिल्यांदा केले तेव्हा नवर्‍याने त्यांच्यात म्हणे दुष्काळ पडला की असा काहीतरी पदार्थ खातात म्हणून नाक मुरडत खाल्ले पण आता पूर्ण शिजले पण नसतात तर हा ताट घेऊन खायला सुरु होतो, पण अजूनही चमच्यानेच खातो Sad

लय भारी लिवता बे तुम्ही.
एकदा मी पण एकाला "जिलेबी पाव" खाताना पाहीले आहे.

लिम्ब्या तुझ्या एव्हड्या सगळ्या पोस्ट मधे खालची उपमा सगळ्यात बेष्ट.. Proud

>>>>
ओल्ड मॉन्क ऐवजी देशी चा कडक घोट (बिन पाणी/सोड्याचा) घेतल्यावर जस वाटेल तस वाटल!
>>>>

वरणफळे!!!!!! .. आहाहाहाहा.... आज करायलाच लागतील ..... त्यावर बक्कळ तुप आणि बरोबर दह्यात कांदा व फोडणी घातलेली चटणी.. अजुन काय हवे समाधीसाठी!!
लेख आवडला Happy
मी असे वेगळे काही पाहिले नाही कधी.. हा, एकदाच भावाला त्याच्या मित्रानी झणझणीत अंडाकरी करायला सांगितल्यावर भावाने फक्त खंडीभर तिखट घालुन केलेल्या त्या अंडाकरीबरोबर मित्र तुप-गुळ घेउन खात बसला ते आठवते. Happy

मस्तं जमलाय लेख. एकेक असले प्रकार आठवले, मलाही.
चहा मधे कडक बुंदीचा लाडू, पुरणपोळीबरोबर "पातळ" म्हणून आणि तूप नको म्हणून दही-साखर, सोलकढी भातावर श्रीखंड (ईईईई), इडली आणि दूध-साखर (मस्तं लागते), मिठाशिवाय उकडलेल्या कणसावर पादेलोण घालून (यक)
फ्राईड राईसवर आमटी, नारळीभातावर दही... Happy

-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

चहात चिरमुरे? ईईईईई Sad
चिवड्यात दूध घालून मी पण खाते, मस्त लागतं Wink
चहात चमचाभर तूप पातळ करून घालून पण प्यायलेय मी, मस्त लागतं.

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

चहात चिरमुरे? ईईईईई >>>>>>>>
त्यात काय आहे दक्ष? मी तर गेली ५० वर्षे खातोय Wink
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

चहात चिरमुरे? ईईईईई >>>>>>>>

हे तर माझ्या भाचीचं ( वय वर्षे ५ ) आवडत खादय आहे... Happy

Lol मस्त लिहिलय एकदम.. Happy

मी पार्ले बिस्कीट चहात बुडवून खायच्या सवयीप्रमाणे इथे येऊन कुक्या आणि केक पण कॉफित बुडवून खातो... त्याबद्दल प्रत्येकवेळी माझे रुमीज खूप शिव्या घालतात... Proud

असाच एक प्रकार म्हणजे शेवग्याच्या शेंगा घातलेली कढी.. Sad कल्पनेच्या पलिकडची चव असते त्याची.. त्या प्रकराचा आणि कढीचा दुरदुरतक संबंध नसतो.. !!!!

<<आमचा कॅन्टीनवाला कढीमधे भजी टाकून देतो, मग ती भाताबरोबर खावी लागतात, आता ही डीश कोणत्या प्रान्तातुन आयात झाली काय की! >>

लिम्बु, ही डिश म्हणजेच कढी-पकोडा.... पंजाबी डिश आहे ही बहुतेक.... आवडते मला... Happy

राज्या, ५० वर्षं? Uhoh
बरा आहेस ना? Proud

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

Pages