वीकेंड म्हणजे आरामाचा, फिरण्याचा, नवे लिहिण्याचा, वाचनाचा 'टाईम'. आठवडाभर चौरस, हेल्दी ई. आहार खाऊन कंटाळलेली रसना वीकेंड येताच तोंडात वळवळू लागते कारण याच वेळी तिला चांगलं-चुंगलं खायला मिळतं. मालतीबाई कारवारकरांनी खुद्द आमच्या 'हि'ला दीक्षा दिली असल्याने आठवडाभरात मला फारसा 'स्कोप' नसतो. पण (माझ्या) सुदैवाने मालतीबाई हिला आहारज्ञान देत असताना आठवड्याच्या शेवटी 'जssरा' आवडते ते खायला हरकत नाही असेही म्हणालेले मी ऐकले होते. त्या पडत्या फळाचा आधार घेऊन मी तो 'जssरा' माझ्या भुकेनुसार लहान-मोठा करत आलेलो आहे. बाकी मला आवडणारा एकही पदार्थ आठवड्याच्या कोष्टकात बसत नाही हे पाहून दाटलेले दु:ख अजूनही हलके झालेले नाही. ज्या मिसळ, उसळ, वडा, समोश्यांनी मला लहानाचे 'मोठे' केले (तोच प्रॉब्लेम आहे...इति सौ. ची शेजारी बसून फोडणी!) त्यांना आज मी असे त्यागावे ह्या कृतघ्नपणाबद्दल मला रौरवात देखील जागा नाही या जाणिवेने मी खूपदा कष्टीही झालो आहे, पण एकदा सौ.च्या हातात आपली सूत्रे गेली की भल्याभल्यांचा 'मोरू' होतो तिथे म्या पामर काय करणार?
मात्र वीकेंडला आमचे घर उत्साहाचे आगर बनते. बाहेर फिरायला गेलो तर हमखास 'जड' जेवण झाल्यामुळे आणि घरी असलो तरी सिनेमे, वाचन इत्यादी 'जीवनावश्यक' गोष्टींसाठी वेळ काढायचा असल्याने वन डिश मील सदृश डिशेसना आम्ही प्राधान्य देतो. अशाच प्रकारातील एक डिश म्हणजे 'गुलाश'. हा पहिल्यांदा खाल्ला ९६-९७ साली बंगलोरला, 'कासा पिकोला' नावाच्या रेस्तराँमध्ये. युरोपिअन जेवणाची ओळख तिथे झाली. पुढे युरोपातही बर्याच वेळा खाल्ला पण 'कासा'ची चव स्मरणातून गेलेली नाही. हा पदार्थ हंगेरियन,ऑस्ट्रियन, झेक काहीही म्हणता येईल अर्थात त्याचे आपल्याला काय? आपणाला खाल्ल्याशी मतलब आहे. एक गोष्ट मात्र खरी की काही खास घटक याला लागतात त्यामुळे थोडे नियोजन करावे लागेल पण तयारी जास्त वाटली तरी कृती सोपी आहे. आणि खास घटकांबद्दल म्हणायचे तर रेसिपी वाचून आपणातले अनेक जण सोपे पर्याय सुचवतील याची खात्री आहे. आणखी एक गोष्टही सत्य म्हणजे दोघांनी मिळून दंगा-मस्ती करीत किचनमध्ये तयारी आणि सिद्धता केलीत तर काहीसा तिखट असलेला गुलाश लवकर तर बनतोच शिवाय भलताच 'गोड'ही लागतो हेही मी 'स्वानुभवाने' नमूद करू इच्छितो.
मूळ गुलाश मांसाहारी असतो पण सौ. शुद्ध शाकाहारी असल्याने आम्हाला खालील शाकाहारी व्हर्जनच भावलेली आहे.
तर बघूया का हा 'गुलाश' ?
साहित्यः
भाज्या:
फ्लॉवरचे तुरे अर्धी वाटी, लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिर्ची प्रत्येकी एक तृतीयांश वाटी, बटाट्याचे चौकोनी तुकडे अर्धी वाटी, दोन मोठे चमचे मटार दाणे, ५-६ मोठे मशरूम्स स्लाईस करून, एक मध्यम टोमॅटो बिया काढून चौकोनी तुकडे, थोडी कोथिंबीर अथवा पार्स्ले, एक मध्यम कांदा स्लाईस करून, तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून
(खालील फोटोत फ्लॉवर, बटाटे, मटार विसरलो, ते दुसर्या प्लेट्मध्ये होते)
बेसिक सॉससाठी:
दीड मोठे चमचे मैदा, ५०-६० ग्रॅम लोणी, असलीच तर एक चमचा ब्राऊन शुगर अथवा साधी साखर, व्हेजिटेबल स्टॉक ६०० मि.ली.
सीझनिंगसाठी (अँड धिस ईज द क्रक्स ऑफ गुलाश)
दोन छोटे चमचे टोमॅटो प्युरे, एक लहान चमचा पप्रिका (तिखटासारखेच असते. नसेल तर काश्मीरी लाल मिर्ची पावडर चालेल), पाव चमचा मध, अर्ध्या लिंबाचा रस, पाव चमचा बारीक कांदा, एक चिमूट ड्राय चाईव्ज (फ्रेश असतील तर आणखी उत्तम, नसतील तर नो प्रॉब्लेम), मिक्स हर्ब्ज एक मोठी चिमूट, दीड लहान चमचा सायडर व्हिनेगर (सायडर नसेल तर ब्राऊन, साधे काहीही चालेल), दोन लवंगा बारीक कुटून, पाव चमचा मिरपूड, पाव चमचा साधे तिखट, चिमूटभर गरम मसाला (ऑप्शनल), पाव चमचा मस्टर्ड पेस्ट, एक थेंब रेड पेपर सॉस (ऑप्शनल), पाव चमचा सोया सॉस
कृती
स्ट्यू पॉटसारख्या भांड्यात मध्यम आचेवर लोण्यात मैदा, साखर परतून घ्या, दोन मिनिटांनी (मैदा तपकिरी होण्याच्या आत) कांदा स्लाईस घाला, थोडेसे परतून लगेच स्टॉक घाला. एकजीव करून कोथिंबीर आणि मशरूम्स सोडून सगळ्या भाज्या घाला. पुन्हा चांगले मिसळा आणि सीझनिंगचे सर्व पदार्थ घाला. उकळी येतेय असे वाटले की मशरूम्स घाला. एक उकळी आली की चवीनुसार मीठ घाला.
पुढचे १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. साधारण बटाटे शिजले की झाले समजावे.
(शिजताना)
कोथिंबीर्/पार्स्ले घालून सुशोभित करा
छान शिजलेल्या भाज्या आणि सरसकट अंगाबरोबरचा रस हे ह्या डिशचे खास वैशिष्ट्य आहे.
गरम वाफाळता भात, पराठे ई. बरोबरही छान लागते पण आम्हाला घरी केलेल्या गार्लिक ब्रेडसोबत खाणे जास्त पसंद आहे.
नक्की कळवा कसे झाले ते
मस्त दिसतय !
मस्त दिसतय !
बहोत बढिया! तुमची पदार्थ
बहोत बढिया! तुमची पदार्थ सांगायची स्टाईल आणि पाककॄति दोन्ही आवडल्या.
छान रेसिपी मी यात मध,
छान रेसिपी
मी यात मध, चाईव्ह्ज, मस्टर्ड सॉस आणि मिक्स्ड हर्ब्स घालत नाही. बारीक चिरलेली लसुण आणि बे लिफ घालते. सोया चंक्स शाकाहारी गुलाश आणि मिनी चिकन सॉसेजेस मांसाहारी गुलाश मधे घालते.
गुलाश पास्ता वर घालुन पण छान लागते. उक्डलेला पास्ता (फेटुचिनी/स्पगेटी) त्यावर असे गुलाश आणि वरतुन थोडे सावर क्रिम.... थंडीतले कम्फर्ट फुड
ही रेसिपी स्लो कुकर मधे पण चांगली होते.
<< < दोघांनी मिळून दंगा-मस्ती
<< < दोघांनी मिळून दंगा-मस्ती करीत किचनमध्ये तयारी आणि सिद्धता केलीत तर
कृती लिहायची स्टाईल छान आहे तुमची. फक्त वरचे गुलाश जरा जास्त पातळसर दिसतेय :).
गुलाश बनवायच्या पद्धती अनेक आहेत. मी जर्मन पद्धतीने गुलाश बनवते, अर्थातच मीट ( पोर्क / बीफ ) घालून. जेव्हढे मीट तेव्हढाच कांदा बारीक चिरून तेलात परतायचा. पण कांदा ब्राऊन होऊ द्यायचा नाही. त्यात घालायचे मसाले म्हणजे पाप्रिका, मीठ ,मिरे, लसूण, थाईम, Marjoram, टोमॅटो मार्क ( concentrated tomato paste ), लिंबाची साल कीसून आणि cumin seeds ची पावडर. हे सर्व मिळून येण्यासाठी अर्थातच कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून लावायचे. चालत असल्यास रेड वाईन घालायची. नाहीतर व्हेजिटेबल स्टॉकच वापरायचा. पुढच्यावेळी केले की फोटो टाकेन
ऑफिसच्या कॅफेटेरियात असतं
ऑफिसच्या कॅफेटेरियात असतं गुलाश. मला कधी आवडलं नाही. घरी करुन बघेन कधी.
कृती लिहायची स्टाईल छान आहे तुमची >>> +१
मेघना भुस्कुटेच्या ब्लॉगवर आहेत अशाच गोष्टी वेल्हाळ पाककृती. बहुतेक खादाडीचा वेगळाच ब्लॉग आहे तिचा- खाईन तर तुपाशी (?)
सोपा आहे की प्रकार.
सोपा आहे की प्रकार. कापाकापीला वेळ लागेल तितकाच. सोपा आणि भरपूर भाज्यांचा प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.
लाजोनं सांगितलेल्या अॅडिशन्सही आवडल्या.
हा प्रकार पण आवडला! वेगळ्या
हा प्रकार पण आवडला!
वेगळ्या प्रकारे केलेली 'मिक्स व्हेज!'
लाजोजी वेलकम ब्यॅक! स्लो कुकर टीपबद्दल धन्स!
भारतात (बन्गळूरात ) रेडिमेड
भारतात (बन्गळूरात ) रेडिमेड व्हेजिटबल stock मिळत नाही हो .....
फक्त पाणी वापरले तर चव चान्गली येइल का?
वत्सला राजसी, मॅगीच्या व्हेज
वत्सला
राजसी, मॅगीच्या व्हेज स्टॉक क्युब्ज मिळतात त्या वापरू शकतेस. पवडर फॉर्म मधेही स्टॉक मिळतो काहि सुपरमार्केटांमधे.
नाहीतर भाज्या / चिकन शिजवुन त्याचे पाणी वापरायचे.
रेसिपी लिहिण्याची स्टाइल
रेसिपी लिहिण्याची स्टाइल लाजवाब
पदार्थ आयता खायला मिळाल्यावर कळेल की कसा झाला होता.
छान वाट्तोय हा प्रकार. करुन
छान वाट्तोय हा प्रकार. करुन बघण्यात येईल. मी कायम नवीन one dish meal च्या शोधात असते. लिहायची स्टाईल पण छान आहे तुमची.
हे पण मस्त लिहीलेय. इतक्या
हे पण मस्त लिहीलेय.
इतक्या भाज्या असलेले पावभाजी सोडून काहिही आवडत नाही.त्यामुळे करणार तर नाही पण वाचायला आवडले.
शाकाहारी गुलाश ! वा छानच. (
शाकाहारी गुलाश ! वा छानच. ( छान लिहिलय. )
छान वाटतोय प्रकार. लेखनशैली
छान वाटतोय प्रकार. लेखनशैली आवडली.
छान वाटतोय हा प्रकार, पण सगळे
छान वाटतोय हा प्रकार, पण सगळे जिन्नस मिळायला पाहिजेत.
पण आम्हाला घरी केलेल्या गार्लिक ब्रेडसोबत खाणे जास्त पसंद आहे.>>> गार्लिक ब्रेड ची पण रेसीपी द्या
राजसी, मॅगीच्या व्हेज स्टॉक
राजसी, मॅगीच्या व्हेज स्टॉक क्युब्ज मिळतात त्या वापरू शकतेस. >> फक्त त्या क्युब्जमधे मिठ घातलेलं असतं त्यामुळे नंतर मीठ घालताना अंदाज घेऊन घालणे. सुपरमार्केटमधे व्हेज स्टॉक मिळतो बर्याचदा. पण त्याची जेवढी किंमत असते त्यामधे माझ्या आठवड्याभराच्या भाज्या आणून होतात. (तात्पर्यः व्हेज स्टॉक घरीच बनवा.
रेसिपी करून बघण्यात येइल. लाजो, तुला स्पेशल धन्यवाद. घरात चाईव्ह्ज आणि मस्टर्ड सॉस नाही. आता तुझ्या अॅडिशनने करून बघेन.
दिसतंय तरी मस्तच. घरच्या घरी
दिसतंय तरी मस्तच.
घरच्या घरी गार्लिक ब्रेड कसा करतात ते कृपया सांगाल का?
तुमच्या आय मीन तुम्ही
तुमच्या आय मीन तुम्ही केलेल्या पाकृ हटके असून सोप्या असतात अन त्याचबरोबर वाचनीय पण असतात.
लिहिण्याची पद्धत आवडली.छान
लिहिण्याची पद्धत आवडली.छान आहे रेसिपी!
लाजो,तुझी मिनी चिकन सॉसेजेसची अॅडिशन आवडली.
मस्त रेसीपी आहे ....आज डिनर
मस्त रेसीपी आहे ....आज डिनर ला गुलाश..........
गुलाश... ..शाकाहारि.......बिग
गुलाश... ..शाकाहारि.......बिग नो...... सगळि मजाच जाईल खाण्याचि......गुलाश मीट च ( पोर्क / बीफ ) छान लागते.
ही रेस्पीही मस्त!!!.. लाजो ची
ही रेस्पीही मस्त!!!.. लाजो ची अॅडिशन आवडली..
लेखनशैली झकास.. पदार्थ करुन
लेखनशैली झकास.. पदार्थ करुन बघेन की नाही शंका आहे. मी नविन रेसिपी जर पदार्थ दिसायला आवडला तरच करते
दक्षिणा, मी गार्लिक ब्रेड या रेसिपीने करते. http://www.foodnetwork.com/recipes/ina-garten/garlic-bread-recipe/index....
त्यात ताजे हर्ब्स म्हटले आहे, मी तरी सुकवलेले, बाटलीतलेच वापरले आहेत नेहेमी. छान होतो गार्लिक ब्रेड.