'बोलाची नसलेली' गुजराती कढी

Submitted by अमेय२८०८०७ on 16 February, 2013 - 06:50

खाण्याची चव आणि त्याचे सादरीकरण यांचा अन्योन्य संबंध आहे. चव आणि दृष्टिसुख यात अधिक महत्त्वाचे काय ह्यावर 'सौंदर्य की बुद्धिमत्ता' या पठडीतला ज्वलंत परिसंवाद होवू शकेल (कोणी टी.व्ही. चॅनेलवाला ऐकतोय का? तेवढे रॉयल्टीचे विसरू नका!) पण प्रस्तुत लेखाचा तो उद्देश नाही (की अभिनिवेश? या संस्कृतप्रचुर शब्दांत नेहेमी घोटाळा होतो. व्यासंग नसल्याचा परिणाम).
मात्र वरील दोन्ही निकषांवर उच्च गुण मिळवण्यात एका प्रांतातील पाककृती यशस्वी ठरतात तो म्हणजे गुजरात होय! आम्ही आमच्या माफक लांबीच्या जिभेच्या मापाने हे लिहित आहोत. पुढचा पंतप्रधान कोण होणार ई. राजकीय विचार आमच्या मनातही नाहीत याची नोंद घ्यावी. इतका धोरणीपणा (की दूरदृष्टी ?) आमच्यात असता तर आम्ही आधार कार्ड सारख्या एखाद्या दूरगामी वगैरे योजनेचे हपिसर झालो नसतो काय? तर असो.
गुजरातचे जेवण (दारुबंदी असूनही) आम्हाला झिंग आणते. विशेषतः ती परिपूर्ण थाळी. त्या छोट्याशा रोट्या, ठेपले, खांडवी, पातळशी खिचडी, चवदार भाज्या, ऊन्धियू वगैरे थाळीत सजलेले पाहूनच अर्धी तृप्ती होते. तसे आम्ही 'पोटाने' विचार करणार्‍यातले असल्याने भारतातील सगळ्याच प्रांतातल्या खाण्याला आमचे झुकते माप आहे (आणि हाच आमच्या वजनाला शाप आहे..असे आमची सौ. कुटुंबसुलभ वत्सलतेने म्हणते पण ते सोडा.)
वेगवेगळ्या पा.कृ. चाखल्यावर निरनिराळे भाव आमच्या मनात उमटतात. ठेचा, कोल्हापुरी मटण खाऊन आम्हाला एखादी घट्ट लावणी ऐकत असल्याचा 'फील' येतो तर ईडली-दोसा चापताना यम. सुब्बुलक्ष्मी मायेने 'कौसल्या सुप्रजा' गातायत असा भास होतो. तसेच पाणीपुरी फोडताना उगाचच 'मुन्नी बदनाम' ऐकू येते. पण हा आमचा आंतरिक गोंधळ असून आमच्या मेंदूतील 'प्लंबिंग' बिघडलेले आहे असे आमचे एक बांधकाम व्यावसायिक मित्र कुचेष्टेने म्हणतात. पण हेही सोडाच. आमच्या कोत्या मनाचे मनोवैज्ञानिक (हुश्श.) विश्लेषण हाही या लेखाचा उद्देश नाही. (खरेतर पा.कृ. म्हणून सुरू केलेल्या या लेखाचा खरेच उद्देश काय हे आता आम्हालाही कळेना झालंय. प्लंबिंगची शंका खरी असावी बहुतेक!)

तर काय सांगत होतो बरं ..हां, हां गुजराती जेवण! या सगळ्या गुजराती जेवणाची राणी म्हणावी असा पदार्थ म्हणजे ती खास गुजराती कढी होय. मराठी कढीचाही आम्हाला अभिमानच आहे. खरेतर कढी मूळची कुठली आणि तिला पेशव्यांच्या एखाद्या मनसबदाराने पुण्यातून 'जहागिर' मिळवून जाताजाता घोड्यावर घालून गुजरातेत नेली की एखाद्या 'जिग्नेशभाईने' नशीब काढण्यासाठी सोबत आणलेल्या लोट्यातून ती मुंबई इलाख्यात आली यावर आम्ही पुढे-मागे मौलिक संशोधन करणारच आहोत. पण सध्या तरी मराठी कढी मूळ मानून तिची चुलतबहीण म्हणावी अशा या गोड-आंबट, जिरे-मोहरी, आले यांच्या स्वादाने नटलेल्या प्रकारावर आम्ही पत्नीखालोखाल प्रेम करतो. (पत्नी हे वाचते याची कल्पना आहे). त्या कढीचीच आम्हाला उमजलेली रेसिपी खाली जोडत आहोत (भाग्यवान लोक मला उमजलेले मर्ढेकर, आरती प्रभु ई.वर लिहितात. तेवढी ताकद आमच्या लेखणीत नाही. पण ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ..राजहंसाचे चालणे..वगैरे. शी... इथेपण काही ओरिजनल सुचत नाही पण ज्ञानेश्वरांनी या ओव्या लिहून आमच्यासारख्या अगणित अर्ध्या कच्च्या मडक्यांची सोय मोठी झकास केली आहे !)

साहित्यः
(स्टॅन्ले कुब्रिकच्या चित्रपटांसारखे) माफक आंबट दही - दोन वाट्या
बेसन - दोन मोठे चमचे
साखर - एक चमचा
मीठ चवीनुसार.

वाटणः
आले एक इंच तुकडा, एक मोठी हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर

फोडणी:
साजूक(च) तूप, जिरे-मोहरी पाव पाव चमचा, ३-४ मेथी दाणे, कढिलिंब ५-६ पाने, दोन लाल मिरच्या शक्यतो बिया काढून, हिंग पाव चमचा, अर्धा ईंच दालचिनिची काडी

160220131361.jpg

कृती:

दही, बेसन, मीठ साखर व्यवस्थित घुसळून एकजीव करून घ्या. त्यात दोन वाट्या पाणी घालून मंद आचेवर एक उकळी आणा. उकळी आल्यावर वाटण घालून पुन्हा घुसळा आणि पुन्हा उकळूद्या. दोन चार मिनिटे मंद आचेवर शिजल्यावर फोडणीसाहित्य वापरून फोडणी करा आणि ती कढीवर घाला.

थोडीशी आणखी कोथिंबीर वापरून सुशोभित करा आणि गरम भात, खिचडीबरोबर खायला द्या. (खिचडीची रेसिपीही मिळेल असे वाटणे सपशेल चूक आहे कारण पत्नीने वाफाळते ताट समोर आणल्याने आम्ही आधीच रसनेच्या राज्यात पोचलेलो आहोत.)

(वैधानिक इशारा: ही पा.कृ. वाचताना अथवा अशी करून खाल्ल्यावर आपणापैकी काहींच्या मेंदूतील अथवा इतरत्र प्लंबिंग बिघडल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, याची नोंद घ्यावी)

160220131364.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडीचा प्रकार! नुसती प्यायला पण आवडते.
मी दालचिनी घालत नाही. पुढच्या वेळी नक्की घालुन बघते.

फोटो छान आहे. पण कढी खिचडी असा फोटो टाकायचा ना!

मस्त दिसतोय फोटो. गोडसर गुजराती कढी खूप आवडती (मराठीही आवडतेच). तुमच्या कढीही एकदम अस्सल दाट आणि ट्रान्सपरंट दिसतेय. पुढल्या वेळी दालचिनी घालून बघेन. एक दोन ठिकाणी लवंग घातलेली पाहिली आहे. तसंच कढिपत्ता नसतो बहुतेक.
>>एखाद्या 'जिग्नेशभाईने' >> इथे चुकलात. 'जिग्नेसभाई' असं हवं.

कढीप्रमाणेच लेखही चवदार झालाय.

सायो Wink जिग्नेसला अनुमोदन.

मी घरगुती गुजराथी कढी सर्वप्रथम जिग्नेस नावाच्या मित्राच्या डब्यातच खाल्ली.

मी फोडणीत मोहरी, मेथी वापरत नाही पण दालचीनी आणि लवंग वापरते. पुढच्या वेळेस मेथी दाणे घालून बघेन.

येस्स, गुजराथी मसाला कढी (छानशी गोड गोड) मला भयंकरच आवडते.

तुमची लिखाणाची शैली एकदम प्रभावशाली आहे. अजून रेसिप्या येऊद्यात. Happy

कढी चवदार की लेख! हा खल चालल्याने तुर्तास अभिप्राय देणे अशक्य!तुमच्या रसिकतेला व तुमच्या सुगरण पत्नीला सलाम! अश्याच चवदार रेसिपीज् येऊ देत!

माझी आवडती कढी.... दालचिनी, मेथी आणि लवंगेने एकदम मस्त चव येते. आई तर यात थोडे मिरी दाणे पण घालायची.

लेख आणि पाकृ दोन्ही झक्कास Happy

छान कढी... सुरतनु जमण अने... असे म्हणतातच.
दालचिनी + मोहरी थोडी ठेचून घातली तर जास्त चांगली लागते.

मी आजवर गुजराती कढी खूपदा केली आहे. पण वरच्या फोटोसारखी दाट, ट्रान्सपरंट आणि किंचित पिवळट रंगाकडे झुकणारी कढी काल पहिल्यांदा जमली. का? कारण आजवर दही फेटून घेतलं की डाळीचं पीठ थोड्या पाण्यात गुठळ्या मोडून मग दह्यात घालून हातानेच मिक्स करत असे. काल पहिल्यांदाच ब्लेंडरने ब्लेंड केलं. काल फोडणीत थोडी दालचिनीही घातली. लवंग, मेथी दाणे एरवीही घालतेच. मस्त चव आली. धन्यवाद.