"तुला फक्त माझं लोणचं आवडतं का?"
"तुझं नाही, तू केलेलं! तुझं लोणचं तुझ्या नवर्यानं घातलंच आहे"
"हं! चल रुग येईल"
"सव्वा बारा ना?"
"हो पण पावणे बारा होऊन गेले की आता?"
"चला... ... आता का?... आता का अडवतीयस?"
"आय कान्ट हॅव सरप्राइझेस"
"म्हणजे?"
"तू अगदी या क्षणाला उठशील असे वाटत नव्हते. पण स्वार्थ उरकलाय म्हणा आता तुझा"
काही वेळ दोघेही बसून राहिलो. एकमेकांचे स्पर्श नुसतेच अनुभवत. दोघेही आपापल्या पद्धतीने विचार करत होतो. या भेटी ही कश्या प्रकारची गरज होती? हे नाते कसे असावे! का असावे. नसले तर काय होईल. भविष्यात तसे कधी तरी होणारच होते, याची जाणीव पोखरत होती. कधी, ते माहीत नसले तरी कधीतरी हे नक्की होते.
बावन्न पत्त्यांपैकी आपल्या हातात कोणतेही रँडम पत्ते यावेत तसे मी आणि हीना पटेल एकाच ठिकाणी एकत्र आलो होतो. जीम! तिला बारीक व्हायचे होते, पण ती जे काय होती तेही उत्तम होती. तिच्या शिस्तबद्धपणे 'लॅटरल पुल' करतानाच्या हालचाली बघून मी तिला ग्रेसफुल हे नांव ठेवले होते. अनेकदा आमचे 'लॅट पुल' चे सेट्स एकदम यायचे. त्यामुळे मी किंवा ती थांबून असायचो. ग्रेसफुल म्हंटलेले तिला आवडत होते असे दिसत होते. ते सगळे तिथेच संपले असते. पण एकदा ती सवाई गंधर्वला चक्क एकटी येऊन बसली आणि मी कितीहीजणांबरोबर असलो तरी एकटाच असतो त्यामुळे अधिक गप्पा झाल्या. अतिशय चिडकी, संतापी असावी ती. शीघ्रकोपी! पण रिझर्व्ह्ड नव्हती. फाड फाड बोलून आभाळ उघडावे तशी उघडायची पुन्हा! मग चुकून रस्त्यात एक दोन भेटी झाल्या तेव्हा कुटुंबकबिला होता बरोबर. उगाचच ओळखीपाळखी!
नवरा डिफेन्समध्ये असला की बायका ऑफेन्सिव्ह होतात.
हीना पटेलचा नवरा जबलपूर, कानपूर, देवास, अंबरनाथ असल्या ठिकाणी ऑडिट आणि कायकायसाठी फिरत असायचा. रुग असेल दहा वर्षाचा!
एकदा हीनाचे एका ट्रेनरशीच भांडण झाले. तो तिला कसलेतरी तीन सेट्स करा म्हणत होता. तिने हात दुखत आहे म्हणून नकार दिला तर त्याने अक्कल शिकवली. म्हणे काहीही होत असले तरी स्किप करायचे नाही. तिने त्याला सोलला सर्वांदेखत! नंतर सॉरीही म्हणाली. पुन्हा आपली उघडीप झाल्यासारखी ताजीतवानी!
सहा महिने सलग जीमला जाण्याचा मला झालेला फायदा म्हणजे हीना पटेलशी जवळीक होणे! लांबून येणारी ट्रेन खूप हळू भासावी आणि प्रत्यक्षात स्टेशनमधून धूळ उडवत जाताना तिचा वेग समजावा अश्या शैलीने आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.
हीनाच्या घरावर, वस्तूंवर, सुशोभीकरणावर आणि वर्तनावर सर्वत्र तिच्या आणि तिच्या नवर्याच्या एकमेकांवरील प्रेमाचे स्पष्ट ठसे होते. रडतराऊ नव्हती ती. नवरा आठ आठ दिवस नसला तरी ती दिलखुलास जगायची.
पण एकदा तिच्या घरी मी असताना तिच्या नवर्याचा फोन आला आणि तिने त्याला सॉलीड झापलेले मी ऐकले. कशावरून तर त्याची ट्रीप आणखी दोन दिवसांनी लांबली होती. फोन ठेवल्यावर मी माझा नैसर्गीक जळफळाट व्यक्त केला.
"इतकं काय प्रेम? झाली असतील की आता बारा वर्षे? राहवत नाही का?"
"आय कान्ट हॅव सरप्राईझेस. मी त्याला आज रात्री एक्स्पेक्ट करत होते"
"मग मला कर आता"
"रात्री? तुला? सोसायटीच्या आसपास घुटमळलास तरी बोंब मारीन"
खदाखदा हासलो मी. मग म्हणालो....
"एकदा रात्री भेटून पाहायला हवे पण"
"सगळं हेच असतं, फक्त दिसत नाही... निघा आता... कटावे लोभ असावा"
साडी नेसावी कशी यावर पी एचडी करता येत असेल. पण साडी सोडावी कशी यावर फक्त डी एच पी करता येईल. डू इट लाईक हीना पटेल. बहुमत गमावलेल्या सरकारने पद सोडावे तशी ती साडी सोडायची. चेहर्यावर निर्वाणीचे आणि आता हे करावंच लागणार आहे तर एकदा करून टाकू असे भाव! जणू सासुरवाशिणीला घरकाम पडतंय!
अमेरिकेचा व्हिसा देणार्या अधिकार्याला असे वाटावे की जणू समोरचा माणूस साला अमेरिकेला गेला नाही तर अमेरिकेचे सार्वभौमत्व धोक्यात येईल. कोण कोणाची गरज आहे हेच समजू नये या पातळीला हीना कोणत्याही माणसाला आणू शकायची. तिचे फाड फाड आणि कोरडे ओढल्यासारखे बोलणे हे तिचे सर्वात मोठे भांडवल होते.
एकदा मी असाच दारात जाऊन उभा राहिलो. चुकलो मी! तिने मला आत घेतले आणि अभूतपूर्व झापले. लाजलज्जा काढली माझी. मी असा कसा काय तिला गृहीत धरून येऊ शकतो हा तिचा प्रॉब्लेम मला पूर्णपणे मान्य होता. पण मीही वाद घातला.
"इतक्यावेळा भेटल्यानंतर एखादवेळा मी असा आलो तर मला काहीच हक्क असू शकत नाही का?"
"आपण भेटतो हे सोसायटीत पाटी लावून सांगायचं का सगळ्यांना? आत्ता घरी रुग किंवा कोणी असते तर?"
"याचा अर्थ तुला इच्छाच नसते मला भेटायची..."
"असते तेव्हा भेटतो ना?"
"तुझ्यावर अवलंबून का म्हणजे सगळे?"
"तू समजतोस काय मला? हवे तेव्हा येथे येऊ शकत नाहीस तू"
"ठीक आहे... "
मी उठून निघालो. एका शब्दानेही ती 'थांब' म्हणाली नाही. मी सोसायटीतून बाहेर पडून वळणावर वळताना मागे पाहायचो तेव्हा ती एका खिडकीत इतर कोणाला दिसणार नाही अशी उभी राहायची. मला खात्री आहे की मी मागे बघतो की नाही हे बघण्यासाठी ती तेव्हाही तिथे उभी असणार, पण ती मात्र मला दिसली नाही. शी कूड नॉट हॅव्ह सरप्राइझेस!
एक आठवड्याचा अबोला असह्य होता.
हसू येते आता. पण तेव्हा मी इतका सिरियस होतो की तिला नुसते पाहायला त्याच वळणावर मी अनेकदा रात्रीचा येतो हे तिला माहीत असल्यामुळे त्या वळणावर मी रोज रात्री उभा राहात होतो त्या अबोल्याच्या कालावधीत! पण ती एकदाही दिसली नाही. व्हेरी स्ट्रिक्ट! रडकुंडीला आलो होतो मी! पण इगो! कोणीच कोणाशी बोलले नाही.
'मन' नावाची अदृष्य बाब जगात नसती तर बरेच काही चांगले किंवा प्रगतीशील झाले असते असे मला वाटते. कोण कुठली हीना पटेल आणि कोण कुठला मी! कशाला जवळ आलो आणि किती क्षुल्लक गोष्टीने, जी अर्थातच तितकी क्षुल्लक नव्हती, दूरही गेलो. दूर गेल्यावर चुटपुट वगैरे! हळहळ, हुरहूर! असले शब्द चपखल बसावेत असल्या मनोवस्था!
दोन माणसांच्या एकमेकांपासून असलेल्या कोणत्याही गरजा भागण्याची वेळ एकच नसते हा मोठा घोळ आहे. एकाची आधी भागते, दुसर्याची नंतर वगैरे! ताटातुटीनंतर तर त्या गरजा खरंच गरजा होत्या का येथपर्यंत विचार पोचतात. सारेच व्यर्थ!
माझ्या आयुष्यातील ऐन महत्वाचा काळ मी वाया घालवून गाजवला. बिघडलेल्या मुलाला बापाची इस्टेट मिळावी तसे आयुष्य उधळले.
ज्याला संस्कृती पाय घसरणे म्हणते त्याला मी आपोआप पुढे जाणे म्हणतो.
सकाळ होते 'आज दिवसभरात काय काय विलास करता येतील' या विचारात! दुपार होते कामाची टाळाटाळ आणि संध्याकाळची प्रतीक्षा करण्यात! संध्याकाळ केव्हा होते हे कळतच नाही. आणि रात्र होते पहाटे अडीच वाजता, ज्यानंतर अर्ध्या तासाने माझे बाबा उठून देवाला पहाटेचा दिवा लावतात आणि दूध गरम करायला ठेवतात.
कर्तबगार समाजाला झालेलं अवघड जागचं दुखणं आहे मी! चार शिव्या स्वतःला हासडल्या की आपणही कोणी मोठे आहोत असे वाटायला लागते. पण तेही खरे नसते. खरे काहीच नसते साले! आपण मोठे आहोत का, चांगले आहोत का, कर्तव्यतत्पर आहोत का याने काही फरकच पडत नाही. शरीर एक, जन्म एक! मृत्यू निश्चीत!
कोणत्यातरी क्षणी कोणालातरी आपण फार हवे असणे अश्या क्षणांच्या साखळीत बाकीचे अनंत वांझ क्षण गुंतवून होणारी साखळी म्हणजे आयुष्य! शेवटी तर हेही कळत नाही की वांझ क्षण त्या हव्याश्या क्षणांसाठी जगत होतो की हवेसे क्षण त्या वांझ क्षणांसाठी!
आपण इतरांना हवे असणे अश्या क्षणांची संख्या वाढवण्यासाठी व्यतीत केलेले क्षण कुठे मोजले आणि? ते तर इतके असतात की प्रत्यक्षात आपण कोणालातरी हवेसे होतो तेव्हा त्याचा आनंद असतो त्यापेक्षा त्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या क्षणांचाच आनंद भोसडीचा जास्त असतो.
प्रयत्नांचा आनंद यशप्राप्तीच्या आनंदापेक्षा जास्त होणे हे आपण स्वर्गात जगत असल्याचे द्योतक मानावे. नाहीतर मग निदान निर्विकार तरी व्हावे. हीना पटेलसारखे!
"काढ!" हा शब्द ती तिच्या गळ्यातला माझा हात, लोणच्याच्या बरणीचे झाकण आणि ब्रा चा हूक या तिन्हीसाठी एकाच निर्विकारपणे उच्चारायची. आणि तिन्ही गोष्टी काढताना त्या आपण काढतो आहोत यापेक्षा त्या काढण्यापर्यंत पोचण्यासाठीचे प्रयत्न आपण केले याचाच आनंद जास्त व्हायचा.
हाही इगोच आहे. एखादी गोष्ट मिळणे यापेक्षा मी ती मिळण्याच्या पात्रतेचा आहेच मुळी हे स्वतःला जाणवणे हा तो इगो. ती नाही मिळाली तर प्रयत्न किंवा आंबट द्राक्षे! जन्म ते मृत्यू हा तहान लागण्याचा काळ सगळे सजीव जग नावाच्या पाणवठ्यावर काढतात. पूर्ण जीवन एक तहान आहे. कसलीही तहान! 'आता मला काही नको आहे', 'आता मला काही करावे लागणार नाही आहे' किंवा 'आता काही नाही मिळाले तरी चालेल' ही मनस्थितीच मुळी येत नाही कधी!
विचार न करता बेधडकपणे जगणे हा फॉर्म्यूला माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला आनंदी करून गेलेला आहे. अपघात व परवाच्या 'प्राणांतिक' टायपाच्या आजारपणाचे काही दिवस किंवा महिने सोडले तर बाकी काय प्रॉब्लेमच काय होता मला? हवे ते करू शकलो.
कोणीतरी आपल्याला हवे असणे ही भावना माझ्या मनात जवळपास यायचीच नाही. हल्लीहल्लीच जरा जाणवते की आपल्याला आपला संसार हवा आहे, मित्र हवे आहेत, आता वाट्टेल तसे जगता येणार नाही. दर आठवड्याला दोनवेळा पी टी आय एन आर चेकिंगचा रिपोर्ट हातात घेताना धाकधूक असते की रक्त फार पातळ तर झाले नसेल ना? फार घट्ट तर झाले नसेल ना? यापूर्वी 'कोणीतरी आपल्याला हवे आहे' या यादीत भलतीच माणसे असायची. हीना पटेलसारखी! ती यादी किती झपाट्याने बदलत आहे. इव्हन आय कान्ट हॅव सरप्राइझेस! बट आय अॅम सरप्राइझ्ड!
हीना पटेल आपल्याला प्रत्यक्षात नकोच होती हा विचार मनात पहिल्यांदा कधी डोकावला ते आठवत नाही.
चांगली अथवा वाईट, प्रत्येक आठवण पुढे दु:खच का देते? आपण हीनाबरोबर व्यतीत केलेले सुखद क्षण आज हीना नको आहे हे पटूनही त्रास का देतात? कोणता मालकी हक्क या मनाला हवा आहे ज्यामुळे हीना सातत्याने आजही हे म्हणत राहीले की तू मला अजूनही हवा आहेस आणि आपला इगो सुखावत राहील? एक माणूस, एक स्वतंत्र माणूस त्याला हवा तसा वागू शकतो हे आपण आपल्या दुष्कृत्यांमधून स्वतःलाच दाखवून देत असताना इतरांनी मात्र इमानदारीत राहावे ही हलकट प्रवृत्ती माझ्यात कधी आली? पझेसिव्हनेसच्या यादीत इतकी अनंत नावे का? आणि त्यातील कोणत्याही नावाशी निगडीत असलेल्या सर्व स्मृती बोचर्याच का? असेच का अन तसेच का!
तर दहा दिवसांनी असह्य होऊन मी तिला सरळ फोन केला आणि तो तिनेही सरळ उचलून थेट म्हणाली.
"बोलायला लागूयात"
माझ्यातले काय सुखावले होते? पुन्हा तेच, की कोणालातरी आपला दुरावा सहन होत नाही आहे. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आपण जरी फोन केला असला तरी आपण काही बोलायच्या आतच ती व्यक्ती ते बोलून टाकत आहे.
त्याहीदिवशी भांडणच झाले. तू असा का वागलास, तू अशी का वागलीस, मी कितीवेळा रस्त्यावर उभा राहायचो, तुला नाही का काही वाटत वगैरे वगैरे! इतकेच, की ते भांडण हे भांडण मिटवण्यासाठी केलेले होते.
माणसांच आधीच सगळे ठरलेले असते. गरजेने ड्राईव्ह केलेल्या कृतींना कर्तृत्व का मानले जावे समजत नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या गरजेतून करत असतो. अगदी आईचे मुलावरील प्रेमही वात्सल्य प्रकट करण्याच्या आंतरिक गरजेतून येते. पण या अश्या गोष्टींना नांवे मोठमोठी मिळतात. गांधींना महात्मा म्हणतात आणि सावरकरांना स्वातंत्र्यवीर! दोघांची गरज एकच, माझा भूप्रदेश माझ्या ताब्यात यायला हवा.
त्या दिवशी ती मला दिसेल अशी खिडकीत उभी राहिली होती मी वळणावर वळताना!
हलकाच हातही केला मी! तिनेही केला. एक दोरी सुटल्यावर उधळलेले नाते नावाचे वासरू पुन्हा हातात गवसले होते.
माझ्याकडे असलेल्या शर्ट्स आणि टीशर्ट्सची संख्या मोप आहे. सहा सात महिने पुन्हा राऊंड येणार नाही एकेकाची. पण त्यातील किमान पंधरा दिवस मी या असल्या नात्यांमधून निघताना मिळवलेल्या शर्ट्सवर तगू शकेन. आणि ते घरी समजले तर ती माझी घरातील शेवटची पंधरा मिनिटे असतील.
हल्ली तर घाबरायचाही कंटाळाच येतो. काय व्हायचं ते होऊन जाऊदेत स्सालं! निबर मनाच्या हारवलेल्या कोवळीकीबरोबर असंख्य नाती आपापले प्रसंग घेऊन शहीद झाली. गेल्या खूप महिन्यांत जोरदार हासलेलो नाही की रडलेलो नाही. जणू आता प्रत्येक हारवलेले नाते 'हीना पटेल'चेच होते. असले काय अन नसले काय!
लक्ष्य तिच्या नवर्याचे नांव! त्याचे लक्ष नसताना इकडे बरेच काही होत होते. पण तो इथे असताना मात्र साधा एस एम एस ही नसायचा.
एका व्यक्तीने दोन व्यक्तींबरोबर समरस असण्यात आपल्या टुकार संस्कृतीला काय ऑब्जेक्शन असते समजत नाही. हेच माझ्या बायकोच्या बाबतीत घडले असते तर? असा प्रश्न मनात आला की हल्ली तर उत्तर येते मनातूनच, की भले ती असे कधीच काही करणार नाही, पण आपण तिच्यावर बंधनकारक का असावे? आपल्याला नैतिक अधिकार तर नाहीच, पण आपण अगदी सोवळ्यातले असतो तरी बंधनकारक का असावे? आयुष्य 'असेअसेच' जगावे हे कशावरून ठरवायचे? ज्याने त्याने आपापलेच ठरवलेले बरे ना?
एका व्यक्तीला दोन व्यक्ती एकाचवेळेस त्या अर्थाने आवडू शकतात हे पटवून घेतले जात नाही. मग लपूनछपून सगळे करायचे. आणि पुढे पुढे असे व्हायला लागते की नात्यातील 'चोरीची, लपवाछपवीची' तीव्र उत्कंठामय भावना विरली की ते नाते कंटाळवाणे वाटू लागते. गृहीत धरले जाऊ लागते. मग असे वाटते साला मजा सगळी त्या चोरीतच होती.
नेमका आनंद कशात असतो हे कळणारच नाही अश्या हजारो बाबी करून बसलो या आयुष्यात! आता याचा अर्थ चांगले वागण्यात, कर्तव्यतत्पर व शीलवान असण्यात आनंद असतो असा काढण्यात तर मुळीच राम वाटत नाही. उलट समाधान वाटते की ज्या गोष्टी हा ढोंगी समाज चघळायला वापरतो त्या आपण श्वास घ्यायला वापरल्या.
हीनासारखी माणसे माझी त्या त्या काळातील व्हेन्टिलेटर्स होती. आज मी त्याशिवाय श्वास घेऊ शकतो. हीच एक अॅचिव्हमेन्ट नाही का?
प्रॉब्लेम फक्त एकच आहे. असे वागल्यामुळे 'आय कॅन हॅव सरप्राइझेस'! लक्ष पटेलची बदली झाली. जबलपूरला! रुगचे शाळेचे हे वर्ष संपले की हीना शिफ्ट होणार होती.
आताच्या भेटींना रंग होता उदासीचा, आत्मा होता निर्जीवतेचा आणि शरीर होते मनोमीलनाचे! कशातच काही अर्थ नव्हता. ती जाणार म्हणून आधीपेक्षा जास्तवेळा भेटणेही शक्य नव्हतेच. एक एक दिवस वाढत होता आणि हीना पटेल वजा वजा होत चालली होती.
आपोआप मिळालेल्या नात्यांची किंमत न ठेवणारा मी महत्प्रयासाने मिळवलेल्या या एका नात्याच्या वजावटीने दुभंगलो होतो. माझं बहुधा ग्रेन स्ट्रक्चरच तसं असावं! अशुद्ध! माझ्या मॅटर्नल आणि पॅटर्नल कोणत्याच रिलेटिव्ह्जमध्ये माझ्यासारखे विचार करणारा आणि हे असले वर्तन करणारा कोणीही नाही. तरीही मी या दोन घरांच्या सांस्कृतीक आणि शारिरीक मीलनातून जन्माला आलेलो आहे. वर्तन सुधारणे हातात आहे, वर्तन सुधारावे हे मनात आणणेही हातात आहे. पण कळते ते वळवणे जमत नाही. हा भौतीक मोह मग स्पष्टीकरणे शोधत बसतो. समर्थने तयार करून घेतो. पण एवढे सगळे आत्मदोष मान्य करूनही मला हे कळत नाही की शेवटच्या भेटीत आम्ही दोघेही हमसून हमसून रडलो का? कोणत्यातरी पातळीवर तरी ती मनातील भावना शुद्ध असणारच ना? की आमचे रडणे यापुढे 'हे शरीर मिळणार नाही' याचसाठी 'फक्त' होते? शक्य नाही. तसे वाटत नाही. इतक्या सहवासानंतर शारिरीक परिघाला तोडून मानसिक छेद पाडणारेही क्षण येतातच ना? नुसते एकमेकांना दिसलो तरी पुरे या पातळीला आपण येतो तेव्हा कोठे शरीर प्राप्त होणार असते? आणि मग ती भावना या संस्कृतीला एक्प्लेन का करता येत नाही? मोहावर नियंत्रण हा मार्ग स्वीकारणारी ही संस्कृती तद्दन ढोंगी नाही का? या तद्दन ढोंगी संस्कृतीत प्रत्येक क्षणाला कोठे ना कोठे व्यभिचार झाल्याचा इतिहास नाही का? मग हा संस्कृतीचा बोजा घेऊन गाढवासारखे हँच्यू हँच्यू करत जगण्यापेक्षा निखालस सुस्पष्टपणे स्वतःचे वर्तन एक्प्लेन करण्याचे साहस बाळगणे हे प्रामाणिक नाही का?
हीना पटेलचा संतापी निर्विकारपणा आणि संस्कृतीच्या सोंगाड्याचा उथळ अप्रामाणिकपणा यांच्यात जिवंत राहिलेली बाब एकच होती म्हणजे ते शेवटचे अश्रू! मला वाटते ते अश्रू हे सत्य आहे. जे टाळता येणार नाही. आज सगळ्याचे हसू आले तरीही त्या अश्रूंचे हसू मात्र येत नाही. हे खरे की आज तितकेच काय, ते आठवून थोडेही रडू येत नाही. पण बाकी सर्व सहवासाचे हसू येत असतानाही त्या अश्रूंचे हसू येत नाही. मग कुठेतरी कवितेत ते शब्दरुपाने ठाम स्वरुप घेऊन वाळत राहतात. जुनी एखादी ओळ वाचताना 'आपण हे का रचले होते' हे आठवले की गलबलते.
"मी जमेल तेव्हा जबलपूरला येईन, नुसते तुला लांबून बघायला"
"आय विल लूक फॉर्वर्ड टू सच सरप्राइझेस'
ओलावलेल्या आवाजात हीना कुजबुजली होती.
कधीही जमले नाही जबलपूरला जाणे. काळाच्या महिम्याने एस एम एस ची संख्या रोडावत गेली.
त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो
-'बेफिकीर'!
(कथेतील नांव काल्पनिक)
==========================================
नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826
जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871
घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000
नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088
मी सारखा सार्या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230
दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898
त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193
म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432
माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217
एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399
मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963
जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177
ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976
आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642
शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399
थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260
तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो - http://www.maayboli.com/node/36341
====================================
-'बेफिकीर'!
आज मी पहिला .. बरेच दिवसांनी
आज मी पहिला .. बरेच दिवसांनी बे.फी. नवीन लेख घेऊन आले, चांगली गोष्ट म्हणजे कथा क्रमश नाही. अन्यथा आमचा भुक्कड व्हायचा ....
छान कथा.
छान कथा.
साचेबद्ध कथा. मागेही अशाच
साचेबद्ध कथा.
मागेही अशाच टाईपची वाचली होती.
कोणीतरी बाई (शक्यतो संसारी) भेटणे- चोरून संबंद्ध - आणि अंती ताटातूट . वाचकांना काय मिळालं यातून ?
काही काही वाक्ये जमली आहेत. दॅट्स ईट.
भारी लिहिता हो बेफिकीर
भारी लिहिता हो बेफिकीर तुम्ही.. डायलॉग उपमा एकदम झक्कास.. इतरही लिखाण वाचायला हवे तुमचे..
पण एक नाही पटले कथेतले,
एकावेळी दोघीजणी नाही आवडू शकत.
स्त्री-पुरुष प्रेम या नात्यात तरी नाही. एखादीत मन गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा करायला फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल.
इतरही लिखाण वाचायला हवे
इतरही लिखाण वाचायला हवे तुमचे..
<<<
इतर काही फारसं नाही लिहिलेलं
एकावेळी दोघीजणी नाही आवडू शकत.<<< हंहं
सर्वांचे आभार!
-'बेफिकीर'!
हाआआआआआय
हाआआआआआय
ओ बेफिकीर गंडवता काय
ओ बेफिकीर गंडवता काय राव
खालच्या लिंका चेकल्या मी..
कचर्यासारखे लिहिलेये तुम्ही.. (कचरा म्हणजे खूप, अमाप या अर्थाने)
आणि खरेच एकावेळी दोघी नाही आवडू शकत, एकीनंतर दुसरी असे बोलू शकता तसेच दुसरीनंतर परत फिरून पहिलीच असेही होऊ शकते... पण एकावेळी दोघी.. नाय नाय नाय.. ..
चलो, पण यावर इथे अवांतर चर्चा नको, फायदाही नाही, तुम्ही आपल्या मताशी ठाम राहणार आणि मी माझ्या... त्यापेक्षा विचार करतोय स्वानुभावाच्या जिवावर का नाही एखादे ललितच लिहावे यावर.. ??
अंडेराव, तुमचा आकडा लिहा
अंडेराव, तुमचा आकडा लिहा अगोदर.
इथला २४ आहे.
माशा +११११११
माशा +११११११
पण एक नाही पटले
पण एक नाही पटले कथेतले,
एकावेळी दोघीजणी नाही आवडू शकत. ?????????????????????????
.
.
कोई शक है क्या......२ काय ५- ६ पण एकच वेळी आवडु शकतात
.
कुणाचा चेहरा आवडतो
तर कुणाचा आवाज आवडतो
कुणाची केसांमधे हृदय गुंतते
तर कुणाच्या डोळ्यात विश्व दिसते
कुणामधे प्रेयसी दिसते तर
कुणामधे बायको...तर
कुणी फक्त सुखादु:खाची मैत्रीण म्हणुन ....
.
असो.......:).
छान आहे.
छान आहे.
या निमित्ताने तयार होत असलेली
या निमित्ताने तयार होत असलेली गझल उत्कृष्ट आहे.
त्या दोन अश्रूंची बचत आहे
त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो
कथेस अन व्यक्तीरीखेस पर्फे़क्ट!!
ज्ञानेश + १००००००००
ज्ञानेश + १००००००००
एकावेळी दोघीजणी नाही आवडू
एकावेळी दोघीजणी नाही आवडू शकत.??? का नाही आवडू शकत?? प्रश्न फक्त आवडण्याचा आहे ;प्रेमात' पडण्याचा....(नेहमीचा सर्वसामान्य अर्थ)....नाहीये !!!
डींग्या मारायला काय लागतं
डींग्या मारायला काय लागतं हो?
माझे २५ आहेत
नवरा डिफेन्समध्ये असला की
नवरा डिफेन्समध्ये असला की बायका ऑफेन्सिव्ह होतात.
दोन माणसांच्या एकमेकांपासून असलेल्या कोणत्याही गरजा भागण्याची वेळ एकच नसते हा मोठा घोळ आहे.
>>>>>>>>>>>>
छान जमलीये...
छान जमलीये...
आवडली .
आवडली .
Good
Good
"कोणत्यातरी क्षणी कोणालातरी
"कोणत्यातरी क्षणी कोणालातरी आपण फार हवे असणे अश्या क्षणांच्या साखळीत बाकीचे अनंत वांझ क्षण गुंतवून होणारी साखळी म्हणजे आयुष्य! शेवटी तर हेही कळत नाही की वांझ क्षण त्या हव्याश्या क्षणांसाठी जगत होतो की हवेसे क्षण त्या वांझ क्षणांसाठी!"
"हाही इगोच आहे. एखादी गोष्ट मिळणे यापेक्षा मी ती मिळण्याच्या पात्रतेचा आहेच मुळी हे स्वतःला जाणवणे हा तो इगो. ती नाही मिळाली तर प्रयत्न किंवा आंबट द्राक्षे! जन्म ते मृत्यू हा तहान लागण्याचा काळ सगळे सजीव जग नावाच्या पाणवठ्यावर काढतात. पूर्ण जीवन एक तहान आहे. कसलीही तहान! 'आता मला काही नको आहे', 'आता मला काही करावे लागणार नाही आहे' किंवा 'आता काही नाही मिळाले तरी चालेल' ही मनस्थितीच मुळी येत नाही कधी!"
फार आवडले हे परीच्छेद.
ज्ञानेशशी सहमत. पण ही गझल
ज्ञानेशशी सहमत.
पण ही गझल स्वतंत्र सलग वाचायला मिळायला हवी.
अजून सात लेख हातावेगळे व्हायची वाट पहायला लागणार बहुधा!
बेफी, नेहमीप्रमाणेच लिखाण
बेफी, नेहमीप्रमाणेच लिखाण अतिशय सुरेख.
विचार योग्य त्या शब्दात प्रकट करणं तुमच्याकडून शिकलं पाहिजे. खरंच.
इतर लोक तुमची प्रकरणं मोजत बसतात. पण तुम्ही तुम्हाला या नात्यांमध्ये काय वाटलं ते ज्या शब्दात मांडता, त्याला तोड नाही.
पुलेशु!
आवडले.
आवडले.
छान ! ( आज बरेच दिवसान्नी
छान !
( आज बरेच दिवसान्नी वाचली तुमची कथा ...)
बेफिकीर, तुमची
बेफिकीर, तुमची निरीक्षणे,सूक्ष्म विनोदबुद्धी अन मध्येमधे डोकावणारे नात्यांमधले तरल कवितीक प्रदेश फार सुंदर.
बेफिकिरी हा स्थायीभाव मानल्यावर तुम्ही ज्या सहज अलिप्ततेने लिहिता ते क्रमप्राप्त. त्या बेफिकीरीमागची वेदना व वैयर्थही पोचते.
एवढेच की जगण्यातले सत्व हे दांभिकपणा अन उगीचच नात्यांसाठी नाती या दोन्ही टोकाच्या अटिट्यूड्सना सापडत नसावे..
बेफिकिरी हा स्थायीभाव
बेफिकिरी हा स्थायीभाव मानल्यावर तुम्ही ज्या सहज अलिप्ततेने लिहिता ते क्रमप्राप्त>>> +१
भारतीताईंच्या प्रतिक्रियेला
भारतीताईंच्या प्रतिक्रियेला अनुमोदन.
एवढेच की जगण्यातले सत्व हे
एवढेच की जगण्यातले सत्व हे दांभिकपणा अन उगीचच नात्यांसाठी नाती या दोन्ही टोकाच्या अटिट्यूड्सना सापडत नसावे..
<<< या वाक्याचा नेमका अर्थ कृपया सांगा अशी विनंती. तसेच, वैयर्थ हा शब्दही मला माहीत नाही आहे, त्याचाही अर्थ सांगावात.
प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार! निवडक दहात ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांचे विशेष आभार!
-'बेफिकीर'!
बेफिकीर, वैयर्थ=
बेफिकीर, वैयर्थ= व्यर्थता.
आपण शारिरीक-मानसिक आकर्षणांबद्दल बोलतोय, ही दोन्ही एकजीव होऊन एक भोवरा तयार होतो ज्यात सामाजिक संकेत धुडकावून व्यक्ती एकत्र येतात. त्यामागे त्यांची मानसिक घुसमट,अभावग्रस्तता असू शकते. हे सत्य नाकारणे हा दांभिकपणा.पण हे सत्य आहे म्हणून त्या नात्यामध्येच सुटका शोधत रहाणे हे दुसरे टोक. या दोन्ही टोकांना जाऊन आपण खर्या जगण्याला पारखे होतो असे काहीसे म्हणायचे आहे.
Pages