आता पुढे ..........
****************************************************************************
माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य..... असो
मी त्या भयानक साखळीचा भाग कसा झालो हे मी आत्ता सांगु शकणार नाही, त्यात गुंतलो कसा हे हि कळलं नाही. किंवा माझ्या दैवात हे भयानक सावट का यावं याचही उत्तर नाही. मनात प्रचंड वादळ उठलयं. डोकं फुटून जाईल कि काय असं वाटतयं. मी वेडा तर झालो नाहीये ना? पण पुढे जे काय मी लिहणार आहे त्याने तुम्हाला तर नक्कीच वाटेल कि वेडा आहे.
माझं नाव..काय बर माझं नाव? आणी ते सांगणं गरजेचं आहे?? ठिक आहे, सांगतो. माझं नाव 'हर्षद बोरकर', तुमच्यासारखाच मध्यमवर्गीय, डोंबिवली नामक उपनगरात एका सुखी घ्ररट्यात राहणारा.
पण हे सगळं दोन महिन्यापुर्वीचं...
आता सगळ बदललंय
दोन महिन्यापुर्वीची संध्याकाळ मला अजुन आठवतेय..
***************************************************************************************************************
"बोरकर, साल्या लटकलास बे तु." कोर्टातुन बाहेर पडता पडता पुष्करने पाठीवर जोरदार थाप हाणत बातमी दिली. त्याच्या बातम्या आजपर्यंत कधी खोट्या ठरल्या नव्हत्या. माझा स्वभाव जात्याच भित्रा.
माझ्या भेदरट नजरेकडे पाहुन त्याने जास्त न ताणता सांगितले.
"अबे तुझी बदली झालीये..नागरगोज्याला..जज पाटील यांच्या हाताखाली, त्यांनी चार्ज घेऊन महिना उलटून गेलाय पण अजुनही स्टेनोची जागा रिकामी आहे, म्हणून सध्या तुला पाठवणार आहेत."
खाडकन सगळा मुड गेला. आत्ता कुठे ६ महिन्यापुर्वी पालघर कोर्टातून बदली घेऊन 'हायकोर्टाचं' सुख अनुभवत होतो. तर ही बदलीची बातमी.
"पुष्क्या, साल्या खर बोलतोयस ना?"
"अरे मग, दिवेकर साहेबांनी तुझ्या रिलीजची ऑर्डर इश्श्यु केली सुध्दा. तुला ऑफिशियली उद्या समजेलच."
चायला, लेका नवीन लग्न झालयं माझं, सगळंच बोंबला आता."
पाठीवर हताशपणे हात मारून पुष्कर निघुन गेला.
सि.एस.टी वर आलो, डोंबिवली फास्ट लागलेली, जेमतेम चौथी सिट मिळाली, सगळ्या मुडचा सत्यानाश झालेला. घरी काही बोललोच नाही.
दुसर्या दिवशी साहेबांनी लेटर हातात दिलं "बोरकर, जरा गैरसोय होईल, पण सहा महिन्याचा प्रश्न आहे. एकदा भरती झाली कि तिकडचा उमेदवार घुसवू, तेव्हढी कळ काढा."
काढावीच लागणार, नाही म्हणून काय मोठा फरक पडणार होता. बदली "नागरगोजे" गावात झाली होती.
नागरगोजे!! नाव तसं परिचीत नव्हतं. सोलापुर-बीड महामार्गावर का कुठेशी होतं ते. रहाण्याची व्यवस्था होतीच सरकारी विश्रामगृहात. फक्त एकट्याला जावं लागणार होतं. उर्मिलेची नोकरी ती सहा महिन्याकरता सोडणं शक्यच नव्हतं आणी आई-बाबा थकलेले असताना त्या आडगावात नेणं तर अशक्यच होतं.
दमुन घरी आलो. उर्मिलास सगळं सांगितलं तिचा पण चेहरा पडला. पण माझा चेहरा पाहुन घरच्यांनी सावरून घेतलं. दहा-बारा दिवस हा हा म्हणता निघुन गेले. आणी अशाच एका सकाळी मी नागरगोजे गावात दाखल झालो. तालुख्याचं ठिकाणं असल्याने बर्यापैकी गजबजलेलं होतं. कोर्ट बरच लांब असावं, एकाही रिक्षावाला येण्यास मागत नव्हता. कसातरी एकजण तयार झाला.
जुलै महिन्याची सुरूवात असल्याने भयंकर पाऊस कोसळत होता. गजबज मागे पडली, आणी गाव सुरू झालं. गावातला कोणताही रस्ता रुंद नव्हता त्याच्बरोबर सर्व घर जुनाट पध्दतीची, चुना फासलेली होती. घर जुनाट, माणसं जुनाट. सर्व वातावरण काळवंडलं होतं, एकदम विचित्र वाटत होतं. एका वळणावर आल्यावर कोर्टाची इमारत दिसायला लागली. रिक्षातुन उतरलो तेवढ्यात एक मुलगा पुढे धावत आला. बहुतेक मी येणार हे त्याला माहित असावं.
"बोरकर सायेब?"
मी हो म्हणालो.
"सायेब म्या रंगा, चला." माझ्या परवानगीची वाट न बघता तो बॅगा उचलुन तरातरा चालायला लागला.
कोर्टाची इमारत सुरेखच होती. संपुर्ण दगडी बांधकाम, भव्य पोर्श, आजुबाजूला मोकळं आवार, मागे चिंचेचं बन आणी समोर आंब्याचे डेरेदार वृक्ष, त्या टेकडीला कोर्टाच्या इमारतीमुळे शोभा आलेली. आत गेलो ते गेलोच. मग याला त्याला भेटणे, फॉर्म वैगेरे भरणे, फाईली चाळणे या सगळ्यात चार कसे वाजले ते कळलंच नाही. दुपारचं जेवणही तिकडेचं झाल. बाहेर सर्वत्र अंधार दाटलेला आणी पाऊसही प्रंचड कोसळत होता. त्या दगडी इमारतीला हिरवट शेवाळी झाक आलेली होती. वातावरणात एक प्रकारचा धुकट गारवा पसरलेला होता.
चहा घेता घेता जज साहेबांच्या आणी माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्यांना गावाबद्दल माहिती विचारली, बोलता बोलता त्यांनी सांगितलं गावातल्या एका वाड्यात ते भाड्याने राहत होते. मी आश्चर्याने विचारलं "भाड्याने? अहो सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना?"
त्यांचा चेहरा खाडकन उतरला. त्यांच्या डोळ्यात दिसलेलं भय मी आजही विसरू शकणार नाही. पण क्षणार्धात त्यांनी स्वतःला सावरलं, क्वॉर्टर्स आहेत म्हणाले पण त्या इथे मागे आहेत कोर्टाच्या शिवाय गाव एवढं लांब, काही लागलं सवरलं कि एवढ्या लांब कोण जाणार. आणी माझं कुटूंबही बरोबर आहे, येण्याजाण्याच म्हणाल तर गाडी आहे की. तुम्ही पण इथे राहण्याच्या फंदात पडू नका. आपण शोधू कि जागा भाड्याने, रोज माझ्या गाडीने एकत्रच येऊ.
पण मला काही ते कारण खर वाटलं नाही. त्यांच्या डोळ्यात दाटलेली भिती काहितरी वेगळंच दर्शवत होती. पण मुलखाचा कंजुषपणा मला भोवणार होता.
"कशाला? मी राहीन कि इथेच, एवढ्या जवळ क्वॉर्टर्स असताना लांब गावात कशाला राहायचं, उगाच दमछाक (आणी त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर डोबिवली-सि.एस्.टी प्रवास उभा राहिला) आणी मला एकांतच आवडतो. आठवड्याचं सामान भरलं कि काही लागत नाही हो." मी सारवा सारव करत म्हणालो
तेवढ्यात ....कडाsssssड कड..! करत माळावर कोसळलेल्या विजेने आमचं संभाषण खुंटलं. घड्याळाचा काटा ७ वर स्थिरावला होता. तो पाहुन जजसाहेब एकदम दचकले.
"अरे बापरे! मी निघतो आता, पाऊस कमी झालाय. रस्ता खुप खराब आहे, तुम्ही नक्की येत नाहीयेत ना?" त्यांनी मला हरप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.
एव्हाना सगळं कोर्ट रिकामं झालं होतं. मी बाहेर आलो, हुडहूडी भरेल असं भणाण वार सुटलं होत. वर आकाशात गर्जत होत, लख्खन वीज चमकत होती. त्या घडीला माळरानावर कोर्टाची ती दगडी इमारत जरा भयाणच वाटत होती. आजूबाजूला किर्र झाडी .. अंधुकसा निळा प्रकाश , दूर दूर जाणारी पाटलांची काळी फियाट .
तेव्हढ्यात गावात जाऊन आलेला रंगा समोरून आला.
"सायेब, तुमी इतच रानार? नक्की?"
आता परत त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याएवढी ताकद माझ्यात राहिली नव्हती. मी हो म्हणून त्याला क्वॉर्टर दाखवायला सांगितली. मग मुकाटपणे तो मला कोर्टाच्या मागच्या भागात घेऊन गेला. मागे पण तशीच विस्तृत जागा होती. आठ-नऊ टुमदार क्वॉर्टर्स समोरासमोर होत्या पण बहुतेक सर्वच बंद होत्या. मी येणार म्हणून एक स्वच्छ करून ठेवलेली होती. प्रत्येक बंगलीच्या समोर चिंचेचं ऐसपैस झाड. त्या भयाण संधीप्रकाशात मला इथे एकटायाला राहावं लागाणार याची जरा भितीच वाटली.
मग रंगा म्हणाला "सायेब राती कोरटात रातच्या पाळीला चार मानसं असत्यात पर ती म्होरच्या अंगाला असत्यात, इत माग कुनीबी फिरकत नाय, पर आजपासनं यक चक्कर माराया सांगतो मी त्येंना."
चला, म्हणजे कोणीतरी आहे म्हणायचं, जरा धीर आला. आत आलो. बंगली छानच होती. कामाच्या निमित्ताने का होईना बंगल्यात राहायला मिळणार होत. रंगाने हातातल्या पिशवीतून डबा बाहेर काढला.
"सायेब, आज गावात्न जेवान आनलयं, उद्यापासनं यक गडी यील सा वाजता जेवान बनवाया आन ह्य दुद फिरीजमदी ठुतो."
थोडा वेळ बसला आणी मग म्हणाला "सायेब जरा जपुन रावा, हवतर गावात जागा बगु तुमाला."
मग मात्र मी चिडलो "अरे मी इथेच राहणार, तु चिंता करू नकोस."
शेवटी त्याचा नाईलाज झाला. तो परत आतमध्ये गेला आणी एक कंदिल शिवाय चार-पाच मेणबत्त्या घेऊन आला.
"सायेब, पावसानं कदी कदी लाइट जातात मनुन ह्ये."
मी मानेनेच हो केलं.
रंगा निघुन गेला आणी पावसाचा जोर वाढला. मी पंलगावर आडवा पडलो, दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा आला होता. ह्या रात्री हे ओसाड गाव, थंडीवार्यातलं हे माळरान, चायला कुठे अडकलो असं झालेलं. पडल्या पडल्या बाहेर बघितलं समोरची बंगली बंदच होती. बाहेर एक मोडकी खुर्ची आणी झोपाळा होता बाकी सगळा शुकशूकाटच. मधोमध असलेल्या लाईटच्या खांबावरचा दिवा शेवटचे क्षण मोजत लुकलूकता प्रकाश टाकत होता. रातकिड्यांनी कान किटवलं होतं. पाखरांचा आवाज, अचानक अंगावर काटा आला आणी जीव घाबराघूबरा झाला. काय झालं कळलं नाही. पटकन आत आलो आणि दार लावून घेतल ,कपडे बदलले आणी आतमध्ये डोकावलो , किचन लहानसच होत.
त्याच्या डाव्याबाजूला बेडरूम , तिथे सर्व पावसाने ओल आलेली होती..
भिंतीवरचे ते डाग भयानकच दिसत होते... जेऊन घेतलं. जेवण झाल्यावर सामान लावायला सुरूवात केली. संपुर्ण बंगल्यात एक कुबट वास पसरलेला होता. सगळं आवरेपर्यंत ९ वाजत आले. पंलगावर झोपुन बरोबर आणलेली पुस्तके बाहेर काढली आणी वाचायला सुरूवात केली. जेमतेम दहा मिनिटे झाली नसतील परत लख्खन वीज चमकली आणी मागुन तो प्रचंड गडगडाट!! काळजाचा ठोकाच चुकला, तेव्हढ्यात गपकन अंधार झाला. लाईट गेलेत हे कळायला मला ५ मिनिटे लागली.
नवीन जागेत अशा अंधारलेल्या आणी भयाण वातावरणात मेंदुने काम करायच थांबवलं बहुतेक, माझी तंतरली होती. कसातरी धडपडत कंदिलाला हात लावला, बाजुला मेणबत्त्या होत्या. जीव घाबराघुबरा झाला होता तेव्हढ्यात पायावरून काहितरी मऊ-ओलं हुळहूळत गेलं. अस्पष्ट किंकाळीच तोंडातून बाहेर पडली. हे होईपर्यंत मी मेणबत्ती पेटवली होती. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात ती कुबट खोली जास्तच भेसुर वाटु लागली. विचित्र सावल्या पसरल्यासारखं वाटत होतं. मेणबत्तीच्या ज्योतीबरोबर सावल्याही हलत होत्या. बेडरूम मध्ये एक कपाट होत.. त्यातल्या आरशात काहीतरी हलल ..
एक काळी सावली ... जणू काही जुन्या आरश्याच्या गर्भातूनच त्याचा जन्म झालेला होता अस..
आता तर जीव जाईल कि काय अस वाटलं.. ते माझंच प्रतिबिंब होत का?
काही कळायला मार्ग नव्हता
आयुष्यात एवढा कधी घाबरलो नव्हतो. डोंबिवलीतल्या उबदार घराची आठवण येत होती. पायावरून नक्की काय गेलं त्याचाही अंदाज येत नव्हता. हे कमी कि काय किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच.
"कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो. किचनमध्ये भांडी पडलेली होती, बाहेर विजांचा नंगानाच सुरु होता
आणि..........
आणि खिडकीत हिरव्या डोळ्यांची दोन काळी मांजर जिभल्या चाटत बसलेली होती....
क्रमशः
झक्कास प्रसन्न !!! मस्त
झक्कास प्रसन्न !!!
मस्त रंगवलीये कथा, पण पुढचा भाग कधी??
आयुष्यात एवढा कधी घाबरलो
आयुष्यात एवढा कधी घाबरलो नव्हतो>>> मी पण ...
मस्त झालाय हा भाग...पुढचा भाग लवकर येऊ द्यात...
मस्त....पुढचा भाग लवकर
मस्त....पुढचा भाग लवकर टाका....
छान सुरुवात!
छान सुरुवात!
आवडला हा भाग.
आवडला हा भाग.
मस्तच लिहिताय.. पुढचा भाग
मस्तच लिहिताय.. पुढचा भाग लवकर येउद्यात.
चायला जबराट लिहिलंय आधीची कथा
चायला
जबराट लिहिलंय
आधीची कथा आत्ता वाचली...
मजा येणार आहे
पुढचा भाग लवकर टाका
बाप रे मांजर तेही
बाप रे मांजर तेही काळं........अन हिरव्या डोळ्यांचं??????
आता पुढे काय?
डेंजरssss (भ्यॉsss) तरीपण
डेंजरssss (भ्यॉsss)
तरीपण पुढला भाग कधी?
भारीच...
भारीच...
ऑफिसमध्ये चार डोकी आजूबाजूला
ऑफिसमध्ये चार डोकी आजूबाजूला असताना हे वाचलं म्हणून बरंय.
पुढचा भाग लवकर टाकावा ही विनंती.
मस्त रे ! सुरुवात झकास
मस्त रे !
सुरुवात झकास झालीये........
अग्गोबाई,, मग पुढ.. भराभर
अग्गोबाई,, मग पुढ..
भराभर लिहीले तर बरं वातेल. 
छान झालीय सुरुवात...
छान झालीय सुरुवात...
आवडला हा भाग.
आवडला हा भाग.
छान आहे
छान आहे
टा डा टि डी SSSSS मस्त!
टा डा टि डी SSSSS
मस्त!
छानच! पुढचा भाग येऊ देत.
छानच! पुढचा भाग येऊ देत.
छान सुरुवात. पुढचा भाग लवकर
छान सुरुवात.
पुढचा भाग लवकर टाका.
खुप छान सुरुवात .. प्रसन्न
खुप छान सुरुवात ..
प्रसन्न मस्त लिव्हलय ..
सुरूवात मस्तच्.....पुढच्या
सुरूवात मस्तच्.....पुढच्या भागाची वाट पहाते..लवकर टाका प्लिज.....
सुरवात झकास.पुधचा भाग लवकर
सुरवात झकास.पुधचा भाग लवकर येउदेत.
"सायबानु मिच त्यो"
"सायबानु मिच त्यो" वाचलि......कदाचित ती २ मान्जरे म्हनजे एक किसन आणि दुसरे शेळकेसाहेब असावेत असा माझा अन्दाज आहे.....
छान आहे.....
छान आहे.....
पहिल्या भागातील वातावरण
पहिल्या भागातील वातावरण निर्मीती आवडली. न्यायाधीशांच्या डोळ्यातील भीती व रंगाचे पुन्हा पुन्हा विचारणे कथानकाचा कल स्पष्ट करून गेल्यासारखे वाटले. 'सायबानू मीच त्यो' वाचलेली नाही. त्यामुळे ताज्यातवान्या मनाने हे सर्व कथानक वाचणार आहे.
-'बेफिकीर'!
सुरवातच इतकी भयानक आहे...मग
सुरवातच इतकी भयानक आहे...मग पुडचे भाग कसे असतील.....फार उत्सुकता लागलीय.
तुमची ही 'ग्रहन' कथा
तुमची ही 'ग्रहन' कथा नावाशिवाय व्हाटस अँप वर फिरते आहे. आजच एका ग्रुप मध्ये आली. पाठवणार्याला पण नाव माहिती नाही लेखकाचं!