सदस्य प्रवेश |
संदीप खरे‘मौनाची भाषांतरे’ करुन कवितेचे ‘खरे’ दिवस परत आणणारे कवी संदीप खरे. ‘अरे, आपल्याला सुध्दा असंच वाटतं कधी कधी’ असा जवळकीचा सुगंध जाणवून देणा~या त्यांच्या कविता. एकही कवितासंग्रह प्रसिध्द न होता ‘दिवस असे की’ ह्या cassette च्या माध्यमातून त्यांना आधी प्रसिध्दी मिळाली. सोपे पण अर्थपूर्ण शब्द, सहज गुणगुणता येतील अश्या चाली आणि मोजके संगीत ह्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय ठरल्या. संदीप: यशस्वितेचे माझे निकष थोडे वेगळे आहेत. कार्यक्रम लोकप्रिय होणे किंवा गर्दी होणे हा माझा यशस्वी होण्याचा निकष नाही. त्यामुळे मी यशस्वी झालो आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे सगळे जे म्हणतात की मी “यशस्वी” आहे ते मला व्यक्तिश: पटत नाही. माझा कन्सर्न आहे तो कवितेशी. लिहिण्याशी. माझी कविता लोकांना आवडते हा सुदैवाचा भाग आहे असे मला वाटते. जुन्या संदीप खरेमध्ये आणि आताच्या संदीप खरेमध्ये वयाने जो फरक पडत जातो तो आहेच. तसेच अनुभवाने संवेदनांचा स्तर बदलल्यामुळे जो काही फरक पडला असेल तो!बाकी माझा मूळ पिंड कायम आहे. पैसा आणि प्रसिध्दी गौण आहेत. मी कविता यश मिळवण्यासाठी कधीच लिहिली नाही. तिच्याकडे asset म्हणून पाहीले नाही. कविता लहानपणापासून बरोबर आहे. माझं व्यक्त होण्यांच माध्यम किंवा बोलण्याचं माध्यम म्हणून.! ती अजूनही तशीच आहे. ती लोकांना आवडते तेव्हा छान वाटतं इतकं्च! क्षिप्रा: लिहिता तसं जगायला आवडतं का? क्षिप्रा: पण मग ‘जपत किनारा शीड सोडणे नामंजूर’ ही एक वृत्ती आणि ‘मी मोर्चा नेला नाही’ ही एक वृत्ती हे कसं? संदीप: हम्म्म! बरोबर आहे पण मुळात जगण्यात विसंगती आहे. आपण सुसंगत जगत नाही. (जसे आपण कधी कधी उदार होऊन भिका~याला भीक घालतो तर कधी त्याला भीक घालणे आपल्याला पटत नाही) शेवटी कविता त्या त्या वेळच्या mood चे reflection आहे असं मला वाटतं. कविता हे आत्मचरित्र नसून एका साध्या सरळ आयुष्याचं प्रतिक आहे जे विसंगतीने भरलेलं आहे. ती प्रचारासाठी वापरायचे साधन नाही. माझ्यासाठी ते व्यक्त होण्याचे माध्यम आहे. कविता ही कवीची कधीच नसते. ती त्याला मिळालेल्या, भिडलेल्या अनुभवाची असते. त्यामुळे ह्या दोन्ही प्रवृत्ती एकाच माणसात असू शकतात नव्हे असतातच! क्षिप्रा: मिळालेल्या प्रसिध्दीचा तुमच्यावर कसा परिणाम झाला? संदीप: खरंतर कधी कधी प्रसिध्दीचा निगेटिव्ह इफेक्ट सुध्दा होतो. पण माझं तसं झालं नाही कारण मला पायरीपायरीने यश मिळत गेलं. आधी College मध्ये काव्यवाचन मग kaleidoscope मध्ये सहभाग मग cassette; ह्यामुळे ह्या स्तुतिच्या विषाचा हळूहळू डोस मिळाल्याने स्वत:विषयी खूप solid असं काही वाटलं नाही. Cassette काढण्याआधीपासून लोकांना मी थोड्या प्रमाणावर माहीत होतो. टेप केलेल्या कविता लोकांकडे तेव्हाही फिरत होत्या. सुचत राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला कारण कविता लिहिण्यातला आनंद हा ती लोकांना आवडण्यापेक्षा जास्त आहे. एखादी गोष्ट आवडल्यावर, पटल्यावर ती लोकांना आवडो वा न आवडो ती करणे हा माझा पिंडाचा भाग आहे. क्षिप्रा: जोपर्यंत तुम्हांला सुचत नाही तोपर्यंत तुम्ही लिहित नाही की mind training वर तुमचा विश्वास आहे? संदीप: तश्या अर्थाने विश्वास नाही. कारण कवितेचा अमुक एक average पडलाच पाहीजे असं माझं नाही. कधी एका दिवसात तीन तीन कविता लिहून होतात तर कधी दोन तीन महिने काही सुचत नाही. Mind training मला वेगळ्या प्रकारे अभिप्रेत आहे. जेव्हा काही सुचत नाही तेव्हा अस्वस्थ राहणं, आजूबाजूला घडणा~या गोष्टींचा आणि इतर कलाकृतींचा आस्वाद घेत राहणं ह्या साठी mind training आवश्यक आहे. जेव्हा सुचेल तेव्हाच लिहावं नाहीतर कविता लिहिणे म्हणजे copywriting होईल जे मी आता (जाहिरातक्षेत्रात ) करतो. लहानपणापासून कविता करीत असल्याने मला शब्दांची आणि मीटरची सवय झाली आहे. पण त्यात दुहेरी धोका आहे. जे सुचलेलं आहे ती कविताच आहे किंवा एखादी ओळ सुचली म्हणजे त्याची पुढे कविता होईल असेही नाही. ह्यात सावध रहावं लागत. कारण मी (जाहिरातक्षेत्रात असल्याने) बसल्या बसल्या ओळी जुळवू शकतो म्हणून मी तसं करावं असं नाही मला वाटतं. हुकमी सुचणं आणि आतून सुचणं ह्यामध्ये गल्लत होऊ नये हया दृष्टीने मला mind training महत्त्वाचं वाटत. क्षिप्रा: जी कविता लिहितो ती आवडतेच असं नाही पण १० वाईट कविता लिहू म्हणजे ११ वी कदाचित चांगली होईल असं कधी झालं का ? संदीप: नाही. एखादी कविता चांगली किंवा वाईट असं म्हणता येत नाही. कुणी मला तुमची आवडती कविता कोणती असं विचारलं तर मला Top 10 काढता येत नाही तसंच ‘आईला सगळी मुलं सारखीच’ इतकंही ते सरळ नाही. क्षिप्रा: यालाच जोडून पुढचा प्रश्न म्हणजे, कविता लिहून झाल्यावर त्यात अपुरेपणा जाणवला किंवा कुणी बदल सुचवल्यास तुम्ही तो बदल करतात का? संदीप: अपुरेपणाला इलाज नाही. शेवटी त्यानेच तुम्हाला काही सुचवलेलं असतं. कधी लिहून झाल्यावर कळतं की हे, ते नाही जे मला वाटत होतं. त्यावेळी त्यावर विचार करण्यात अर्थ नसतो. ते तसंच ठेवून द्यायचं असतं. बदलाबद्दल म्हणायचं, तर आपल्याकडे तशी परंपराही नाही की उस्तादांकडून शायरी दुरुस्त करून घ्यायची. ते गज़लच्या (वृत्तातील बदलाच्या) बाबतीत असेल पण कवितेच्या बाबतीत होऊ शकत नाही. काव्यवाचनाबद्द्ल सूचना असू शकतात पण कविता लिहिण्याबद्दल नाही! क्षिप्रा: ’दिवस असे की..’ आणि ‘एव्हढंच ना..’ या कविता कश्या सुचल्या? संदीप: या दोन्ही कविता साधारणतः १९ ते २१ या वयात त्या लिहिलेल्या आहेत. क्षिप्रा: साधारणपणे पहिल्यांदा कवितेचे पुस्तक काढले जाते पण त्याऐवजी ध्वनिफ़ित काढून लोकांपर्यंत पोचण्याची कल्पना कशी सुचली? संदीप: खर्ं तर जाहिरातक्षेत्रात असूनही स्वतःच्या product साठी मला कल्पना सुचत नाहीत. Kaleidoscope मध्ये या कविता मी अगदी कुठल्याही साथीशिवाय गात होतो. अश्याच एका कार्यक्रमात ‘Music Byte’ चे रवि वेदांत भेटले. ते म्हणाले की interesting आहे. मग मंदार आगाशेने ही गाणी ऐकली आणि त्यानेच ही ध्वनिफ़ितीची कल्पना सुचवली. (तेव्हा तो अगदी ‘नको काढायला’ असे जरी म्हणाला असता तर शांतपणे मी तसाच बाहेर पडलो असतो.) कवितांच्या बाबतीत नक्की काय करायचं ते ठरलेलं नव्हतं. त्याचवेळी विवेक परांजपे भेटले. मी त्यांना आधीच सांगून ठेवले की वाटेल ते करा पण ह्यातल्या कविता हरवू देऊ नका. ह्या कवितांची ‘गाणी’ करू नका आणि त्यांनी ती गंमत केली! (प्रसन्न हसतात!) तस्ं मराठी ध्वनिफ़ितीच्या बाबतित मार्केटींग करुयात म्हटलं तरी तितकं शक्य नव्हतं. त्यावेळी mouth publicity फ़ार महत्वाची ठरली. आता मात्र एक विशिष्ट वर्ग मिळालेला असल्याने तसा सेफ़ गेम झालाय. त्यावेळी रसिक हे स्विकारतील की नाही? हा प्रश्न होता म्हणून एका अर्थाने याचं खरं श्रेय मंदार आगाशेचं म्हणता येईल. क्षिप्रा: कवि असल्याने वेगवेगळे टप्पे जाणवतात का? संदीप: वाढत्या वयानुसार आपण त्या-त्या वयाप्रमाणे वागायला लागतो. प्रगल्भतेच्या एका टप्प्यावर आपण सिद्धतेला जाऊन पोचलो तर अभिव्यक्तिची गरजही उरणार नाही. मी तिथपर्यंत पोचणारही नाही कदाचित! त्यामुळे प्रगल्भ कविता म्हणण्यापेक्षा प्रत्येक टप्प्याची मजा वेगळीच आहे. ते सुचत रहावं हे महत्वाचं. क्षिप्रा: चांगलं सुचण्यासाठी जाणूनबुजून काही प्रयत्न केले की ही दैवी देणगी म्हणावी? संदीप: जाणूनबुजूनच्या आधीपासूनच हे चालू झालं, म्हणून हे आजही चालूच आहे. समजायला लागल्यापासून मी खूप वाचलंय! आईने कधी खेळणी आणून दिली नाहीत मला आणि मी मागितलीही नाहीत. रद्दीतून पुस्तकं आणायची किलोवर, अगदी ‘ही हवी,ती नको’ असंही करायचं नाही. मग घरी येऊन त्यांचं sorting करत बसायचं. त्यामुळे काय वाट्टेल ते वाचलं. त्यात सुसूत्रता अशी नव्हतीच. घरातही कुणी academic type चं नव्हतं की ज्यामुळे ‘हा लेखक झाला आता तो घेऊयात’ असं काही झालं ! आणि जेव्हा काय वाचायच ते कळलं, पुस्तकं विकत घेणं शक्य झालं तेव्हा एक विशिष्ट लेखक आवडला तर पाठपुरावा करून मी वाचलाही आहे. पण वाचन हा मुख्यतः माझ्या आनंदाचा भाग असल्याने ‘चांगलं वाचणारा’ (असं म्हणून ओळखण्यासाठी) मी वाचलं अस्ं कधी झालं नाही. वाचनासाठी वाचन असल्याने वेगवेगळ्या शैलीतलं वाचलं गेलं. या सगळ्यातून शब्दांची समृद्धी येते असं मला वाटतं. त्यामुळेच नेहमी काही सुचत राहतं. क्षिप्रा: जुन्या कवींपैकी कोण कोण आवडतं? संदीप: विंदा आवडतात. मर्ढेकर आवडतात. नव्या पिढीतले हेमंत जोगळेकर आवडतात. तसे खूप नव्या पिढीतले नाही म्हणता येणार त्यांना! पण तरी नवेच वाटतात ते प्रकाश संतांप्रमाणे! क्षिप्रा: लेखकांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असे कोण आवडतात? संदीप: नेमाडे, श्याम मनोहर आवडतात. प्रकाश संत खूप आवडतात. बाकी आपले ठरलेले गड-किल्ले आहेतच म्हणजे पुलं, गोनीदां, श्री.ना.पेंडसे हे (नेहमीचे यशस्वी) ! (प्रसन्न हसतात!) क्षिप्रा: सध्या जे कवितालेखन करत आहात ते काही विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून आहे का? संदीप: मी सध्या जे लिहितोय त्यात performance च्या कविता दहापैकी दोन-तीन असतात त्या लोकांसमोर वाचता येतात. पण बाकीच्या (कविता) सगळ्याच लोकांना अपिल होतील अश्या नसतात त्यामुळे त्या कार्यक्रमात येत नाहीत. विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून लिहायचं म्हटलं तर ते जाहिरातक्षेत्रात होतं. कवितेच्या बाबतीत नाही. क्षिप्रा: काही विशिष्ट कविता ज्या लोकांना आवडतात त्या (कार्यक्रमात) घ्यायलाच लागतात, त्यामुळे मला जे सांगायचं आहे, माझी जी अभिव्यक्ती आहे ती मागेच राहते, असं कधी होतं का? संदीप: एक आहे जेव्हा तुम्ही performance ला लोकांसमोर उभे राहतात तेव्हा performance ची जी चौकट आहे, ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हाला पाळाव्याच लागतात. ती तुमची जबाबदारी असते. तुम्हाला मनस्वीपणा करायचा आहे, कलंदरपणा करायचा आहे तर तो स्टेजवर नाही करू शकत तुम्ही! तसा मनस्वीपणा केला तर लोक तुम्हाला स्टेजवर येऊ न देण्याची काळजी घेतात! शिवाय ‘मी कसा कलंदर आहे’ हे स्टेजवर जाऊन सांगण्यात काही गंमत नाही. तुमच्याकडे जे आहे ते लोकांना ऐकवायच आहे ना, मग त्यातलं काही त्यांना आवडेल काही आवडणार नाहीत. पण सुवर्ण मध्य साधून त्यांना जे आवडत्ं ते तुम्ही ऐकवायला पाहिजे. तुम्ही दोनदा ‘वन्स मोअर’ घ्याल, तीनदा फ़र्माईश घ्याल पण हा कार्यक्रम फ़र्माईश चा नाही हे तुम्हाला सांगता यायला हवं. ही खरं तर Give & Take process आहे. तुम्ही लोकांचं ऐकता म्हणून ते तुमचंही ऐकतात. मग जेव्हां पडदा पडतो तेव्हा तुम्ही मनस्वीपणा करायला मोकळे असतात. हे सगळं स्पष्ट असल्याने तसा काही त्रास झाला नाही किंवा नव्या कविता समोर आणायच्या राहून गेल्या असंही कधी वाटल्ं नाही. क्षिप्रा:तरीही एखादी कविता स्वतःला खूप आवडते पण ती लोकांना आवडणार नाही अश्या जाणिवेतून ती लोकांसमोर सादर करायची राहून गेली असं कधी झालंय का? संदीप: आता हा माझा अंदाज़ असतो एक performer म्हणून की लोकांना कुठली कविता कळेल आणि कुठली कळणार नाही. इथे मी आवडेल असं म्हणणार नाही. जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा त्या कवितेची जी भाषा आहे ती समोरच्याला कळली पाहिजे. जेव्हा लोकं तिकिट काढून या कार्यक्रमाला नाटकासारखीच येतात तेव्हा त्यांचा कवितेचा एक IQ ठरलेला असतो. ती काही त्यात पारंगत नसतात किंवा कवितेच्या भाषेशी तितकी परिचित नसतात. (हसून सांगतात) माझ्या कार्यक्रमाला convent मधली खूप मुलेमुली येतात की मुळात ज्यांना शब्द कळायचीही मारामार असते. त्यामुळे मी हे सगळं गृहीत धरून कार्यक्रम करतो तेव्हा त्यांचा कवितेचा IQ माझ्या मनात set झालेला असतो. मला त्या IQ चा आदर करावाच लागतो. हं, हळूहळू मी त्यांना एकेक चमचा डोस वाढवत नेला तर ती भाषा त्यांना कळायला लागतेही. अगदी पहिल्याच दिवशी ग्रेस ऐकवले तर ते कठीण जाईल. त्यात कवितेचा दोष आहे असे नाही किंवा ऐकणा~याचा दोष असेही नाही. दोघांची या आधी कधी ओळखच नसते हे त्यामागचं खर्ं कारण! क्षिप्रा: ‘आयुष्यावर बोलू काही’ बद्दल म्हणायचं झाल्ं तर पुर्वार्ध तरुणाईला आवडतो आणि उत्तरार्ध इतरांना भावतो, असं काही वाटतं का? संदीप: नाही… नाही. मा्झ्यापर्यंत अगदी उलट प्रतिक्रिया पोचल्या आहेत. माझ्याकडे college मधली आणि अगदी convent मधली मुलंमुली प्रतिक्रिया सांगायला येतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा भाग त्यांना ‘जास्त catchy’ वाटतो. उत्तरार्ध हा content च्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. मला व्यक्तिशः तो खूपच आवडतो. म्हणून मला असं वाटतं की आपण विशिष्ट वयाला काही गोष्टी चिकटवून दिल्या आहेत. त्या खर्ं तर तश्या नसतात. आपण judge करायला चुकतो त्यामुळेच! क्षिप्रा: मायबोलीविषयी काही ऐकलं आहे का? संकेतस्थळ पाहिलं आहे का? संदीप: हो. Site बघितली आहे ना! त्यावर ज्या चर्चा चालतात त्या वाचलेल्या आहेत. क्षिप्रा: आता शेवटचा प्रश्न…… माणूस म्हणून जी सामाजिक बंधनं आहेत ती पाळता की नाही? की ही बंधनं फ़क्त कल्पनेतच तोडायला आवडतात? संदीप: संधी मिळेल तेव्हा तुम्ही बंधनं तोडायला बघतात! तुम्ही समाजासाठी काही करताय असं काही नसतं तर तुमच्याकडून ते करवून घेतलं जात असतं, नाहीतर तुम्ही चौकटीबाहेर फेकले जाता! जशी चाकोरीत राहण्याची एक किंमत आहे तशीच ती तोडण्याचीही आहे. मला स्वतःला चाको्रीत जगायला कधी आवडलं नाही. पण त्याचवेळी मी माझ्या जबाबदा~या झटकून रानावनात नाही निघून जाऊ शकत! मी कलाकार आहे म्हणून माझ्या जबाबदा~या मी टाळत नाही. पण त्या पुर्ण करुन मी माझं माझं स्वातंत्र्य जपू शकतो. समारोप:– २४ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंचावर सादर होणा~या ‘आयुष्यावर बोलू काही’ ह्या कार्यक्रमाच्या २०० व्या प्रयोगासाठी त्यांना शुभेच्छा देऊन, मायबोली तर्फे त्यांचे आभार मानून ही बातचीत संपली. आभार - मायबोलीच्या ‘संवाद’ ह्या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल Admin आणि संवादचे सभासद ह्यांचे आभार. मुलाखतीची कल्पना सुचवल्याबद्दल आणि मुलाखत एडिट करताना गिरीची मदत झाली त्याबद्दल त्याचे आभार. प्रश्न विचारण्याचा sequence आणि बोलतं करण्याच्या काही सूचना दिल्याबद्दल मुक्त पत्रकार नीला शर्मा ह्याचेंदेखील आभार. |