भावना व्यक्तीकरण कर्मचारी पुरवठा केंद्र

Submitted by बेफ़िकीर on 15 July, 2011 - 05:42

८० वर्षांची म्हातारी मेली तसा दादू वैतागला. शेजारपाजारची चार माणसे आली होती आणि त्यांना म्हातारीला एकदाचे स्मशानात नेऊन टाकायचे होते. इव्हन दादूलाही काही विशेष इन्टरेस्ट नव्हताच. पण तो बघायचा. रस्त्यावर कित्येक कट आऊट्स असायचे. कुणाचा वाढदिवस, कुणाची कुठेतरी निवड झाल्याबद्दल अभिनंदन तर कुणाचे तरी दु:खद निधन! दादूला स्वतःचा वाढदिवस माहीत नसल्याने त्याला हेही माहीत होते की त्याचे होर्डिंग कधीच लागणार नाही. पण निदान म्हातारी वारली आहे तर त्याचा तरी उल्लेख केला जावा ही त्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे तो विचार करत बसला होता. तो कसला विचार करत आहे याची चौकशी केल्यावर मग ते चार चौघेही तिथे बसून विचार करू लागले. एक विचारवंत म्हणाला..

"च्यायला खरंच की! आपण सामान्य मेलो तरी कुणाला घेणंदेणं नाही, आणि त्या नगरसेवकाचं पोरगं स्वतः उभं राहून मुतलं तरी पोस्टर लागतंय रस्त्यावर! बाळासाहेब लांडगे आता स्वतःहून मुतू लागल्याबद्दल अभिनंदन! काय जमाना आलाय. नाही मीही म्हणतो की दादूच्या म्हातारीचा कटआऊट पायजेच चौकात! काय????"

माना हालल्या. दादूलाही जरा बरं वाटलं. आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात आहे या खुषीत तो म्हणाला..

"मी तर दोन हजार देईन... पण इकडे एक अन तिकडे एक... दोन पोस्टर पाजयेत म्हातारीची"

शेवटी एकाने सल्ला दिला.

"दादू, अरे गंजपेठेत जाऊ चल... तिथे एक दुकान आहे.. ते सोहळा असला की त्यात सहभागी होतात.."

"आता म्हातारी गचकली यात सोहळा काय आहे??"

"तू चल रे नुसता... तिथे गेल्यावर बघ"

"पण या बॉडीचं काय?"

"अरे ते प्रेत काय हालणारे होय? चोरीलाही जायचं नाही... चल तू"

पाचही जण उठले आणि सायकलवर टांगा टाकून निघाले.

गंजपेठेत पोचले आणि 'त्या' दुकानासमोर उभे राहिले.

'भावना व्यक्तीकरण कर्मचारी पुरवठा केंद्र'

सस्मित मुद्रेने एक पन्नाशीची तरुणी बसलेली होती. तिच्या डोळ्यात 'मी जगातले, माझे स्वतःचे सोडून, सर्व प्रॉब्लेम्स मिटवू शकते' असा आत्मविश्वास होता. आलेल्याला धीर देणे व त्याच्या सर्व शंकांचे निरसन करणे या कर्तव्यांची जाणीव असल्याने तिने पुढे होऊन सर्वांचे स्वागत केले व त्यांना बसायला सांगीतले. तेवढ्यात एका मुलाने सहा पाण्याचे ग्लास आणून ठेवले.

"मी रंभा गुरव"

"आं? नांव आन आडनाव लयच इसंगत आहे बाई तुमचं"

या विधानावर जमेल तितके मादक हासत रंभाने मुलाला चहा अशी खुण केली.

"बोला... काय प्रकारचा समूह हवा आहे?"

"तुमच्या इथे नेमकं काय मिळतं?"

"आमच्या येथे माणसे मिळतात भाड्याने. रडणारी, नाचणारी, चालणारी, खांदा देणारी, हासणारी, नुसती बसणारी, स्तुती करणारी, उदास वगैरे होणारी, टाळ्या वाजवत राहणारी अशी अनेक प्रकारची माणसे मिळतात. एका माणसाचे आम्ही सहा तासांचे शंभर घेतो. तुमच्या कोणत्याही भावना तीव्रपणे व्यक्त करण्यात आमची माणसे वाकबगार आहेत. बोला, तुमच्याकडे काय झाले आहे?"

"म्हातारी खपली"

"मग वाटण्या बिटण्या झाल्या आहेत का?"

"मी यकटाच पोरगाय तिचा"

"हं.. नाहीतर म्हंटलं भांडणारी माणसं हवीयत की काय?"

"न्हाय! आमच्या म्हातारीच्या मौतीचं आळीत कुणाला कौतुकच न्हाई. "

"पाठवते... चार बायका येतील आणि म्हातारी मेल्याचे कॉन्स्टन्ट कौतुक करतील"

"अहो ऐका... मेल्याचं कसलं कौतुक?? आमच्या म्हातारीचं पोस्टर लागलं पायजेल चौकात"

"पोस्टर लावणारी माणसेही आहेत"

"पोस्टर लावणारी माणसं नकोयत, आम्हाला म्हातारीची मौत गाजवून सोडणारी मणसं हवीयत"

" गाजवून सोडणारी म्हणजे?"

"म्हणजे अख्या रस्त्याला आणि नगरसेवकाला कळायला पायजेल की आपल्या भागातली एक मोठी म्हातारी गेली असून तिच्या 'निध्नाने' एक मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे आन त्या पोकळीचं आपणबी दर्शन घ्यायला जायला हवं"

"म्हणजे म्हातारीला मुत्यूपश्चात हिरो करायचंय"

"एक्दम राईट... न्हाईतर आमी कायमचे सामान्यच र्‍हानार"

"त्यासाठी जातिवंत आक्रोश करणारे असे सहा पुरुष व पावलोपावली हंबरडे फोडणार्‍या सहा बायका लागतील, एकूण बाराशे रुपये होतील. "

"अहो पाच हजार घ्या पण चागली पन्नास माणसं लावा रडायला... 'हित्पास्नंच' सुरू करायचंय रडायला"

"देते की? माझ्याकडे आत्ता सदतीस माणसं आहेत, ती घेऊन जा, तेरा एक तासाभरात पाठवते"

"आसं करा... ती तेरा नगरसेवकाच्या बंगल्यावरच धाडा... थितंच बोंबलूदेत त्यांना.. म्हन्जे मंग तो यील"

"चालेल... आत्ता पाच हजार अ‍ॅडव्हान्स द्या... तसेच आमच्या काही अटी आहेत"

"कसल्या अटी??"

"ज्या कामासाठी माणसे येत आहेत तेच काम ती करणार, दुसरे कोणतेही काम ती करणार नाहीत, तसेच, सहा तासात त्यांना एक कप चहा मिळायला हवा, काम करताना भावनांची तीव्रता पराकोटीला पोचून एखाद्या माणसाची तब्येत बिघडली तर त्याला अ‍ॅडमीट करावा लागेल, हॉस्पिटलायझेशनचा खर्च आम्हीच देऊ, पण तिथपर्यंत पोचवण्याचे काम तुमचे आहे, तसेच, आमच्या माणसांच्या भावना व्यक्तीकरनाचा प्रभाव पडून तुमच्यापैकी कुणाला काही झाले तर ती आमची जबाबदारी नाही. आता शेवटची अट! पाच तास एकोणसाठ मिनिटे होईपर्यंत तीव्रतेने भावना व्यक्त करणारी माणसे सहाव्या तासाचे पहिले मिनिट सुरू झाले की कोरडे ठण्ण चेहरे करून परतू लागतील. त्यांच्यात झालेला हा बदल उपस्थितांच्या पचनी कसा पाडायचा हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. मान्य आहेत का अटी?"

"अहो दोन तासात आग द्यायचीय म्हातारीला.. सहा तास कुठले लावताय?"

"किमान सहा तास भावना व्यक्त करणारच ते! समजा तुम्ही त्यांना दोन तासांनी परत पाठवलेत तरी आमचा कायदा म्हणून ते पुढचे चार तास तीच भावना व्यक्त करत राहतात, मग समजा हासत असले आणि कुणी बडवून काढले तरी हासतच राहतात, ओरडत वगैरे नाहीत"

"माणसं आहेत का यंत्रं?"

"प्रशिक्षित स्टाफ आहे आमचा!!!"

"हे घ्या पाच हजार... कुठे आहेत माणसं??"

"तुम्ही रस्त्यावर थांबा... दोन मिनिटात सगळे तिथेच भेटतील तुम्हाला"

खरच दोन तीन मिनिटात पस्तीस एक जमाव तिथे जमला. आता तर तो जमाव पाहून रस्त्यातही काही लोक खोळंबून पाहू लागले. सर्व जण पाषाणासारख्या भावहीन चेहर्‍याने वावरत होते. एक शब्दही बोलत नव्हते. रंभाताई गुरव बाहेर आल्या व घड्याळाकडे बघत म्हणाल्या..

"कस्टमरची म्हातारी वारली आहे... आक्रोश पॅकेज घेतलेले आहे... स्टार्ट इथूनच आहे... स्मशानातून परत सेन्टरला यायचं आहे.. जो बघेल त्याला भारतातील एक महान नेता वारला असावा असे वाटायला हवे इतका आक्रोश करायचा आहे... समजले??? पेमेंट घेतलेले आहे... एक चहा मिळेल.. आत्ता अकरा वाजलेले आहेत... पाच वाजता सर्वांनी येथे रिपोर्ट करायचा आहे... तेरा माणसे नगरसेवकाकडे डायरेक्ट जाऊन आक्रोश करणार आहेत... त्यांना कस्टमरच्या घरी पोचलेले पाहून गोंधळून जायची गरज नाही... तेही त्याच कारणासाठी आक्रोश करत असतील... ओके??? यूअर टाईम स्टार्ट्स.....???????????? न्न्न्न्न्नाऊऊऊऊऊऊ"

रस्ता अक्षरशः दुभंगला त्या आक्रोशाच्या आवाजाने!

दहा एक माणसे जमीनीवर गडबडा लोळू लागली. बायका आपल्याच हातांनी कपाळ बडवून भीषण आवाजात रडू लागल्या. एका माणसाने तर माती वगैरे खाऊन दाखवली. दोन माणसे थयाथया नाचत हिडीस आवाजात किंचाळत होती.

दादू आणि ते चार मित्र हादरलेच! प्रकार असा निघेल याही त्यांना यत्किंचितही कल्पना आलेली नव्हती आधी त्या माणसांचे कोरडे चेहरे पाहून! त्यांना वाटत होते की फार तर हळूहळू मुसमुसू लागतील व नंतर वातावरण निर्मीती झाली की मग बेभानपणे रडतील वगैरे!

हे म्हणजे बटन दाबल्यावर खेळणे नाचू लागावे तसे पब्लिक बोंबा ठोकत होते. रस्त्यावरच्यांची मात्र पाचावर धारणच बसली. अचानक हा काय गलका म्हणून वाहने कर्कश्श ब्रेक्स दाबत थांबली. लोक जमू लागले. कुणीतरी महान व्यक्ती निवर्तली असणार हे सगळ्यांनाच समजू लागले. आजूबाजूला जी दुकाने वगैरे होती त्यांना हे प्रकार आधीच माहिती असल्याने ते शांत होते. पण रस्त्यावरचे पब्लिक मात्र चौकशा करू लागले. रडणारे इतके आर्त आणि व्याकुळ होऊन रडत होते की त्यांना विचारायची सोयच नव्हती. आणि दादू आणि चौघे जरा शांत दिसत असल्यामुळे त्यांना 'काय झाले' असे कुणी विचारले की ते एवढेच म्हणत होते की 'म्हातारी खपली'. कोण म्हातारी, कुणाची म्हातारी, ती का खपली आणि ती खपली तर एवढे गडाबडा लोळण्यासारखे काय हे प्रश्न सुचत असूनही विचारण्याचा कुणाला धीर नव्हता. रंभाताई गुरव आत निघून गेलेल्या होत्या.

सदतीस अधिक चार असा एक्केचाळीसचा जमाव आता पुढे पुढे सरकू लागला. रस्त्यावर जे रिकामटेकडे होते त्यातील पाच दहा त्यात आणखीन मिसळले. ते काही रडणार्‍यांना धीर वगैरे देऊ लागले. त्यांनी केलेल्या सांत्वनामुळे रडणारे अधिकच बेभान होऊन रडू लागले.

तीन चार मिनिटात बाबू आणि कंपनीसमोर एक तिसराच प्रश्न उभा ठाकला. हे इतके रडतायत आणि आपली म्हातारी खपलेली असून आपल्या डोळ्यात टिप्पूस नाही हे कसे काय मान्य होईल???

त्यामुळे आता दादू रडल्यासारखे करू लागला. काही रडणारे आता दादूला मिठी वगैरे मारून सर्वस्व लुटल्यासारखे आक्रोश करू लागले. ते भावनिक वादळ झेपत नसल्यामुळे दादूला खरे रडूही आले.

दोन बायका आता रस्त्यावरच्या वाहनाखाली जीव द्यायच्या हेतूने पाय टाकू लागल्या. त्यांना इतर अनेक बायकांनी ओढून बिढून धरले. त्यातच एक हवालदार पोचला. आपण या प्रेतयात्रेत असावे की नसावे हे न समजल्यामुळे शेवटी त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

कोणीही आता काहीही करत होते. वाट्टेल ते चाललेले होते. एका रडणार्‍याने दुसर्‍या एका रडणार्‍याला झिंजा ओढून मधे आणले आणि शिवीगाळ करून म्हणाला...

"सांगत होतो अ‍ॅडमीट कर... सांगत होतो अ‍ॅडमीट कर... न्हाय ऐकलं.. न्हाय ऐकलं माझं... माझी म्हातारी ग्येली हो........."

तो झिंजा धरला गेलेलाही बोंबलू लागला.

कोण गेले आहे आणि कोण का रडत आहे हे आता दादूलाही समजेनासे झालेले होते.

गंज पेठेतून वरात पुलाच्या वाडीत पोचायलाच दोन तास लागले. मागून दोन किलोमीटर अंतरावरून वेगळीच तेरा माणसे स्वतंत्रपणे रडत नगरसेवकाच्या घराच्या दिशेने चाललेली होतीकारस्त्यातल्यांना हे टप्प्याटप्प्यातील रडणे काही समजत नव्हते.

इकडे हा प्रमुख समुह पुलाच्या वाडीत पोचल्यावर त्या झोपडपट्टीतील काही जुन्या बायका त्या रडण्यात सामील झाल्या. त्यांना त्यांच्या आयुष्यात फक्त रडायलाच स्वातंत्र्य उरलेले असल्यामुळे त्या धाय बिय मोकलून रडू लागल्या. त्यांचे रडणे आपल्यापेक्षा प्रभावी वाटून आपल्याला स्पर्धक निर्माण होऊ नये या विचाराने 'रंभा गुरव' गटाचे 'रडके' आणखीनच कोकलू लागले.

एकदम इतकी माणसे येऊन रडू का लागली हे न समजल्यामुळे पुलाच्या वाडीत हाहा:कार माजला. प्रचंड धावपळ झाली. दुकाने बंद झाली. लोक रडणार्‍यांच्या आजूबाजूला जमू लागले. रडणार्‍यांमधील एक बाई प्रचंड हाय एनर्जी लेव्हलची होती. आजूबाजूला गर्दी जमलेली पाहून तर तिच्या अंगातच आले. तिचे रडणे म्हणजे रडण्याची कमाल मर्यादा होती.

आता दादूला अभिनयात प्रावीण्य मिळवायलाच लागणार होते. आता तो जमीनीवर बसून छाती पिटून बिटून घ्यायला लागला.

अर्धा तास तिथेच रडारड होतीय तोवर मागून नवीन रडणारे तेरा जण आले. त्यांच्यात लगबगीने चालणार्‍या सौ. नगरसेवकही होत्या. ते पाहून दादूने रडण्याची नवीन कमाल मर्यादा प्रस्थापित केली. पण आता व्यावसायिक रडणार्‍यांची नेमकी चहाची वेळ झाली. आता करायचे काय???

दादूने पटकन एका चहाच्या टपरीला पैसे दिले आणि रडणार्‍यांपैकी एकाच्या कानात सांगीतले की चहा हातात पडेपर्यंत रडत राहा.

एकच आक्रोश दुमदुमला आसमंतात!

सौ नगरसेविका बाईंनी पुढे येऊन दादूच्या खांद्यावर हात ठेवला.

"माझ्या भावा... आई गेली ना रे आपली??? मी आहे हो तुला... तुझी मोठी बहिण???? आणि दाजी येतायत हो भेटायला.. तासाभरात पोचतीलच.... रडू नको भाऊ... रडू नको... अरे आई काय परत येणार आहे का रडून??"

दादूला आता स्वतःच्या रडण्याचेच रडू यायला लागले होते. हंबरड्यांची आणखी एक मालिका पार पडेपर्यंत चहा आला. चहा आल्यावर यंत्रवत हालचाली केल्याप्रमाणे सर्वांनी शांतपणे बसून चहा घेतला. हे दृष्य पाहून दादूच्या तळपायाची मस्तकाला पोचलेली होती. पण पर्याय नव्हता. ते रडणारे आता एकमेकांच्या रडण्याचे वगैरेच कौतुक करत होते. दादू मात्र छाती पिटत बसलेला होता. मात्र ते रडणारे एकदम थांबले हे सगळ्यांच्याच डोळ्यांवर आले. मात्र लोक काही बोलले नाहीत कारण वेळ मयतीची होती.

अचानक चहाचे कप बाजूला ठेवून पुन्हा आक्रोश सुरू झाला.

"दादू... अरे चल... अरे म्हातरीला अग्नी दे दादू..."

मित्र दादूला ओढून समजावत म्हणत होते. पण प्रॉब्लेम असा होता की नगरसेवक आल्याशिवाय दादू तिथून हालणार नव्हता. तो मुद्दा समजल्यावर मग मित्रही बोलायचे थांबले. व्यावसायिक रडके आता काहीसे दमल्यामुळे नुसतेच मुसमुसत वगैरे होते. अगदीच भंकस वाटू नये म्हणून एखाददुसरा मोठाल्ले हुंदके वगैरे देत होता.

पुलाच्या वाडीच्या प्रवेशद्वारावर तीन तासाइतका विक्रमी वेळ कधी मारामारीसुद्धा झालेली नव्हती.
तिथे एक मय्यत झाल्याबद्दल रडारडी इतका वेळ??

शेवटी एकदाचे नगरसेवक आल्याची दवंडी पिटली गेली तसा पुन्हा एकदा हाहा:कार उडाला. आता रडके भिंतीवर वगैरे हात आपटू लागले. दोन बायका दु:ख सहन न होऊन कोसळल्या. एका व्यावसायिक रडक्याबाईने तर बांगड्या वगैरेही फोडून दाखवल्या. मेली होती म्हातारी आणि ही विधवेच्या थाटात रडत होती.

नगरसेवक लांबून दिसले तसा जमाव प्रक्षोभकपणे आक्रोश करू लागला. हंबरड्यांनी पुलाच्या वाडीतील झोपड्यांचे पाणीपाणी झाले.

तो आक्रोश लांबून पाहूनच नगरसेवकाची छाती दडपली. कारण आपल्या वॉर्डात एक इतकी लोकप्रिय म्हातारी होती हे त्याला आजच समजले होते. तिचा काही एकगठ्ठा मतांसाठी वापर करून घेता आला असता पण ती आधीच मेली याचे नगरसेवकाला एक स्वतंत्र दु:ख झाले.

ते चालत चालत जमावापाशी येताच दोन बायकांनी स्वतःला त्यांच्यावर झोकून दिले. ते पाहून सौ नगरसेविका पुढे आल्या व त्यांनी 'स्त्रीवर्गाचे सांत्वन मी करेन' असा एक हळुवार संदेश पतीराजांना नजरेने दिला. तोवर एक व्यावसायिक रडका नगरसेवकांच्या पायांवर लोळण घेऊन ओरडू लागला...

"अख्या भारताची आई गेली हो.... अख्या भारताची आई गेली"

नगरसेवक त्याला थोपटत होते. च्यायला दादूची आई मेल्याचे दहा घरे सोडून अकराव्या घराला कळलेले नव्हते आणि देशाची आई गेली म्हणून पब्लिक बेशुद्ध वगैरे पडत होते.

आता दादूही धावला आणि त्याने तर नगरसेवकांच्या पायांना हाताच्या जुडीने घट्ट पकडले वगैरेच! जणू काही नगरसेवक म्हणजे यमाचा रेडा होता आणि 'पृथ्वी चित्रगुप्त पृथ्वी' हे शटल यान थांबवणे त्याच्या हातात होते.

नगरसेवकांनी दादूला थोपटत व रुमालाने डोळे पुसत गहिवरलेल्या आवाजात भाषण सुरू केले.

"मित्रांनो... तुमची, माझी, या दादूची, पुलाच्या आईची वाडी गेली.... आपलं.. सॉरी... पुलाच्या वाडीची आई गेली.. हा तुम्हा सर्वांचा आक्रोश पाहून तिच्या आत्म्याला दु:ख नाही का होणार??? मृताच्या नातेवाईकांना मी माझ्या निधीतून.. "

"यकटाच्चे... यकटाच्चे मी नातेवाईक"

दादूने त्याही परिस्थितीत हळहळून सांगीतले. काय सांगावे? आता नातेवाईक म्हणून च्यायला इथेच दहा जण उभे राहायचे..

"तर या दादूला मी माझ्या निधीतून... रुपये चार हज्जार ..."

खट्ट!

अँ???

हे काय झाले???

व्यावसायिक रडके स्टॅन्डस्टिल! एकदम हॉल्टच!

दादू सगळ्यांकडे पाहू लागला. कोरड्या ठण्ण चेहयाने एकेक रडका पाय काढता घेऊ लागला. कुणालाच काही कळेना !

नगरसेवकांनाही! ते म्हणाले...

"पैशाचा विषय आल्यावर असे सगळे निघालात का रे माझ्या बांधवांनो??? माझे काही चुकले आहे का??"

एक व्यावसायिक रडकी म्हातारी स्पष्टपणे म्हणाली.

" पाच वाजले... आता झाला आमचा टायम रडनं थंबिवन्याचा... "

"म्हणजे???... पुलाच्या वाडीची आई गेली आहे आणि असे रडणे हवे तेव्हा थांबवता येते का आज्जी??"

" आम्हाला येतं... "

"दादू... हा काय प्रकार???"

दादूने आसवे ढाळत हात जोडत विनंती केली...

"माझ्या म्हातारीचं योक पोस्टर लावा साह्यब... योक पोस्टर लावा... तेवढंच बघून समाधान"

नगरसेवकांनी विचारले काय आणि त्याने उत्तर काय दिले...

तेवढ्यात दादूच्या पाठीत काठीचा प्रहार झाला खण्णकन!

"आईच्या जीवावं उठलायस व्हय रं दोडा??? तुझ्या बापापाठोपाठ तू बी ग्येला का न्हाईस मसनात??"

म्हातारीला जिवंत पाहून पुलाची वाडी हादरलेली होती.

गुलमोहर: 

छान

काय आहे हे...... भयानक हसले,हसुन हसुन पोट दुखायला लागले,
अफलातुन अफलातुन अफलातुन........!!!!!!!

आयडियाची कल्पना चांगली आहे...भूषणराव चांगलं जमलंय लेखन.
माझ्या एका मित्राची आई गेली तेव्हाचा प्रसंग....
स्मशानात प्रेतासकट सगळे जमलेत....माझ्या मित्राला घरच्यासकट बाहेरचेही दादा म्हणायचे.
आता प्रेतावर काही धार्मिक संस्कार करण्यासाठी किरवंतांची लगबग सुरु आहे....तेवढ्यात तिथले कॉंग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक आले...आल्या आल्या त्यांनी गर्दीचा ताबा घेतला आणि एक छोटेखानी भाषण ठोकलं....गर्दी पाहिली की ह्यांना भाषण देण्याची सुरसुरी येतेच....आज आपल्या दादाची आई गेली(इथे दादाचं मुसमुसणं वाढलं)...दादाची आई ही केवळ दादाचीच आई नव्हती तर ती आपलीही आई होती(इथे दादाच्या तोंडातून एक अस्फूटशी किंकाळी)...इतकेच नव्हे तर ती आख्ख्या देशाची आई होती असेही म्हणायला मी मागेपुढे पाहणार नाही...अशा कठीण प्रसंगी आपण देशाचे....आपलं दादाचे हात बळकट केले पाहिजेत.....वगैरे वगैरे!
दादाचे हात बळकट? ते कशासाठी वो?
माझ्यासारखेच काहीजण फिस्सकन हसले...गंमत म्हणजे त्या परिस्थितीतही दादा हसला.(तसा स्वभावाने तो गंमत्याच होता ..प्रती दादा कोंडकेच म्हणा ना)...पण मग लगेच आपल्या रडण्याच्या भूमिकेत शिरला
इंदिराजींचे,राजीवजींचे.....वगैरेंचे हात बळकट करा....हा संदेश कॉंग्रेसीजनांच्या रक्तात इतका मुरला होता की अंतिम क्रियाकर्माच्या वेळीही हे ’हात बळकट’ करणं सुरुच होतं. Proud

जबरदस्त कल्पना! खूप हसवलेत!
>>.....पण ती आधीच मेली याचे नगरसेवकाला एक स्वतंत्र दु:ख झाले. <<

आणि तेही चक्क खरे खरे. अशा कितितरी जागा.

नगर्सेवकाच्या भाषणात आजकालचे आणखी एक चलनी नाणे, " ती वाडीची आई म्हणून थोर होतीच पण एक माणूस म्हणून तर आणखीच थोर होती" , हे टाकायचे राहिले काय?
हसवणे फार फार अवघड.
धन्यवाद!

त्यासाठी जातिवंत आक्रोश करणारे असे सहा पुरुष व पावलोपावली हंबरडे फोडणार्‍या सहा बायका लागतील, एकूण बाराशे रुपये होतील. >>
चारचारदा हसलो.!
खूप भारी .!!

Pages