सदस्य प्रवेश |
धुमारेदुपारची वेळ होती. दादा शांतपणे माईंनी वाढलेलं जेवण जेवत होते. माईंनी हळूच दादांकडे पाहून त्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे पाहून कसलाच थांग लागत नव्हता. माईंचही चित्त होतं कुठे ठिकाणावर.. सवयीने हात काम करत होते इतकंच. ते दोघंही खरंतर संध्याकाळ व्हायची आतूरतेने वाट बघत होते. देवकी आज निलयला घेऊन घरी येणार होती. दादा - माईंना निलय आवडला तरच ती त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार होती. देवकी........ तिला पाहून दादांना फार कणव दाटून यायची तिच्याबद्दल. जे काही घडलं तिच्या आयुष्यात त्यात तिची काय चूक होती? चांगलं पत्रिका पाहून दादांच्या एकुलत्या एक मुलाशी - आशिषशी तिचं लग्न ठरवलेलं.... लग्नाला केवळ एक महिना उरलेला असताना देवकीचे वडील गेले. केवढी खचून गेली होती देवकी आणि तिची आई..... पण केवळ धरलेला मुहुर्त टाळायचा नाही म्हणून देवकी लग्नाला तयार झाली. लग्न झालं आणि पाठोपाठच देवकीच्या आईनेही एक मुख्य जबाबदारी पार पाडल्याच्या समाधानात डोळे मिटले. लागोपाठ आई-वडिल जाणं हा केवढा मोठा धक्का होता देवकीसाठी... पण देवकी आपलं सगळं दु:ख विसरून नविन घरात रूळायचा प्रयत्न करायला लागली. आपल्या लाघवी स्वभावाने माईंना, दादांना आपलंसं केलं. आशिष तर केवढा खुश होता तिच्यावर..... नितळ गोरा रंग, सुबक बांधा, आशिषला साजेशी उंची, शिक्षण आणि मुख्य म्हणजे मृदू मुलायम प्रेमळ स्वभाव. परमेश्वराकडून जादूई आवाजाची देणगी मिळाली होती देवकीला आणि वडिलांकडून गाण्याचा वारसा. त्या गाण्याच्या प्रेमातच तर आशिष पडला होता. दरम्यान, देवकीने आपलं मन गाण्यामध्ये गुंतवलं. तिने गाण्याच्या शिकवण्या घ्यायची तयारी दाखवली आणि तिला विद्यार्थीही मिळत गेले. देवकी आपलं एकटेपण सुरांमध्ये बुडवून टाकत होती. आपल्या वेदना विसरायचा असोशीने प्रयत्न करत होती. आता घरात चार मुलांची उठबस व्हायला लागली होती. त्यानिमित्ताने देवकीचंही बोलणं, वागणं मोकळं होत होतं. देवकीला जगण्याची एक दिशा मिळत होती. ती आपले विद्यार्थी घेऊन जिल्ह्याबाहेर स्पर्धा - परीक्षांसाठी घेऊन जात होती. नवनविन अनुभव गाठीशी बांधत होती. आणि अशाच एका स्पर्धेच्या वेळी तिची निलयशी ओळख झाली. निलय... अतिशय सुसंस्कृत, सभ्य आणि उमद्या मनाचा मुलगा होता. आपलं मेकॅनिकल इंजिनियरींग पुर्ण करून आपल्या गावी एक वर्कशॉप चालवत होता. 'गाणं' हा त्याचा छंद त्याने उत्तम रीत्या जोपासला होता. ह्या क्षेत्रात होणार्या प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवून होता. आपल्या विद्यार्थ्यांकडून कमालीची तयारी करवून घेणार्या देवकीबद्दल त्याने ऐकलेलं होतंच. नम्रपणे बोलणारी देवकी पाहून, तिचं सात्विक, सोज्वळ रुप पाहून तो भारावून गेला होता. ती स्पर्धा संपल्यावर जमलेल्या एका अनौपचारीक मैफलीत कोणीतरी देवकीला गायचा आग्रह केला आणि तिचा तो आवाज, गाण्याची तयारी पाहून त्याचक्षणी तिच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी ओळख वाढवून तिच्या परीचयात रहायला लागला होता. तिच्याविषयी, तिच्यावरच्या प्रेमाविषयी जेव्हा त्याला स्वतःला खात्री पटली तेव्हा वेळ न दवडता त्याने लग्नाविषयी देवकीला विचारलं होतं. परंतु त्यावेळी स्पष्टपणे देवकीने त्याला नकार कळवला होता. पण कुठूनतरी माईंना ह्याविषयी कळलं तेव्हा त्यांना खुपच आनंद झाला. देवकीच्या पुनर्लग्नाचा विषय तिच्याजवळ कसा काढू ह्याबद्दल त्या दुविधेत होत्या आणि अचानक निलयविषयी त्यांना समजलं होतं. दादांच्या मागे लागून त्यांनी निलयबद्दल माहिती मिळवली आणि त्याच्याविषयी खात्री पटल्यावर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायचं ठरवलं. पण देवकीने माईंनाही ठाम नकार दिला. म्हणाली, 'मी आशिषला विसरू शकणार नाही आणि केवळ एक तडजोड म्हणून लग्न करायचं तर निलयवर अन्याय होईल'. खरंतर देवकीचं पुन्हा लग्न करून देणं तिच्या पूर्ण आयुष्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. पण त्यासाठी तिला तयार कशी करायची हा मोठा प्रश्न माईंना पडला होता. तिकडे एक वेगळीच समस्या दादांचं मन पोखरत होती. पेशाने दशग्रंथी ब्राम्हण असलेल्या दादांनी आजवर नोकरी कधी केलीच नव्हती. चार घरचं यजमानपद आणि वेळोवेळी होणार्या पूजा अर्चा यावरच त्यांनी संसार चालवला होता आणि आशिषचं शिक्षण पुर्ण केलं होतं. आशिषला व्यवस्थित नोकरी लागल्यावर त्याने हे सगळं दादांना बंद करायला लावलं होतं. नोकरी कधी केली नव्हती त्यामुळे त्यांची स्वतःची अशी काही पुंजी त्यांच्याजवळ नव्हती. त्यांच्या भविष्याची तरतूद म्हणजे आशिषच होता. त्याचंच असं काही होईल हे कधी दादा - माईंच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्याच्या फंडाचे, विम्याचे जे काही पैसे मिळाले ते गुंतवून त्याच्या व्याजावर आणि देवकीच्या शिकवण्यांवर आता घर चालत होतं. पण देवकीचं लग्न करून द्यायचं म्हणजे शिलकीतले पैसे खर्च होणार; अगदी साधं लग्न जरी केलं तरी आशिषचे म्हणून त्यातले थोडे पैसे तरी तिच्या नावे करावे लागणार; मग आपलं काय? पुढे आपला खर्च कसा चालणार? म्हातारपणातली दुखणी खुपणी कशी सावरायची पैशाशिवाय, देवकीशिवाय? असे कोते विचार आपल्या मनात येत आहेत ह्याचा त्यांना भयंकर राग येत होता. स्वतःचीच त्यांना लाज वाटत होती. आपलं संस्कारक्षम मन असा विचार कसा काय करू शकतं ह्याची त्यांना चीड येत होती. व्यवहारी बुद्धी वरचढ ठरू पाहत होती. विचार करकरून डोकं थकलं तरी काही मार्ग समोर येत नव्हता. शेवटी संकोचत त्यांनी माईंजवळ आपले विचार मांडले. पण माईंनी एका झटक्यात त्याचा निकाल लावला. पुन्हा नव्याने संसार मांडायची देवकीला खरंतर भितीच वाटत होती. आणि असल्या काही गोष्टींवर तिचा विश्वास नव्हता तरी न जाणो निलयशी लग्न केल्यावर आशिषसारखं त्याचं काही झालं तर? आशिषच्या मधुर आठवणी अजून ती जवळ बाळगून होती. पण पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने कोणाची तरी सोबत असणं जरुरीचं आहे हेही तिला समजत होतं. निलयला आपण स्विकारू शकू का? त्याच्याशी एकरुप होऊ शकू का? की केवळ आयुष्याची साथसोबत म्हणून त्याच्याशी लग्न करायचं? हे आणि असे अनेक प्रश्न तिची पाठ सोडत नव्हते. खरं म्हणजे निलय तिला आवडला होता पण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तिचं मन राजी होत नव्हतं. देवकी काहीच निर्णय घेत नाही म्हटल्यावर माई अस्वस्थ झाल्या. कसं पटवायचं ह्या पोरीला? आम्ही दोघे काय जन्माला पुरणार आहोत का हिच्या? आजचं जग कसंय, माणसं कशी आहेत? एकटीने आयुष्य काढणं इतकं सोपं असतं का? देवा, हीला सुबुद्धी दे. आमचा दोघांचाही काही नेम नाही, आमचं काही बरं वाईट व्हायच्या आत आमच्या डोळ्यादेखत हीचं लग्न होऊ दे अशी प्रार्थना रोज त्या देवाजवळ करत होत्या. आणि ठरल्याप्रमाणे निलय संध्याकाळी आला. त्याच्याबद्दल जसं ऐकलं होतं तसाच तो होता. अतिशय सभ्य आणि मृदुभाषी. दादांच्या चेहर्यावरूनच माईंना त्यांची पसंती कळली. माईंनाही निलय अगदी आवडून गेला. -------समाप्त-------- |
|
मंजू कथाबीज चांगले आहे. पण अजून फुलवायला हवी होती. भराभरा सांगून टाकल्यासारखी वाटतेय.
छान गोष्ट
संघमित्राला अनुमोदन.
मंजु तु हापिसात बसुन लिहित असल्याने थोडी गडबड होते अस वाटतय.
घरी मस्तपैकी एका कागदावर आधी लिहित जा जस सुचेल तस आणि मग परत वाचुन सुधारणा करु शकतेस.
किंवा इथेच अप्रकाशित ठेवुन तुला व्यवस्थित वाटली की मगच प्रकशित करु शकतेस.तोपर्यंत तिथे संपादीत करु शकतेस.
राग मानु नकोस सुचनेबद्दल.
सन्मी आणि झकोबा........ सुचनांबद्दल अनेक धन्यवाद.
झक्या, अरे रागवेन कशाला? तुला खोटं वाटेल पण गेले १०-१२ दिवस ही कथा लिहित होते. ह्यावेळी एकदम शांतपणे लिहिली..... प्रयत्न करत रहायचं.. माझी पण सिक्सर बसेल कधीतरी..
गोड आहे.. अगदी विशफुल थिंकिंग!
मन्जू चांगलं लिहिलं आहेस.

.
सूनेचा पुनर्विवाह करून देणं- खूप मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. तो लघुकथेत मावणार नाही. याचीच दीर्घकथा लिहायचा विचार कर.
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
माझी पण सिक्सर बसेल कधीतरी..>>>>.
अरे हा कधीतरी फार लांब नाहिये
मंजूडे, वाचली होती कधीच कथा. आणि 'व्वा' गेलाही तेव्हाच. प्रतिक्रिया अत्ता लिहितेय.
सुंदर कथाबीज. मोजकी चार पात्र इतक्या थोडक्यात कसली सणसणीत उभी केलियेस. राहुन राहुन वाटतय की अजून लिहील तर....?
थोडे अधिक प्रसंग, काही अजून संवाद...
अजून फुलली असती गं. तुझ्याकडे ती ताकद आहे... तब्येतीत लिही. वाट बघत्ये पुढच्या कथेची.
मंजु, मस्त लिहिलीय ग. कथाबीज अतिशय सुंदर... फुलवण्याच्या बाबतीत इतरांशी सहमत.
सिक्सर लागणारच लवकर. एकामागोमाग चौकार लागताय ते काय कमी आहे
.
-प्रिन्सेस...
मंजूडी, आवडली गोष्ट. माझ्या मते थोडक्यात आणि सुटसुटीत झालीये. उगाच फापटपसारा नाहीये त्यामुळे छान वाटली. लिहित रहा.
मंजु छान लिहीलेस , लिहीत रहा , असेच चौकार मारत सिक्सर पण सहज होईल , आमच्या शुभेच्छा .