माझे हृदयधमनीरुंदीकरण

Submitted by नरेंद्र गोळे on 29 January, 2011 - 01:13

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहारविषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.

प्रस्तावना: ह्या रोगाची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. हे लेखन कुठल्याही पुस्तकाचे भाषांतर नाही. मौलिक आहे. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. ह्या लेखनाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. ह्या लेखनाचा आपल्या सार्‍यांच्याच आरोग्यस्थितीवर सकारात्मक, सत् प्रभाव पडू शकेल तेंव्हाच ते यशस्वी झाले असे समजता येईल.

हृदयधमनीरुंदीकरण

मीः डॉक्टर मला तुम्ही हृदयधमनीआलेखन (angiography) करण्यासाठी पाठवत आहात, पण मला हे सांगा, की ते माझे हृदयधमनीरुंदीकरण (angioplasty) तर करण्यासाठी मला भाग पाडणार नाहीत ना? (हा लोकांनी व्यक्त केलेल्या अनुभवावर आधारित भीतीचा व्यक्त परिणाम होता.)

डॉक्टरः मुळीच नाही. तुम्ही आधी हृदयधमनीआलेखन तर करून घ्या! मग जरूर वाटल्यास हृदयधमनीरुंदीकरण करू. तेव्हाही सगळ्या पर्यायांचा विचार करूनच आपल्याला निर्णय घेता येईल. (हा सारा दिलासा निव्वळ खोटा असतो. हे मला आता कळून चुकले आहे. एकदा हृदयधमनीआलेखन करण्यासाठी पाठवतात तेव्हा जमल्यास हृदयधमनीरुंदीकरण करण्याचाच बेत असतो. त्यावेळी मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. खरे तर एव्हाना ताणचाचणी झालेली आहे. हृदयधमनीविकाराचे निदान झालेले आहे. त्याची खात्री करण्यासाठी आणि मग हृदयधमनीरुंदीकरण करण्यासाठी मला पाठवलेले आहे. असो. मला हे सारे आता समजते आहे.)

त्यावेळी मग मला माझ्या एका मित्राची आठवण झाली, ज्याचे हृदयधमनीरुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच झालेले होते. मी लगेच तातडीने त्याची भेट घेतली.

मीः काय रे, मला हृदयधमनीआलेखन करवून घेण्याचा सल्ला दिलेला आहे. तसे ते करवून घ्यावे का? त्यात काय धोका असतो? त्यादरम्यान हृदयधमनीत अडथळा आढळून आल्यास ते लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगू शकतात का? सांगितल्यास तसे करावे का?

मित्रः अरे हो, हो, हो! किती प्रश्न विचारशील? हृदयधमनीआलेखन करवून घेण्याचा सल्ला दिलेला असल्यास अवश्य करवून घ्यावे कारण प्राथमिक निदान तर आधीच ताणचाचणीने झालेले आहे. तेव्हा संपूर्ण निदान करवून घेण्याशिवाय काहीही पर्याय नाही. त्यात धोका असा असतो की त्यादरम्यान हृदयधमनीत अडथळा आढळून आल्यास ते लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगू शकतात. तसे सांगितल्यास, व शक्य असल्यास तिथेच करवून घ्यावे कारण मी तसे न केल्यामुळे माझ्या दोन दिवसात दोन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

मीः त्या कशा?

मित्रः मलाही हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगतील अशी भीती होतीच. तसेच त्यांनी सांगितलेही. एकच अडथळा होता व तो हृदयधमनीरुंदीकरणाने काढून टाकता येण्यासारखा होता. मला आधीच लोकांनी सतर्क केलेले असल्यामुळे मी तिथेच हृदयधमनीरुंदीकरण करण्यास, स्पष्टच नकार दिला. मला दुसरा चांगला पर्याय सापडेल असा विश्वास वाटत होता. मात्र, त्यावेळी मी अतिदक्षताविभागात शल्यक्रियेच्या हानीतून सावरत होतो व बायकोला तो पर्याय शोधायचा होता. ती घाबरूनच गेली. मला आधीच एक हृदयविकाराचा झटका आलेला होता. दुसरा कधीही येईल अशी भीती तिच्या डोक्यावर टांगती होती. मुलगा लहान होता. अशा स्थितीत ती कुठे फिरली असती? तिला निकटवर्तीयांनी हृदयधमनीरुंदीकरण करवून घेऊन धोका आधी नष्ट करण्याचा सल्ला दिला. तो तिला पटला. मग तिने डॉक्टरांना कसेही करून लगेचच हृदयधमनीरुंदीकरण करवून घेण्याची गळ घातली. डॉक्टर म्हणाले की जर असे होते तर मग त्यावेळीच का करून घेतली नाही? आता दुसर्‍या जांघेतून दुसरी शल्यक्रिया करावी लागेल. खर्च येईल तो निराळा. आणि दुसरी शल्यक्रिया सहन करावी लागेल तीही निराळी. पण तिला पर्याय सापडला नाही आणि दुसर्‍या दिवशी, दुसर्‍या जांघेतून माझी दुसरी शल्यक्रिया झाली.

मीः पण मग मी काय करू? जर मलाही हृदयधमनीरुंदीकरण करण्यास सांगतील तर मी करून घेऊ का?

मित्रः हो! नाहीतर वेगळ्याने करावी लागल्यास दोन शल्यक्रिया आवश्यक ठरतात.

शल्यक्रियेचे दुःखः हृदयधमनीरुंदीकरण शल्यक्रियेनंतर माझा एक मित्र मला भेटायला आला. त्याने विचारले की शल्यक्रियेदरम्यान दुःख होते का? त्यावर खालील चर्चा झाली. मला वाटते की त्यात चर्चिल्या गेलेली माहिती प्रातिनिधीक आहे. कुणालाही सारखीच उपयोगी/निरुपयोगी. पण गरजवंतास संदर्भसाधन व्हावे म्हणून इथे लिहून ठेवत आहे.

मीः खरे तर दुःख असे फारसे होत नाही. कारण स्थानिक भूल दिलेली असल्याने काय करत आहेत ते दिसत राहते, प्रत्यक्षात आणि संगणकाच्या पडद्यावरही, मात्र दुःख असे होत नाही. (उजव्या अथवा डाव्या) जांघेतील धमनी त्वचेच्या अगदी जवळ असते. तिथे बाहेरून एक हृद्-नाल-शलाका (नाल-नलिका, शलाका- सळई, लवचिक सुई, नाल-शलका- पोकळ, लवचिक, लांबलचक सुईसारखी प्रवेशनळी जिच्यातून निरनिराळी आयुधे व औषधे हृदयधमनीत शिरवता येतात, catheter) प्रवेशनासाठी एक बंद तोटी धमनीत खुपसून घट्ट चिकटवून टाकतात. मग शरीराबाहेरूनच ती तोटी उघडून धमनीत हृद्-नाल-शलाका शिरवता येते. शल्यक्रिया ह्या तोटीतून आयुधे व औषधे धमनीत शिरवून साध्य केल्या जाते. शल्यक्रियेनंतर ही तोटी बाहेरून बंद करून ठेवतात. ह्या सर्व क्रिया करत असतांना जांघेस स्थानिक भूल दिलेली असते म्हणून शल्यक्रिया फारशी जाणवतही नाही.

जिच्याद्वारे शल्यक्रिया साधलेली असते ती तोटी आठ दहा तासांनंतर जेव्हा काढून टाकतात त्यावेळी मात्र, दुखते. खूप रक्तस्त्रावही होत असावा. आणि ती काढून टाकण्याची प्रक्रियाही फारच वैशिष्ट्यपूर्ण असते. स्थानिक भूलही दिलेली नसते. तोटी उपसून बाहेर काढतात. काढणारे निवासी डॉक्टर त्या छिद्रावर बाहेरून त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा, रक्तस्त्राव थांबेस्तोवर घट्ट दाबून धरतात. ही अवस्था फारच अवघडलेली असते. दहा-पंधरा मिनिटे चालते. नंतर रक्तस्त्राव थांबलेल्या त्या छिद्रावर बाहेरून मलम पट्टी करून वर अनेक तासपर्यंत जड वाळूची पिशवी ठेवतात. पुन्हा ते छिद्र उलगडून, रक्तस्त्राव होऊ नये म्हणून.

मित्रः मग ती पट्टी काढून टाकतांनाही पुन्हा रक्तस्त्राव होत असणार. नाही का?

मीः नाही. दुसर्‍या दिवशी घरी जाण्यासाठी सोडतात तेव्हा डॉक्टरच ती पट्टी काढून टाकून दुसरी लावून देतात. यावेळी मला तरी मुळीच रक्तस्त्राव झाला नाही.

पण माझ्यावेळी तोटी काढून टाकत असतांना, डॉक्टर अंगठा दाबून उभे होते. बहुधा रक्तस्त्राव थांबत नसावा. मला डोळ्यापुढे अंधेरी येऊ लागली. थंडी वाजू लागली. मी त्यांना तसे सांगितले. त्यांनी नर्सला, हाताच्या शिरेत कायम बसवून ठेवलेल्या पोकळ सुईच्या तोटीतून, कसलेसे औषध घालण्यास सांगितलेले मी स्पष्ट ऐकले. नंतर माझे भान हरपू लागले. नर्स आसपास नव्हती. तिला बोलावण्यासाठी ते बटण दाबणार होते. मात्र एकाएकी त्यांनी दोन्ही हातांनी माह्या मांडीवरील छिद्र दाबून धरल्याचे पाहून, मी त्यांना म्हणालो की 'थांबा मीच बटण दाबतो'. मग मी बटण दाबून नर्सला बोलावले. नर्सने हातातील पोकळ सुईमध्ये कसलेसे इंजेक्शन टोचले. मग माझे भान परत येऊ लागले. सारी प्रक्रिया तीस, चाळीस मिनिटे चालली असावी. मग मला वाजणारी थंडी कमी व्हावी म्हणून एक मोठा गरम हवेचा ब्लोअर चालू करून त्याचा नळा माझ्या पांघरुणात घुसवून ठेवलेला होता. त्यानंतर साधारण तीन चार तासांनी मला उब वाटू लागली.

मित्रः पण हृदयधमनीत विस्फारक (स्टेन्ट) बसवतांना दुखले की नाही?

मीः हृद-नाल-शलाका मांडीतील धमनीद्वारे हृदयाबाहेरील मुख्य रक्तनळ्या (aorta) पर्यंत आणि तिथून पुढे वळवत, वळवत ज्या हृदयधमनीत अडथळा सापडलेला असेल त्या धमनीत अडथळ्यापर्यंत सरकवत नेतात. शलाका आत घुसवत असतांना, ती सारत असल्याचे आपल्याला प्रत्यक्षच दिसत असते. ती आतमध्ये वळावी ह्यासाठी बाहेरील मांडीजवळचे टोक गोल फिरवत असावेत. अडथळ्याचे जागेवर पोहोचताच तिच्या बाह्य भागावर चढवलेला एक फुगा हवा भरून फुगवू लागतात. माझ्या शल्यक्रियेच्या वेळी ह्या फुगवण्यासाठी वातावरणाच्या सतरापट दाब वापरलेला होता. त्या फुग्यावर विस्फारकही चढवलेला असतो. तो पण फुगू लागतो. त्यावेळी धमनीतील अडथळा आतून फुगवत, फुगवत रुंदावत असतांना मात्र छातीत त्या जागी किंचित दुखू लागले. 'डॉक्टर छातीत दुखताय हो' एवढे म्हणण्याचा आतच ते दुःख थांबलेलेही होते.

नंतर जेव्हा फुग्यातील हवा उतरवून तो पूर्वस्थितीत आणतात, तेव्हा विस्फारक मात्र परत येत नाही कारण तो लवचिक नसतो आणि सतरापट वातावरणीय दाबाखाली विस्फारलेला धातूचा विस्फारक पूर्वपदावर आणण्याचे त्राण हृदयधमनीच्या स्नायूमध्ये नसते. हृद-नाल-शलाका मग खेचून बाहेर काढतात, तोटी बंद करून ठेवतात आणि हृदयधमनीरुंदीकरणाची शल्यक्रिया पूर्ण होते. (माझ्या डाव्या, पुढे उतरत्या हृदयधमनीत, LAD-Left Anterior Descending Artery, १६ मिलीमीटर लांब आणि २.२५ मिलीमीटर व्यासाची नलिकासदृश, कलंकहीन पोलादाची औषधलिंपीत जाळी, विस्फारक म्हणून बसविण्यात आली होती.

शस्त्रक्रियेनंतरचा पहिला दिवस: ताणचाचणी सकारात्मक आली. ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे सांगण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला. ते केल्या गेले. डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत एकच अडथळा होता. ७० टक्के धमनीला व्यापून टाकणारा. तो त्याच शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांची ख्याती एवढी जबर होती की मला आणि नातेवाईकांना वेगळा विचार करण्याची आवश्यकताच वाटली नाही. त्यांचा सल्ला मानून तो अडथळा लगेच काढून टाकण्यात आला. तिथे कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमीटर लांबीचा व २.२५ मिलीमीटर व्यासाचा, औषधवेष्टित विस्फारकही बसविण्यात आला. एका दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले.

मग मला हे कळले की हृदयधमनी रुंदीकरण झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. त्यानंतर समजले की ती औषधे रु.७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.

यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे वाढवून द्यावी लागतील.

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच, कधीच, काहीही वाईट केलेले सोडाच पण चिंतिलेलेही नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक (stent), गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.

त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरशः निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालविले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरविली. ही खरोखरीच साध्य आहेत का, हे मला माहीत नव्हते.

लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवित. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त वेळ कुठून आणू?), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे?), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो, मग तर मला हृदयविकार होऊच नये!), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे?), संतापू नका (लोक संताप आणतात!), आराम करा (आणि माझी कामे कोण तुम्ही करणार?), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.

माझ्या याआधीच्या दिनःचर्येत मला ते सारे साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती उद्भवली ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला माझा आहार ह्या सार्‍यांच्या उपस्थितीत मी त्यांच्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद असत, नातेवाईक असत. त्याना माझ्या आरोग्याबाबत वाटणारी काळजी खरी असे. हेतू प्रामाणिक असल्याचीही माझी खात्री असे. ते सांगत असलेल्या उपायांनी, लोक बरे होत असल्याचे दाखलेही ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खर्‍या प्रश्नाची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता. मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना!

प्रतिबंधक हृदयोपचारशाखा: तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा 'अधिक्षेपक हृदयोपचारशाखा (इन्व्हेझिव कार्डिओलॉजी)' म्हणून ओळखल्या जाते. वाढलेल्या रक्तदाबावर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाबनियंत्रक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यावर रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास विद्युत हृदयालेखन, ताणचाचणी आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवतात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यास हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

ह्या शाखेच्या मान्यतेनुसार हृदयधमनीविकार प्रगतीशील असतो. तो वयानुसार वाढतच जातो. औषधे व शस्त्रक्रियांच्या आधारे तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात न राहिल्यास जास्त औषधे व आणखी शस्त्रक्रिया यांद्वारेच इलाज केल्या जातो. माझी उपाययोजनाही ह्याच वाटेवर वाटचाल करीत होती. म्हणून मी ह्या वाटेवर माझ्याआधीच गेलेल्या चारपाच स्नेह्यांना भेटलो. त्यांच्या कहाण्या सविस्तर ऐकल्या. मला अनेक हृदयधमनी रुंदीकरणे व उल्लंघन शस्त्रक्रिया झालेले लोक भेटले. आपण आता पुन्हा कधीच पूर्णतः बरे होणार नाही असे मला वाटू लागले. आपली औषधे कधीच पूर्णपणे सुटणार नाहीत असेही वाटे.

बराच शोध घेतल्यावर मला 'प्रतिबंधक हृदयोपचार शाखे (प्रिव्हेंटीव्ह कार्डिओलॉजी)' बाबत माहिती कळली. तिच्याद्वारे मला माझ्या उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकेल असा आशेचा किरण दिसला. प्रतिबंधक हृदयोपचार शाखा त्यामानाने नवोदित आहे. ह्या शाखेत औषधे आणि शस्त्रक्रियेविना हृदयविकार माघारी परतवता येतो अशी मान्यता आहे. हे मला समजताच, मला ह्या निव्वळ पोकळ बढाया वाटू लागल्या. मी विचारले की "डॉक्टर मला तुम्ही औषधे पूर्णपणे थांबलेली आहेत असा एखादा हृदयरुग्ण दाखवू शकाल का? ज्याला हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेचा उपाय सुचविण्यात आलेला आहे अशा रुग्णास, तुम्ही त्या शस्त्रक्रिया न करता बरे करू शकता का? तसे काही बरे झालेले रुग्ण तुम्ही दाखवू शकाल का?" अनपेक्षितरीत्या ह्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली. प्रत्यक्षात तशी काही उदाहरणे पाहिली आणि मग मी प्रतिबंधक हृदयोपचार करवून घेण्याचा निर्णय घेतला.

हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार): जरी माझी हृदयधमनी शस्त्रक्रिया होऊन माझ्यावरील हृदयाघाताचा धोका टळलेला होता तरी चढेल रक्तदाब (१३०/९० ते १४०/१००) आणि वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी (१९२) यांचा सामना मला करायचा होता. आणि भविष्यात औषधविरहित, विना शस्त्रक्रियाहस्तक्षेप, आरोग्यपूर्ण आयुष्य मला जगण्याची इच्छा होती. म्हणून, प्रतिबंधक हृदयोपचाराबद्दल मनात विश्वास निर्माण झाल्यावर मी हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार) मध्ये सहभागी झालो. मला सांगण्यात आले की आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन या सर्वांचा यथोचित आधार घेऊन सर्वंकष जीवनशैली परिवर्तन घडवता येते. त्या व्रताचे कठोर पालन केल्यास तीन महिन्यांच्या 'हृदयपुकार' ने हे साध्य दृष्टीपथात येऊ शकते.

तिथे योगावर्ग सुरूच होता. मी त्यात रुजू झालो. प्रशिक्षक म्हणाल्या डोळे मिटा. आणि काय नवल, माझे डोळेच मिटेनात. अत्यंत प्रयत्नांनी डोळे मिटल्यावरही, सारखे ते किलकिले करून बाहेर काय चाललेले आहे ते पाहण्याची इच्छा अनिवार होई. साधे डोळे मिटून घेणे एवढे अवघड असेल असे मला कधीच वाटले नव्हते. मग मी पापण्यांचे पडदे बळे बळेच ओढून डोळे मिटायला शिकलो. पण ते पुरेसे नव्हते. त्या म्हणत डोळे 'अर्धोन्मिलित' असावेत. म्हणजे ते मिटण्यासाठी पापण्यांची ओढगस्त त्यांना मंजूर नव्हती. मात्र, अर्धोन्मिलित डोळ्यांनी योग्साधना करणे मला तीन महिन्यांच्या प्रयासाने सहज जमू लागले. माझ्यासोबत आणखीही लोक होते. एकदोघांचे भ्रमणध्वनी वाजत असत. त्या म्हणायच्या योग साधनेसाठी बसतांना भ्रमणध्वनी, घड्याळे वगैरे तर आणूच नयेत पण डोळे मिटून घेण्याचे कारणही नीट समजून घ्यावे -ते म्हणजे योगसाधनेत कुठलेली दुसरे व्यवधान नसावे. त्या म्हणायच्या, जरी आपल्याला काही मिनिटेच योगसाधना करायची असेल तरी, सार्‍या जगातील सारा वेळ आपल्याला योगसाधनेसाठी उपलब्ध आहे असे समजावे, म्हणजे मन सहज स्थिर होऊ शकते.

प्रार्थनेदरम्यान डोळे मिटून घेऊन, पावलांचे अंगठे जुळवून ताठ उभे राहणे किती कठीण आहे हेही मला तेव्हाच कळले. सवय नसेल तर तोल जातो. हळूहळू सवयीने मला ते साधले. समोर छातीशी हात जोडून आपण नमस्कार करतो तसा पाठीशी हात जुळवून नमस्कार केल्यास हातांच्या मोठ्या स्नायुंना कार्यरत राखण्यास मदत होते हेही मला तेव्हाच कळले. टाचांवर चालणे, पौच्यांवर चालणे, पर्वतासन, उभे राहून समोर हात जमिनीला समांतर धरून पाय ताठ ठेवत कमरेत वाकवत हातास टेकवणे इत्यादी लवचिकतेसाठीचे व्यायाम मी तिथे शिकलो.

बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायुंना कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. ४०-६० मिनिटे जलद चालणेही किमान स्वस्थतेसाठी आवश्यक असते. श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विवक्षित आहार निष्ठेने अंमलात आणायला हवा हे मला सहजच पटले. मात्र तणाव व्यवस्थापन, शिथिलीकरण आणि मनोव्यवस्थापन म्हणजे काय ते समजून येण्यास बराच काळ जावा लागला. सुरुवातीला तर ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण असल्या भाकड उपायांमध्ये मी हकनाकच गुंतत चाललो आहे असे मला वाटत असे.

सम्यक जीवनशैली परिवर्तन: सम्यक जीवनशैली परिवर्तन म्हणजे काय? तर आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन यांची व्यवस्थित योजनापूर्वक आखणी करून त्यानुसार आरोग्यहितकर जीवन जगल्यास विकार/विकृती दूर होऊन निसर्गनियमित/प्राकृत स्वस्थ आयुष्य घडू लागते.

१. आहारः कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विवक्षित आहार निष्ठेने अंमलात आणायला हवा. तसा आहार मला सुचविण्यातही आला. मात्र, मला सुचविलेल्या आहाराचे माझे आवडते वर्णन आहेः निष्तेल, निष्तुप, निर्दही, निर्साखर आणि निर्मिठ. हा असला शाप मिळाल्यानंतर मी आपोआपच उःशाप शोधू लागलो. मग समजले की दिवसाला २ चमचे (दहा ग्रॅम) तेल/तुप, तेवढीच साखर आणि तितपतच मिठ घेतलेले चालू शकेल. सुरूवातीला काही दिवस, मी जो जो आहार (जेवण, नाश्ता, चहापाणी, च्याऊम्याऊ वगैरे सर्व) त्यापूर्वी घेत असे तो लिहून ठेऊन त्याची चिकित्सा करून काय ठेवावे, काय सोडावे हे ठरविण्यात आले.

२. विहारः ४०-६० मिनिटे जलद चालणेही किमान स्वस्थतेसाठी आवश्यक असते. मग दोन तास किंवा त्याहूनही जास्त का चालू नये? तर चालल्यामुळे जेवढा अतिरिक्त आयुष्यलाभ होतो तो जेवढा वेळ आपण चालत असतो त्याचे एवढाच असतो. म्हणून त्याहून जास्त चालून अतिरिक्त फायदा होत नाही. चालल्यामुळे एरव्हीही दिवसभर ऊर्जस्वल वाटत राहते म्हणूनच चालावे. मात्र ३० मिनिटांहूनही कमी चालल्यास, शरीरास चालण्याचा लाभ होण्यास सुरूवात होते तोपर्यंत तुम्ही ते बंद करू लागत असता म्हणून चालूनही फायदा होत नाही.

३. व्यायामः बैठ्या जीवनशैलीमुळे आखडलेल्या स्नायुंना मोकळे करण्यासाठी /कार्यरत राखण्यासाठी लवचिकतेसाठीचे व्यायाम दिवसातून १०-२० मिनिटे तरी करणे आवश्यक असते. बैठी आसने (खुर्चीवर, दिवाणावर, पलंगावर) घालून तासंतास बसणार्‍यांनी वारंवार आसन मोडून थोडेसे चालून घ्यावे. एकाच स्थितीत अवघडून राहणे टाळावे. कमी करता येईल तेवढे कमी करावे. शरीराचे किमान मोठे स्नायू (हात, पाय वगैरे) दिवसातून एकदा तरी त्यांच्या संपूर्ण क्षमतेने ताणले जायला हवे असतात. तरच ते शाबूत राहतात. माणसाला पूर्वी शेपूट होती. ती न वापरल्याने नष्ट झाली असे म्हणतात. तेव्हा जे अवयव वापरात राहत नाहीत ते नष्ट होण्याची भीती असतेच. 'वापरा अथवा गमवा' (use it or loose it).

४. प्राणायामः श्वसनशक्ती वाढविण्यासाठी १० मिनिटे तरी प्राणायाम करायलाच हवा. कपालभाती, उदरश्वसन आणि अनुलोमविलोम यांचा उपयोग सर्वाधिक होतो. खरे तर श्वसन कायमच चालू असते. पण आपण फारच थोड्या श्वसनशक्तीचा उपयोग करत असतो. तेव्हा नेहमीच दीर्घश्वसन करावे. संथ श्वसन करावे. योगासने आणि प्राणायाम यांना मिळून 'योगसाधना' असेही म्हणातात. त्याचा उपयोग आरोग्यसाधनेत अपार आहे.

५. शिथिलीकरणः हे शिथिलीकरण शारीरिक ताणांसाठी जरूर असते. आपण दिवसातला बराचसा काळ कशाच्या तरी प्रतीक्षेत, अवघडत बसून उभे राहून वा थांबून घालवत असतो. ह्या काळात आपण निरनिराळे शारीरिक तणाव गोळा करत असतो. सुखासन, शवासन ही आसने दररोज करावीतच. एरव्हीही हातपाय ताणणे, फिरविणे, त्यातील ताण मोकळे करणे हे करतच राहावे. त्यामुळे ते ताण वेळीच निरस्त होऊ शकतात.

६. तणाव व्यवस्थापनः आपल्यासोबत कायमच मानसिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ गडबड, प्रदूषण ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' (fight or light) स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र सार्‍याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही. तेव्हा एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरित घेणे ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते.

७. मनोव्यवस्थापनः मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात.

ह्या सात कलमी कार्यक्रमाचा आपण तपशीलवार उहापोह करणारच आहोत.

माझे यापूर्वीच मायबोलीवर प्रकाशित झालेले "जीवनशैली परिवर्तने" या विषयाशी संबंधित लेख खाली दिलेले आहेत.

http://www.maayboli.com/node/23013 हृदयविकार का होतो?
http://www.maayboli.com/node/21579 एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
http://www.maayboli.com/node/12307 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-४
http://www.maayboli.com/node/12306 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-३
http://www.maayboli.com/node/12291 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-२
http://www.maayboli.com/node/12263 पातंजल योगसूत्रे व भाष्ये-१
http://www.maayboli.com/node/12231 हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके
http://www.maayboli.com/node/11009 आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष
http://www.maayboli.com/node/12061 हृदयधमनी रुंदीकरण
http://www.maayboli.com/node/10982 आंतरिक शक्तीचा शोध

याशिवाय,
http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप महत्वाचा आणि उपयुक्त लेख आहे. स्वानुभवाची धार असल्याने त्यात जान आली आहे. पण तो एव्हड्या क्लिष्ट मराठित (संस्कृतप्रचुर मराठित) का आहे?

खुप उपयुक्त आणि धीर देणारी माहिती. खरे तर या अनुभवाचे शब्दांकन करणे कठीण असते, त्या आठवणी पण नकोशा असतत.

अप्रतिम लेख आहे नरेंद्रजी. माझ्या मते याहून सोप्या मराठीत प्रचलित वैद्यकीय संज्ञांचे मराठीकरण होवू शकत नाही. Happy

Narendra Sir,

my relative undergone various tests. 2DEcho and other tests are normal, but stress test come out positive. Dr. recommanded early CAG.

CAG is invasive test, but now there is new test comming up CT coronary angiography which is non-invasive.
Any more information about non-invasive test will be helpful.

Also for CAG test is Sahyadri hospital pune is good option? please suggest
Thanks

माझ्या वडिलांच्या बाबत आलेला अनुभव खूपच बोलका आहे.
बरेच वर्ष मधुमेह असल्यामुळे periodic check up होतच होता.
एकदा ते सज्जनगड वगैरे फिरुन दुसर्या दिवशी चेक अप ला गेला. थोडा थकवा वाटत होता ईतकेच...
जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांना ईसीजी abnormal असल्याचे सांगून लगेच ICU मध्ये admit होण्यास सांगितले. बाबा एकटेच गेले होते. मग डॉक्टर म्हणाले घरी जाऊन कोणालातरी घेऊन या. बाबा घरी येऊन आईला घेऊन गेले. दोघे खूपच घाबरून गेले.दुसर्या दिवशी त्यांना ambulance ने जहांगिर ला नेण्यात आले angiography साठी..आणि अर्थातच plasty लगेच करून घेण्यास सुचविण्यात आले.

यात मुळात बाबांना फारसे काहीच होत नव्हते..त्यामुळे आम्ही खंबीर राहिलो आणि second opinion घेण्याचे ठरविले. meanwhile netsurfing करताना पूना हॉस्पिटलमधील 'Reversal of heart disease' बद्द्ल कळाले. बाबांनी तो कोर्स केला सहा महिन्यांचा. आता घरी योगासने प्राणायाम करतात. या गोष्टीला आता नऊ वर्षे झाली. बाबांना हार्ट्चा काही त्रास नाही.

आम्ही शिकलेल्या गोष्टी :

१. जीवनशैली बदलणे महत्त्वाचे....नरेन्द्र गोळे यांनी म्हट्ल्याप्रमाणे..
२. डॉ़क्टर पारखून घ्यावा. family doctor चा सल्ला घ्यावां. नुसत्या graphy आणि hospitalisation पायी आमचे दीड दोन लाख गेले.. मनस्ताप वेगळा...

आपला लेख फारच उद्भोदक आहे...धन्यवाद.

श्रीयुत नरेंद्र गोळेजी,
आपला माहितीपूर्ण लेख वाचला.
दोन गोष्टी सुचवाव्याशा वाटतात,
१. मराठी प्रतिशब्द वापरण्याचा प्रयत्न प्रशंसनीय जरूर आहे पण भाषांतरित इंग्रजी शब्दांची सूची दिली असती तर लेख आणखी चांगल्याप्रकारे समजण्यास मदत झाली असती. बर्याच वेळा काही इंग्रजी शब्द इतके जास्त वापरलेले व रुळलेले असतात की त्यासाठी अवजड मराठी प्रतिशब्द वापरणे योग्य वाटत नाही.

२. लेखाचिंत्रांचा वापर केल्यास बरे झाले असते

तसेच आपण आहाराविषयी अतिशय त्रोटक विवेचन केले आहे. काय टाळावे या पेक्षा काय खावे यावर भर असावा. आपल्या आहारामध्ये कर्बोदकांचा अतिवापर हे हृदय विकाराचे मुख्य कारण आहे. आपण दैनदिन आहारामध्ये कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट चा उपयोग खूप कमी केला (रोज ५० ग्राम ) आणि प्रथिनांचा उपयोग वाढवला तर शरीर एनर्जी ( शक्ती ) निर्माण करण्यासाठी ( चयापचय / मेटाबोलिझम ) कर्बोदकांऐवजी स्निग्ध पदार्थांचा ( फ्यट ) वापर करील व अवयवांमधील चरबी विरघळेल. ( lipid detoxification ) माझ्या मते असा आहार-उपचार हृदयरोग प्रतिबंध व उपचार या दोन्हीकरता अतिशय महत्वाचा आहे.

आपण वैद्यकीय व्यावसायिक नसूनदेखील या विषयात इतका रस घेतलेला पाहून आपले मनःपूर्वक अभिनंदन.

ह्या लेखावरील प्रतिसादांचा समाचार घेण्याकरता मला एवढा वेळ का लागला हे मला सांगता येणार नाही. मात्र जेव्हा जाग आली तीच वेळ सूर्योदय झाल्याची समजायला हवी. असो.

मुग्धानंद, नितिनचंद्र, दिनेशदा, डॉ.कैलास, सचिन१८, गीता, विणा आणि डॉक्टर शिंदे साहेब आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.

मुग्धानंद,
कदाचित तुम्ही पहिल्यांदा तेच शब्द इंग्रजीत ऐकलेत तेव्हाही तुम्हाला क्लिष्टच वाटले असतील. आठवून पाहा.

सचिन१८,
पुण्यातील कुठले शुश्रुषालय चांगले ते संभवतः डॉक्टर शिंदे साहेबच आपल्या सगळ्यांना सांगू शकतील.
माधवबागही प्रतिबंधक हृदयोपचार पुरवते ही गोष्ट खरी आहे.

वीणाजी,
आपल्यासारख्यांच्या प्रतिसादांवरच मी मराठीच्या भाषाविज्ञान-विकासार्थ कटिबद्ध आहे.

डॉक्टर शिंदे साहेब,

भाषांतरित इंग्रजी शब्दांची सूची दिली असती तर लेख आणखी चांगल्याप्रकारे समजण्यास मदत झाली असती. >>>
इथेच अशी मागणी वारंवार होत गेल्याने http://shabdaparyay.blogspot.in/ ह्या स्वतंत्र अनुदिनीवर असंख्य पर्यायी शब्द गोळा करून ठेवले आहेत. जेव्हा हे लेख लिहिले तेव्हा मी ह्या विषयांना नवीन होतो. हल्ली मी कंसात मूळ इंग्रजी शब्द देण्यास अग्रक्रम देत असतो.

बर्याच वेळा काही इंग्रजी शब्द इतके जास्त वापरलेले व रुळलेले असतात की त्यासाठी अवजड मराठी प्रतिशब्द वापरणे योग्य वाटत नाही. >>>
आपण म्हणता ते खरे आहे. टेबल, पंप, इलेक्ट्रॉनिक्स ह्यांना प्रतिशब्दच नाही अशीही दुरावस्था मराठीची झालेली होतीच की. पण मेज, क्षेपक, विजकविद्या हे शब्द पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याचे समजल्याने आपणच मराठी शिक्षणात कुठे कमी पडतो की काय असे वाटू लागले. आणि तसेही हृदयधमनीरुंदीकरण हे अँजिओप्लास्टीपेक्षा नक्कीच सोपे सहज आणि अर्थपूर्ण वाटेल. नाही का? आपण काय म्हणता?

लेखाचिंत्रांचा वापर केल्यास बरे झाले असते >>>
हे लेख मुळात मनोगत डॉट कॉम वर लिहिले गेले होते. तिथे त्या काळी चित्रे दाखल करण्याची सोय नसे. हेच खरे कारण आहे. माझ्याच नंतर नंतरच्या लेखांत विपुल चित्रेही दाखल केलेली आढळतील.

तसेच आपण आहाराविषयी अतिशय त्रोटक विवेचन केले आहे. काय टाळावे या पेक्षा काय खावे यावर भर असावा. >>>
सत्यवचन! ह्याकरताच आहाराने रोग हरा हा लेख पुढे लिहिलेला आहे. http://aarogyasvasthata.blogspot.in/2011/01/blog-post_30.html#links

आपल्या आहारामध्ये कर्बोदकांचा अतिवापर हे हृदय विकाराचे मुख्य कारण आहे. आपण दैनदिन आहारामध्ये कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट चा उपयोग खूप कमी केला (रोज ५० ग्राम ) आणि प्रथिनांचा उपयोग वाढवला तर शरीर एनर्जी ( शक्ती ) निर्माण करण्यासाठी ( चयापचय / मेटाबोलिझम ) कर्बोदकांऐवजी स्निग्ध पदार्थांचा ( फ्यट ) वापर करील व अवयवांमधील चरबी विरघळेल. ( lipid detoxification ) माझ्या मते असा आहार-उपचार हृदयरोग प्रतिबंध व उपचार या दोन्हीकरता अतिशय महत्वाचा आहे.>>>>
डॉक्टर आपला हा सल्ला अतिशय मोलाचा आहे. पण योग्य वेळी मोलाचे नेमके सल्ले मिळत नाही हो!
त्यावेळी तुम्ही कुठे होतात मला खरोखरीच माहीत नव्हते. आताच्या वाचकांना वेळीच सुधारण्यास हे आता उपयुक्त ठरेल.