रत्ननगरी रत्नागिरीच्या या तिसर्या भागात आपण भेट देणार आहोत ते गणपतीपुळे येथील "प्राचीन कोकण" या अनोख्या म्युझियमला.
=================================================
=================================================
"गणपतीपुळे" कोकण किनारपट्टीवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेले जागृत व स्वयंभु श्री गणेश मंदिर. कोकणातील ३००-४०० वर्षाची परंपरा असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. भारतातील अष्टद्वारदेवतांपैकी हि
पश्चिमद्वार देवता. समोर क्षितीजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू, सभोवतीचा हिरवा निसर्ग आणि त्यावर कळस म्हणजे गुलाबी रंगातील सुंदर गणेश मंदिर. अशी रंगांची मुक्तहस्ते उधळण असलेला हा परिसर मला नेहमीच आकर्षित करत असे. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला "प्राचीन कोकण-५०० वर्षापूर्वीचे कोकण" हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत जाताच संस्थेच्या मार्गदर्शकाकडून तांब्याच्या पेल्यातुन थंडगार आणि गोड पाणी देऊन आपले स्वागत होते. प्रत्येकी १५ रुपये इतके नाममात्र शुल्क (कॅमेर्यासाठी रूपये १०/- जादा) देऊन आपण गाव पहायला सज्ज होतो. गावात प्रवेशद्वाराशीच एक सुंदर सजवलेली बैलगाडी आपले स्वागत करते. समोरच एक निवांत कोकणी माणुस आपले पारंपारीक वाद्य वाजवत बसलेला दिसतो. यावरूनच आतील गावाची आपल्याला कल्पना येते.
सजवलेली बैलगाडीनिवांत बसलेला कोकणी माणूस
गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक गुहा लागते. या गुहेच्या आधी फळांनी भरलेली एक टोपलीही दिसते. हि गुहा म्हणजे काळाचे प्रतिक असून आपण वर्तमानकाळातून भुतकाळात प्रवेश करतो. प्रकल्पाची
संपूर्ण माहिती देण्याकरीता संस्थेचे मार्गदर्शक आपल्या सोबत असतात. गावात आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो.
काळाची गुहाफळांनी भरलेली टोपली
गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ते "वाघजाई" या ग्रामदेवतेचे मंदिर. वाघजाई देवीबद्दल माहिती देतान सांगीतले कि, ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध मानला जातो. पूर्वीचा कोकण असाच समृद्ध होता. आपल्या पुर्वजांनी निसर्गाला देवत्व बहाल केल्याने ग्रामदेवतेचे नावहि निसर्गाशी संबंधित आहे. ग्रामदेवतेचे मंदिराजवळच कोकणचे जनक श्री परशुराम यांची प्रतिकृती आहे. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपण गावात फेरफटका मारण्यासाठी निघतो. पूर्वीच्या बारा बलुतेदार पद्धतीवर आधारलेल्या या गावात आपल्याला प्रथम भेटतो तो एक बलुतेदार - नाभिक. या नाभिकाबद्दल लोकसाहित्यातील एक मजेशीर वर्णन आम्हाला सांगीतले ते असे कि गावातली प्रत्येक गोष्ट हि नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट हि गावभर होते तेव्हा तुम्ही गाव बघायला आला हि गोष्ट ज्याअर्थी नाभिकाला समजली त्याअर्थी ती सगळ्या गावाला समजेल.
ग्रामदेवता – वाघजाईभगवान श्री परशुराम
नाभिक
प्रथेप्रमाणे सर्वांत आधी आपण जातो ते खोताच्या घरात. अंगणातच सुपारी कातरत बसलेले खोत आपल्याला दिसतात. माजघरात खोताची बायको उभी आहे. कोकणी स्त्रिया शूर व सुंदर होत्या पण त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठा हि त्यांच्या साठी मर्यादा होती. पडवीत खोतांची दोन मुले परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. खोताच्या घराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. खोताच्या घरातून आपण जातो ते एका शेतकर्याच्या घराकडे. पूर्वी बारा बलुतेदार, राजे यांना धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करायचा. शेतकऱ्याच्या घराशेजारीच गोठा आहे. त्याची सर्व अवजारे जसे, नांगर, इरलं, मासे पकडायची खोयणी, कणगी आपल्याला येथे पहायला मिळतात.
खोताचे घरसोंगट्या खेळत बसलेली खोताची मुले
अशा प्रकारे गावात फेरफटका मारताना आपल्याला एक एक बलुतेदार भेटत जातो. गणपती सणाला लाल मातीचे गणपती, मातीची भांडी बनविणारा कुंभार, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी बनविणारा सुतार,
पाण्यात जाळे टाकून मासे पकडणारा कोळी, तेलाच्या घाण्यावरून तेल काढणारा तेली, चर्मकार, माडीवाला, बागकाम करणारा माणूस, गारूडी, दरवेशी, वाणी, धनगर, कडकलक्ष्मी यांना भेट देत देत आपण पोहचतो ते पाणवठयावर. उंचावरून पडणारे पाणी, मातीचा बांध, पाणी भरणार्या कोकणी स्त्रिया हा सर्व देखावा सुंदर आहे. गावात सर्वात जो उंच पाणवठा असे तेथे बंधारे बांधून ते पाणी प्रत्येक घराकडे नेले जाते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव असे ठिकाण कि जेथे सगळेजण एकत्र येत असे.
पाणवठ्यावर पाणी भरत असलेली कोकणी स्त्रीबागकामात व्यस्त असलेला कोकणी माणूस
कडकलक्ष्मी
चर्मकार
वाणी
सुतार
कुंभार
सुप, टोपल्या बनविणारी कोकणी स्त्री
कासार
कोळी
प्रत्येक समाजाची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती असते. कोकणी खाद्यसंस्कृती चवीष्ट आहे. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. कोकणी माणसांच्या याच संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू तांदुळ काढण्याचे घिरटं, जातं, कोकणी कूकर म्हणजेच मोदकपात्र, परात येथे पाहवयास मिळतात.
पूर्वापार चालत आलेली कोकणी भांडीपूर्वापार चालत आलेली कोकणी भांडी
कोकणातील मुख्य सण "गौरी–गणपती"
घरकामात व्यस्त असलेली कोकणी स्त्री आणि शेजारी खेळत असलेली लहान मुलगी
शिकार करणारा कोकणी
शिकार करून घरी परतताना
माडीवाला
दरवेशी
धनगर
गारूडी
विहिर
साकव
यानंतर आपण पोहचतो ते सगळ्यात उंच भागात. येथे ३० ते ३५ फुट उंच मचाण बांधलेला आहे. त्यावरून आजुबाजुचे विहंगम दृष्य दिसते. गणपतीपुळ्याचा निळाशार समुद्र, गावातील नारळीपोफळीच्या बागा, खारफुटीचे जंगल खुपच नयनरम्य दिसते.
मचाण
मचाणाच्या समोरच दशावतारात वापरले जाणारे मुखवटे टांगुन ठेवले आहेत. ते तुम्ही स्वतःच्या चेहर्यावर लावू शकतात.
दशावतारी मुखवटेमुखवटे लावून आमचा हा "दशावताराचा" प्रयोग
कोकणात आढळणार्या निरनिराळ्या जातींच्या सापांचे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आपणास बघावयास मिळते. तसेच विविध दुर्मिळ पक्ष्यांचे संग्रहालय सुद्धा आहे. गावात फेरफटका मारून तुम्ही दमलात आणि भुक लागली असेल तर इथले "आतिथ्य" रेस्टॉरंट तुमच्या स्वागताला तयार आहे. खास कोकणी पदार्थ म्हणजेच भाजणीचे गरमागरम थालिपीठ, उकडीचे मोदक, फणसाचे सांजण, कोकम/आवळा सरबत यावर यथेच्छ ताव मारता येतो. जर तुम्हाला येथे काही खरेदी करावयाची असेल तर कोकण टुरीझमच्या हस्तकला केंद्रात अनेक गोष्टी आपणास पहायला आणि खरेदी करायला मिळतात. या संस्थेने केवळ ५०० वर्षापूर्वीच्या कोकणसंस्कृतीचे दर्शन देणारे केवळ खेडेच नाही उभारले तर कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्नही चालवला आहे.
अशा या प्राचीन कोकणीसंस्कृतीचे दर्शन घेत आपण गावच्या वेशीपर्यंत पोहचतो. गावच्या वेशीवर शेंदुर फासून देव ठेवला आहे आणि हाच देव गावचा राखणदार मानला जातो. कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहेत ती जेव्हा गावच्या बाहेर जातात तेव्हा या राखणदाराला नमस्कार करून जातात. या सर्व सफरीमध्ये आपणही या खेड्याचा एक भाग होऊन जातो आणि आपल्या नकळतच आपण या देवाला नमस्कार करून या गावाचा निरोप घेतो.
गावचा राखणदारजायचे कसेः
१. मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीला येण्यापूर्वी १५ किमी वर निवळी येथे गणपतीपुळयाकडे जाणार्या रस्त्याचा फाटा फुटतो तेथून सुमारे ३५ किमी अंतरावर गणपतीपुळे आणि गणपतीपुळयाहून १ किमी अंतरावर आहे प्राचीन कोकण. मुंबई - रत्नागिरी हे अंतर ३७५ किमी
२. रत्नागिरीहून हातखंबामार्गे गणपतीपुळे हे अंतर ४८ किमी असून नेवरे मार्गे हेच अंतर फक्त २९ किमी एवढेच आहे. गणपतीपुळयाहून १ किमी अंतरावर आहे प्राचीन कोकण.
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१)
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045
रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073
या आधी सुद्धा, मोबाईल
या आधी सुद्धा, मोबाईल कॅमेर्याच्या क्लिक्स मधून पाहिलं होतं हे म्युझिअम. पण "तेरे क्लिक्स कि बात हि कुछ और है.. म्युझियम कि खासीयत आज कल तेरे क्लिक्स से बयां होने लगी है'
निवडक १० मधे.
ए, सहीच आहे रे हे म्युझियम.
ए, सहीच आहे रे हे म्युझियम.
खुप जबरद्स्त
खुप जबरद्स्त
कसं बघायचं राहिलं कोकणात असून
कसं बघायचं राहिलं कोकणात असून ! आता जायलाच हवं. छानच प्र्.चि.
[ एक सुधारणा सुचवू का ? बैलगाडीनतरच्या प्र्.चि.त दाखवलेला कोकणी माणूस गुडगुडी [ स्थानिक हुक्का] ओढतोय; चुकून ते वाद्य असल्याच लिहीलं गेलंय, असं वाटतं.]
सुकि, योडी, कमलेश, भाऊ
सुकि, योडी, कमलेश, भाऊ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
भाऊ, धन्यवाद चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल. बदल केला आहे.
योग्या... पहिल्या चित्रातला
योग्या... पहिल्या चित्रातला माणूस कोणते वाद्य वाजवतोय रे.... सरळ सरळ हुक्का पिताना दिसतोय की तो...
मस्त रे योग्या.
मस्त रे योग्या.
अप्रतिम मित्रा... आम्हाला
अप्रतिम मित्रा...
आम्हाला येथे बसल्या-बसल्या कोकण दर्शन घडवतोय त्याबद्दल तुझे मनापासुन धन्यवाद..
सरळ सरळ हुक्का पिताना दिसतोय
सरळ सरळ हुक्का पिताना दिसतोय की तो...>>>हिम्स, अरे केला बदल. चुकीची "मिस्टेक" झाली
अरे वा, यातले काहीच फोटो आधी
अरे वा, यातले काहीच फोटो आधी बघितले होते. भांड्यांच्या फोटोतला चकलीचा साचा आता आता पर्यंत आमच्या कडे होता. शेवयाचा लाकडी शेवगा (?) पण मी वापरला आहे. तांब्यांच्या तपेल्या भात / पेजेसाठी वापरत असत.
असेच एखादे गाव, जिवंत माणसे असलेले असायला पाहिजे. (कोकणात अजून फार बदल झालेला नाही.) तिथे जाउन त्यांच्या घरचे पदार्थ खाता आले पाहिजेत.
छान आहे हे.. मी गेलो होतो ३
छान आहे हे.. मी गेलो होतो ३ वर्षांपूर्वी...
मचाण आहे तिथे असणाऱ्या दुकानात सरबत काय मस्त मिळते... 
अरे माहिती देताना त्या मुली 'आमच्या कोकणात' हा शब्द प्रयोग खूप वापरतात.. मी त्यांना सूचना दिली होती की आमच्या ऐवजी 'आपल्या कोकणात' असे म्हणायला हवे.. आता काय बोलतात ठावूक आहे का??? की अजून आमचे आमचेच सुरू आहे???
मस्तच....५०० वर्षापुर्वीचा
मस्तच....५०० वर्षापुर्वीचा कोकण आणि प्रचि सुद्धा...
येथून अवघ्या १ किमी अंतरावर
येथून अवघ्या १ किमी अंतरावर मालगुंड आहे...
येथे जाऊन कुसुमाग्रजांचे गाव आणि घर नक्की बघावे असे आहे...
योगेश , मस्तच रे आवडत्या
योगेश , मस्तच रे
आवडत्या १०त .
योगेश... मस्तच
योगेश... मस्तच
योगेश कुठुन कुठुन रत्न शोधुन
योगेश कुठुन कुठुन रत्न शोधुन काठतोस रे ? खुप छान आहे.
पेपरात वाचले होते.. आज बघायला
पेपरात वाचले होते.. आज बघायला मिळाले.. मस्त फोटोज !
योगेश मस्तच रे
योगेश मस्तच रे
लय भारी...................
लय भारी...................
छानच , आज सकाळी -सकाळी माझ्या
छानच ,
आज सकाळी -सकाळी माझ्या ऑफीस मध्ये याबदद्ल चर्चा झाली .
हे पहायला खूप चालाव लागत म्हणे . प्रत्येक देखावा दुर-दुर आहे अस समजलं
योगेश.... मी नव्हतो गेलो
योगेश....
मी नव्हतो गेलो इथे.... नंतर कळले...
दशावताराचा प्रयोग आवडला....
योगेश, अतिशय माहितीपूर्ण
योगेश, अतिशय माहितीपूर्ण लेख.
फोटोही झक्कास.
छान प्रचि! येथून अवघ्या १
छान प्रचि!
येथून अवघ्या १ किमी अंतरावर मालगुंड आहे...

येथे जाऊन कुसुमाग्रजांचे गाव आणि घर नक्की बघावे असे आहे...
ते केशवसुतांचं गाव आहे. कुसुमाग्रज नाशिकचे.