पहीला भाग इथे वाचा.
बघता बघता दूसर्या संकटानेही आमच्या घरात चोरपावलांनी शिरून स्वयंपाकघरात (आणि पोटात..) प्रचंड गदारोळ माजवला.
त्याचं झालं असं..
मागे एकदा सौ. ने मला आठवडाभर वांग्याचीच भाजी खायला घातली. दूपारच्या जेवणात वांगं...! रात्रीच्या जेवणातही वांगं...! आठवडाभर वांगं वांगं खाऊन माझं सर्व अंग अंग वांगमय झालं होतं. "वांगं" या विषयावर एखादं वाङ्मय (आतातर याला "वांगमय"च म्हटलं पाहीजे.) लिहावं, असं मला वाटायला लागलं.
"आज कोणती भाजी करू?" आठवडाभरानंतर सौ. ने लाडीक प्रश्न केला.
"वांग्याचं शेतच दाखव एकदाचं. तिथचं जावून चरून येतो." मी वांग्यासारखा जांभळा-निळा होऊन म्हणालो.
"अहो, त्यादिवशी फारच स्वस्त होती वांगी. म्हणून घेवून ठेवली एकदम. कालच संपली." सौ. ने वांगपुराण कथन केलं.
"रोजचं वांगं ठीक आहे. पण त्यातसुद्धा वेगवेगळे प्रकार करायला कुणी शिकवलं नाही वाटतं तूला?" माझ्या रक्तात भिनलेलं वांगं बोललं.
त्यानंतर पुन्हा कधी आमच्या घरी वांगं शिजलं नाही.
दूसरा एक प्रसंगही काहीसा असाच आहे.
त्यादिवशी जेवताना भातात इतके खडे सापडले की मला प्रश्न पडला, "भातात खडे" आहेत की "खड्यांचा भात" आहे?
"माझ्या पोटात सेतू बांधायचा विचार आहे की काय तूझा?" माझे (पोटातले) 'खडे' बोल.
"काय झालं आता?"
"काय झालं..! देवाने चांगले दोन डोळे दिलेत, तरी तूला तांदळातले खडे नीट निवडता येत नाहीत?"
"अस्सं..!" कमरेला पदर खोचत सौ. म्हणाली. "मग देवाने तुम्हांलाही चांगले मोजून बत्तीस दात दिलेत, तरी तुम्हांला भातातले दोन खडे चावता येत नाहीत?" (देवाने दिलेले) माझे बत्तीस दात सौ. ने माझ्याच घशात घातले. "उगाच माझ्या नावाने खडे फोडत असता ते..." वर आणखी हेही...
तेव्हापासून मी कानाला "खडा" लावला.
या दोन प्रसंगानंतर सौ. नी फारच गंभीरपणे घेतलं आणि घराला नव्या संकटाची चाहूल लागली.
सौ. टीव्हीवर येणारे खाना-खजाना, फूडी, मास्टर शेफ असले खाद्यविषयक शो फार "चवीने" पाहू लागली. तिलाही ते पदार्थ बनवण्याची आणि (ते मला खायला घालून ) माझ्यावर ट्राय करण्याची खुमखुमी आली.
सौ. भलतीच "शेफा"रली.
आता घरात विविध प्रकारच्या भाज्या, मसाले, सॉसेस, ते पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, रेसीपींची पुस्तके यांची रिघ लागली.
स्वयंपाकघरात भांडी वाजू लागली.
"गायनातले सगळे राग सौ. भांड्यांकडून वदवून घेत असावी" मला संशय आला.
घरात रोज नवीन पदार्थ बनू लागले. चला, हे संकट निदान आपल्या पोटासाठी तरी फायद्याचं ठरेल, या आनंदात मी होतो. पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही.
त्यादिवशीची गोष्ट. सौ. ने एक नवीन पदार्थ तयार करून मला खायला घातला.
"नऊ धान्याचा धान्यवडा आहे हा..!" सौ. ने पदार्थाचं नाव सांगितलं.
मी दाताने त्याचा तुकडा तोडण्याचा प्रयत्न केला. पण तुकडा तुटेना. त्या वड्यात नऊ धान्याची ताकद आहे, हे मला पटले. धान्यवडा अगदी रबरासारखा ताणत होता. दातांच्या अनेक करामती करून अथक प्रयत्नांनी शेवटी एकदाचा तो तुकडा तोंडात आला.
मी चघळत बसलो.
आणखी किती वेळ तो चघळला असेल काही कल्पना नाही. पण त्यामुळे पोटात मात्र नवीन कल्पना जन्माला आली.
मी लागलीच टॉयलेटमध्ये गेलो.
तोंड वेडं-वाकडं करून धान्यवडा "दूसर्या मार्गाने" काढण्याचा प्रयत्न केला. पण वडा निघेना. मी घामाघूम झालो.
अखेर बरीच "वडा"ताण केली तेव्हा कुठे पोटातल्या त्या धान्यवड्याला "जलसमाधी" लाभली. आणि माझ्या मनावरचा (आणि अर्थात.. पोटावरचा) ताण कमी झाला. मी सुटकेचा नि:श्वास सोडला. (कुठून ते विचारू नये.)
नुकत्याच गेलेल्या दिवाळीचीही गोष्ट काही निराळी नाहीए.
जसजशी दिवाळी जवळ येवू लागली, सौ.च्या फराळाच्या तयारीला उत येऊ लागला.
"आता काय वाढून ठेवलयं आणखी?" असा मी विचार करू लागलो.
दिवाळीच्या मुहूर्तावर दोन लाडू माझ्या बशीत पडले. त्यातल्या एका लाडवाचा मी चावा घेवू लागलो. माझे दात कमजोर झाले असावेत अथवा लाडू कडक झाले असावेत, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो.
"फारच कष्टाने बनवलेले दिसताहेत लाडू?" मी दातांची काळजी करत विचारले.
"कस्च कसं..!" माझ्या टोमणेवजा स्तुतीने सौ. लाजून म्हणाल्या. (सौ. लाजली की असचं काहीतरी तोंडाने पुटपुटते. मला अजून त्या शब्दाचा अर्थ कळालेला नाही.)
"तुम्हांला कसं कळलं?" इति सौ.
"नाही म्हणजे खातानासुद्धा बरेच कष्ट करावे लागताहेत, म्हणून म्हटलं." असं म्हणून मी लाडवाचा जोरात चावा घेतला आणि "कट्ट" असा आवाज करून माझ्या एका दाताने बशीत उडी घेतली.
एक चाव्यासाठी एक दात तर........ याप्रमाणे मी बत्तीस दातांचा हिशेब करू लागलो.
दात गमावल्याचं दु:ख नव्हतं पण सौ. सोकावत होती.
आदल्या रात्री भिजत ठेवून दुसर्या दिवशी सकाळी ते लाडू खावून संपवले एकदाचे.
आता दिवाळी जवळ आली की मला लाडूंची भिती नक्की वाटेल,
न जाणो ते लाडूही सौ. ने कष्टाने बनवले तर..
* * *
हा लेख इथेही वाचू शकता.
छान आहे वांग पुराण
छान आहे वांग पुराण
अप्रतिम लेख आहे keep it up
अप्रतिम लेख आहे keep it up
"वांगं" या विषयावर एखादं
"वांगं" या विषयावर एखादं वाङ्मय (आतातर याला "वांगमय"च म्हटलं पाहीजे.)>>>>>>>>
माझ्या रक्तात भिनलेलं वांगं बोललं.>>>>>>>>>>>
सौ. भलतीच "शेफा"रली>>>>>>>>>>
"गायनातले सगळे राग सौ. भांड्यांकडून वदवून घेत असावी" मला संशय आला>>>>>>>>>>
व्वा...:खोखो: खुमासदार लेखन.... खूप आवडलं...
"नऊ धान्याचा धान्यवडा आहे हा..!" सौ. ने पदार्थाचं नाव सांगितलं.>>>>>>>>>>
धान्यवड्याच्या उल्लेखाने मला ''एकापेक्षा एक'' चित्रपटातील निशिगंधा वाड आठवली...... ती अशोक सराफ चे असेच हाल करायची ''धान्यवडा'' खावू घालून.
आभार @ डॉ. मी ही तो चित्रपट
आभार
@ डॉ.
मी ही तो चित्रपट पाहीला आणि तो धान्यवडा मला माझ्या लेखात घेण्याचा मोह अनावर झाला.
"माझ्या पोटात सेतू बांधायचा
"माझ्या पोटात सेतू बांधायचा विचार आहे की काय तूझा?" >>>>>>>>>>>>>>> चला रामायण part 2 तयार होते आहे.
जबरी लिव्हलयस... सही लगे
जबरी लिव्हलयस... सही लगे रहो....
पहिल्या भागाइतकी मजा नाही
पहिल्या भागाइतकी मजा नाही आली.
छान...खुदुखुदु हसत होते लेख
छान...खुदुखुदु हसत होते लेख वाचताना.
आभार
आभार
आवड्या आवड्या.
आवड्या आवड्या.
मस्त.. पहिल्या भागापेक्षा हा
मस्त.. पहिल्या भागापेक्षा हा भाग अधिक आवडला...
पुढचा भाग येऊ दया... काय होतंय घरात अजून ???
मस्त लिहिलयं !
मस्त लिहिलयं !
धान्यवडा
धान्यवडा
मस्त आहे!
मस्त आहे!
मस्त आहे.. वांग्याचं शेतच
मस्त आहे..


वांग्याचं शेतच दाखव एकदाचं. तिथचं जावून चरून येतो." >>
आदल्या रात्री भिजत ठेवून दुसर्या दिवशी सकाळी ते लाडू खावून संपवले एकदाचे.>>
खड्यांचे डायलॉग पण सही आहेत
खड्यांचे डायलॉग सगळ्यात
खड्यांचे डायलॉग सगळ्यात आवडले. पुलेशु.
जबराट मित्रा... सही लिहितोस
जबराट मित्रा... सही लिहितोस तु...

हसुन हसुन डोळ्यातुन पाणी आले...
काय आवडले सांगायचे तर अख्खा लेखच ईथे लिहावा लागेल...
अशक्य...